४४-वर्धापनदिन विशेष अंक

मृत्यूनंतर आपण मृतदेहावरचे मौल्यवान दागिने काढून घेतो. पण डोळे, त्वचा हे आपले निसर्गदत्त मौल्यवान दागिने काढून घेतले तर एखाद्या गरजू जिवाला त्याचा उपयोग होऊन त्याचं जीवन सुधारू शकतं. तेव्हा नेत्रदान, त्वचादान, देहदान करा..

पृथ्वीवरील प्रत्येक कीटक, पशुपक्षी, प्राणिमात्र मृत्यूनंतर काहीना काही रूपात इतरांच्या कामी येतो. गाय, म्हैस यांची चरबी व चामडी, मोराची पिसे, हत्तीचे दात वगरे उपयोगात येतात. काही प्राणी तर इतरांचे भक्ष्य बनतात. परंतु मनुष्यप्राणी मृत्यूनंतर आपल्या सजातीयाच्या शवाचे दहन किंवा दफन करून मातीमोल करून टाकतो. पण काही प्राण्यांच्या बाबतीत तसे होत नाही. उदाहरणार्थ साप दिसला की ठेच त्याचे डोके. पण त्याच सापाच्या विषाचे संकलन करून त्यापासून असाध्य रोगावर जीव वाचवणारे औषध बनवू शकतो हे तारतम्य आपण बाळगत नाही. जवळची व्यक्ती गेली की लाकडे मागवून तिला अग्नी देणे किंवा जमिनीत पुरणे हाच आपला प्रघात आहे. सर्व जाती-धर्माचे लोक साधारणपणे मृत्यूनंतर मृताच्या शरीरावरील मौल्यवान दागिने काढून घेतात. सोन्याचे दागिने किमती आहेत ते कसे वाया घालवणार, हे सर्वाना समजते परंतु परमेश्वराने दिलेले त्याहूनही अनमोल दागिने म्हणजे डोळे, त्वचा इत्यादी जमिनीत गाडून मातीमोल करणे किंवा जाळून टाकणे किती योग्य आहे?

आज आपल्या भारतीयांचा अवयवदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदलत आहे, परंतु तो अधिक ठामपणे बदलायला हवा.

वैद्यकशास्त्र अतिशय प्रगत झाल्याने अवयवदान खूप सोपे व सोयीचे झाले आहे. तरीसुद्धा लोक धर्माचा आधार घेतात. कुराण, पुराण किंवा बायबल काळात मृताचे अवयव प्रत्यारोपण करून कोणाचा जीव वाचवता येईल इतपत वैद्यकशास्त्र प्रगत नव्हते. अन्यथा आज सर्वाचा तसा धार्मिक प्रघात असता. आजारी पडल्यास इलाज आजच्या प्रगत शास्त्राचा पण अवयवदानाचा विषय आल्यावर आधार पुराणशास्त्राचा? केवढा हा विपर्यास? त्यामुळे अवयवदान हा सार्वजनिक प्रघात व्हायला हवा. प्रत्येकाने जात-पात-धर्म न पाहता दान करावे. एखाद्याने नाही केले तर त्याला मोठा प्रश्न पडावा की मी अवयवदान केले नाही तर लोक काय म्हणतील?

आजवर अवयवदानात सामाजिक, धार्मिक रूढी-परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा आडव्या येत गेल्या. आता आता कोठे अवयवदानाची माहिती व प्रसार होत चाललाय, परंतु तरीदेखील लोकांची उदासीनता किंवा पारंपारिक पद्धतीच्या अंत्ययात्रा व तेच ते धर्मावर (अंधश्रद्धेवर) आधारित मृत्यूनंतरचे क्रियाकर्म, कर्मकांड या सर्वामुळे परमेश्वराने बहाल केलेला अनमोल खजिना मानव जातीच्या उपयोगात येऊन कोणाला जीवनदान मिळण्यासारखे असूनसुद्धा आपल्याकडून दुर्दैवाने त्याची राखरांगोळीच केली जाते आहे.

देहाला अग्नी न देता त्याचे दान केले तर मोक्ष मिळणार नाही, आत्मा भरकटत राहील, िपडाला कावळा शिवणार नाही, नेत्रदान केल्यास पुढच्या जन्मी मी आंधळा जन्माला येईन इत्यादी भ्रामक कल्पनांच्या आधारे नकारात्मक भूमिका घेऊन अज्ञानी (?) लोक पळवाट काढतात. खरं पाहता या गोष्टी कोणत्याही धर्मग्रंथात सांगितलेल्या नाहीत, देहदान-अवयवदानास सर्व धर्मानी व धर्मगुरूंनी मान्यता दिलेली आहे. मुळात ‘दान हा प्रत्येक धर्माचा पाया आहे’. शवाचे दहन किंवा दफन करणे म्हणजे एक प्रकारे अग्नीला किंवा भूमीला आपण ते दानच करतो असे नाही का? मग त्याप्रमाणे तो देह आपल्या म्हणजे मानवजातीच्या पुनर्जीवनासाठी कामास येण्याच्या उदात्त हेतूने अवयवदान करणे उत्तम नाही होणार का? शरीर हे क्षणभंगुर आहे, मृत्यूनंतर देह संपणार. मात्र अवयवरूपी जिवंत राहायचे असेल तर ‘अवयवदान’ करावे.

रक्तदानाबाबतसुद्धा समाजात असेच गरसमज होते. आता बरीच जागरूकता आलेली आहे. खरं तर रक्त हा शरीराचाच एक हिस्सा आहे, तो जिवंतपणी आपण सर्वजण नियमितपणे दान करू लागलो आहोत म्हणजे तो विषय आता आपल्या चांगलाच अंगवळणी पडला आहे. मात्र अजून आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने हजारो रुग्ण वर्षांनुवर्वष प्रतीक्षा करत करत मृत्यूला सामोरे जात आहेत.

कुठलाही रुग्ण मृत झाल्यानंतर त्याचे शोकाकुल नातेवाईक अवयवदानाचे महत्त्व समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळे त्या वेळच्या अवयवदानाच्या सूचनांना ते विरोध करतात. अनेक देशांत मृत व्यक्तीने मरण्याआधी आपले अवयव दान करू नयेत, असे स्पष्ट जाहीर केले असेल, तरच त्या व्यक्तीचे अवयव दान केले जात नाहीत. अन्यथा प्रत्येक व्यक्तीची या अवयवदानाला मान्यता आहे, असेच मानून त्वरित कार्यवाही केली जाते. आपल्या देशात अशी व्यवस्था नाही. प्रतीक्षा यादी व नेत्रदाते यात फार मोठे अंतर आहे. श्रीलंकेसारखा छोटासा देश नेत्र निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला मात्र त्यांच्याकडून नेत्र आयात करावे लागतात ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे? नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान याला प्रघाताने अवयवदान म्हटले आहे. ते प्रत्यक्ष करायचे असल्यास काय करावे हे आत्ताच नीट समजून घ्यावे व यापुढे आपल्या माहितीत कोणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांचे सांत्वन करून नेत्रदानासाठी प्रोत्साहित करावे. आपलं एक सकारात्मक पाऊल आजच्या काळाची पायाभूत गरज आहे. आपल्या आयुष्यात एक तरी अवयवदान घडवून आणा.

मृत्यूच्या वेळेपासून तीन ते चार तासात नेत्रदान/ त्वचादान होणे उत्तम. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये सहा तासांच्या आत नेत्र स्वीकारले जातात. त्यानंतर ते स्वीकारता येत नाहीत.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिने नेत्रदानाचा संकल्प सोडलेला असेल तर  सर्वप्रथम जवळच्या नेत्रपेढीस बोलवावे किंवा जवळच्या नेत्रदान व त्वचादान समन्वयक (Organ Donation Coordinator) / संस्था यांना फोन करून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. असे महत्त्वाचे फोन नंबर कुटुंबातील सर्वाना सहज सापडतील अशा ठिकाणी लिहून ठेवलेले असावेत.

नेत्रदानाचा संकल्प केला आहे, त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दात्याच्या मृतदेहावरील सर्व पंखे बंद करावे, एसी (उपलब्ध असल्यास) चालू करावा. (ज्यामुळे डोळे सुकणार नाहीत.)

डोक्याखाली किमान दोन उशा ठेवाव्यात.

बंद डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात (शक्यतो बर्फाच्या) (ज्यामुळे नेत्रपटल ओले राहतील).

डॉक्टरकडून मृत्यूचे कारण, (कॉज ऑफ डेथ) वय, वेळ नमूद केलेले मृत्यू सर्टििफकेट (डेथ सर्टिफिकेट) प्राप्त करून आय बँकेस पाठवावे (व्हॉट्सअ‍ॅप, स्कॅन). त्यामुळे आय बँकेस निर्णय घेणे सोपे जाते. शक्य असल्यास त्याच वेळेस दहा सीसी रक्ताचा नमुना घेऊन ठेवल्यास उत्तम.

नेत्रपेढीचे व त्वचापेढीचे तज्ज्ञ किंवा डॉक्टर घरी येऊन (मृतदेह दवाखान्यात असल्यास तेथे येऊन) नेत्रपटल / त्वचा काढून नेतात (या प्रक्रियेस प्रत्येकी सुमारे अर्धा तास लागतो).

नेत्रदान / त्वचादानानंतर चेहरा किंवा देह अजिबात विद्रूप होत नाही. (कदाचित नेत्रदान झाले आहे किंवा नाही हे समजतही नाही).

दात्याला मृत्यूसमयी कावीळ, हिपॅटायटिस बी/ सी ,एड्स, कॅन्सर, शरीरभर सेप्टिक पसरणारे इन्फेक्शन, इ. आजार असल्यास अशा परिस्थितीत नेत्रदान, त्वचादान होऊ शकत नाही. याव्यतिरिक्त कुणीही नेत्रदान करू शकतो. हे संपूर्ण गुप्त दान असते. घेणाऱ्याला अथवा देणाऱ्याला त्याची माहिती दिली जात नाही.

डोळ्याच्या काळ्या बाहुलीवर घडय़ाळाच्या काचेसारखा भाग आहे. या काचेला ‘कॉíनआ’ (पारपटल) असे म्हणतात. फक्त याच भागाचे रोपण करता येते. संपूर्ण बुबुळ / डोळा वापरला जात नाही. कॉíनआमध्ये रक्तवाहिन्या नाहीत त्यामुळे कोणतेही क्रॉसमॅचिंग न करता कॉíनआ यशस्वीपणे कलम करून कोणालाही बसवता येतो.

विशेष बाब म्हणजे; नेत्रदानात फक्त कॉíनआ रोपण केले जात असल्यामुळे, कॉíनआ व्यवस्थित असून अन्य कारणामुळे अंधत्व आलेली अंध व्यक्तीदेखील नेत्रदान करू शकते!

डायबेटिस असलेली, जाड भिंगाचा चष्मा असलेली, मोतीिबदूचे ऑपरेशन झालेली व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकते.

नेत्रदान, त्वचादानासाठी वय, लिंग, रक्तगट यांची कोणतीही मर्यादा नाही. नेत्रदान, त्वचादान, देहदान या सर्वासाठी ‘सहा तासांच्या आत’ ही वेळेची मर्यादा फार महत्त्वाची आहे.

आपल्या नेत्रदानामुळे किमान दोन (नवीन तंत्रज्ञानामुळे यापुढे चार ) दृष्टिहीनांना आपण नेत्रज्योती प्रदान करू शकतो ज्यामुळे त्यांचे जीवन नुसते बदलतच नाही तर ते अंधत्वातून कायमचे मुक्त होतात.

आधी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरलेला असला किंवा नसला तरी प्रत्यक्ष अवयवदानाच्या वेळी नातेवाईकांच्या संमकतीने अवयवदान करता येते.

रक्तदान जिवंतपणी करता येते, परंतु नेत्रदान मृत्यूनंतर करावयाचे असते. जगातलं हे एकमेव दान आहे, जे आपण करूनही आपल्याला पाहता, अनुभवता येत नाही. आपली दानाची इच्छा आपले जवळचे नातेवाईकच पूर्ण करू शकतात.  म्हणून आपण नुसते इच्छापत्र (डोनर्स कार्ड) भरून न ठेवता आपल्या जवळच्या जास्तीतजास्त नातेवाईकांना आपल्या इच्छेबाबत सांगून ठेवावे. आपले नेत्रदान केले जाऊन त्या डोळ्याचे रोपण होऊन कुणाला तरी दिसू लागेल, आपली अंतिम इच्छा नक्की पूर्ण होईल अशी खात्री झाल्यानंतर एक अलौकिक समाधान व आनंद आपण अनभवू शकतो. बहुधा वाढदिवस किवा लग्न इत्यादी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आपली इच्छा जाहीर केल्यास दुहेरी लाभ होऊ शकतो जेणेकरून इतर आप्तजनांना आपल्या इच्छेची माहिती होईल व तेदेखील देहदान अवयवदानास प्रवृत्त होतील. स्वतच्या प्रयत्नाने एकाचे तरी नेत्रदान घडवून आणा.

त्वचादान

शरीरावर त्वचेचे एकंदर सात थर असतात, त्यापकी सर्वात वरची त्वचा डरमोटोम नावाच्या बॅटरीवर चालणाऱ्या छोटय़ाशा मशीनने घेतली जाते. कांद्याच्या दोन पडद्यामधील दुधी रंगाचा अतिशय पातळ पापुद्रा असतो तितकी पातळ त्वचा काढली जाते. बऱ्याच वेळा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनासुद्धा त्वचादानाबद्दल नीट माहिती नसते. लोकांमध्ये त्वचादानाबाबत भरपूर गरसमज असतात. त्यांना त्वचादान केल्यानंतर ती घेणारे संपूर्ण शरीर सोलून काढतात असेच वाटते. पण सत्य हे आहे की  त्वचादानामध्ये रक्ताचा एक थेंबदेखील येत नाही. पायाच्या घोटय़ापासून जांघेपर्यंतच्या भागाचीच त्वचा घेतली जाते. काही परिस्थितीमध्ये पाठीच्या भागाची त्वचासुद्धा घेतली जाते. त्वचादान केल्याने शरीर अजिबात विद्रूप होत नाही. त्यात पायाला अतिशय योग्य तऱ्हेने बँडेज लावले जातात. कधी अपघाताने शरीर फाटले तर टाके मारून ते शिवता येते, हाडे तुटली तर कृत्रिम रॉड टाकता येतो, पण भाजण्याच्या जखमेवर कोणतेही हमखास बाह्य़ उपचार नाहीत. निसर्गनियमाप्रमाणे आतून येणारी त्वचाच जखम भरून काढू शकते. पण त्वचा खोलवर भाजल्यास त्या जागी जिवंत त्वचापेशीच शिल्लक राहत नाहीत त्यामुळे हवेतून होणाऱ्या सततच्या जंतुसंसर्गामुळे जखमा भरत नाहीत व चिघळतच राहतात. रुग्ण महिनोन्महिने मरणयातना भोगत राहतो. अशा केसेसमध्ये त्वचारोपणाचाच मार्ग उरतो. दानात मिळालेली त्वचा जखमेवर कोणत्याही विशेष ऑपरेशनशिवाय नुसती झाकल्यास जादू झाल्याप्रमाणे काही दिवसांतच हमखास जखमा भरून रुग्ण बरा होतो. असे असूनही आपण ती त्वचा मातीमोल करतो, जाळून टाकतो..

देहदान

शरीर विज्ञानशास्त्राच्या अभ्यासासाठी संपूर्ण देहदान करावयाचे असल्यास, विहित नमुन्यातील  फॉर्म फोर ए (4-अ)भरायचा असतो. तो  नगरपालिका अथवा हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असतो. तो भरून देह किमान एका जवळच्या नातेवाईकामार्फत सहा तासांच्या आत नजीकच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची पूर्वपरवानगी घेऊन पोहोचवावा लागतो. यातील कोणतेही फक्त एक, दोन किंवा तिन्ही दान करण्याचा निर्णय मृताच्या नातेवाईकांच्या संमतीनुसार घेता येतो. देहदान करण्यासाठी डोनर फॉर्म कोणत्याही संस्थेमार्फत कोणत्याही गावी भरला आणि मृत्यू दुसऱ्या ठिकाणी झाला तरी काहीही अडचण नाही. कोणत्याही प्रकारचा अवयवदानाचा फॉर्म भरलेला नसला तरी जवळचे वारस ऐन वेळी निर्णय घेऊन आपल्या इच्छेप्रमाणे दान करू शकतात.

अवयवदान

बहुतेक लोकांचा असा समज आहे की आपला कधीही आणि कसाही मृत्यू झाला तर आपल्या मृत्यूनंतर आपले सारे अवयव दान करता येतील पण ते खरे नाही. ‘जिवंत अवयवच’ शरीरातून काढले जातात. जिवंत म्हणजे ज्यांना रक्तपुरवठा सुरू आहे असे अवयव. अवयवदान हे प्रामुख्याने दोन प्रकारांत केले जाऊ शकते.

जिवंतपणीचे दान (लाइव्ह डोनेशन)

जिवंत व्यक्ती केवळ आपल्या नातेवाईकांसाठीच अवयव दान करू शकते. कुटुंबातील सदस्य म्हणजे मुलगा, मुलगी, आईवडील, भाऊबहीण अथवा पती किंवा पत्नी. नातेवाईक किंवा मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीस जिवंतपणीच आपल्या शरीरातील एखादा अवयव दान करायचा असल्यास त्यास महाराष्ट्र शासनाची (ZTCC ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे) परवानगी घेणे आवश्यक असते. अवयवदानानंतर दात्याच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही परवानगी दिली जाते. त्यामुळे जिवंतपणी किडनी व यकृताचे काही प्रमाणात दान केले जाऊ शकते.

मृत्यू पश्चात (कॅडेव्हर डोनेशन) : प्रत्येक व्यक्ती नेत्रदान व त्वचादान करू शकते; नव्हे प्रत्येकाने ते करायलाच हवे. तसेच आपण संपूर्ण देहदानदेखील करू शकतो. मात्र प्रत्येक व्यक्तीचे अवयवदान होऊ शकेलच असे शक्य नाही. कारण अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी (ऑर्गन ट्रान्सप्लान्ट) अवयवांना रक्तपुरवठा चालू असणे आवश्यक आहे. म्हणून मेंदुमृत (ब्रेन डेड) व्यक्तीच अवयवदान करू शकते, जी अवस्था अतिदक्षता विभागातच (आयसीयू) शक्य आहे. एखादा अपघात झाल्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केले जाते. विविध उपचार करूनदेखील रुग्णाकडून उपचारांना प्रतिसाद दिला गेला नाही तर न्यूरोसर्जन मेंदू तपासणी करतात त्या वेळेस जर मस्तिष्क स्तंभ मृत झाल्याचे निदान झाले तर तो रुग्ण (ब्रेन स्टेम डेड) मेंदू मृत घोषित केला जाऊ शकतो. ही अवस्था कोमासारखी असते. कोमात असलेला रुग्ण कधीतरी बरा होण्याची थोडीशी शक्यता असू शकते, परंतु मेंदुमृत रुग्ण कधीही बरा किंवा जिवंत होऊ शकत नाही. अशा अवस्थेत उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्ण मेंदुमृत झाला आहे असे घोषित करता येत नाही. मेंदुमृत असण्याची शक्यता वर्तवल्यानंतर सरकारने मान्यता दिलेल्या चार तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नेमली जाते. त्यातील कोणतेही दोन डॉक्टर सुरुवातीला अ‍ॅप्नेआ (APNEA) टेस्ट घेतात, त्यांना ती टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास आणखी तीन तासांनंतर वेगळ्या दोन डॉक्टरांची टीम येऊन खात्री करते त्यात सत्य आढळल्यानंतरच रुग्णाला मेंदुमृत घोषित केले जाते.

अशा स्थितीत रुग्ण मृत झालेला असूनही कृत्रिम उपकरणांच्या आधाराने त्याच्या हृदयाची क्रिया चालू ठेवल्यामुळे मॉनिटरचा ग्राफ चालू असताना दिसतो. उपकरणाच्या माध्यमातून हृदयाची स्पंदने सुरू ठेवल्याने संपूर्ण शरीरभर रक्तसंचार फिरता राहून प्रत्येक अवयवालादेखील रक्त मिळत राहते. ही स्थिती अवयवदानासाठी उपयोगी ठरते. ही रुग्णाच्या नातेवाईकांनी संमती द्यावयाची निर्णायक घडी असते. नातेवाईकांनी संमती दिल्यास, अवयवदाता मृत्यूच्या दारात अडखळलेल्या आठ अभागी जिवांचे प्राण वाचवून इतर अनेकांचे जीवन दु:खमुक्त करू शकतो. अवयवदान केल्यानंतर देह विकृत होत नाही. अगदी ऑपरेशन केल्यानंतर जशी असते तशीच रुग्णाची काळजी घेऊन अंत्यविधीसाठी देह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. मृत्यूनंतर देहदान केल्यानंतर आपले नेत्र, त्वचा, अस्थी, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्या, हृदय, फुप्फुस, यकृत, स्वादुिपड, मूत्रिपड इत्यादी महत्त्वपूर्ण अवयवांचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोग होऊ शकतो.

देहदान, अवयवदानाबाबतीत असलेल्या गरसमजुतींवर लोक पटकन विश्वास ठेवतात, पण योग्य व्यक्ती, संस्था यांच्यामार्फत सत्य समजून घेत नाहीत. एक सुज्ञ नागरिक म्हणून चला आता तरी मोघम माहितीपेक्षा सखोल माहिती मिळवून या विषयाचा पुरस्कार, प्रचार व प्रसार करून प्रत्यक्ष देहदान करण्याची परंपरा सुरू करू या.

स्कीन बँकेचे पत्ते

  • RCBN Skin BankNational Burns Centre
    Sector-13, Airoli, Samarth Ramdas Swami Marg,
    Navi-Mumbai-400708 (INDIA).
    Phone No: +91-22-2779 6660/61/62/63/64
    Helpline No.: +91-22-2779 3333
    Fax: +91-22-2779 4227
    Email: skinbanknbc@gmail.com
  • Surya Hospital, Agarwal Marg, Lunanagar,
    Kasba Peth, Pune, MH 411011, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion (West), Mumbai – 400022
    Telephone Numbers: + 91 2407 6381, + 91 2406 3000, + 91 2409 2020, + 91 2408 2504
    Phone : 020 2445 4232, (020) 24574232
  • Lokmanya Tilak Municipal General Hospital
  • Choithram Hospital, Manik Bagh Road,
    Choithram College of Nursing, Indore, MP 452014
    EMail: medicine@choithram.org
    Phone: 0731-2362491-99 , 0731-4206750-59
  • Pune Hospital in Pune
    Phone; (020) 24331706, 24331707
  • Safdarjang Hospital, New Delhi, Ring Road,
    Opp AIIMS
    Phone: 011 2616 5032

काही महत्त्वाचे फोन नंबर

  • EYE BANK: All India Toll Free 1919
  • EBCRC Eye Bank Parel Opp. KEM Hospital Mumbai : 02224164342 / 4162929
  • Rotary Eye Bank Borivali (E), Tel: 98216 01919 / 98218 01919.
  • SAHIYARA EYE BANK B/305 Manas Residency,Teen Petrol pump,L.B.S. Road, Thane 022 2534 1919 93206 11919 / 93213 11919 / 93204 11919
  • SKIN BANK:National Burns Centre, Sector-13, Airoli, Navi-Mumbai Phone No: 022-2779 6660 /61/62/63/64 or 27643333
  • Sion Hospital Mumbai. 022 24063000. Helpline No: 2779 3333* 022 24076381 Ext. 440 / 248
  • BODY DONATION:INFORM J.J. Hospital Mumbails RMO / CMO / Doctor on duty_022 23735555 ext. 2302. 23769400, 23735543, Or 2) Rajeev Gandhi Hospital Kalwa, Thane 022 25347784.Or Any nearest Govt. Medical Collegeprior consent.
  • ORGAN DONATION: ZTCC at Sion Mumbai 022 24028197

पुरुषोत्तम पवार – response.lokprabha@expressindia.com