आपल्याला उत्तम सामाजिक भान आहे, समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे, असे एखाद्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी सार्वजनिक आरोग्य हे एक उत्तम क्षेत्र ठरू शकते.

आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर संभ्रमावस्थेत असलेल्या माणसासाठी गांधीजींनी एक मूलमंत्र दिला होता : ‘ज्या वेळी भविष्यात नेमका कुठला मार्ग निवडू असा प्रश्न पडेल त्या वेळी समाजातील सर्वात वंचित माणसाला माझ्या निर्णयाचा काय फायदा होईल याचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या!’ हीच कसोटी बारावीनंतर कोणती शाखा निवडू या प्रश्नाला लावली तर सार्वजनिक आरोग्य (Public Health) या क्षेत्रामधील करिअर यामध्ये कदाचित चपखल बसू शकेल.

सार्वजनिक आरोग्य ही भारतात गेल्या दहा वर्षांत वेगाने मूळ धरू लागलेली ज्ञानाशाखा आहे. या शाखेची सोपी व्याख्या म्हणजे एका मोठय़ा जनसमुदायात आढळणाऱ्या रोगांची नोंद करणे, त्या मागील नेमका कार्यकारणभाव शोधून काढणे, त्याच्या प्रसारास अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची आखणी करणे, रुग्णांवर त्वरित उपचार करणे आणि तो भविष्यात होणार नाही यासाठी उपाययोजना करणे. वैद्यकीय शाखा (Medicine) आणि सार्वजनिक आरोग्य शाखा यांची तुलना केल्यास एका माणसाचा रोग बरा करणे हे झाले वैद्यकशास्त्राचे काम तर संख्येने मोठय़ा जनतेत पसरलेल्या साथीच्या रोगाचा प्रतिबंध करणे हे झाले सार्वजनिक आरोग्य तज्ञाचे काम. डॉक्टरचा सर्व भर हा रुग्णाच्या उपचारांवर असतो, तर सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ समाजात रोग मुळात पसरूच नये आणि अधिकाधिक लोक निरोगी राहावेत यासाठी धडपडत असतो. म्हणूनच या शास्त्राला प्रिव्हेन्टिव्ह अ‍ॅण्ड कम्युनिटी मेडिसीन (Preventive and Community Medicine) असेही म्हणतात. भारताच्या संदर्भात या ज्ञानशाखेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गरिबी, अल्पसाक्षरता, दाट लोकवस्ती आणि दमट हवामान यांसारख्या घटकांमुळे सार्वजनिक आरोग्याला भारतात पदोपदी आव्हाने निर्माण होतात. म्हणून सर्वच विकसनशील देशांमध्ये सार्वजनिक आरोग्यावर काम करणाऱ्या तज्ज्ञांची सक्षम फळी तयार करणे गरजेचे असते.

सार्वजनिक आरोग्यक्षेत्राचे नेमके स्वरूप आणि व्याप्ती काय आहे, हे आपण एक उदाहरण घेऊन पाहू.  पुणे शहरात २०१० च्या सुमारास स्वाईन फ्लूची गंभीर साथ आली होती. त्या वेळी लागण झालेल्या आणि साथीत मृत्यू पावलेल्या रुग्णांची नोंद ठेवणे, विशिष्ट भागात रुग्ण अधिक संख्येने आढळत असल्यास त्यांची दाखल घेणे, रुग्णांच्या वैशिष्टय़ांचा अभ्यास करणे, (वय, िलग, त्यांना असणारे इतर आजार इत्यादी.) ही सर्व कामे सार्वजनिक आरोग्य खात्याचा एक विभाग पार पाडत होता. या उलट दुसरा विभाग रुग्णांचा इतरांशी संपर्क येणार नाही याची काळजी घेणे, त्यास औषधोपचार सुरू करणे, रोगाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास त्या संभाव्य रुग्णाची लवकरात लवकर तपासणी करून निदान करणे या जबाबदाऱ्या पार पाडत होता. आणखी एक विभाग जनतेस लक्षणांविषयी सजग करणे, प्रतिबंधात्मक उपायांची आणि आरोग्यसेवांची माहिती देणे हे लोकशिक्षणाचे काम करत होता. या शिवाय सार्वजनिक आरोग्य खातेच आवश्यक ती औषधे उपलब्ध करून देणे, लसीकरणाची व्यवस्था करणे ही महत्त्वाची कामे पार पाडत होते.

वर नमूद केलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी देश राज्य आणि जिल्हा पातळीवर स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.

भारताच्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असले तरीसुद्धा अजूनही मोजक्याच शिक्षणसंस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. विद्यार्थी हा अभ्यासक्रम दोन प्रकारे निवडू शकतात. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस या पदवीनंतर दोन वर्षांची एमडी (पीएसएम, प्रीव्हेटिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसी) ही पदवी घेऊ शकतात. किंवा शास्त्र शाखेतील (गणित व पदार्थविज्ञान वगळता) पदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षणात एमपीएच (Maters in Public Helth) करू शकतात. हा अभ्यासक्रम बहुविद्याशाखीय (interdisciplinary) आणि उपयोजित (applied) स्वरूपाचा आहे. यात प्रामुख्याने संख्याशास्त्र, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगशास्त्र, साथीच्या रोगांचा अभ्यास (epidemiology), आहारशास्त्र, शरीरशास्त्र, आरोग्ययंत्रणांचे आयोजन व व्यवस्थापन हे विषय शिकवले जातात.

भारतात टीस ऊर्फ टाटा सामाजिक विज्ञान संस्था- मुंबई, पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया, गांधीनगर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एपिडेमींॉलॉजी (National Institute of Epidemiology) चेन्नई, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रीसर्च, जयपूर, (Indian Institute of Helth management Reserch- Jaipur) आशियम इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ, भुवनेश्वर (Asian Institute of Public Helth) दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (Dutta Meghe Institute of Medical Sciences) वर्धा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी दोन वर्षांचा सार्वजनिक आरोग्य या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो.

या विषयातील पदवीधर सरकारी यंत्रणेबरोबर, तसेच स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करू शकतात. केंद्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर मलेरिया नियंत्रण, क्षयरोग नियंत्रण, एड्स नियंत्रण, जननी सुरक्षा यांसारखे कार्यक्रम चालवले जातात. हे कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी या विषयातील पदवीधरांची आवश्यकता असते. WHO, UNICEF, UNFPA, UNDP यांसारख्या संयुक्त राष्ट्र संघ संचालित संस्थांतही सार्वजनिक आरोग्य पदवीधरांना संधी मिळू शकते. बडय़ा उद्योग संस्था सामाजिक उत्तरदायित्व योजनांखाली अनेक आरोग्य विषयक उपक्रम हाती घेतात. तेथेही या पदवीधरांना काम करण्याची मोठी संधी उपलब्ध असते. याशिवाय विविध भारतीय आणि परदेशी संस्थांमध्ये पीएच.डी.चा पर्याय उपलब्ध आहेच.

चार िभतींच्या बाहेर काम करायला आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम योग्य आहे. जितके फिराल तितकी समाजाची नस पटकन कळते. विषयाची जाण वाढते. सरकारी यंत्रणेची बलस्थाने, मर्यादा कळतात आणि लोकसहभागाचे महात्म्य कळते. अनेकदा नोकरीदरम्यान आपला लाभार्थी कोण हे कळत नाही. मात्र या क्षेत्रामध्ये आपण करत असलेले काम हे थेट लोकहिताचे आहे याचे समाधान मिळते.

या क्षेत्राच्या काही मर्यादाही लक्षात घ्यायला हव्या. या क्षेत्राला अजून भारतात विशेष वलय नाही. रोग बरा करणारा वैद्य लोकांना प्रिय असतो पण तो होऊ नये म्हणून धडपडणाऱ्या व्यक्तीचे महत्त्व कळत नाही. हे महत्त्व अधोरेखित होते जेव्हा ‘भारत पोलिओमुक्त’ किंवा ‘भारतातील मातामृत्यूंच्या प्रमाणात घट’ या बातम्या वृत्तपत्रात झळकतात. दुर्दैवाने भारतासमोरील आरोग्याच्या समस्या नजीकच्या काळात कमी होण्याची लक्षणे नाहीत आणि म्हणूनच सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सतर्क ठेवणे आवश्यक आहे.
चारुता गोखले – response.lokprabha@expressindia.com