आजची आपली रचना चित्रपटाला कोणत्यातरी एका वर्गात बसवणारी आहे. पण यापलीकडे जाऊन चित्रपट एक अनुभव असा विचार ठेवून आदीश केळुस्कर या तरुण दिग्दर्शकाने साकारलेला ‘कौल’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने त्याच्याशी साधलेला संवाद.

मराठी चित्रपटांची जागतिक चित्रपट महोत्सवात चर्चा होणं यात आताशा काही नावीन्य राहिलेले नाही. कधी आशयाबाबत, कधी दिग्दर्शनाबाबत, कधी कलाकारांसाठी, तर कधी छायाचित्रीकरणासाठी अशी चर्चा ऐकू येत असते. त्यावर भरपूर लिहिलं, बोललं जात असतं. पण बऱ्याच वेळा अशा चित्रपटांना एखाद्या साच्यात, म्हणजे गटात बसवायची आपली धडपड असते. अशानं होतं काय तर त्या चित्रपटाचा म्हणून एक ठरावीक वर्ग तयार होतो आणि अमुक अमुक चित्रपट हा त्या तमुक तमुक वर्गाचा आहे अशी धारणा होऊ लागते. अशी धारणा आपल्याकडे तयार व्हायला लागून बरीच वर्षे झाली. या रचनेचाच आधार घ्यायचा तर ‘कौल’सारखा एखादा चित्रपट पाहिल्यावर त्याचा गट ठरवणं तसं अवघडच आहे. किंबहुना चित्रपटाला अशा गटात बसवायची दिग्दर्शकाचीच इच्छा नाही. त्यामुळे तर हे काम आणखीनच कठीण वाटू लागतं. म्हणूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखीनच वाढते. हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta entertainment Murder Mubarak movie released on Netflix channel
अजब व्यक्तिरेखांची गजब जंत्री

मुंबई इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव, पुणे इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव अशा ठिकाणी पुरस्कार पटकावलेल्या, गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेल्या या चित्रपटाबद्दल सध्या चांगलीच उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे हा न कळणाऱ्या टाइपातला चित्रपट आहे का अशीदेखील विचारणा होत असते. एका वाक्यात हा चित्रपट कसा आहे हे सांगायचे तर हा चित्रपट म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे. जो प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो आणि तो त्याचा स्वत:चा असतो. व्यक्तीगणिक तो बदलू शकतो. तुम्ही कसं पाहताय त्यावर अवलंबून आहे. पण तुम्हा प्रत्येकाला तो त्या अनुभवाची जाणीव करून देतो. कारण एकतर ठोकळेबाज साच्यात ओतलेल्या गोष्टी पाहण्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे. आणि मुळातच आदीश केळुस्करला म्हणजेच दिग्दर्शकाला हे साचे, गट मान्य नाहीत. किंबहुना त्याला प्रस्थापित, प्रचलित असं काहीच मान्य नाही. हे असंच करायचं असतं आणि ते तसंच यांसारख्या संकल्पनांना तो थेट छेद देतो. त्याचं हे छेद देणं केवळ त्या साच्यालाच नाही तर प्रस्थापित परिभाषेलादेखील छेद देणारं आहे.

आदीशशी संवाद साधताना त्याच्या प्रत्येक वाक्यात त्याची चित्रपट निर्मितीमागची ही भूमिका स्पष्टपणे जाणवत राहते. खरं तर एफटीआयआयसारख्या संस्थेत शिक्षण घेतलेल्यांनादेखील आपण अशा साच्यात बसवत असतो. पण आदिश त्यांपैकी नाही. किंबहुना तो 12-lp-anilएफटीआयआय हेदेखील एक ‘इल्युजन’ आहे असे सांगतो. असे विषय तेथेच सुचतात वगैरे आपली समजूत असते. पण ‘कौल’ त्या पठडीतला नाही. आदीश सांगतो की तंत्रज्ञान सर्वासाठी सारखेच असते, पण मांडणी वेगळी असू शकते. कॅमेरा तोच पण क्लोजअपच्या हजार तऱ्हा असू शकतात. या चित्रपटाचे, आदीशच्या भाषेत विचित्रपट कसा सुचला हे पाहणं महत्त्वाचं ठरते. आदिश सांगतो, ‘‘अनेक तरंगांचा आतमधून आलेला उद्रेक. आपण भरपूर काही शिकत असताना त्यामध्ये अनेक रचनांचा समावेश असतो. प्रचंड उलथापालथ होत असते. एखादी गोष्ट अशीच होईल असे त्यात नसते. पण जेव्हा उद्रेक होतो, तेव्हा त्यात मॅडनेस असतो, पण त्याला मेथड असते, मी त्यामध्ये फिरून येईन, पण वाहवत जाणार नाही याची खात्री ट्रेनिंग देते. आपण किती पुढे जाऊ हे आपल्यावर अवलंबून आहे. एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये जात राहिलात तर वास्तव आणि तुम्ही निर्माण करीत असलेली प्रतिसृष्टी यातील सीमारेषा सांभाळावी लागते. हे शब्दात सांगणं कठीण असतं.’’ म्हणूनच याला आदिश विचित्रपट म्हणतो. आदिश सांगतो की चित्रपट संथ आहे की वेगवान आहे, क्लाससाठी आहे की मासेससाठी यापेक्षा तो चित्रपट तुम्हाला काय अनुभव देतो हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांची आयक्यू पातळी कमी आहे का जास्त याचा येथे संबंधच येत नाही. जर तुम्हाला आइनस्टाइनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत माहीत-समजला असेल तर तो तुम्ही बारमेडलादेखील व्यवस्थित सांगू शकता. अगदी तसेच चित्रपटगृहात आमच्यावर विश्वास ठेवून आलेल्या प्रेक्षकाला काही तरी नवा अनुभव द्यायचा हे महत्त्वाचे आहे. त्याच्या आयक्यूवर चर्चा करायची गरज नाही असे आदिश नमूद करतो.

शहरातून कोकणात शिक्षकाची नोकरी करायला गेलेल्या शिक्षकाची ही गोष्ट आहे. शहरातील त्याचं पूर्वायुष्य, कोकणातील दोन वर्षांचे वास्तव्य, त्यात आलेले अनुभव, कोकणच्या गूढ पाश्र्वभूमीवर त्याला भेटलेली ती गूढ व्यक्ती, त्यातून निर्माण झालेला संभ्रम आणि तो सोडवण्याची त्याची धडपड असं हे कथानक. तसं पाहिलं तर सरळसाधं. पण ते मांडताना केलेल्या प्रयोगामुळे चित्रपटाचा क्लास, प्रेक्षकवर्ग, परिभाषा अशा घटकांना धक्का लागतो आणि अनेक प्रश्न निर्माण होतात.

अर्थात आदीशच्या म्हणण्यानुसार हे असे साचे अथवा वर्ग त्याला मान्य नसतील तरीदेखील आजच्या मार्केटिंगमध्ये असणाऱ्या ठोकताळ्यांचा भाग उरतोच. आदीश त्याचं अगदी साधं सरळ विश्लेषण करतो. तो सांगतो की, एखादी गृहिणी जर डेली सोप पाहत असेल तर टीआरपीच्या माध्यमातून गृहिणींना हेच आवडतं असं आपण ठरवतो. पण तीच गृहिणी संपादकीय वाचत असेल, ग्रेस, खानोलकर वाचत असेल तर त्याची नोंद होत नाही. मराठीत बोललेलं त्या गृहिणीला आवडतं, आणि जे उपलब्ध आहे ते ती पाहतेय. पण याचा अर्थ तेच तिला हवंय असं होत नाही. आवडतं त्यामुळे जे उपलब्ध आहे ते पाहिलं जातं. हे हवंय असं अनेकांना अनेकदा वाटतं. म्हणूनच आदिशच्या मते असं काही ठरवून चित्रपट करायचा नसतो. अर्थातच ‘कौल’ हादेखील असं काही ठरवून केलेला चित्रपट नाही. त्यामुळे चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकाची वैचारिक पातळी, जडघडण वगैरेशी काहीही संबंध नाही. कदाचित त्या प्रेक्षकाने भरपूर वाचलेलं असेल किंवा एखाद्याने नसेलही, कदाचित हा चित्रपट ही त्याची सुरुवात असेल. त्यामुळेच प्रेक्षकांच्या आयक्यूशी चित्रपट पाहणं जोडायची गरज आदिशला वाटत नाही. पुणे फेस्टिव्हलमध्ये एका तरुण प्रेक्षकाची प्रतिक्रिया म्हणूनच मार्मिक आहे, ‘हा चित्रपट पाहायला आयक्यूची नाही तर कॉमनसेन्सची गरज आहे.’ अर्थातच आजवर ‘कौल’ला मिळालेला प्रतिसाददेखील असाच आहे. विशेषत: तरुण वर्गातून त्याला हा प्रतिसाद मिळतोय.

चित्रपट आणि स्वत:चा अनुभव अशी काही सरमिसळ यात झाली आहे यावर आदीश खूप मार्मिक टिप्पणी करतो. तो सांगतो, ‘‘असा काही फरक उरत नाही. माझा अनुभव आणि चित्रपट असं तोडून पाहता येत नाही. कल्पना माझी असली तरी ती माझ्यापुरतीच मर्यादित नाही. मी माझ्यासाठी चित्रपट करतोय याचा अर्थ असा की, माझ्यातले, तुमच्यातले सर्वाच्यातले तरंग माझ्या माध्यमातून प्रतीत होतात. त्यातून तयार झालेला ऱ्हिदम सर्वांपर्यंत पोहोचवायचाय. म्हणूनच याला ‘फिल्म बाय मी’ असं म्हणता येणार नाही, तर ‘फिल्म थ्रू मी’ असं म्हणावं लागेल.’’

या चित्रपटात नावीन्य भरपूर आहे; किंबहुना त्यासाठीच हा चित्रपट पाहायला हवा. चित्रपटाची म्हणून एक परिभाषा असते, चित्रीकरणाचं एक शास्त्र असतं, तसेच त्याचे अगदी खास ठोकताळे असतात. अशा सर्व घटकांना आदिशने चित्रपटातून थेट छेद दिला आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर श्रेयनामावली दाखवताना रस्त्यावरील गाडीतील कॅमेरा थेट उलटा होतो आणि आजूबाजूचा कल्लोळ टिपत अंधूक, काहीशा धुरकट आकाशात श्रेयनामावली दाखवू लागतो. संपूर्ण चित्रपटात आदिश असाच कॅमेऱ्याची ठरावीक साच्यातील भाषा तोडताना दिसतो. नवीन रचना दाखवायची असेल तर ती कलाकृतीच्या सुरुवातीपासूनच मांडत शेवटपर्यंत त्याचं नावीन्य टिकवणं महत्त्वाचं असतं. आदीशच्या चित्रपटात अमेय चव्हाणच्या कॅमेऱ्यातून हे नावीन्य टिकवण्याची  धडपड स्पष्टपणे जाणवते. अगदी थेट. म्हणजे प्रचलित पद्धतीत चित्रीकरणाचे जे संकेत आहेत ते तो धुडकावून लावतो. पण मग हे बंड म्हणायचं का, तर तसंदेखील नाही. आदिश सांगतो की, ही स्टोरीटेलिंगची  नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि हे पटण्यासारखं आहे.

संगणक, मोबाइल अथवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधील ऑपरेटिंग सिस्टीम ही अंतर्गत मूळ रचना वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडत असते. त्या उपकरणाच्या अंतर्गत रचनेत डोकावण्याची ती वेगळी खिडकी असते. आदिशचा ‘कौल’ हेच काम करतो. तो चित्रपटनिर्मितीच्या पठडीबाहेरच्या संकल्पना हाताळतो. त्याला उत्तम ध्वनी आणि संवादाची जोड देतो. पण सादरीकरणातले प्रयोग सुरूच असतात.

ध्वनी हादेखील चित्रपटात कलाकाराचं काम करतो असं येथे वाटू लागतं. पटकथा लेखनानंतर आदीशने ध्वनी पटकथादेखील (साऊंड स्क्रिप्ट) लिहिली. सुरुवातीला ध्वनीसाठी स्टेरिओ पद्धतीचे आयोजन उपलब्ध होते. त्यामुळे त्याअनुशंगाने पुन्हा ध्वनी पटकथा लिहिली गेली. पण एकंदरीतच चित्रपटाच्या निर्मिती आणि आशयाकडे पाहिल्यावर चिंटू सिंग या निर्मात्यांनी डॉल्बी अ‍ॅटमॉस ही ध्वनियोजना वापरण्याला होकार दिला. त्यामुळे पुन्हा एकदा अ‍ॅटमॉससाठी वेगळे साऊंड स्क्रिप्ट लिहिले गेले. डॉल्बी अ‍ॅटमॉस ही सध्याची सर्वात अद्ययावत ध्वनी योजना आहे. एकाच वेळी १२८ ट्रॅक त्यामध्ये असतात. आदीशच्या डोक्यात जे घाटत होते ते प्रत्यक्षात येण्यासाठी ही ध्वनियोजना पूरक असल्याचे निर्मात्यांना जाणवणे हे नक्कीच उल्लेखनीय म्हणावे लागेल. हॉलीवूडमधील मोठे निर्माते या ध्वनियोजनेचा वापर करतात. कौलसाठी या ध्वनी संयोजनाचा वापर होणे हे अर्थातच मराठी चित्रपट उद्योगासाठी विशेषच म्हणावे लागेल.

ध्वनीवर इतका भर देण्यामागचा आदीशचा हेतू अगदी सहज साधा आहे. तो सांगतो की, ध्वनी लहिरी या सर्वात सूक्ष्मतम असतात. जेव्हा प्रकाश नव्हता, विजेचा शोध लागला नव्हता तेव्हादेखील ध्वनीचे अस्तित्व होते. अगदी आईच्या पोटात असल्यापासूनच. त्याचाच हा परिणाम आहे. अर्थातच चित्रपट सुरुवातीला दृश्यात्मक आणि ध्वनी प्रयोगातून तुम्हाला खिळवून ठेवतो, कथेच्या गाभ्याकडे खेचत नेतो आणि पुढच्या टप्प्यात तुम्हाला कथेत अडकवून गदागदा हलवून सोडतो.

या चित्रपटाचे जवळपास ९० टक्केचित्रीकरण कोकणात झाले आहे. एकंदरीतच कोकणचा अद्भुतता, अंधश्रद्धा, गूढपणाशी संबंध अधिक आहे. आदीशने हा कोकण अनुभवला आहे. त्यामुळे जाणीवपूर्वकच हा चित्रपट कोकणात साकारला आहे. त्याला कोकणाचे छान छान निसर्ग चित्रण करायचे नव्हते, तर त्यात दडलेला विक्षिप्तपणा, गूढता कॅमेऱ्यात पकडायची होती.

इतके सारे बदल करणे हे खास ठरवून केलं का यावर आदीशचं उत्तर असते की, तो काही प्रतिक्रियावादी नाही. ठरवून असं काहीच केलेलं नाही. कोणालाही हे करता आले असते. पण आपण आज मुख्य प्रवाह, कला प्रवाह, लोकांची आवड, त्यांना काय हवंयं अशा गृहीतकांमध्ये अडकलोय. त्यामुळे सिनेमाकर्ते असं काही करायला घाबरतात. प्रेक्षकांची गरज काय यावर विचार होत नाही. सिनेमाला असं एका साच्यात ठरवून कधीच बसवता येणार नाही. आदीश सांगतो की आपल्याकडे प्रत्येक टप्प्यावरचे गाजलेले चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल की त्या त्या काळात सिनेमाकर्त्यांनी त्या त्या काळानुसार नावीन्यच मांडलेले आहे.  लोकांना काय हवंय वगैरेमध्ये ते अडकलेले नाहीत. १९५२ साली जेव्हा प्यासा आला तेव्हा आपल्याकडे साक्षरता अगदीच कमी होती. पण लोकांनी प्यासा स्वीकारला होता याकडे तो लक्ष वेधतो. त्यामुळे चित्रपट करताना लोकांच्या आयक्यूपर्यंत पोहचायची गरज नसल्याचे तो पुन्हा एकदा अधोरेखित करतो.

हल्ली आपल्याकडे कोणताही चित्रपट हा दोन लेबलं घेऊन येतो. करमणूक आणि सामाजिक संदेश. पण हा चित्रपट यापैकी दोहोंना थेट हात घालत नाही. तो फक्त तुम्हाला एक अनुभव देतो. पण ही लेबलांची गणितं तयार झाली आहेत ती मार्केटिंगमुळे. आदीश या संदर्भात स्टीव्ह जॉबचे उदाहरण देतो. स्टीव्हने एकदा सांगितले होते की, ‘मार्र्केटिंग हे चांगल्या उत्पादनाला मदत करणारे असावे, मार्केटिंगप्रमाणे उत्पादन तयार करणे ही रचना चुकीची आहे. किंबहुना प्रत्येक उत्पादनासाठी मार्केटिंगची नवी पद्धत शोधणे महत्त्वाचे आहे.’ पण आज आपण मार्केटिंग आधारित उत्पादन तयार करत आहोत.

‘कौल’चं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्टय़ येथे नमूद करावं लागेल, ते म्हणजे त्याला मिळणारा तरुणाईचा प्रतिसाद. आदिश सांगतो की, आजची तरुणाई साचेबद्ध रचना नाकारते. आणि त्यांच्याकडे प्रचंड ताकदीच्या गोष्टी आहेत. म्हणूनच चित्रपटाची ही नवीन भाषा तो छोटय़ा शहरांमध्ये घेऊन जात आहे. उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा ठिकाणी गेल्या महिन्याभरात त्याने ‘कौल’चे विशेष खेळ केले आहेत.

‘कौल’वर इतकी चर्चा करताना नेहमी विचारला जाणारा प्रश्न येतोच, चित्रपटाची एका ओळीत गोष्ट काय (वन लाइनर स्टोरी)? आदिश त्यासाठी चित्रपटातीलच एका संवादाचा आधार घेतो. ‘‘चमत्कार लोकांक हवे असत, पण चमत्कार सहन करुची ताकद नसते.’’ सामान्य माणसांमध्ये असामान्याचा शोध घेण्याची ताकद आहे का, याचा मागोवा चित्रपटात घेतला आहे असं थोडक्यात सांगता येईल. पण हा स्वत:चा शोध नाही, कारण अशा शोधामध्ये उद्दिष्ट असतं; येथे मागोवा घ्यायचा आहे. काही तरी आहे, जे निसटू पाहतंय ते पकडायचा. आदिश सांगतो की, आपण स्वत:लाच खूप घाबरत असतो, स्वत:च्या आतमध्ये डोकावायला. अगदी जवळच्या व्यक्तीलादेखील आपण अशा गोष्टी सांगत नाही. त्या साऱ्याचा मागोवा या चित्रपटात दिसून येतो.

थोडक्यात सांगायचं तर, कॅमेरा माणसाच्या आतमध्येच डोकावतोय. पण आदिश सांगतो की, चित्रपटात नवीन काहीच नाही. हेच चित्रपटाच्या कथेतदेखील सांगितलं आहे, ‘‘तुका माहीत नाही असं या जगात काहीच नाही.’’ म्हणजेच जे आहे तेच, पण वेगळ्या पद्धतीने कथन करणं.

या सर्व रचनेवर ‘कौल’ हे नाव नेमकं कसं आणि का आलं हे पाहणंदेखील रंजक आहे. आदीशला ते सुचलं आणि त्याने दिलं असं अगदी एका वाक्यात त्याचं उत्तर आहे. पण जेव्हा पुन्हा एकदा त्याने या नावाचा मागोवा घेतला तेव्हा त्याला ‘कौल’चं मूळ आर्यन-रशियन भाषेत मिळालं. तर काश्मीरमध्ये कुला नावाची एक परंपरा आहे. ही जमात पुजारी आहे. म्हणजे दैवीसंदेश लोकांपर्यंत पोहोचवणारी. पण ही जमात पारंपरिक पुजारी पद्धतीची नाही. तर ती सामख्यासारखी आहे. सामख्या म्हणजे हिंदूू धर्मात ज्या सहा मुख्य तात्त्विक विचारधारा आहेत, त्यापैकी आस्तिक-नास्तिकच्या मध्ये असणारी विचारधारा. ह्य़ाच जमातीचा संदर्भ बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्रातदेखील आहे. पण या नावात आणखी एक अर्थदेखील दडलेला आहे. ‘कौल’ या नावाचा असा मागोवा घेताना एकदा आदीशला अचानक कव्वाली हा शब्द आठवला. त्याची फोड आहे- कौल आ अली-अलीकडून आलेला संदेश- ‘कौल’. सुरुवातीला ‘कौल’ नाव सुचलं तेव्हा हे सारं काहीच डोक्यात नव्हतं. पण त्या शब्दाचा, संदेशाचा मागोवा घेताना हे सारं जाणवलं. पण हा जो संदेश आहे तो नेमका कसा आहे, काय आहे, मुळात परमेश्वरच कसा आहे, तो आहेच का, त्याची ऑपरेटिंग सिस्टीम काय, नैतिक-अनैतिकतेची परिमाणं कशाला हवीत, अशा अनेक प्रश्नांची, घटकांची विचारशृंखला आदिशच्या विचारांमध्ये आहे आणि तिचं प्रतिबिंब चित्रपटात उतरताना दिसतं. म्हणूनच चित्रपटाची गोष्ट सांगण्यापेक्षा तो पाहून अनुभव घ्यायला हवा.

अर्थात असं असलं तरी चित्रपट हा व्यवसाय आहे. त्यामुळे निर्मिती करतानाच त्यातून फायदा काय, हा प्रश्न शिल्लक राहतोच. पण असा विचार चित्रपट करताना आदीशने केलेला नव्हता. जे करायचं ते त्याने केलं आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो प्रदर्शित होत आहे. पण निर्मात्याला गुंतवलेल्या पैशांचा परतावा मिळत नसेल तर केवळ दिग्दर्शकाला चित्रपट केल्याचं समाधान मिळणं एवढाच मर्यादित हेतू या चित्रपटाचा आहे असं म्हणायचं का? नेमकं यातून काय साधायचं हादेखील प्रश्न उपस्थित होतोच. त्यावर आदीश सांगतो, ‘‘मला चित्रपट करण्याचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं महत्त्वाचं वाटतं. ‘कौल’ने निर्मात्यांचे पैसे मिळवून दिले तर उद्या असा चित्रपट कळत नाही असा प्रश्न कोणीही विचारणार नाही. दिग्दर्शकला चित्रपटनिर्मितीचं स्वातंत्र्य मिळणं हे कायमच सर्वात महत्त्वाचं आहे.’’
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2