सिनेमा काढायचा म्हणजे काय खायची गोष्ट नसते भाऊ. लेखक मंडळी आपली सिनेमाची गोष्ट घेऊन निर्माते, दिग्दर्शक भेसाळींना भेटायला जातात, तेव्हा ती गोष्ट ऐकून भेसाळीभाऊंना किती कल्पना सुचतात. पण कुणाला आहे का किंमत?

गोष्ट फार जुनी नाही, अगदी परवापरवाचीच म्हणजे दोन लेखक प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक भेसाळीना भेटायला गेले तेव्हाची गोष्ट..

लेखक १ : नमस्कार सर, आम्ही सिनेमासाठी एक कथा घेऊन आलो होतो आपल्याकडे. आठवतंय ना?

भेसाळी : कोणती कथा? माझ्याकडे रोज पन्नास कथा येत असतात.

लेखक २ : असतील सर. पण आमची कथा एका खूप मोठय़ा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर आधारित होती. खूप अभ्यास करून आम्ही ती लिहिलीय. तुम्ही वाचलीत का ती?

भेसाळी : असेल. पण अशा टाईपच्या ज्या कथा माझ्याकडे येतात, त्यातल्या ज्यांच्यावर सिनेमेटिक लिबर्टी घेता येईल अशाच कथांचा मी विचार करतो.

लेखक २ : पण अशी लिबर्टी घेताना तुम्हाला कायच्या काय दिसतं सर, त्याचं काय? महाभारतातल्या संजयाच्या दिव्यदृष्टीलाही मागे टाकेल अशी तुमची सिनेमेटिक दिव्यदृष्टी काय काय ‘लीला’ घडवेल सांगता येत नाही. आणि काय म्हणालात सर? तुम्ही विचार करता?

भेसाळी : हो, म्हणजे असं दाखवावं तरी लागतं. हे क्षेत्रच असं आहे ना. म्हणजे समहाऊ तुम्ही विचारवंत आहात असं एकदा लोकांना पटलं की भाव वधारतो तुमचा. असो, कथा कोणती होती?

लेखक १ : क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज गोब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज छत्रपति श्री शिवाजी महाराज यांच्यावरची होती.

भेसाळी : अरे बाबा, एक कोणती तरी सांग. ही किती जणांची नावे घेतोस एकदम.. एक कोणतं तरी व्यक्तिमत्त्व निवड आणि सांग. एवढे शब्द कशाला?

लेखक १ : सर ही एकच व्यक्ती आहे, आणि शब्द म्हणाल तर, कितीही शब्द वापरले तरी ते त्यात मावत नाहीत, त्यांचं कर्तृत्वच तसं आहे. (अभिमानाने) शिवाजी महाराज!!

भेसाळी : अच्छा.. सिवाजी

दोघे लेखक : (अभिमानाने मोठय़ा खणखणीत आवाजात) शिवाजीऽऽ

भेसाळी : हां शिवाजी. ओके, हां आठवलं. सी.. मी कथा वाचली. पण फार फ्लॅट जातेय रे ती. ड्रामा नाही आणि काही भव्यदिव्य, झगमगते मोठे सेट्स दाखवायला स्कोप नाही फारसा.

लेखक १ : सर, राज्याभिषेक आहे ना शेवटी

भेसाळी : तीच तर गोची आहे. तो शेवटी आहे ना.. हां, सुरुवातीला तो दाखवून फ्लॅशबॅकचा एक पर्याय आहे तसा, पण ते जरा ऑड वाटतंय, मलाच खटकतंय.

लेखक २ : अरे वा, सर, तुम्हालाही काही गोष्टी ऑड वाटतात? खटकतात?

भेसाळी : म्हणजे काय मित्रा.. या सिनेसृष्टीतला एक संवेदनशील का काय म्हणतात तसला दिग्दर्शक आहे मी. आणि ‘हम विल दे चुके जानम’, ‘मनदास’ने बक्कळ पसा मिळवून दिला म्हणून आता निर्माताही आहे मी. माझ्यातला निर्माता तर डबल संवेदनशील आहे यू नो..

लेखक २ : हो तर सर, तुम्ही तर संवेदनशीलतेचे आजवरचे सारे निकष, व्याख्या, मापदंड बदलूनच टाकलेत. तसं कर्तृत्वच आहे तुमचं.. हे कोण नाकारेल?

भेसाळी : ओह, अरे ऑकवर्ड होतंय. किती कौतुक करशील..

लेखक २ : (चमकून) कौतुक? मी? कधी?

भेसाळी : अरे तू आत्ता ते.. जाऊदे तू पडलास लेखक.. मदहोश प्रतिभाशाली असता तुम्ही लेखक लोक.. सहजसुंदर कौतुक करून जाता आणि विसरून जाता. गुड.. असो, तर मी काय म्हणतो.. तुमची कथा तशी चांगली आहे..पण..

लेखक २ : ‘आमची’ कथा? सर तो इतिहास आहे.

भेसाळी : व्हाटेव्हर.. सिनेमाच्या भाषेत बोलत असतो मी नेहमी. कळलं? तर ऐक, सिनेमा करण्याच्या दृष्टीने कथेत काही मायनर बदल करावे लागतील.

लेखक २ : सर तुमचे मायनर बदल म्हणजे मेजर शब्द फिका पडेल असे असतात.. असं मी नाही पण कित्येक जण म्हणतात, सो असं ऐकून आहे. म्हणजे असं बघा, ड्रामा, रोमान्स, अ‍ॅक्शन, हॉरर, सस्पेन्स थ्रिलर, कॉमेडी वगरे जोनर्स असतात सिनेमांचे हे सर्वाना माहीत आहेच, पण ‘हाजीराव सस्तानी’मधले बरेच प्रसंग हास्यास्पद ठरल्याने तुम्ही त्याद्वारे ‘हॉरिबल हिस्टोरिक कॉमेडी’ हा एक नवीनच जोनर आणलाय असंही काहींचं मत आहे.

भेसाळी : आपण लक्ष नाही रे द्यायचं.. जे म्हणतात त्यांना काही कळतं का सिनेमातलं. आपण पिक्चर बनवायचा, पसा कमवायचा. इतिहास काय लोकांना शाळेत इतिहासाची पुस्तकंबिस्तकं वाचूनपण कळलेला असतोच की, मग आपण तेच बोअिरग काय सांगायचं पुन्हा. जरा रंजक करून दाखवायला नको. अरे माउली बालनबाई काय म्हणतात, फिल्में सिर्फ तीन चीजों की वजह से चलती है- एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट आणि तिसरं काय बरं ते, विसरलो बघ.

लेखक २ : ते असू दे सर काहीही.. पण मूळ इतिहासात बदल म्हणजे..

भेसाळी : अरे घाबरू नकोस.. फार काही नाही. पण लोकांना समजेल असं आजच्या कालानुरूप.. म्हणजे असं बघ.. अं हां, विशाळगडावर पोचल्यावर तोफांचा आवाजाऐवजी आपण बाजीप्रभूंना शिवाजींनी व्हॉट्सअपवर िपग केलं असं दाखवूया. शिवाजी महाराज- अफझल खान भेटीवेळी आधी अफझल खानाने भांगडा केला असं दाखवू, राजांबरोबर आलेल्या जिवा महालाने आधी पाहुण्यांना प्रतापगडाची सविस्तर माहिती दिली आणि सय्यद बंडा आणि अफझल खान ती नीट लक्षपूर्वक ऐकताहेत असं दाखवू.. शामियाना भव्यदिव्य उभा करू, तो साधा शामियाना वाटता कामा नये, अरे काही झालं तरी तिथे अफझल वध ही ऐतिहासिक घटना आपण घडवायची आहे.

लेखक १ : ऐतिहासिक घटना ‘आपण घडवायची’ आहे? आणि जिवा महाला काही टुरिस्ट गाईड नव्हता सर..

भेसाळी : नसू दे रे, पण प्रेक्षकांनाही गडाची माहिती कळली पाहिजे की नाही. सिनेमा बघून त्यानिमित्ताने गडावर टुरिझम वाढलं तर.. कर विचार.. बिझनेस माइंडेड राहावं लागतं रे. ते पर्सेटचं मी बोलून घेईन मग त्यांच्याशी. मग काय.. आणि तो शामियान्याचा सेट कसा भारी आलिशान करून घ्यायचा ते तू माझ्यावर सोड. मस्त ब्राण्डेड पडदे, गाद्या वगरे वापरू. बाय द वे, यात कुठेच गाण्याला जागा मिळत नाहीये.

लेखक २ : एखादं स्फूर्तिगीत, शौर्यगीत करू ना थीम साँग म्हणून..

भेसाळी : तसं नव्हे रे, म्हणजे तेही ‘जमलं तर’ घेऊच. पण मुख्य म्हणजे काही रोमँटिक, आणि त्याहूनही मुख्य म्हणजे डान्सला वावच्या वाव देणारी गाणी हवीत आपल्याला, काय समजलास? मला एक सांगा, तुमच्या मते, राजांना एकूण पत्नी किती होत्या?

लेखक १ : मते? त्याबाबत वेगवेगळी मते कशी काय असतील जन्मतारखेसारखी?

भेसाळी : अरेच्चा, हो की रे, भारी मुद्दा काढलास बघ. तुम्हाला काय वाटतं आपण त्यांचा जन्म तिथीनुसारवाल्या तारखेचा दाखवायचा की सरकार दरबारी असलेल्या तारखेप्रमाणे?

लेखक १ : जी खरी आहे ती..

भेसाळी : अरे आता ते कोण ठरवत बसणार खरी आणि खोटी.. ते आपणच ठरवायचं, आपण सिनेमा करतोय तर तेही आपल्याच हातात असतं वेडय़ा.

लेखक २ : (झटका बसतो) काय? शिवाजी कधी जन्मले हे दाखवणं?

भेसाळी : अर्थात.. ते ठरवू आपण. आमच्या न्यूमरॉलॉजिस्टशी बोलून घेतो मी, सिनेमा हिट होण्यासाठी कोणती बर्थडेट सुटेबल आहे ते विचारून घेतो.

लेखक २ : पण त्यांनी दोन्हीपकी कोणतीच योग्य नाही असं सांगितलं तर?

भेसाळी : तर काय गुरुजी सांगतील ती डेट ठरवू..

लेखक २ : (चमकून) काय?

भेसाळी : मक्काय! अरे मी भेसाळी आहे विसरलास.. एवढी भेसळ चालते माझ्या प्रॉडक्टमध्ये..

लेखक १ : प्रॉडक्ट? अहो पण दोन तारखा ऑलरेडी असताना आणखी एक म्हणजे आणखी गोंधळ होईल अशी भीती वाटतीये मला, प्रॉडक्टची एक्सपायरी डेट सिनेमा रिलीज, आय मीन प्रॉडक्ट लॉन्च होण्याआधीच आणतील मग..

भेसाळी : कसं होणार रे तुमचं असं घाबरत बसलात तर, लेखकाने कसं बिनधास्त असलं पाहिजे. आणि मी तर दिग्दर्शक आहे, सिनेमे बनवतो, मग तेवढी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली तर काय बिघडलं?

लेखक २ : (वैतागून) घेतलीय का तुम्ही?

भेसाळी : खूपदा. अरे देवदासमध्ये मी पारो आणि चंद्रमुखीला एकत्र नाचवलं. लिबर्टी काय, खूपदा घेतलीय मी.

लेखक २ : नाही ते म्हणालो नाही मी.. घेतलीय का विचारलं? असे काय काहीही बरळताय.. आय मीन बोलताय?

भेसाळी : हा हा हा, गुड जोक. (युरेका युरेका आनंदाने) अरे ऐक, आयडिया.. असं करू.. ते महापुरुष होते म्हणून दोनदा जन्मले असं दाखवू.. काय म्हणतोस? गोंधळ वगरे करून घेऊ नकोस रे मित्रा, चारशे वष्रे झाली लोकांचा अजून गोंधळ आहेच ना खऱ्या तारखेबद्दल. मग आपण अजून थोडा वाढवला तर काय बिघडलं. विचार करावा लागेल जरा याबद्दल, पण एवढा वेळ नाही रे. स्क्रिप्ट लेव्हलला एवढा वेळ घालवत बसलो तर सेट डिझाईन आणि कोरिओग्राफर्स मीटिंग कधी करू मी. माझ्या सिनेमासाठी ती सर्वात महत्त्वाची कामे असतात राजा, कथाबिथा काय होत राहील आपण करू तशी.

लेखक १ : आपण करू तशी? म्हणजे? अहो फिक्शन असेल तर ते ठीक आहे, पण नॉनफिक्शन सब्जेक्ट असताना..

भेसाळी : बाजीरावाला केलाच ना मी फिक्शन, आणखी जरा जोर लावला तर शिवाजी पण जमेल. ते टेन्शन तुम्ही घेऊ नका रे. तुम्ही फक्त नाच, गाणी आणि मोठमोठे भव्यदिव्य सेट्स यांना फुल स्कोप राहील अशी स्क्रिप्ट लिहा.. बास.

लेखक २ : अशी स्क्रिप्ट? पण सर, आपल्याला महाराजांच्या लढाया, किल्ले वगरे दाखवावं लागेल. किमान ते किल्ले तरी ओबडधोबड असतील ना सिनेमात? खरे किल्ले तर तुम्ही आधीच नको म्हणताय.. मग सेट्स?

भेसाळी : मक्काय.. अरे नुसतेच ते किल्ले, दगडधोंडे, वाळकं गवत दाखवून पिक्चर होतो होय माझा कधी.. काही भरजरी श्रीमंती थाटमाट नको काय?

लेखक १ : सर पण, त्या काळात दुष्काळ वगरेही होता, महाराजांनी गरीब, रंजल्यागांजल्यांना मदत केली होती. आता दुष्काळ कसा भरजरी दाखवणार तुम्ही? (दुसऱ्या लेखकाला हळूच टाळी देत.)

भेसाळी : फॅण्टॅस्टिक.. अरे मस्त क्ल्यू दिलास. मदत.. आपण राजांकडून गरिबांना मोठमोठे श्रीमंती नजराणे तबकातून भेट मिळतायत असे दाखवू.. मज्जा येईल. फुल धमाल. आणि काय बरं करता येईल. ..अरे हां, मघाचा विषय बाजूलाच राहिला.. सांग महाराजांची लग्ने किती.. म्हणजे मल्टिपल पत्न्या होत्या का त्यांना?

लेखक २ : आठ

भेसाळी : (कायच्या काय, आनंदाने.) एक्क नंबर, आठी जणींचा एकत्र डान्स दाखवू. न्यूमरोलोजिस्टशी बोलून घेतो, त्या काळात आठवडय़ाचे खरंच आठ दिवस होते असं काही दाखवता येईल का बघूया.. म्हणजे राजे रोज एकीसोबत नाचायचे असं आपल्याला दाखवता..

लेखक १ : काय, राजे नाचताना दाखवणार?

भेसाळी : त्यात काय बिघडलं..  मल्हारीवर नाचत बाजीरावाने वाट लावलीच की नाही. अरे हे बघ, शिवाजीराजे युद्धात, डावपेचात वगरे निपुण होते. हे लोकांना माहिती आहेच..  आपण नवीन काय दाखवणार मग, म्हणून नृत्यनिपुण राजे दाखवू..  ठरलं तर – आठी जणींसोबत डान्स..

लेखक १ : ते पाहून लोकांच्या कपाळावर आठी येईल त्याचं काय..  लोक आपल्यालाच गनिमी कावा करून धरतील.

भेसाळी : काय भावा कावाबिवा घेऊन बसलास.. ऐक.. अजून एक आठवलं..  ते लिहिलंय ना एके ठिकाणी.. तो कोण तो..  गड आला पण सिंह का काय ते..

लेखक २ : तानाजी.

भेसाळी : हां तानाजी, मेमरी चांगली आहे हा तुमची.. गुड. तर तो जो काय प्रकार आहे ना कथेत की तो म्हणतो आधी लगीन कोंकणा सेनचं, मग माझ्या..

लेखक २ : ओ अहो तसं नाहीये ते..  आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणतात तानाजी मालुसरे.

भेसाळी : हां ते तेच, ऐक भारी सुचलंय एक. ते किल्ला जिंकला वगरे दाखवूच, पण आदल्या दिवशी तो रायबा आपल्या लग्नाचं स्वप्न पाहतोय असं दाखवू, मस्त मोठाच्या मोठा सेट, फुल सरबराई, शाही थाट आणि अर्थात एक मस्त वेिडग साँग. झकास डान्स.. ड्रीम सिक्वेन्स असेल तो, दुसऱ्या दिवशी एनिहाऊ त्या रायबाला कळणारच आहे आपलं लग्न तात्पुरतं पोस्टपोन होतंय, आधी लढायला जायचंय बाबांबरोबर वगरे. कोण कसा आक्षेप घेईल सांग आता..

लेखक २ : धन्य आहात.

भेसाळी : तूच रे.. तूच! थॅन्क्स..  आणि हो, ते अफझल खान मीटिंगच्या वेळी काय ते वाघनखं वगरे भयानक लिहिलंय बाबा..  पेटावाले, प्राणी संरक्षणवाले येतील वाघांची नखे कशी वापरली म्हणून, प्रॉब्लेम होईल..  ते तसं नको, असं करू, राजांनी हंँडग्लोव्ज घातले होते आणि एखाद्या छोटय़ा सुऱ्याने..

लेखक १ : अहो, अहो ऐका, ते सिम्बोलिक आहे. वाघनखं, ते एक शस्त्र..

भेसाळी : अरे, असं कसं..  आधीच वाघ कमी होत चाललेत देशातले. ऐका जरा, आणि तो आग्ऱ्याहून सुटका सीन आहे ना..  तो जऽऽऽरा बदलू, म्हणजे अशा शूरवीरानं असं लपून पेटीतून येणं वगरे..  नाही रे नाही पटत..

लेखक २ : अहो सर, सगळ्याच गोष्टी ताकदीवर साध्य होत नाहीत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.

भेसाळी : ती पुस्तकी वाक्य सांगू नको रे मला. बाहुबलीमध्ये त्या हिरोनं शिविलग क्रेननं उचलून आणलं असं दाखवलं असतं तर..  अरे भोळ्या माणसा, तो ते खांद्यावर घेऊन येतो तेच बघून लोक वेडे झाले ना? ऐक माझं बरोबर आहे, नव्हे ते असतंच म्हणा नेहमी. महाराज भर दरबारात औरंगजेबाला चॅलेंज देऊन शंभूराजाला खांद्यावर घेऊन बाहेर पडतात, आणि रिलीजच्या काही आठवडे आधी तो सीन यू-टय़ूबवर टाकू, बघ त्या सीनला लाखो हिट्स मिळतात की नाही ते..  रोहित शेट्टीलाही कळू दे, दुश्मनच्या इलाख्यात जाऊन काय फक्त तुझा एकटय़ाचा बाजीराव.. .

लेखक १ : (तोडत) अहो सर त्याने कुठे, बाजीराव तुम्हीच केलात..  मल्हारी गाण्यावर नाचवलंतही.

भेसाळी : आं..  अरे ए वेडय़ा, असा कसा रे तू. अरे तो पेशवावाला बाजीराव नव्हे, सिंघमवाला बाजीराव रे. तो नाही का जयकांत शिखरेच्या इलाख्यात जाऊन वाघासारखा बोलून येतो. तसा सीन आपण मुघल दरबारात करू. इव्हन मी तर म्हणतोय तानाजीने पावनिखड लढवली आणि बाजीप्रभूंनी सिंहगड लढवला असा दाखवावं.

लेखक २ : (तीनताड उडत) काय?

भेसाळी : हां, भारी होईल. तानाजी विचारांच्या िखडीत सापडलाय -लढाई आधी की पोराचं लग्न आधी..  असा विचारांचा डायलेमा दाखवू त्याचा. वॉव, व्हॉट ए ब्रिलियंट आयडिया. काहीतरी सूट होणारा डायलॉग लिहा तिथे त्याचा.

लेखक १ : सर तुम्ही आम्हाला गोळी का घालत नाही? हे असं काही आपण दाखवत बसलो तर लोक काय करतील याचा अंदाज आहे का तुम्हाला? आम्हाला नाही करायचा तुमच्यासोबत हा चित्रपट.. आम्ही जातो.

भेसाळी : अरे, थांबा थांबा..  ऐका तर खरं..  मी काय म्हणतो तो जो राजे आणि समर्थ रामदास भेटीचा प्रसंग आहे, तो जरा मॉडिफाय करून..

पण भेसाळी हे बोलत असतानाच दोघे लेखक ‘नाही.. . नाही’ म्हणत, गालफडावर हात मारून घेत त्यांच्या या भव्यदिव्य भरजरी भेसाळीभेटीचे भकास भग्नावशेष भंगारात टाकण्याच्या निर्धाराने निघून गेले.
पराग पुजारी – response.lokprabha@expressindia.com