एकच नोकरी चाळीसेक वर्ष करण्याचा जमाना आता गेला. आता जमाना आहे पटपट स्वीचओव्हर होण्याचा. काय आहे त्यामागची मानसिकता?

‘तुमचा हर्षद हल्ली काय करतो? शिक्षण पूर्ण झाले ना त्याचे?’ विलासरावांच्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले. आता तो नोकरीला लागला असेल, अशा अपेक्षेने लोक त्यांना हा प्रश्न विचारू लागले. ही त्याच्या करिअरची सुरुवात होती. तीन वर्षांनी कळले की हर्षदने नोकरी बदलली. का विचारले तर ‘फॉर बेटर प्रॉस्पेक्टस्!’ असे त्याचे दर तीन वर्षांनी सुरू राहिले आहे. याच वेळेस तो सलग पाच वर्षे एकाच ठिकाणी नोकरी करतो आहे, तर त्याला ‘लाँग सव्‍‌र्हिस’चे बक्षीस देण्यात आले!

गेली अनेक वर्षे उच्च पदे भूषवणारा दीपक अचानक सेंद्रिय शेतीकडे वळला, हे ऐकून सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला. धावपळीचा, स्पर्धेचा कंटाळा आला, समाजोपयोगी आणि मन:शांती देणारे काही तरी करावे असे वाटले आणि त्याने जमीन विकत घेतली.

या आणि अशा अनेक गोष्टी रोज ऐकायला मिळतात. पूर्वीसारखे एका ठिकाणी चिकटले की चिकटले असे आता राहिलेले नाही. ४० वर्षे नोकरी करून आता सेवानिवृत्त होत आहेत अशांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत जाणार. अर्थात याची कारणे अनेक आहेत.

करिअर निवडणे, त्या मार्गावर चालणे, त्यात आनंद मिळणे, मनासारखे काम करता येणे आणि तसे करता करता आपल्या करिअरची दिशाच बदलणे असे अनेक टप्पे एखाद्याच्या करिअरमध्ये दिसतात.

आपल्याकडे करिअरनिवडीचे काही चोखंदळलेले मार्ग आहेत. जसे डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर बनले पाहिजे किंवा कारखानदाराच्या मुलाने कंपनीची जबाबदारी उचलली पाहिजे इ. त्याचबरोबर वर्गात पहिल्या चार-पाच मुलांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षक, नातेवाईक, शेजारी पाजारी सगळेच जण ‘काय डॉक्टर बनणार की इंजिनीअर?’ असे वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच म्हणू लागतात. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू लागले की विद्यार्थ्यांलाही वाटते की आपण असेच काही तरी बनावे. पण मुलाचा कल, आवडनिवड, त्याच्या क्षमता, स्वभाव या सगळ्याची सांगड घालत करिअर निवड करणारे पालक आणि मुले यांची संख्या आता वाढू लागली आहे. त्यासाठी अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, करियर काऊन्सेलिंग यांचा वापरही खूप जण करू लागले आहेत. आपल्या मुलाला विविध विषयांची ओळख व्हावी, विविध करिअरमधील बारकावे समजावेत असा सजगपणे प्रयत्न करणाऱ्या पालकांची संख्या निश्चितच वाढत चालली आहे. त्या त्या क्षेत्रातल्या यशस्वी लोकांची माहिती मिळवून देणे, प्रत्यक्ष भेट घडवून आणणे इ. अनेक मार्गाचा वापर लोक आता करू लागले आहेत.

असे असूनही कधी कधी निवडलेला मार्ग पसंत पडत नाही आणि आपल्या करिअरची दिशा बदलावी असे वाटू लागते. आपल्या आवडीनिवडी लक्षात न घेता कधी पालकांच्या दबावामुळे, कधी स्वत:च्या चुकीच्या अपेक्षांमुळे निवडलेले करिअर आनंद देईनासे होते आणि मग स्वत:चा शोध सुरू होतो. मग एखादी डॉक्टर झालेली व्यक्ती शेअर मार्केटकडे व्यवसाय म्हणून वळते तर एखादा इंजिनीअर झालेला माणूस ट्रॅव्हल कंपनी काढून आपली प्रवासाची हौस भागवतो. किशोरावस्थेत आपल्या करिअरचा केलेला विचार नेहमीच परिपूर्ण नसतो. तरुणपणी एखादाच मुलगा किंवा मुलगी स्वत:च्या इच्छा-आकांक्षांचा वास्तववादी विचार करून आणि स्वत:च्या क्षमतांचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ शकतो किंवा शकते. अशा वेळेस आपल्या आत्तापर्यंतच्या शिक्षणाच्या आधारे पुढील नोकरी-व्यवसाय न करता वेगळेच प्रावीण्य मिळवणे गरजेचे वाटते. उदा. बी.कॉम. झाल्यावर दिग्दर्शनाचा, फिल्म मेकिंगचा कोर्स करणे. काही वेळेस अति ताण निर्माण करणारा व्यवसाय किंवा नोकरी नको असे वाटू लागते. नोकरीतल्या स्पध्रेचा कंटाळा येतो, कोणाच्या हाताखाली काम करणे स्वाभिमान दुखावल्यासारखे वाटते आणि स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला जातो. हासुद्धा एक प्रकारचा करिअरमधील बदलच.

वयाबरोबरच माणसाची विचाराची प्रगल्भता वाढत जाते, माणूस अधिक अंतर्मुख बनतो. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याचा प्रवास हा केवळ आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी होता, आता आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून लवकर सेवानिवृत्ती घेऊन वेगळी वाट चोखंदळणारे कमी नाहीत. इतके दिवस आपल्या नोकरी-व्यवसायातून आपला आणि आपल्या कुटुंबाचा लौकिकार्थाने विकास साधताना मध्यम वयात आंतरिक विकासाची ओढ वाटते. आपला रोजचा नित्यनेमाचा नोकरी-व्यवसाय सोडून इतर काही करावेसे वाटते. तसेच आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा यासाठी ज्ञानार्जनही अनेक जण करू लागतात. विशेषत: पन्नाशीत असताना जे करिअरमध्ये बदल करतात त्यामागे ही काही कारणे असतात.

प्रत्येक वेळेस करिअरमध्ये होणारा बदल ऐच्छिक असतोच असे नाही. उदा. नोकरी गेल्यामुळे नवीन काम शोधायला लागणे, अनेक वर्षे गृहिणी म्हणून राहिल्यानंतर परिस्थितीमुळे कमवायला लागणे, सेवानिवृत्तीनंतरही काम करायला लागणे हे सगळेच आपल्या इच्छेने घडत नाही. बदली होणे, आपल्या कामाचे स्वरूप बदलणे, बढती मिळाल्यामुळे जबाबदारी बदलणे हेसुद्धा करिअरमधील बदलच आहेत. अशा प्रत्येक वेळेस त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते.

करिअरमधील कुठल्याही बदलाला सामोरे जाताना मनाच्या अनेक आंदोलनांना सामोरे जावे लागते, भले मग तो बदल हवाहवासा असला तरीही. करिअरमधील बदलाची मानसिक पूर्वतयारी करावी लागते. त्यानंतर प्रत्यक्ष बदलाला सामोरे जाताना आपली मन:स्थिती सकारात्मक राहील यासाठी प्रयत्न करावा लागतो, तर बदल स्वीकारणे शक्य होते.

नवीन करिअरची सुरुवात करण्याआधी त्या करिअरविषयी चांगल्या अपेक्षा ठेवणे, मनात सकारात्मक भावना बाळगणे, बदल चांगलाच असेल असे मनाला सांगणे आणि बदल स्वीकारून आपल्याला उत्तम काम करायचे आहे अशी मन:स्थिती तयार केली तर बदल सोप्पा वाटतो. नवीन प्रकारचे काम करताना आत्मविश्वास बाळगून आपल्या कामाला एक अर्थ प्राप्त करून दिला तर नवीन काम सहज बनते. नवीन ठिकाणी रुळण्यासाठी कधी कधी स्वत:मध्येही बदल घडवावा लागतो. नवे नातेसंबंध प्रस्थापित करावे लागतात. आपली विशिष्ट भूमिका हळूहळू नक्की करावी लागते. त्यातून आपण नवीन कामात अ‍ॅडजस्ट होतो. आपल्या प्रयत्नातले सातत्य, निष्ठा आणि परिणामकता आपल्याला बदलत्या करिअरमध्ये स्थिरस्थावर व्हायला मदत करते.

याउलट जर आपला बदलाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असेल तर नवीन कामात जुळवून घेणे आपल्याला कठीण जाते. करिअरमध्ये बदल घडण्याआधीच मनात भीती आणि अनिच्छा निर्माण होते. प्रत्यक्ष बदलाच्या वेळेस मन तो स्वीकारायला तयारच होत नाही. उगाच करिअर बदलले असा विचार राहून राहून मनात येतो. निर्णयाचे दु:ख होत राहते. मग नवीन कामात जुळवून घेणे कठीण होते. नवीन नाती जोडायला मन तयार होत नाही. आपण इथे मिसफिट आहोत असे वाटू लागते. यामुळे नव्या क्षेत्रात स्थिरस्थावर होताच येत नाही आणि मनात अपयशाची भावना निर्माण होते. निराशा येते आणि उदासीनतेचा आजार होण्याची शक्यता बळावते.

आधीच्या करिअरमध्ये एखाद्याचे काय अनुभव होते, तो किती स्थिरावलेला होता, नवीन जबाबदाऱ्या घेण्याची त्याची क्षमता आणि कामाविषयीची प्रेरणा या सर्वाचासुद्धा नवीन करिअरमध्ये स्थिरावताना उपयोग होतो. नवीन ठिकाणी जर कोणी गुरू (मेंटॉर) मिळाला, मन मोकळे करण्याचे एखादे ठिकाण उपलब्ध असेल, आपल्या कामाविषयी प्रोत्साहन मिळण्याची व्यवस्था असेल तर तेथे रुळणे अर्थातच सोपे जाते.

घरचे नातेवाईक पाठिंबा देणारे असतील, करिअर बदलामागची भूमिका समजून घेणारे असतील तर बदल करणे सोपे होते.

आजच्या वेगवान आयुष्यात लवकर आणि भरपूर पसा, लवकर ऐहिक प्रगती, म्हणजे घर, गाडी, नवीन नवीन वस्तू, वाढती क्रयशक्ती याचा पाठपुरावा करताना अनेक वेळेला करिअर बदलले जाते. त्यानेही दमछाक होते. कंटाळा येतो. मग निराशा येते. कामामागची प्रेरणाच संपू लागते आणि कामातला रस संपतो. ही भावना टाळायची असेल, कामाची प्रेरणा कायम ठेवायची असेल तर ज्यातून आनंद मिळेल असे आपल्याला काम करणे आवश्यक आहे. कामातली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीची असू शकत नाही, पण आवडत्या गोष्टीसाठी काही अप्रिय गोष्टी कराव्या लागतात. आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक असते. स्वत:शीच थोडासा शोध घेऊन आपल्या कामाची अंत:प्रेरणा काय हे पाहिले की पुन्हा उत्साहाने कामाला लागता येते.

करिअर ही तसे म्हटले तर आयुष्यभर करण्याची गोष्ट आहे. त्यातून समाधान घेणे हे आपल्याच हातात आहे.
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com