त्रिपुराच्या २२ वर्षीय दीपा कर्माकरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा जिम्नॅॅस्टिक्समधील सर्वात कठीण प्रकार सादर करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. गेली २५ वष्रे जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नीलम भोसले यांनी दीपा कर्माकरच्या ऑलिम्पिकवारीच्या पाश्र्वभूमीवर केलेली खास बातचीत

तुम्ही दीपा कर्माकरच्या पराक्रमाकडे कसं पाहता?

– दीपा कर्माकर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यामुळे जिम्नॅस्टिक्सकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. आतापर्यंत हा फक्त एक खेळ होता. पण त्यात इतक्या मोठय़ा प्रमाणात यश मिळू शकेल, त्यात पुढं जाता येईल, असं लोकांना वाटतच नव्हतं. पण म्हणतात ना की, एखादा धक्का लागतोच पुढं जाण्यासाठी. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीयांना तेवढा भाव दिला जात नव्हता. सध्या आपण थोडं मागं असलो तरी जिम्नॅस्टिक्स खेळू शकतो, असा दृष्टिकोन निर्माण होऊ शकेल. लोकांना माहिती होईल की, जिम्नॅस्टिक्स नेमकं काय आहे. कारण कितीही म्हटलं तरी ऑलिम्पिक ही गोष्टच वेगळी आहे. ही जगातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. तिथं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्वात अव्वल खेळाडू सहभागी होतात. क्रीडाविश्वात ऑलिम्पिकला खूप मानाचं स्थान आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये जाणं, ही माझ्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे.

इतक्या वर्षांनी एक महिला जिम्नॅस्ट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. हे महिलांसाठी किती प्रेरणादायी असू शकतं?

– आपल्याकडे जिम्नॅस्टिक्समुळे मुलींवर काय परिणाम होऊ शकतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. जिम्नॅस्टिक्समुळे स्नायूंना बळकटी येते आणि शरीर लवचीक होतं. आता जिम्नॅस्टिक्समध्ये मुली इतकी मोठी उंची गाठू शकतात, हा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे जास्त मुली या खेळाकडे वळू शकतील.

या क्षेत्रात दीपामुळे कसं चतन्य निर्माण झालं आहे?

– ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व कुणी करणार आहे, हे समजल्यावर सरकारचा दृष्टिकोन बदलतो. खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी मिळण्यासाठी सरकारचं आर्थिक पाठबळ आणि खेळासाठीच्या पायाभूत सुविधांची नितांत आवश्यकता असते. मात्र तिथं आपण खूप कमी पडतो. जिम्नॅस्टिक्सच्या अत्याधुनिक सुविधा असणारं केंद्र मुंबईतही नाही. त्यामुळे आवश्यक तो निधी जमा करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. दीपाच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक आपल्याला मिळालं तर त्याचा खूपच सकारात्मक परिणाम देशात दिसून येईल.

दीपा कर्माकर ऑलिम्पिकमध्ये सादर करणार असलेल्या ‘प्रोडय़ुनोव्हा’ या जिम्नॅस्टिक प्रकाराविषयी काय सांगाल?

– ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा प्रकार मुळात  जोखमीचा मानला जातो. कारण यात मारली जाणारी कोलांटउडी साध्य झाली नाही, तर ती व्यक्ती मानेवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठा धोका यात आहे. म्हणून बरेच जिम्नॅस्ट हा प्रकार करत नाहीत. दीपानं हा प्रकार अतिशय प्रयत्नपूर्वक साध्य करून त्यात प्रावीण्य मिळवलं आहे. ही कौतुकाची बाब आहे.

‘प्रोडय़ुनोव्हा’ कडे अन्य देशांचे खेळाडू कसं पाहतात?

– आंतरराष्ट्रीय स्तरावरही हा प्रकार फारसे खेळाडू करत नाहीत. सहभागी देशांपकी चार-पाच खेळाडू हा प्रकार करतील, असा माझा अंदाज आहे. त्यामुळे तिला पदकाची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण त्याच वेळी ते उत्तम करणं जमायला हवं. कारण त्यात चुकाही होऊ शकतात. हा सादरीकरणाचा प्रकार असल्यानं त्या क्षणी ते कसं होतंय, हे जास्ती महत्त्वाचं आहे.

दीपाला ऑलिम्पिक पदक मिळवणं किती आव्हानात्मक असेल?

– हा क्रीडा प्रकार ती खुबीनं सादर करते आहे, हे दिसतंय. ऑलिम्पिकमध्ये ती तो किती प्रावीण्यानं करतेय ते पाहावं लागेल. कारण ऑलिम्पिकमध्ये ते करणं ही एक वेगळी बाब असते. कारण ती संधी आपल्याला एकदाच मिळते.

जिम्नॅस्टिक्सच्या सध्याच्या जागतिक स्थितीबद्दल तुम्ही काय सांगाल?

– हा क्रीडाप्रकार जागतिक स्तरावर मोठय़ा प्रमाणात स्वीकारला गेला आहे. वास्तविक सर्व खेळांचं मातृत्व असलेला खेळ म्हणजे जिम्नॅस्टिक्स. एक म्हणजे लहान मुलांनी जिम्नॅस्टिक्स खेळल्यास त्यांची सर्वागीण वाढ होईल आणि पुढे या खेळात प्रावीण्य मिळवता येईल. दुसरं म्हणजे स्पर्धात्मकता. ते रंजक आहे आणि तितकंच जोखमीचंही आहे. परदेशात या स्पर्धा शुल्क भरून लोक बघायला जातात. दुर्दैवानं आपल्याकडे तो तेवढा लोकप्रिय  नाही. यात अपेक्षित यश मिळायला खूप वेळ लागतो. त्यात ताण आणि अविरत कष्ट खूप असतात. मुलींना चार आणि मुलांना सहा साधनं मिळतात. ती वापरून त्यांना या खेळात प्रावीण्य मिळवावं लागतं.

महाराष्ट्रातल्या जिल्ह्य़ांत, विशेषत: मुंबई-ठाण्यासारख्या ठिकाणी या खेळाबद्दल काय वातावरण आहे?

– जिम्नॅस्टिक्ससाठी वातावरण तसं चांगलं आहे. केंद्रं खूप आहेत, पण सगळीकडे योग्य पायाभूत सुविधा नाहीत. म्हणून जेवढय़ा प्रमाणात चांगले खेळाडू तयार व्हायला पाहिजेत, तेवढे होत नाहीत. लोकांची जागरूकता वाढलेली आहे. शहरांत होणाऱ्या स्पर्धामुळे लोकांना जिम्नॅस्टिक्सबद्दल माहिती अधिक मिळते आहे. तिथले प्रशिक्षक आपल्या परीनं सातत्यानं प्रयत्न करत आहेत, त्यांना तेवढीच साथ मिळायला हवी. जिम्नॅस्टिक्सचं साहित्य तसं महाग आहे. त्यासाठी, तसंच आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी सरकारनं मदत केली, तर आपण आणखीन चांगली कामगिरी करू शकू. आताही या ठिकाणची आपली मुलं-मुली राज्यस्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. काही राष्ट्रीय संघातही आहेत. काही आंतरराष्ट्रीय स्तरावरही जाताहेत. पण हे प्रमाण वाढणं गरजेचं आहे. प्रशिक्षकांची संख्याही वाढायला हवी.

जिम्नॅस्टिक्स हा थोडासा नृत्यासारखा प्रकार आहे. त्यात लालित्य आहे. फुलवा खामकरच्या यशाचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे. त्याबद्दल काय सांगाल?

– हे जास्तीतजास्त मुलींना अधिक लागू पडतं. संगीतावर दोन-एक-दोनचा सेट करायचा असतो. अ‍ॅक्रोबॅटिक आणि नृत्य या दोघांचं मिश्रण करून ते ताल-लयीत सादर करायचं असतं. त्यामुळे ते अतिशय सुंदर दिसतं. फुलवा माझ्याबरोबरच जिम्नॅस्टिक्स करायची. तेव्हाही फुलवाचं सादरीकरण हा औत्सुक्याचा विषय असायचा. तेव्हापासून तो ऱ्हिदम तिनं जोपासला आहे. जिम्नॅस्टिक्स आणि नृत्याच्या मिलाफानं तिनं करिअरची छान वाट निर्माण केली आहे. त्यातला अभिनय हा भागही महत्त्वाचा आहे. जिम्नॅस्टिक्स केल्यानंतर त्यातल्या करिअरचा हा एक पर्याय आहे. त्याची नीट माहिती लोकांनी करून घ्यावी.

नोकऱ्यांच्या पातळीवर जिम्नॅस्टिक्सला कशी मदत मिळते आहे आणि कशा प्रकारचं वातावरण आहे?

– रेल्वे आणि इतर सेवांमधून क्रीडापटूंसाठीच्या राखीव जागा असतात, तशा त्या जिम्नॅस्टिक्ससाठीही आहेत. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रावीण्य मिळाल्यानंतर तुम्ही अर्ज करून नोकरी करू शकता. शिवाय प्रशिक्षकासंदर्भातील काही अभ्यासक्रम केले तर साई, एनआयएसमध्ये प्रशिक्षक होऊ शकता. ते सांगतील त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. क्रीडा मानसोपचारतज्ज्ञही होता येऊ शकेल.

दीपाचे वडील हे स्वत: वेटलििफ्टग प्रशिक्षक होते. त्यामुळे तिच्या घरात खेळाविषयक अनुरूप वातावरण होतं. घरात खेळविषयक वातावरण असणं हे कितपत उपयुक्त ठरतं?

– घरातलं वातावरण खेळासाठी अनुकूल असेल तर त्यांना माहिती असतं की, खेळाडूंना यश मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. उलट सामान्यांना खेळाची माहिती नसल्यानं इतकी वर्षे खेळासाठी करूनही काहीच मिळवता आलं नाही असं वाटतं. खेळाडूंचे आहार, व्यायाम, आदी सगळं वेळापत्रक व्यवस्थित सांभाळावं लागतं. तरच त्याचा चांगला परिणाम होतो. कुठंही जाऊन सराव करण्याची तयारी लागते. एक बांधिलकी पालकांना सांभाळावी लागते. या सगळ्या गोष्टींची माहिती आणि त्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन काही जणांनाच असतो. त्यामुळे दीपाला खूप फायदा झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिचं मानसिक सामथ्र्य वाढलं.

सध्या काही रिअ‍ॅलिटी शोजमधून जिम्नॅस्टिक्सची झलक दिसते आहे. त्यामुळे पालकांमध्ये त्याविषयी काही जागृती झाली आहे का?

– जिम्नॅस्टिक्सविषयक जागृती होते आहे. पण काही वेळा गरसमजही होतात की, हे किती सोप्पं आहे. आमच्याकडे काही पालक विचारणा करतात की, मुलीला नृत्याचं सादरीकरण करायचं आहे, तिच्याकडे दोन आठवडे आहेत. काय करता येईल? या खेळाला समíपत वृत्ती असावी लागते. मग आम्हाला सांगावं लागतं की, इतकं सोप्पं नाही आहे, हे समर्पण करणं. त्यासाठी व्यवस्थित तयारी करावी लागते, त्याला वेळ लागतो. पण टीव्हीवरील प्रसिद्धीमुळे लोकांना जिम्नॅस्टिक्सचं आकर्षण वाढतं आहे. बरीच मुलं त्याकडे वळताहेत. आम्ही त्यांना सांगतो की, आम्ही शिकवू, मुलांनी वेळ मात्र द्यायला हवा.

ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये लोकांना जिम्नॅस्टिक्स शिकायचं आहे. तर वस्तुस्थिती काय आहे?

– शहरी भागात जिम्नॅस्टिक्स शिकण्यासाठी अनुकूल वातावरण नक्की आहे. ग्रामीण भागात तेवढी जागरूकता नाही. पण खरं सांगायचं तर ग्रामीण भागातील मुलांकडे क्षमता जास्त आहे. त्यांचं शरीर खूप काटक आहे, जे जिम्नॅस्टिक्सला योग्य न्याय देऊ शकतील. जिम्नॅस्टिक्समध्ये पुढे करिअर काय, हा प्रश्न त्यांच्यापुढं असतो. तो शिष्यवृत्ती देऊन, करिअरची जबाबदारी घेऊन सोडवता येऊ शकतो. याबाबत प्रयत्न सुरू आहेत, पण ते आणखीन वाढायला हवेत.
(शब्दांकन : राधिका कुंटे)
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com