महाराष्ट्रात ज्वालामुखीय अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या सह्यद्री पर्वत रांगेचा उपयोग करून लेणी, दुर्ग यांची निर्मिती झाली आहे. देशभरात उपलब्ध असलेल्या हजारेक लेणींमध्ये सातेकशे लेणी एकटय़ा महाराष्ट्रातच आढळतात. तत्कालीन बौद्ध भिख्खूंच्या वर्षांवासासाठी निर्माण केली गेलेली ही लेणी आज आपल्या समृद्ध इतिहासाचा प्राचीन वारसा ठरली आहेत.

महाराष्ट्रातील पर्यटकांना पांडवलेणी म्हणून माहीत असणारी कोरीव लेणी ही महाराष्ट्रातील अस्तित्वात असणारी प्राचीन स्मारके आहेत. प्राचीन शिलालेखांतून ‘लयण’ असं वर्णन केलेल्या वास्तू म्हणजे अजिंठा, वेरुळ आणि घारापुरीसारख्या लेणी. ज्वालामुखीय अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या सह्याद्री पर्वत रांगेचा उपयोग करून महाराष्ट्रात लेणी, दुर्ग यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. भारतात साधारणत: हजारेक लेणी आहेत त्यातील जवळजवळ ७०० लेणी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या १५ ते ६० मीटर उंचीच्या कातळामुळे लेणी निर्मितीला उत्तम पाश्र्वभूमी लाभली. त्याचबरोबर सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट अशा विविध राजवटींच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींनी तसेच व्यापारी, भिक्षू, सामान्य नागरिक इत्यादीकांनी दान दिल्यामुळे या लेण्यांची निर्मिती झाल्याचे शिलालेखीय पुराव्यांवरून दिसून येते.

weather update marathi news, heat wave maharashtra marathi news
पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
Drought in the state but plenty of water in Koyna dam
राज्याला दुष्काळाचा झळा, कोयना धरणात मात्र मुबलक पाणी

सम्राट अशोकाच्या काळात पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर झाला होता. वर्षभर फिरतीवर असणारे हे बौद्ध भिक्षू पावसाळ्यातील निवासासाठी (वर्षांवासासाठी) तात्पुरती वस्ती उभारत. प्राचीन बौद्ध ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ही वर्षांवासाची जागा गावाच्या अथवा शहराच्या सीमेबाहेर परंतु जवळ असे. त्यामुळे नंतर भिक्षूंच्या वर्षांवासासाठी शैलगृह/लेणी निर्माण केली जाऊ लागली तीदेखील गावाच्या सीमेजवळच्या डोंगरामध्ये! ही शैलगृहे म्हणजे तत्कालीन लाकडी स्थापत्याची प्रतिकृती असावी.

वर्गीकरण

ज्या धर्मीयांच्या वापराकरिता ही लेणी निर्माण करण्यात आली त्या धर्मावरून या लेणींना बौद्ध, िहदू अथवा जैन लेणी संबोधले जाते. महाराष्ट्रात लेणी कोरण्यास साधारणपणे २२०० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. भाजा लेणी, जुन्नर येथील तुळजा लेणे, कोंडिवते लेणे ही महाराष्ट्रातील सर्वात जुन्या लेणींपकी मानली जातात. त्यानंतर कोंडाणे, नाशिक, बेडसे, काल्रे, कुडा, इ. लेणींची निर्मिती झाली. त्यानंतरच्या काळात वेरुळ, घारापुरी इ. ठिकाणी िहदू लेणी (मुख्यतछ शैव लेणी) कोरली गेली. याचबरोबर वेरुळ येथे दिसणारी जैन लेणी देखील कोरली गेली.

बौद्ध लेणींचे स्थापत्य-बौद्ध लेणींना भेट देताना त्यातील स्थापत्य बघावे लागते. बौद्ध लेण्यात प्रामुख्याने चत्यगृह (पूजेची जागा), विहार (राहण्याची जागा),भोजन मंडप, स्मशाने, न्हाणपोढी (आंघोळीची पाण्याची टाकी), पाणपोढी (पिण्याच्या पाण्याची टाकी), कोढी (पूजेचे कोनाडे), बाकाचे कट्टे यांचा अंतर्भाव होतो. मुख्यत: भाजा, कान्हेरी व जुन्नर येथील मोठय़ा शैलवसाहतीमध्ये हे स्थापत्य प्रकार दिसून येतात. चत्यगृह म्हणजे पूज्य वस्तूंच्या उपासनेसाठी निर्माण झालेल्या बांधीव स्तूपमंदिराच्या प्रतिकृती आहेत. तर विहार हे भिक्षूंच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या कुटिरांच्या प्रतिकृती आहेत. लेणी बघताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही लेणी बांधलेली नसतात तर एकसंध पाषाणात कोरलेली असतात, ज्यास एकपाषाणीय (मोनोलिथिक) अशीही संज्ञा आहे.

अजिंठा तसेच जुन्नर येथील काही अर्धवट कोरलेल्या चत्यगृहांवरूनअसे लक्षात येते की ही चत्यगृहांवरून कोरायला सुरुवात केलेली असते. भाजे, बेडसे, काल्रे, कान्हेरी, जुन्नर येथील चत्यगृहं चापाकार व गजपृष्ठाकृती आहेत. काल्रे, भाजे व कोंडाणे येथील चत्यगृहांमध्ये छताच्या कमानी लाकडीच केलेल्या आहेत. या भाजे येथील लाकडी कमानींवर असलेल्या ब्राह्मी शिलालेखावरून या लाकडी कमानी प्राचीन काळातील असाव्यात हे निश्चित. तसेच या चत्यगृहांना एखाद्या राजवाडय़ासमान अनेक मजले कोरून प्रासादाचा आभास निर्माण केलेला आहे. तर काल्रे, कुडा, पितळखोरा येथील लेणींमध्ये हत्तींच्या मूर्ती कोरून त्यांच्या मस्तकावर ही लेणी तोलल्याचा आभास निर्माण करण्यात आलेला आहे.

सुरुवातीच्या चत्यगृहांमध्ये (भाजे, कोंडाणे, बेडसे येथे) साधे अष्टकोनी खांब कोरलेले दिसतात तर तुलनेने नंतरच्या काल्रे, कान्हेरी, नाशिक,गणेशलेणी (जुन्नर) येथील चत्यगृहांमध्ये व विहारांमध्ये खांबांचे अलंकरण वाढलेले दिसते. काल्रे येथील चत्यगृहातील खांबांवर हत्तीची जोडी व त्यावर आरूढ झालेले स्त्री-पुरुष दिसतात.

दोन हजार वर्षांपूर्वी चालणाऱ्या रोम व भारत यामधील व्यापारी संबंधांचे अवशेष आपल्याला महाराष्ट्रातील लेणींवर पडलेले दिसतात. काल्रे, जुन्नर येथील लेणींमध्ये यवनांनी (आयोनियन ग्रीकांनी) दाने दिली आहेत. काल्रे, नाशिक, लेण्याद्री येथे आपल्याला स्फिन्क्स कोरलेले आढळतात. तर कान्हेरी येथील चत्यगृहाच्या बाहेर दोन मदारींचा बॅक्ट्रियन उंट कोरलेला आढळतो. भाजे येथील विहारात सेंटॉर्सचे (अर्धा माणूस व अर्धा प्राणी) तसेच पेगासस या पंख असणाऱ्या घोडय़ाचे अंकन आढळते. हे सर्व संदर्भ अर्थातच परदेशी आहेत. भारतीय पौराणिक कथांतून यांचे संदर्भ येत नाहीत.

नाशिक, भाजे, कोंडाणे इ. लेणींतील चत्यगृहांबाहेर एखादी स्त्री अथवा पुरुष प्रतिमा कोरलेली दिसते. ती त्या लेण्याचे रक्षण करणाऱ्या यक्षाची अथवा यक्षीची आहे असे मानले जाते. नाशिक व कान्हेरी येथे अशा पद्धतीने मानवरूपी नाग कोरण्यात आलेला आहे.

चित्रकला

लेणी बघताना आत्ता आपल्याला ती खडबडीत दिसत असली तरी अनेक ठिकाणी त्यावर चित्रांचे अवशेष आढळून येतात. अजिंठा येथील चित्रे जगभर चíचली जातात. कोरून तयार केलेल्या खडबडीत िभतीवर भाताचे तूस, शेण, माती, इ. कालवून त्याचे लेपन केले जात असे. त्यावर चुन्याचा लेप देऊन मग नसíगक रंग वापरून चित्रकाम केले जात असे. कान्हेरी व वेरुळ इथे आपल्याला काही रेखाचित्रे काढलेली दिसतात. त्यात रंग भरण्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे चित्रकलेची प्रक्रिया आपल्याला कळते. त्यामुळे अशा लेणी पाहण्यासाठी गेल्यावर कुठे चित्रकलेचे अवशेष दिसतात का याचा जरूर शोध घ्यावा. या चित्रांतून मुख्यत: जातककथा म्हणजे भगवान बुद्धाच्या पूर्वजन्मांचे चित्रण केलेले असते.

शिलालेख

महाराष्ट्रातील या लेणींच्या इतिहासात भर घालण्याचे साधन म्हणजे इथे आढळणारे शिलालेख. हे शिलालेख ब्राह्मी लिपीत व प्राकृत अथवा संस्कृत भाषेत लिहिलेले असतात. विविध राजे, मंत्री, व्यापारी, शेतकरी इत्यादींनी दाने दिल्यानंतर हे लेख कोरून ठेवलेले आहेत. या लेखांच्या अभ्यासातून तत्कालीन राजकीय, आíथक, धार्मिक बाबींचा उलगडा होतो. याच लेखांतून ‘अक्षयनिधी’ कायमस्वरूपी ठेव व्यापारी संघाकडे ठेवली जात असे व त्यातून येणाऱ्या व्याजातून भिक्षूंना दान दिले जात असे अशी माहिती कळते. नाशिक येथील लेण्यातील लेख हे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ब्राह्मी लिपीची बाराखडी इंटरनेटवर उपलब्ध असते आणि ती घेऊन आपल्याला एखादा शिलालेख वाचता येतो. शिलालेखांसंबंधी उपलब्ध पुस्तकाचा उल्लेख पुढे केला आहे.

अधिक माहिती कशी मिळवायची?

महाराष्ट्र टुरिझमची नवीन वेबसाइट आपल्याला महाराष्ट्रातील लेण्यांची मूलभूत माहिती देते. ‘आíकऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ची अजिंठा, वेरुळ आणि घारापुरी लेण्यांविषयीची तज्ज्ञांनी लिहिलेली छोटेखानी पुस्तके या लेण्यांना भेट देण्यापूर्वी जरूर वाचावीत. ‘महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार’ या कल्पना रायरीकर आणि मंजिरी भालेराव लिखित मराठी पुस्तकातून आपल्याला लेण्यांमधील प्राकृत/संस्कृत शिलालेखांचे वाचन व अधिक माहिती मिळते. त्यामुळे हे पुस्तक लेणी बघताना बरोबर असल्यास त्या लेणींतील शिलालेखांची माहिती आपल्याला होईल.

जगभरातील संशोधक महाराष्ट्रातील या लेणींचा अभ्यास करतात. या लेणींवर राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आणि परिषदा भरवल्या जातात. महाराष्ट्रातील अजिंठा, वेरुळ व घारापुरी लेणींना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असलेल्या या लेणींकडे फक्त ‘पांडवांनी बांधलेल्या लेणी’ म्हणून आणि एक सेल्फी काढण्याचे ठिकाण म्हणून बघण्यापेक्षा आपण डोळसपणे भेट दिली तरच ते ज्ञात्याचे ‘बघणे’ ठरेल आणि हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी आपल्या सर्वाचा थोडा तरी हातभार लागेल!

लेखक अफगणिस्तानातील जागतिक वारसा स्थळांचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
आनंद कानिटकर

response.lokprabha@expressindia.com