मुंबईतल्या अनेक कॉलेजेस्मध्ये फेस्टिव्हल्सची तयारी जोर धरू लागली आहे.

विद्याविहारमधलं नामांकित कॉलेज म्हणजे के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड आर्ट्स. (विद्याविहार- पूर्व) येथे २००८ पासून ‘वाइब्स’ या नावाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या फेस्टिव्हलचे नामकरण मागच्या वर्षी ‘फिनिक्स’ असं झालं. मुंबईवर आधारित असलेली ‘आमची मुंबई’ या थीमसह ‘फिनिक्स २०१६’ हा फेस्टिव्हल १५, १६ व १७ डिसेंबर रोजी पार पाडण्यासाठी तयारी सुरू आहे.

या फेस्टिव्हलच्या प्रसिद्धीसाठी फेस्टिव्हलच्या थीमवर आधारित एक टिझर आणि एक ट्रेलर कॉलेजने नुकताच रिलीज केला, त्यासाठी २० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सात दिवस मेहनत केली आहे. लिटरली, फाइन आर्ट्स, स्पोर्ट्स अशा  ४० स्पर्धा   तीन दिवसांत होणार आहेत. फाइन आर्ट्समध्ये थोडा हटके प्रयोग करत ‘सबसे अलग’ यामध्ये पेन्ट ब्रश, पेन्सिल, पेन न वापरता बोटाने, स्ट्रॉने  पेन्टिंग करायचे अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

अशा स्पर्धासाठी कॉलेजच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी कामात मग्न झालेले आहेत. त्याचबरोबर फक्त मजामस्ती केंद्रस्थानी न ठेवता सामाजिक जाणिवेसाठी ‘उम्मीद- अ‍ॅक्सेप्ट स्पेशल, फील स्पेशल नावाचा एक इव्हेंट होणार आहे, त्यामध्ये स्पेशल मुलांसाठी त्यांचं  टॅलेन्ट सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळणार आहे, अशी माहिती कल्चरल सेक्रेटरी तन्वी चव्हाणने दिली.

वडाळ्यातील विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेजचे ‘विगर’ आणि ‘व्हर्व’ हे दोन फेस्टिव्हल्स गेल्या १० वर्षांपासून दिमाखदार पद्धतीने साजरे केले जातात. ‘विगर’ हा आंतरमहाविद्यालयीन फेस्ट येत्या २२ व २३ डिसेंबरला  होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांसह कॉलेजचे शिक्षकही तयारीला लागले आहेत.  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक, क्रीडा आणि साहित्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत याची माहिती कॉलेजचे जी.एस. तन्वी जाधव आणि सिमरस लामाने दिली.  दरवर्षीप्रमाणे हटके  थीम अर्थात ‘रेट्रो बॉलीवूड’ अशी थीम घेऊन कॉलेजचा ‘व्हर्व’ हा फेस्ट २४ डिसेंबरला होणार आहे. या थीममुळे  ७०-८० च्या दशकातल्या बॉलीवूडमधल्या सुपरस्टारचा सुवर्णकाळ अनुभवता येणार आहे.

खास आकर्षण असलेला, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि मराठी संस्कृतीचा ठसा तरुण मनात उमटवणारा ‘माय मराठी’ हा इव्हेन्टसुद्धा फेस्टचा महत्त्वपूणं भाग आहे, त्यासाठी अनेक कलाकार विद्यार्थी कसून प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.

ठाण्याच्या पूर्वेला असलेल्या जोशी-बेडेकर कॉलेजच्या ‘गंधर्व महोत्सवाचे’ हे १०वे वर्ष आहे. ‘‘गेल्या वर्षी ‘स्वदेशी’ ही थीम घेऊन महोत्सव  आयोजित करण्यात आला होता, तर यंदाचे हे १०वे वर्ष असल्याने काहीतरी हटके आणि वेगळा विषय म्हणजेच ‘नॉस्टेल्जिया (ल्ल२३ं’ॠ्रं) – अ‍ॅन अल्बम फुल्ल ऑफ मेमरीज’ या थीमसह २०-२१  जानेवारी रोजी होणार आहे. तरुणांना पुन्हा बालपणीच्या आठवणींना उजाळा येईल अशी ही थीम आहे.’’  अशी माहिती कॉलेजच्या पब्लिसिटी हेड ‘सागर रणशूर’ने दिली.

परफॉर्मिग  आर्ट्सपासून ते फुडी, ट्रेजर हन्टसारख्या अनेक स्पर्धा आयोजित केल्या आहेत.  १०० हून अधिक कॉलेजचा सहभाग या महोत्सवात असतो. या वर्षी त्याहूनही अधिक कॉलेजेस्पर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थी कामाला  लागले आहेत.
तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com