छोटय़ा मुलांनाच नव्हे, तर मोठय़ा माणसांनाही खिळवून ठेवणारी कार्टूनची दुनिया आपल्याला वाटते तितकी सोप्पी नसते. तिची गुंतागुंत उलगडून दाखविणारा लेख

अ‍ॅनिमेशन म्हटलं की आपल्याला सर्वात आधी एकमेकांच्या जिवावर उठलेले परंतु शेवटी तेवढय़ाच प्रेमाने एकत्र येणारे ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’ आठवतात. अस्सल मनोरंजन करणारी ही जोडगोळी गेली पंच्चाहत्तर वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे आणि यापुढेही गाजवेल यात शंका नाही. प्रत्यक्षात कधीच अस्तित्वात नसलेल्या ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’ या व्यक्तिरेखांनी मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली असली तरी अ‍ॅनिमेशन म्हणजे फक्त कार्टून ही संकल्पना आता खूप मागे पडली आहे. अ‍ॅनिमेशन हा प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर ते आता सामान्य माणसासोबत संवाद साधतंय. कारण कार्टूनव्यतिरिक्त चित्रपटनिर्मिती, जाहिराती, गेमिंग, विज्ञान, तंत्रज्ञान, मोबाईल, ऑटोमोबाइल डिझायनिंग, मेडिकल, इंजिनीअरिंग, शिक्षण, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये अ‍ॅनिमेशनचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. अमुक टूथब्रश तुमचे दात कशा पद्धतीने साफ करतो, बँकेत खातं कसं उघडावं, बाजारात नव्याने आलेल्या गाडीची वैशिष्टय़े कोणती, चॉकलेटच्या आतमध्येही किती चॉकलेट आहे, नवीन घराची व्हच्र्युइल सफर, रात्री झोपताना कोणती मॅट तुमच्या पाठीला कशी आराम देते, असं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि तुमच्या आयुष्यातील जवळपास प्रत्येक गोष्टीमध्ये आता अ‍ॅनिमेशनने शिरकाव केलेला आहे. त्यामुळे पूर्वी केवळ मनोरंजनापुरतं असलेलं अ‍ॅनिमेशन आता आपल्या आयुष्याचा एक भाग झालं आहे.

तंत्रज्ञानाचा भाग मोठा असला तरी चित्रकला हा अ‍ॅनिमेशन पाया आहे. कला आणि तंत्रज्ञान यांचा उत्तम मिलाप म्हणून अ‍ॅनिमेशनकडे पाहिलं जातं. म्हणूनच चहूबाजूंनी अ‍ॅनिमेशनचं जग विस्तारतंय. एखादी अस्तित्वात नसलेली गोष्ट सजीव करून दाखवणं अ‍ॅनिमेशनच्या साहाय्याने सहज शक्य आहे. टी.व्ही.वर आपल्या आवडत्या मालिका पाहताना विश्रांतीच्या वेळेत येणाऱ्या जाहिराती या अ‍ॅनिमेशनशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत, अशी परिस्थिती सध्या आहे. जाहिरात आकर्षक करण्यासाठी आणि उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अ‍ॅनिमेशन वापरले जाते. पूर्वी कागदावर केलं जाणारं काम आता संगणकावर अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून होऊ  लागलं आहे. मोठमोठी शहरं डिझायनिंग हब बनली असून, बििल्डगच्या डिझाइनला अधिकाधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातही अ‍ॅनिमेशनचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. इमारती आणि घराचे आराखडे बनवणे, त्यातील इतर सोयीसुविधा दाखवणं यासाठी अ‍ॅनिमेशनचा खुबीने वापर केला जातो.

आर्किटेक्चरप्रमाणे ऑटोमोबाइल क्षेत्रातही डिझाइनची मागणी वाढली आहे. पूर्वी गाडी तयार करण्यापूर्वी तिचा साचा तयार केला जात असे, पण आता लाखो डिझाइन्स बनवून त्यामधून सिलेक्शन केलं जातं. भारतात शिक्षण क्षेत्रात ई-लìनगचा वापर वाढत असल्याने कोणत्याही धडय़ाचे सुयोग्य पद्धतीने सादरीकरण करण्यासाठी अ‍ॅनिमेशन वापरण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या शिक्षणाचं स्वरूप पाहता येत्या काही वर्षांत हा वापर अधिक वाढण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन ही आता गरज नाही तर जीवनावश्यक वस्तू झाली आहे. त्यावर आपण जवळपास सर्वच गोष्टी करतो. स्मार्टफोनचा सर्वात मोठा वापर हा गेम्स खेळण्यासाठी होतो आणि गेम्स हे अ‍ॅनिमेशनचाच वापर करून तयार केले जातात. त्यासाठी विविध स्टुडिओ कार्यरत आहेत. एवढंच नव्हे तर चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी त्यातील कथेवर आणि व्यक्तिरेखांवर आधारित गेम बनवून तो मार्केटमध्ये उतरवण्याचा ट्रेण्ड सध्या प्रचलित आहे. असे नवनवीन गेम तयार करण्याचं काम अ‍ॅनिमेटर्स करतात. अँड्रॉइडमधील प्ले स्टोअरमधून, ब्लॅकबेरी, आयफोनसारख्या स्मार्टफोन्समध्ये अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करणं सोपं झालं आहे. या अ‍ॅप्लिकेशनची रचनादेखील अ‍ॅनिमेटर्सच करतात.

गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये आपण अ‍ॅनिमेशन क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली आहे. परंतु अद्यापही आपल्याकडे फॅक्टरी म्हणूनच पाहिलं जातं. याचा अर्थ काय? तर आपल्याकडे वस्तू निर्माण होण्यासाठी येते. अ‍ॅनिमेशनपटाची संकल्पना, गोष्ट, कलाकार, अंतिम हातफिरवणी ही परदेशातच होते. याचं कारण आपल्याकडे कलाकार आणि स्टुडिओ स्वस्तात उपलब्ध आहेत. तसंच आपल्याकडे आपलं स्वत:चं मार्केट नाही. त्यामुळे या क्षेत्राचं शिक्षण घेतलेल्यांना रोजगार देण्यासाठी परदेशी कामं घेणं हा एकमेव पर्याय उरतो. असं असलं तरी अगदीच निराशाजनक वातावरण नाही. बालहनुमान, बालगणेश, श्रीकृष्ण, छोटा भीम आदी अ‍ॅनिमेशनपटांनी आपल्याकडे धमाल उडवून दिली आहे. आता तर टूडी वरून झेप घेऊन थ्रीडीचा जमाना आला आहे. २०१२ साली आलेला ‘लाइफ ऑफ पाई’ आणि नुकत्याच आलेल्या ‘जंगलबुक’मधून त्याची प्रचीती येते. या चित्रपटांचा येथे आवर्जून उल्लेख करण्याचं कारण म्हणजे त्यांचं काम भारतातील स्टुडिओमध्ये झालेलं आहे. चित्रपटांसोबत चॅनेल्सनाही आता अ‍ॅनिमेशनचं महत्त्व कळू लागलेलं आहे. पूर्वी परदेशातील मालिका विकत घेऊन त्या डब करून आपल्याकडे दाखवल्या जात. पण आता हे चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे. संपूर्ण अ‍ॅनिमेशन नसलं तरी निदान व्हिज्युइल इफेक्ट्सचा वापर असलेल्या मालिकांची निर्मिती सातत्याने होताना दिसत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये सर्वच चॅनेल्सवर पौराणिक, ऐतिहासिक मालिकांची रेलचेल सुरू आहे. ‘सिया के राम’, ‘अशोका’, ‘महाबली हनुमान’, ‘सूर्यपुत्र कर्ण’, ‘सिया के राम’, ‘महाभारत’, ‘नागिन’ या हिंदी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय मल्हार’, ‘तू माझा सांगाती’, नव्याने आलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मराठी मालिकांमुळे प्रेक्षकांनाही सास-बहू ड्रामापेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळतंय. या मालिकांमध्ये अ‍ॅनिमेशन आणि इफेक्ट्सचा वापर मोठय़ा प्रमाणात असल्याने त्या लोकांच्याही पसंतीस उतरत आहेत.

डिजिटल मनोरंजनाला दर्शकांची मिळणारी पसंती, विविध क्षेत्रात अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक होणारा वापर, संगणकीय खेळांमध्ये झालेली वाढ या सर्व गोष्टींमुळे अ‍ॅनिमेशन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. ११ मिनिटांचा टीव्हीवरील एपिसोड आणि ३० सेकंदाची जाहिरात यांचं बजेट सारखंच असतं. कारण गोष्टी जेवढय़ा कठीण कराल तेवढी तांत्रिक मदत जास्त लागते. यावरूनच जाहिरात क्षेत्रात अ‍ॅनिमेशनला आलेलं महत्त्व ध्यानात येईल. जाहिरात क्षेत्रात अनिमेशनचा वापर ३० टक्के, चित्रपट उद्योगात ४० टक्के, शैक्षणिक क्षेत्र उद्योगात २० टक्के जाऊन पोहोचला आहे.

अमेरिका आणि युरोपात तयार होणाऱ्या अ‍ॅनिमेशनपटांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्यामुळे त्यांना मोठी गुंतवणूक करणं परवडतं. आपण अजूनही आशियाई बाजार पूर्णपणे काबीज करू शकलेलो नाही. तंत्रज्ञान मदतीला असलं तरी मुख्य गाभा गोष्ट सांगणे हा आहे. ती सांगताना त्यामध्ये खूप पैसे गुंतवावे लागतात. कारण एक चांगला अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यासाठी कमीत कमी ३५ कोटींची आवश्यकता असते. तसंच लोकांना चित्रपटगृहात ओढून आणण्याचं आव्हान असतं. एवढा पैसा ओतून तो वसूल होईल का याबाबत निर्माते आजही साशंक आहेत. त्यामुळे ते हीच गुंतवणूक खान मंडळींमध्ये करतात आणि शेकडो कोटी कमवतात.

इंटरनेटमुळे अ‍ॅनिमेशन क्षेत्राला नवीन उभारी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे एकच गोष्ट सलग पाहण्याचा कालावधी कमी होतो आहे. म्हणूनच लहान लहान व्हिडीओंना मोठी मागणी आहे. चॅनेलकडे पूर्वी २२ ते २३ मिनिटांचा एपिसोड असायचा, पण आता ११ किंवा साडेपाच मिनिटांचे एपिसोडही बनवून मागितले जातात. तसंच मनोरंजन हे वैयक्तिक झालं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे तो आपल्या पसंतीनुसार त्याला जे हवं ते पाहायला लागला आहे. आणि हे सर्व इंटरनेटमुळे शक्य आहे. ज्याचा फायदा अ‍ॅनिमेशन क्षेत्राला होत आहे.

अ‍ॅनिमेशनची आणखी एक सकारात्मक बाजू म्हणजे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुम्हाला हवं ते तुम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर आणि स्टुडिओमध्ये बसून निर्माण करू शकता. अभिनय करण्यासाठी कलाकारांच्या तारखा मिळवणं, प्रत्यक्ष शूटिंग करणं या किचकट गोष्टी यातून बाद होतात. असं असताना लोकांच्या अपेक्षा वाढत असल्यामुळे हे काम अधिक आव्हानात्मक झालं आहे.

अ‍ॅनिमेशन तंत्रकौशल्य शिकवणाऱ्या अभ्यासक्रमात डिजिटल फिल्मनिर्मितीच्या सर्व बाबींचा समावेश करण्यात येतो. संकल्पना लेखन, कथा विस्तार, कला-दिग्दर्शन, प्रतिमानिर्मिती आणि डिझाइन या प्रतिमांची मॉडेल्सनिर्मिती, थ्री डी अ‍ॅनिमेशन, लायटिंग, मुद्राभिनय, मोशन ग्राफिक्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, स्टायलायझेशन, टेक्श्र्च्रिंग आदी विषयांचाही या अभ्यासक्रमात समावेश केलेला असतो. ‘स्क्रिप्ट टू स्क्रीन’ असा कथा-संकल्पनेचा प्रवास प्रभावीरीत्या करता येणे शक्य व्हावे अशा तऱ्हेने या अभ्यासक्रमांची रचना केलेली असते. अ‍ॅनिमेशनमध्ये स्टोरी बोर्ड, कॅरेक्टर डिझाइनिंग, हालचाल, मोल्डिंग, शेड, थ्री-डी, कलर, पाश्र्वसंगीत अशा विविध भागातही काम केले जाऊ शकते. या सर्वाना एकमेकांबरोबर जोडण्यासाठी प्लानर आणि एडिटरची आवश्यकता असते. त्यामुळे ज्याच्याकडे सशक्त कल्पनाशक्ती, सृजनात्मक विचार आणि शिकाऊ  वृत्ती आहे त्याला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी दरवाजे नेहमीच खुले असतील.

आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास भारताला अद्याप लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण या बाबतीतही शेजारचा चीन आपल्यापेक्षा पुढे आहे. चीन सरकारने या क्षेत्राविषयी लोकांना प्रशिक्षित केल्यामुळे आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे युरोप आणि अमेरिकेतील बडय़ा स्टुडिओंना त्यांच्याकडून स्वस्तात काम करून मिळते. आपल्याकडे मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, चेन्नई आणि आता दिल्ली अशा मोजक्याच शहरांमध्ये अ‍ॅनिमेशनची कामे मोठय़ा प्रमाणावर केली जातात. त्यामुळे चीनपेक्षा आपण थोडे महागच आहोत. यासाठी भारत सरकारने भारतात तयार होणारे अ‍ॅनिमेशनपट टीव्हीवर दाखवण्यासाठी चॅनेल्सना प्रोत्साहन द्यायला हवं. सरकारी मालकीच्या चॅनेल्सवर भारतीय अ‍ॅनिमेशनपट जास्तीत जास्त दाखवायला हवेत. परदेशात यासाठी मोठय़ा प्रमाणात सबसिडी मिळते, जागा, स्वस्तात कर्जपुरवठा हे फायदेदेखील मिळतात. अशी सबसिडी आणि फायदे भारतातही मिळाले तर येथील इंडस्ट्रीला त्याचा फायदा होईल. सर्वात खेदाची बाब म्हणजे आपल्याकडे शाळा-महाविद्यालयांमध्ये अ‍ॅनिमेशन हा विषयच शिकवला जात नाही. केवळ खासगी क्लासेसमार्फत त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हा विषय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं आवश्यक आहे. या सगळ्यावरून एकच अर्थ काढता येईल तो म्हणजे आज जवळपास सर्वच क्षेत्रात अ‍ॅनिमेशनची गरज भासत आहे, म्हणून या क्षेत्रातील नोकरी व व्यवसायाच्या संधीदेखील वाढल्या आहेत. त्या वेळीच ओळखून मनोरंजनाचा चष्मा उतरवून  अ‍ॅनिमेशनकडे पाहिलं पाहिजे.

17-lp-cartoonअ‍ॅनिमेशनपटांची वाटचाल

अ‍ॅनिमेशन म्हटलं की, आपल्याला सर्वात आधी वॉल्ट डिस्नेची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. त्यांनी अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून स्थिर चित्रांना चालतं-बोलतं करून गोष्टी सांगितल्या. पण काळानुसार अ‍ॅनिमेशनमधील तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होऊ लागलंय. १८६८ मध्ये ‘फ्लिप बुक’सारख्या माध्यमातून अ‍ॅनिमेशनचा जन्म झाला. सर्वप्रथम अ‍ॅनिमेशनसाठी चित्र हेच मूळ माध्यम होतं. १८९२ मध्ये जगातील पहिल्या टूडी अ‍ॅनिमेशन चित्रपटाची निर्मिती झाली. भारतात अमेरिकन तंत्रज्ञाच्या मदतीने १९५७ साली ‘बनियन डिअर’ या चित्रपटांची निर्मिती केली गेली. त्यानंतर फिल्म डिव्हिजनतर्फे १९७४ मध्ये ‘एक अनेक और एकता’ या पहिल्या हिंदी भाषिक अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती करण्यात आली होती. दूरदर्शनसाठी १९८६ साली सर्वात प्रथम ‘घायब अया’ या दहा भागांच्या मालिकेची निर्मिती करण्यात आली, तर भारतातील पहिली वीएफएक्स मालिका म्हणजे ‘कॅप्टन व्योम’ होय. सुरुवातीच्या काळात अ‍ॅनिमेशन हे पूर्णत: चित्रकारावर अवलंबून होतं. मात्र, आता चित्रदेखील संगणकाच्या मदतीने काढली जातात. अ‍ॅनिमेशन जगतातील सर्वात मोठी क्रांती थ्रीडी अ‍ॅनिमेशनमुळे झाली. पिक्सार या अ‍ॅनिमेशन स्टुडिओने १९९५ मध्ये ‘टॉय स्टोरी’ या पहिल्या थ्रीडी अ‍ॅनिमेशन चित्रपटाची निर्मिती केली. भारतात मात्र त्यासाठी २००८ साल उजाडावे लागले. यशराज फिल्म आणि वॉल्ट डिस्नेच्या भारतीय विभागातर्फे ‘रोडसाईड रोमिओ’ या पहिल्या थ्रीडी अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती करण्यात आली.

अ‍ॅनिमेशनचे प्रकार :  अ‍ॅनिमेशनचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. टूडी अ‍ॅनिमेशन आणि थ्रीडी अ‍ॅनिमेशन.

21-lp-cartoon

18-lp-cartoonटूडी अ‍ॅनिमेशन :

हाताने रेखाटलेल्या चित्रांना कॅमेऱ्याच्या साहाय्याने टिपून किंवा फ्लॅश नावाचे सॉफ्टवेअर वापरून या प्रकारचे अ‍ॅनिमेशन करता येते. या प्रकारच्या निर्मितीमध्ये पात्राची फक्त द्विमिती दर्शविता येत असल्यामुळे याला टूडी अ‍ॅनिमेशन म्हटले जाते. टूडी म्हणजे टू डायमेंशनल, ज्यामध्ये चित्रे ही कागदाच्या लांबी आणि रुंदी म्हणजेच एक्स व वाय अक्षाचा वापर करून चितारलेली असतात. येथे अभाव असतो तो म्हणजे खोलीचा म्हणजेच झेड अक्षाचा. मात्र टूडी अ‍ॅनिमेशनमध्ये खोली असल्याचा आभास शेडिंग किंवा परस्पेक्टिव्हच्या आधारे दर्शविला जातो. टॉम अ‍ॅण्ड जेरी, हनुमान, मिकी माउस ही सर्व टूडी अ‍ॅनिमेशनचीच उदाहरणे आहेत. टूडी अ‍ॅनिमेशनमध्ये एखादे दृश्य दाखविण्यासाठी सेकंदाला २४ चित्रांचा वापर केला जातो. म्हणजे अस्तित्वात नसलेली कथा, त्यातील पात्र, त्याच्यामागची पाश्र्वभूमी, त्यांच्या हालचाली हे सर्व तयार करणे आवश्यक असते. सध्या अडोब फ्लॅश, टूनबूम स्टुडिओ, अ‍ॅनिमो, फोटोशॉप, इलस्ट्रेटरसारखे विविध सॉफ्टवेअर वापरून टूडी अ‍ॅनिमेशन तयार केले जाते.

19-lp-cartoonथ्रीडी अ‍ॅनिमेशन :

मॅक्स आणि माया हीे थ्रीडी अ‍ॅनिमेशनकरिता प्रचलित सॉफ्टवेअर आहेत. या प्रकारच्या अ‍ॅनिमेशनमध्ये पात्राची त्रिमिती दर्शविता येत असल्यामुळे याला थ्रीडी अ‍ॅनिमेशन म्हटले जाते. थ्रीडी अ‍ॅनिमेशनमध्ये एक्स, वाय व झेड या तिन्ही अक्षांचा वापर करून त्रिमितीय रचना केली जाते. ज्युरासिक पार्क, निमो, द इन्क्रेडिबल, रोडसाईड रोमिओ ही सर्व थ्रीडी अ‍ॅनिमेशनची उदाहरणे म्हणून पाहता येतील. डी मॅक्स, माया, ब्लेंडर अशा सॉफ्टवेअरचा वापर करून पात्र निर्मिती व त्या पात्रांसभोवतालची वातावरण निर्मिती म्हणजेच सेट डिझाईन केले जाते.

20-lp-cartoonकम्पोझिटिंग आणि व्हिज्युअल इफेक्टस् म्हणजे काय?

कम्पोझिटिंग : दोन किंवा अधिक वेगवेगळ्या चित्रीकरणांचे एकत्रीकरण करून होणारी तिसरी निर्मिती ही एकाच चित्रीकरणाचा भाग असल्याचे भासविण्याची कला म्हणजे कम्पोझिटिंग. रामायण, महाभारत, सोनपरी, शाका लाला बुमबुम, जजंतरम ममंतरम, जंगल बुक आदी अनेक निर्मितीमध्ये कम्पोझिटिंगचा वापर झालेला लक्षात येईल.

व्हिज्युअल इफेक्टस् : प्रत्यक्षात चित्रीकरणात नसणारे दृश्य संगणकाच्या साहाय्याने निर्मित करून चित्रीकरणाला अधिक आकर्षक किंवा रोमांचक बनविण्याची कला म्हणजे व्हिज्युअल इफेक्टस्. व्हिज्युअल इफेक्टस्ला डिजिटल पोस्ट प्रोडक्शन, व्हीएफएक्स किंवा एफएक्स असेही म्हटले जाते. कम्पोझिटिंग आणि व्हिज्युअल इफेक्टस् तंत्र महागडे सेटस्, लोकेशन्स आदी अनेक गोष्टींना पर्याय म्हणून सिद्ध झाले आहेत. अतिशय कठीण आणि अंगावर रोमांच उभे करणारी दृश्ये केवळ कल्पनेच्या भरारीवर संगणकाच्या मदतीने साकारलेली असतात.

अ‍ॅनिमेशनला प्रादेशिक भाषेत संधी

अ‍ॅनिमेशन क्षेत्राकडे भारत आता गंभीरपणे पाहू लागला असला तरी अद्याप आपण परदेशी व्यक्तिरेखा आणि निर्मितीवरच मोठय़ा प्रमाणावर विसंबून आहोत. भारतात जिथे बऱ्याच प्रादेशिक भाषा आहेत त्या भाषेत अ‍ॅनिमेशनपट तयार होतच नाहीत. ते नसल्यामुळे चॅनेल्स नाहीत आणि त्यामुळे त्यातील 22-lp-cartoonसंधी निर्माण झालेल्या नाहीत. अपवाद केवळ दक्षिणेकडील भाषांचा. दक्षिणेकडील राज्यांमध्ये डिस्नीसारखे चॅनेल त्या त्या भाषेत संपूर्ण चॅनेल चालवतात. पण मराठीमध्ये अद्याप तसा पायंडा पडलेला नाही. खरं तर काही कोटींच्या घरात असलेल्या मराठी प्रेक्षकांना समोर ठेवून त्यादृष्टीने अ‍ॅनिमेशनपट तयार केले तर एक मोठी आणि वेगळी इंडस्ट्री निर्माण होऊ  शकते. लाईव्ह अ‍ॅक्शन मूव्ही आता मराठीमध्ये येण्यास सुरुवात झाली असली तरी एकही मराठी अ‍ॅनिमेशनपट अद्याप आलेला नाही. हीच गोष्ट बरंच काही सांगून जाते.

(सदर लेखातील माहितीसाठी ज्येष्ठ अ‍ॅनिमेटर विलास वाडकर, ई-प्लस स्टुडिओचे शैलेश गुरव, राकेश गुरव, सुरेश वाला आणि अ‍ॅनिमेटर कुणाल मुंग्रा, नम्रता पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.)
प्रशांत ननावरे – response.lokprabha@expressindia.com