पर्यटन कंपन्यांच्या वेळापत्रकाबरहुकूम धावत, अनेक ठिकाणांना भोज्जा करून येण्यापेक्षा तेवढय़ाच पैशात एखाद्या ठिकाणी राहून स्थानिक जनजीवनाचा आनंद घेण्यातही एक वेगळीच मजा आहे. युरोपच्या अशा अनवट भटकंतीचा आनंद मांडणारा लेख.

निसर्गरम्य युरोपची भ्रमंती हा निखळ रमणीय आणि सुखद अनुभव असतो. २०१४ या वर्षी मार्च महिन्यात ‘लोकप्रभा’च्या अंकात माझी याआधीची ‘लाख मोलाची’ युरोप भटकंती मी शेअर केली होती. त्याच धर्तीवर युरोपमध्ये परत एकदा पंधरा दिवसांची छानशी परवडेल अशी सफर करायचे मनात होते. भारतात अजूनही बहुतांश जण प्रवास कंपन्यांबरोबर जायला प्राधान्य देतात; परंतु एकाच वेळी अनेक स्थळांना नुसते भोज्ज्या देण्याची कसरत करण्यापेक्षा त्या खर्चाच्या जवळपास अध्र्या पशात आपल्या मनपसंत ठिकाणी आपल्या आवडीप्रमाणे मनसोक्त भटकंती करायचा अनुभव न्याराच असतो. तिथल्या अपार्टमेंटमध्ये राहण्यामुळे पाहिजे तेव्हा तेथील स्थानिक चवीचा आस्वाद घेणे आणि पाहिजे तेव्हा घरचे जेवण असा फायदा होतो. कंपन्यांच्या जाहिरातील त्यांचे वैशिष्टय़ म्हणून अमुक ठिकाणी कॉफी, सॉफ्ट िड्रक किंवा आइस्क्रीम अशी प्रलोभने हास्यास्पद वाटतात, कारण आपण पाहिजे तिथे पाहिजे तो पदार्थ पाहिजे तेव्हा तिथलेच बनून एन्जॉय करत असतो.

आपले आपण जाऊन हॉटेलमध्ये न राहता अपार्टमेंट बुक करायचे असेल तर airbnb.com, vrbo.com, homestay.com, myparisvisit.com, paris-room-rentals.com इत्यादी वेबसाइट्स उपयोगी पडतात. एकॉर ग्रुपची अपार्ट-हॉटेल्सही स्वस्त दरात मिळू शकतात. पॅरिसमध्ये वेगवेगळ्या दरांतली अपार्टमेन्ट भरपूर आहेत, पण लवकर बुकिंग केले नाही तर, विशेषत: पॅरिसमधील जागा खूप महाग तर होतातच आणि एखादा छानसा एरिया पूर्णपणे बुकही होऊन जातो. अपार्टमेंट साइट्समध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आधी पसे भरायला लागतात. आधी किंवा तिथे पोहोचल्यावर सिक्युरिटी डिपॉझिटही द्यावे लागते, पण त्याचे ‘डूज आणि डोंट्स’ लक्षात ठेवले तर अगदी मध्यवस्तीतील जागा स्वस्तात मिळू शकतात, अगदी पाच हजार रुपयांच्या आतही. अपार्टमेंट-हॉटेलमधील रीफंडेबल किंवा नॉन-रीफंडेबल बुकिंग हा त्यातल्या त्यात सोपा आणि चांगला पर्याय असतो. अपार्टमेंटमध्ये वास्तव्य हे पसे वाचण्याबरोबर त्या ठिकाणचे थोडा वेळ का होईना आपल्याला तिथले स्थानिक होण्याचा आनंद देऊन जाते. जवळची स्टोअर्स किंवा मॉल शोधून जरुरी सामानाने फ्रिज भरणे, शेजाऱ्यांबरोबरचे जुजबी संवाद, स्थानिक लोकांच्या बरोबर सकाळी जॉिगग किवा रात्रीच्या जेवणानंतर जवळच्या पार्कमध्ये मस्तपकी फेरफटका मारतानाचे अनुभव आपल्याला अधिकच समृद्ध करतात.

पूर्वी केलेल्या युरोप ट्रिपमध्ये पॅरिसमधील आयफेल टॉवर, डिस्नेलँड, लुव्र म्युझियम, वस्रेलीस पॅलेस इत्यादी प्रमुख आकर्षणं बघून झाली होती. त्यामुळे या वेळी पॅरिसमध्ये चार दिवस पॅरिसकर होणे, जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट रीजनमधील त्यांच्या अत्यंत स्वस्त आणि मस्त अपार्टमेंटमध्ये राहून फ्री ट्रान्स्पोर्टेशनचा लाभ घेत भटकणे, पॅरिस, बेल्जिअममध्ये अपार्टमेंटमध्ये राहून कमी खर्चात टूर करणे शक्य होते. त्यानुसार नियोजन करायला लागलो. सिटी ऑफ लाइट्स, हे एक अत्यंत महत्त्वाचे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे; परंतु त्याबरोबरच त्यामुळे महागही आहे. त्यामुळे ट्रिप आनंददायी होण्यासाठी प्रयत्न करताना खिशाला परवडेल यासाठी भगीरथ प्रयत्नच लागणार होते.

गुगल मॅप, गुगल स्ट्रीट व्ह्य़ू, त्या त्या ठिकाणाबद्दलची इतरांची माहिती, व्हिडीओ, प्रवाशांच्या भटकंतीच्या कथा इत्यादींचा उपयोग करून प्रत्येक दिवसाचे नियोजन करता येते. गुगल स्ट्रीट व्ह्य़ू हा तर आपल्याला व्हच्र्युअली तिथल्या रस्त्यातून फेरफटका मारून आणतो. विशेषत: हॉटेल वा अपार्टमेंटजवळच्या महत्त्वाच्या ठिकाणांची आपल्याला तिथे पोहोचण्याआधीच पूर्णपणे इत्थंभूत माहिती झालेली असते. पाश्चात्त्य देशातील प्रवासी बऱ्याचदा स्वनियोजित प्रवास करतात आणि त्याच्या व्यवस्थित नोंदीही विविध ब्लॉग्सवर टाकतात. त्यांचा आपल्या नियोजनामध्ये उत्तम उपयोग करून घेता येतो. डेस्टिनेशनच्या वेबसाइट्स तिथल्या परिसराची माहिती देतानाच राहण्याच्या हॉटेल वा अपार्टमेंट बुकिंगलाही मदत करतात. बऱ्याचदा डेस्टिनेशन वेबसाइटवरून केलेली अपार्टमेंट रिझव्‍‌र्हेशन खासगी साइट्सपेक्षा बरीच स्वस्त असतात. मी जर्मनीतील किर्चझार्टनमध्ये डेस्टिनेशन वेबसाइटवरून अपार्टमेंट रिझव्‍‌र्हेशन करून airbnb थ्रू रिझव्‍‌र्हेशनपेक्षा सात दिवसांचे अकरा हजार रुपये वाचवले होते. प्रत्येक दिवसाचं नियोजन केलं तरी पोहोचल्यावर तिथल्या परिस्थितीप्रमाणे बदल करावेच लागतात. त्यामुळे आयत्या वेळी एखादा दिवस जिवाचा रविवार करता येतोच आणि इतरांपेक्षा काही तरी बघायचे राहिले अशी रुखरुखही लागत नाही.

सहल खूप दगदगीची न करता भेट द्यायची ठिकाणे आणि पसे यांचा तोल सांभाळण्याची कसरत करत नियोजनास सुरुवात केली. सर्वप्रथम विमानाचे तिकीट काढले. पॅरिसला जायचे नक्की असल्याने vrbo, airbnb इत्यादी साइट्स बघून शेवटी tripadvisor चे रिव्ह्य़ू बघून तात्पुरता पर्याय म्हणून एका ग्रुपच्या अपार्ट-हॉटेलचे रीफंडेबल बुकिंग करून प्रवासाच्या नियोजनाची दुसरी पायरी पक्की केली. एक तर हे अपार्टमेंट आर्क-द-त्रोम्फ (Arc de Triomphe) आणि शॉ-से -ली-से (Champs-RYlys×es) या प्रसिद्ध रस्त्याच्या अगदी जवळ होते आणि त्याच्या गच्चीवरून सभोवतीचा परिसर खूपच सुंदर दिसतो असे वाचले होते. शिवाय बुकिंग पूर्णपणे रीफंडेबल असल्याने प्रवासाला निघण्याच्याआधी दुसरा स्वस्त पर्याय निवडायची मोकळीक होतीच. आता राहण्याच्या दृष्टीने महाग पॅरिस आणि सर्वच दृष्टीने स्वस्त जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट या स्थळांबरोबर स्पेनमधील माद्रिद, डेन्मार्कमधील कोपनहेगन, नॉर्वेमधील ओस्लो आणि ब्रुसेल्स तसंच ब्रुसेल्सजवळील बूज इत्यादी स्थळे जोडण्याची कसरत सुरू झाली. अंतर्गत प्रवासाचा खर्च, हॉटेलचं भाडं, वेळ आणि खर्च यांचे भान ठेवून आखणी केली. त्यानुसार पॅरिसला चार दिवस, ब्रुसेल्स आणि जवळच्या बूज येथे तीन दिवस, जर्मनीतील कलोन चर्च, ऱ्हाईन नदीतील क्रूझने बहाहा (bacharach) या छोटेखानी गावात एक दिवस, ब्लॅक फोरेस्टमधील किर्चझार्टन गावात आठ दिवस राहून प्रवासाची सांगता स्वित्र्झलडमधील झुरिकमध्ये करायची ठरवली. बूजमध्ये ‘पीके’मधील अनुष्कास्टाइलने कॅनॉलच्या बाजूने सायकल चालवत गाणे म्हणत फिरायचेही पक्के केले. ब्रुसेल्समध्ये सेन्ट्रल लोकेशनला त्याच ग्रुपचे अपार्ट- हॉटेलचे रीफंडेबल बुकिंग केले. ब्लॅक फॉरेस्ट टुरिझम प्रमोशनअंतर्गत ब्लॅक फॉरेस्टमधील फ़्रिबुर्ग आणि ओफ्फेनबुर्ग आणि बादेन-बादेन ही शहरे सोडली तर जवळपास बाकी सर्व ठिकाणी हॉटेल वा अपार्टमेंट बुक केले तर संपूर्ण वास्तव्यादरम्यान स्थानिक ट्रेन, बस, ट्रामचा प्रवास विनामूल्य असतो. नेटवर शोधून किर्चझार्टनसाठी एक अपार्टमेंटही पक्के केले. घरमालकाशी ईमेलवरून संपर्क साधून घराचे दर आणि राहण्याच्या तारखाही पक्क्य़ा केल्या. सात रात्रींसाठी ३०० युरो (दर दिवशी साधारण ३२००/- रुपये) अशा माफक दारात ते संपूर्ण अपार्टमेंट मिळत होते. वर फिरणे फुकट. पसेही तिथे पोहोचल्यावर द्यावयाचे होते. इतरही बुकिंग केली.  ही सर्व बुकिंग पूर्णपणे रीफंडेबल असल्यामुळे थोडी महाग पडत होती,. पण कुठेही युरो ब्लॉक करायला लागणार नव्हते.

नंतरचा टप्पा म्हणजे युरोपांतर्गत प्रवासाची रिझव्‍‌र्हेशन्स. संपूर्ण युरोप रेल्वे आणि रस्त्याच्या जाळ्याने विणलेले आहे. पॅरिस ते ब्रुसेल्स हा प्रवास साधारण तेवढय़ाच वेळात रेल्वेपेक्षा बसने खूपच स्वस्त पडत होता; परंतु मी बुकिंग करायला थोडासा उशीर केला आणि १५ युरोचे तिकीट २५ युरो झालेले बघितले होते. प्रवासाच्या तारखा पक्क्या असतील तर जितक्या लवकर रिझव्‍‌र्हेशन्स करू तेवढे तिकीट स्वस्त पडू शकते. त्या काळातच बेल्जियममध्ये ‘मोबिलिटी वीक’ घोषित झाल्यामुळे बेल्जियमअंतर्गत २८ युरो लागणारा प्रवास ११ युरोमध्ये होणार होता. ‘http://www.deutschebahn.com/en/start-en.htm’ या जर्मन रेल्वेच्या वेबसाइटवरून कलोनमध्ये साडेतीन तासांचा स्टॉपओव्हर घेत ब्रुसेल्स ते बहाहा या टप्प्याचे बुकिंग केले. स्विसरेलच्या साइटवरून जर्मनी ते स्विर्झलडमधील झुरीचपर्यंतच्या प्रवासाचे हाफ फेअर तिकीट चेक केले, पण बसचे तिकीट त्याच्या अध्र्या किमतीत मिळत होते, त्यामुळे ते बुक करून टाकले. यानंतर वेबसाइट्सच्या मदतीने, विविध ठिकाणं, तेथील हायलाइट्स पाहून प्रत्येक दिवसाचे आणखी बारीक नियोजन केले. या वेळी व्हिसाचे सोपस्कार अहमदाबादहूनच असल्यामुळे फारशी काळजी नव्हती. ऑफिसमधून लागणाऱ्या योग्य त्या परवानग्या घेऊन व इतर औपचारिकता पूर्ण करून व्हिसाही घेतला. प्रयाणाचा दिवस जवळ येईपर्यंत पासपोर्ट, व्हिसा, ट्रॅव्हल इन्शुरन्स, हॉटेल रिझव्‍‌र्हेशन्स, महत्त्वाचे फोन नंबर्स, औषधांची प्रिस्क्रिप्शन्स इत्यादी कागदपत्रांचे तीन सेट करून ठेवले. विविध फॉरेन एक्स्चेंज कंपन्यांच्या रेट्सची चौकशी करून, थोडीफार घासाघीस करून काही रक्कम रोकड स्वरूपात आणि बाकी कार्डमध्ये युरो घेतले. घरी जेवण करण्याच्या दृष्टीने कणीक, तांदूळ, मिसळण्याचे सामान, रेडी टू इट इत्यादी सामानही जमा केले.

बहुतेक सर्व ठिकाणी अपार्टमेंटमध्येच वास्तव्याचा प्लॅन होता. तिथे वॉिशग मशीन असल्याने कपडय़ांचे ओझे कमी करता आले. खाण्याचे सामान भरताना, खसखशीसारखे पदार्थ नेण्यास मनाई असते अशा विविध गोष्टी लक्षात ठेवून पॅकिंग केले आणि ठरल्या दिवशी मार्गस्थ झालो.

चार्ल्स द गॉल विमानतळापासून अपार्टमेन्टपर्यंत जाण्यासाठी आम्ही इझीजेट कंपनीच्या इझीबसचा सर्वात स्वस्त पर्याय पक्का केला होता. साधारण दोन-तीन युरो एकासाठी असे दर दिसले होते. बाकी सर्व ठिकाणी त्याच प्रवासाला साधारण आठ ते दहा युरो लागणार होते. बससाठी एअरपोर्टवरून सोर्टी (एक्झिट गेट) पाचच्या तळमजल्यावर अंतर्गत ट्रामने पोहोचलो. बस आल्यावर ड्रायव्हरने एक बॉम्ब फोडला. बसचे ऑनलाइन तिकीट दोन युरोपासून सुरू होत असले तरी आयत्यावेळी बसमध्ये ते १५ युरोला पडत होते. आमच्या स्वस्त प्रवासाचे गणित पहिल्याच पायरीला चुकत होते. ट्रेनने जाण्याचा विचार करत असतानाच त्या कंपनीच्या माणसाने १० युरो कमी करून २० युरोला तिकिटे दिली. शहर जसजसे जवळ येत होते तशी हिरवी शेते आणि गोडाऊन्स मागे पडून काँक्रीटचे जंगल सुरू होत होते आणि रस्त्याच्या सर्व लेन्स भरू लागल्या होत्या. चक्क लेन चेंजिंग, गाडय़ा घुसवणे, बेफाम दुचाकींचे कट मारून जाणे (प्युजोच्या थ्री व्हील मोटार सायकल्स) यामुळे जरा मायदेशाची जवळीक वाटली. बघता बघता इंटरनेटवरून सर्च केलेल्या पॅरिसमधील मुख्य जागांचे बोर्ड दिसू लागले आणि रस्त्याच्या बाजूने विविध ऐतिहासिक वास्तू मागे टाकत आमची बस ‘ल पेलेस रोयाल’ या गंतव्य स्थानावर पोहोचली. तिथून ल पेलेस रोयाल ते चार्ल्स द गॉल – एतिओल हा मेट्रोचा आणखी एक टप्पा पार पाडावयाचा होता. मेट्रो तिकिटांचे कान्रेट, म्हणजे १० तिकिटांचा बंच व्हेंिडग मशीनमधून घेतला. चार्ल्स द गॉल – एतिओल मेट्रोहून बाहेर पडल्यावर, आर्क द त्रोम्फ या भव्य वास्तूच्या बाजूला बारा रस्ते एकत्र येणाऱ्या ठिकाणी पोहोचल्यावर आमची अवस्था अभिमन्यूसारखी झाली होती. आणि त्यात हॉटेलच्या ठिकाणाच्या गुगल मॅपचे िपट्रआऊट सापडत नव्हते. एका फ्रेंच सुंदरीने मोबाइलच्या मदतीने आम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर काढले आणि शेवटी अपार्टहॉटेलमध्ये पोहोचायला संध्याकाळचे सात वाजले. सप्टेंबर चालू असला तरी अजून चांगलाच उजेड होता आणि थंड हवा अंगावर शिरशिरी आणत होती. आम्हाला अपार्टमेंट अपग्रेड करून वन बेडरूम हॉल किचन मिळाल्याने ट्रिपची सुरुवात तर मस्तच झाली होती. प्रवासाचा शीण जरी जाणवू लागत असला तरीही झोपही येत नव्हती. शेवटी बरोबर आणलेल्या गुळपोळी आणि फराळावर ताव मारून अपार्टमेंटच्या टेरेसवर गेलो. असंख्य दिव्यांच्या पाश्र्वभूमीवर लख लख चंदेरी दिव्यांनी न्हाऊन निघालेला आर्क द त्रोम्फ आणि त्याच्याच मागे विविध दिव्यांच्या प्रभावळीने उजळून निघालेला आयफेल टॉवर डोळे विस्फारून टाकत होता. सिटी ऑफ लाइट्समधली पहिली रात्र त्या दृश्यावर तरंगतच पार पडली.

पुढचे तीन दिवस सकाळ आणि संध्याकाळ अशा विभागात वाटले होते. यावेळी तीन दिवस पॅरिसच्या संस्कृतीच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत मन मानेल तिथे भटकणे असा साधा, सोपा आणि स्वस्त कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी सर्व प्रथम दोन प्रीपेड सिमकार्ड विकत घेऊन ती अ‍ॅक्टिव्हेट केली. आर्क द त्रोम्फ अंड शॉ से लीझे आव्हेनु हे बाजूलाच होते. इंटरनेटवर ४२ आणि ६९ नंबरच्या बसने महत्त्वाची सर्व ठिकाणे कव्हर करता येतात अशी माहिती मिळाली होती. रिक स्टीव्ह या प्रसिद्ध अमेरिकन मुसाफिराच्या वेबसाइटवरून हिस्टॉरिक पॅरिस वॉक इत्यादी ऑडिओ गाईड्सही डाऊनलोड केली होती. त्याप्रमाणे मनात येईल तसे भटकत नोत्र देम केथ्रेडल, तुलेरीस गार्डन, संध्याकाळी सीन नदीच्या काठावरून आयफेल टॉवरला प्रदक्षिणा यात दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही. घरच्या नाश्त्याव्यतिरिक्त शॉ से लीसे रस्त्यावरच्या ‘पॉल’ कॅफेसमोर बटरी क्रोझो, बेगेट हा लांबट, थोडासा कडक आणि चिवट ब्रेड, केक आणि कॉफीसाठी रांगेत उभे राहताना पुण्याच्या चितळेंची बाकरवडीची रांग आठवली. पॅरिसमध्ये लोक घरी जेवण्यासाठी जातात की नाही हाच प्रश्न पडतो. पाहावे तेव्हा मोठय़ा रस्त्यापासून ते छोटय़ा गल्लीपर्यंत कॅफेसमोरच्या फुटपाथवर लाल निळ्या पेटिओ छत्र्यांखाली लाकडी किंवा वेताच्या गोलाकार टेबल खुच्र्यावर फॅशनच्या नवनव्या ट्रेंड्स उठून दिसत असतात. संध्याकाळी तर या सर्वाना अधिकच बहर येतो. रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईत अनेकविध वाइन्सच्या ग्लासांबरोबर अनेक प्रकारच्या फ्रेंच डेलिकसी हास्याच्या लकेरीत बुडत रंगीन होत असतात, जणू काही आजच एन्जॉयऽऽ. ‘कल हो न हो’. याच रूपगर्वतिांच्या डोळ्यात दिवसा दिसणारे अलिप्त आणि बेदरकार भाव बघितल्यावर त्यांचे खरे रूप कोणते असा प्रश्न पडतो. ऑन अ लाइटर नोट फ्रेंच भाषाही इंग्रजीपेक्षा आणखीनच मजेदार आहे, जसे लिहिताना लिहितात Champs-RYlys×es आणि म्हणतात ‘शॉ से लि से ’. त्यामुळे ज्या जागी जायचे त्याचा उच्चार आधीच लिहून ठेवलेला असल्याने आम्हाला जागा शोधायला फारसा त्रास झाला नाही. पॅरिसमधील टुरिस्ट ट्रॅप्स कुप्रसिद्ध आहेत. पण मोमार्त्स (montmartre) कॅथ्रेडलच्या पायऱ्यांवरील फ्रेन्डशिप बॅण्ड झिडकारून, सीन नदीवरच्या मिळालेल्या सोन्याच्या अंगठीला नाकारून, लूव्र म्युझियमजवळील मूक-बधिर मुलांच्या याचिकेवर सही करण्यास नकार देत बस आणि मेट्रो प्रवासात सामानाची योग्य काळजी घेत या सर्व गोष्टींपासून आम्ही स्वतला वाचवले होते.

पॅरिस रोमँटिक आहे तशीच ती फॅशनचीही राजधानी आहे. गेलेरिज लाफायात (Galeries Lafayette) हे पाच मजली भव्य, दिमाखदार अपमार्केट डिपार्टमेंटल स्टोअर याचं अप्रतिम प्रतीक आहे. स्टॅन्ड ग्लासने मढवलेल्या अतिभव्य डोमखाली आख्खं फॅशन जग अवतरताना दिसतं. जगातील सर्वात प्रथितयश ब्रॅण्डच्या शोरूम्स आपल्या ग्लॅमरस डिझाईन मोठय़ा झोकात दर्शवत असतात. लुई व्हितोच्या दुकानात फक्त प्रवेशासाठी रांग लागली होती. दर शुक्रवारी दुपारी तीन वाजता चौथ्या मजल्यावर इथे एक विनामूल्य फॅशन शो असतो असे वाचले होते. ती वेळ साधून दोन वाजताच आम्ही त्या हॉलजवळ पोहोचलो तर कळले की एक दोन दिवस आधी या शोसाठी फ्री पासेस ऑनलाइन बुक करावे लागतात. या शोच्या द्वारपालिकेने जागा भरल्याचे काहीशा तुसडय़ा आविर्भावात सांगून टाकले. पण आपल्याकडे सिनेमाची तिकिटे मिळवण्याचा सराव असल्याने स्टोरच्या वायफायच्या मदतीने गुगल ट्रान्स्लेटने द्वारपालिकेशी फ्रेंचमध्ये संपर्क साधला आणि आयुष्यातील पहिला फॅशन शो थेट पॅरिसमध्ये पाहिला.

आमचा पुढील दोन रात्रींचा मुक्काम बेल्जिअममधील ब्रुसेल्स येथे होता. पहाटे साडेपाचला बर्की बस स्टेशनवर पोहोचण्यासाठी थोडीशी चौकशी करावी लागली पण ठीक सहा वाजता आमच्या बसने पॅरिस सोडले. हिरवीगार शेते, टुमदार गावे, रेखीव रस्ते मागे टाकत आमची बस साडेदहा वाजता ब्रुसेल्स झ्युड बस स्टेशनवर पोहोचली. येथील अपार्ट हॉटेलला ट्रामने दहा मिनिटांतच पोहोचलो. ब्रुसेल्स ही युरोपियन युनियनची राजधानी असले तरी खूप जास्त पसरलेले नाहिये. तसे पाहिले तर प्रेक्षणीय स्थळेही तशी मोजकीच आहेत. पण योगायोगाने तो आठवडा बेल्जिअमने मोबिलिटी वीक घोषित केला होता. त्यामुळे त्या वेळी रेल्वे तिकिटांचे दर अध्र्याहून कमी होणार होते आणि तेथील मुख्य शहरे दिवसभर कार फ्री राहणार होती. मुख्य रस्त्यांवर गाडय़ा नसल्याने आणि वीक एंड असल्यामुळे जल्लोशाचा माहोल होता. हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर लाकडी बेंचेस टाकून लोक गाणी म्हणत होते, टेबल टेनिसची टेबल्स टाकली होती, कोणी गिटारच्या तालावर नाचत होते, मोठमोठय़ा पटांवर बुद्धिबळाचे डाव रंगले होते. ‘मॉन्स २०१५’ हा सांस्कृतिक महोत्सव ‘ग्रांड प्लेस’ या तेथील दिमाखदार अशा मध्यवर्ती चौकात चालू होता. रंगीबेरंगी आकर्षक पोशाखात नटलेले तरुण-तरुणी आणि मुले आपापल्या गावांचे प्रतिनिधित्व करत जुन्या काळातील खेळांची व नृत्य प्रकारची प्रात्यक्षिके दाखवत होती. म्युझिकल बॅण्डच्या तालावर स्वार होत बुजुर्गही नाचण्यामुळे सर्वाची वाहवा मिळवत होते. सभोवती मांडलेल्या विविध स्टॉल्सवरील असंख्य प्रकारची चीज, स्थानिक बीअर आणि वाइनचा आस्वाद घेत पूर्ण परिसर जणू तरंगतच होता. या सर्व उधाणातून बाहेर पडल्यावर काहीच मिनिटांवर असलेला आणि ब्रुसेल्सची ओळख बनलेला ‘मेनिकन पिस्स’ पुतळा म्हणजे एकदम एन्टिक्लायमेक्स वाटला. खवय्यांच्या यादीत बेल्जिअम प्रसिद्ध आहे ते त्यांच्या जगप्रसिद्ध चॉकलेट्स, फ्रिटोज म्हणजे बटाटा चिप्स विथ मायोनीज आणि वेफेल्ससाठी. जेन्युइन बेल्जिअन फ्रीटोज हे कच्चा बटाटा कापून त्या चिप्स अध्र्याकच्च्या तळून पंधरा मिनिटे बाजूला ठेवून नंतर पूर्णपणे तळतात आणि मेयोनीज सॉसबरोबर गरमागरम खायच्या असतात, आपल्याकडे भजी तळतात तसे. ग्राण्ड प्लेसच्या आजूबाजूस प्रसिद्ध कंपन्यांची चॉकलेटची दुकाने त्यांच्या सजावटीने आणि श्वासाबरोबर घेतलेल्या सुगंधामुळे पर्यटकांना खेचून घेतात. अगदी मिर्चीपासून रम आणि रेझिन फ्लेवपर्यंत विविध आकाराची चॉकलेट्स खिशालाही जोरका झटका मुलायमपणे देतात.

दुसऱ्या दिवशीच्या नियोजनाप्रमाणे आम्ही जाणार होतो सतराव्या शतकातील घरांची परंपरा जपणाऱ्या, पीके सिनेमात अनुष्काने कॅनॉलच्या बाजूने सायकलवरून गाणे म्हणलेल्या बूज (brugge) गावात. मोबिलिटी वीकमुळे ब्रुसेल्स ते बूज परतीचे तिकीट ३०च्या ऐवजी ११ युरोमध्ये मिळाले होते. बूज त्याच्या सतराव्या शतकातील घरे, कॅनॉल्स आणि दगडी रस्ते यांची परंपरा जपून ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहे. कशिदाकारी आणि लेस बनवण्यासाठीही बूज हा भाग प्रसिद्ध आहे. आणि शनि-रविवार वगळून गेल्यास लेस बनवण्याचे प्रात्यक्षिकही बघायला मिळते. सकाळी जेवणाचा डबा भरून घेऊन ट्रेनने जाताना एक भारतीय कुटुंब भेटल्यामुळे बूजमधील केथ्रेडल, बाजार, कॅनॉलमधली राइड, एकत्र जेवण करण्यात दुपार कशी झाली ते कळलेच नाही. त्या दिवशी कार फ्री दिवस असल्याने कोणत्याही प्रकारच्या गाडय़ांची रहदारी नव्हती. जवळच्या हॉटेलमधून सायकल भाडय़ाने घेऊन कॅनॉलच्या बाजूने ‘भागी भागी जिंदगी रे’ गाणे म्हणत सेल्फी व्हिडीओ घेत एन्जॉय केलेला एक तास त्या दिवसाचा हायलाइट होता. रात्री परत एकदा ब्रुसेल्सच्या ग्रांड प्लेस जवळ फ्रिटोज, वेफल्स आणि रोड साईड बर्गरचा समाचार घेत बेल्जिअममधील छोटेखानी मुक्काम संपवला.

पुढच्या दिवशीची स्वारी होती सकाळची साडेसहाची ट्रेन पकडून कलोनमाग्रे बहहा (Bacharach) या सीमा पार असलेल्या छोटेखानी जर्मन गावावर. रेल्वे तिकीट जर्मन वेबसाइटवरून बुकिंग केले असले तरीही ब्रुसेल्स ते कलोन प्रवास स्विस रेल्वेच्या इंटरसिटी एक्स्प्रेसने होता. वेग आणि वेळ यांचा मेळ घालत या रेल्वेने कधी कधी २६५ ताशी कि.मी. चा वेगही घेतलेला डिस्प्ले दिसत होता. बरोबर आठ वाजून पंधरा मिनिटांनी कलोनला आल्यावर ऑटोमेटिक लगेज लॉकरमध्ये जास्तीचे सामान टाकले आणि ब्रेकफास्ट आटोपून घेतला. स्टेशनच्या बाहेरचे सारे अवकाश समोरच्या कलोनच्या प्रसिद्ध कॅथ्रेडलने भारून टाकले आहे. या रोमन प्रकारच्या कॅथ्रेडलची कलोन शहराप्रमाणेच दुसऱ्या महायुद्धात अपरिमित हानी झाली होती. याच्या दोन उत्तुंग मनोऱ्याचा मित्रसेनेच्या वायुदलाला शहर लोकेट करण्यासाठी खूपच फायदा झाल्याचे सांगतात. कॅथ्रेडलच्या दर्शनी भागावरील दगडांच्या काळ्या रंगाचा प्रोमिनन्स एक प्रकारची गूढ संवेदना जागवत होता आणि टिपिकल कलाकुसर आणि भव्यता आणि अंतर्भागातील ओर्गनचे धीरगंभीर सूर अंतर्मुख करून टाकत होते.

थोडावेळ जवळपास फेरफटका मारल्यावर सामान घेऊन बहाहाला जाणाऱ्या ट्रामवजा ट्रेनमध्ये स्थानापन्न झालो. युरोपमधील सर्वच प्रवास प्रेक्षणीय असतात. ही ट्रेन सर्व स्टेशनांवर थांबणाऱ्या लोकलसारखी होती व हा सर्व प्रवास ऱ्हाइन नदीच्या बाजूबाजूने होता. ऱ्हाइन माई आपल्या कुशीतून अनेक प्रकारच्या जहाजांना अलगदपणे घेऊन, सभोवतालच्या परिसराला हिरवेगार करत संथपणे वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूने थोडय़ा थोडय़ा अंतरावर पूर्वीच्या राजांच्या छोटय़ा किल्ल्यासदृश कोठय़ा पाहायला मिळत होत्या. जर्मन राष्ट्र उदयास येण्याआधी हे राजे किवा राजपुत्र नदीतून जाणाऱ्या जहाजांवर कर लावत असत. असेही वाचले होते की त्यात व्यापारी वर्गाचाही मोठा पुढाकार होता.

या भागातील सर्व गावांप्रमाणेच बहाहा हे अतिशय चिमुकले गाव डोंगर उतारावर असलेल्या वाइन यार्ड्सच्या मध्ये वसलेले आहे. कधीकाळी वाइनच्या व्यापारात महत्त्वाचं स्थान असलेल्या गावाला फ्रेंच आक्रमणांना सामना द्यायला लागला होता. तेथील छोटेखानी किल्ल्याचे आता युथ होस्टेल झाले आहे. हॉटेल चेक इन केल्यावर लगेचच पाच मिनिटांवर असलेल्या जेट्टीवरून ‘केडी’ या प्रस्थापित क्रुझचे तिकीट काढून सेंट गोर या पॉप्युलर गावाकडे प्रयाण केले. नदीच्या दोन्ही बाजूस वाइन यार्डमधील द्राक्षाच्या लागवडीमुळे डोंगरावरील हिरवेपणा कुरतडल्यासारखा वाटत होता. इतर क्रुझ आणि मालाची ने-आण करणाऱ्या बोटींना नदीच्या काठावरच्या ब्लाइड टर्नवर लावलेले सिग्नल्स दिशा देत होते. सेंट गोर गावही अगदीच छोटे होते, पण तेथील छोटय़ा टेकडीवरील असलेल्या किल्ल्यामुळे त्याला थोडं महत्त्व आले आहे. राजगड, रायगडवाल्या मावळ्यांना हा किल्ला सर करणे म्हणजे हातचा मळ होता. टेकडीवरून त्या भागाचे विहंगम दृश्य नजरेत साठवून क्रुझने बहाहाला परतेपर्यंत संध्याकाळ झाली होती. हॉटेलसमोरच्या केबाप कॉर्नरमधील टíकश ओरिजीनच्या हॉटेलमालकाला खूपच महिन्यांनी आमच्याशी िहदी मिश्रित इंग्लिशमध्ये गप्पा मारायला मिळाल्या होत्या. पिझ्झा, बर्गरबरोबर सॉफ्टी आइसक्रीमने रात्रीच्या जेवणाची सांगता झाली. सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, घरी बनवलेले, फ्रेश, पनीरसारखे लुसलुशीत चीझ, ऑमलेट इत्यादी टिपिकल जर्मन नाश्ता करून किर्चझार्टनकडे कूच करण्याआधी बहाहाचा किल्लाही सर करून टाकला.

दुपारी फ्रीबुर्ग या ब्लॅक फॉरेस्ट रिजनमधील मुख्य गावापासून १३ मिनिटांवर असलेल्या किर्चझार्टन गावात पोहोचलो. हिरव्या घनदाट डोंगराच्या पाश्र्वभूमीवरील हे चिमुकले गाव अक्षरश: पिक्चर परफेक्ट आहे. साधारण चाळिशीच्या जवळपास वाटणाऱ्या आतिथ्यशील घरमालकिणीने स्वागत करून घरातील गोष्टींची माहिती करून दिली. बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरील एक बेडरूम हॉल किचन विथ वॉशरूम असा योग्य तेवढा स्वतंत्र सेटअप होता. घरमालकीण चांगल्यापकी इंग्रजी बोलत होती. त्यामुळे हायसे वाटले. तिच्याबरोबर तिची दोन छोटी मुलेही जर्मन चिवचिव करत होती. घरमालकिणीने कोनस कार्ड म्हणजेच आमचा आठ दिवसांचा रेल्वे ट्राम बसमधून मोफत फिरण्याचा पास आणून दिला आणि लागलीच त्याचा उपयोग करून फ्रीबुर्गच्या डिपार्टमेंटल स्टोअरमधून दूध, योगर्ट, चीझ, आइसक्रीम्स आणि भाज्या खरेदी झाली.

या वेळच्या आठवडय़ाच्या मुक्कामात शुलसी (schluchsee) सरोवरातून मोटरबोट राइड, ट्राइबार्गचा धबधबा आणि कुकु क्लॉक फॅक्टरी आणि जवळच असलेले स्वार्झवाल्ड म्युझिअम, बाडेन शहरातील रोमन बाथ, फ्रीबुर्गजवळील जर्मनीतील सर्वात लांब केबल कार अशी मोजकीच ठिकाणे कव्हर करायचे ठरवले होते. मागील वेळी तीतीसी या लेकमधील पेडल बोटीचा आनंद घेतला होता. शुलसी (schluchsee) हे तीतीसीपेक्षाही मोठे वाटले. तिन्ही बाजूंनी डोंगर आणि चौथ्या बाजूला नितांतसुंदर, फुलांनी बहरलेले गाव यांनी वेढलेल्या या सरोवरात इतर छोटय़ा शिडाच्या बोटींबरोबर आम्हीही आमच्या इलेक्ट्रिक बोटीतून वाऱ्याशी सामना करू लागलो. तळ्याच्या सान्निध्यात पिकनिक लंचची मजा काही औरच होती. ट्राइबार्गचा धबधबा हा पावसाळ्यातील कर्जत-लोणावळ्यातील राकट रांगडे धबधबे बघितल्यानंतर एकदमच शामळू वाटला. जाण्या-येण्याच्या वाटा अतिसुरक्षित केल्यामुळे वाटले असेल कदाचित. येथे सुरक्षेला अतीच महत्त्व देतात. किर्चझार्टनजवळील जंगलात चक्कर मारताना एक झाड उखडण्यामुळे झालेल्या छोटय़ा खड्डय़ालाही कार्डिनग करून सुरक्षितता जपलेली बघितली होती. स्वार्झवाल्ड म्युझिअममध्ये ब्लॅक फॉरेस्ट भागातील विविध प्रकारची घरे सामानासकट जतन करून ठेवलेली आहेत. ओडीओ गाइडमुळे जुन्या जर्मन चालीरीतींबद्दल खूपच माहिती मिळाली. फ्रीबुर्गजवळील केबल कारने पोहोचवलेल्या डोंगरमाथ्यावरील वॉच टॉवर आजूबाजूच्या प्रदेशाचे नयनरम्य दर्शन घडवतो. बाडेन-बाडेन हे नितांतसुंदर गाव तिथल्या रोमन बाथसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी गर्भश्रीमंतांनाच परवडेल अशा या गावाने आता सर्वसामान्यांसाठीही दरवाजे खुले केले आहेत.

पॅरिस आणि ब्रुसेल्सला अपार्टहॉटेल होते. पण जर्मनीत लोकल कुटुंबात राहिल्याने एक आगळाच आपलेपणा वाटला. इथे आम्ही केलेली साबुदाणा खिचडी, थालीपीठ आणि त्यांच्या केकची देवाणघेवाण झाली. घरमालकिणीने केलेल्या डमिप्लग सदृश गोडसर पदार्थावर आम्ही गप्पा मारत ताव मारला होता आणि आम्ही केलेल्या रेडीमेड भेळीवर (तिखट चटणी वगळून) जर्मन पसंतीचा स्टॅम्प बसला होता.

झुरिकहून परतताना हिशोब केला तर लक्षात आले की, या वेळीही १६ दिवसांची ट्रीप लाखमोलाचीच झाली होती. संपूर्ण प्रवासात एकदाच आमची नियोजित ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून निघून गेल्यामुळे चुकली होती, पण तिकीट कंडक्टरने प्लॅटफॉर्मवरच तिकीट नियमित करून दिले होते. काही ठिकाणी पावसामुळे आधी ठरवलेले कार्यक्रम पुढे ढकलावे लागले किंवा रहित करावे लागले. पण माहीत असलेल्या स्थळांबरोबर अनपेक्षितपणे माहीत झालेल्या उत्तम गोष्टींचे सुखद धक्केही खूप ठिकाणी मिळाले.

तुम्हीही चला तर मग आपापल्या कोशातून बाहेर पडून काही दिवस पॅरिसकर किंवा जर्मन होऊन जगण्यासाठी..

विंदांच्या ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’च्या धर्तीवर वेगवेगळ्या देशात फिरताना त्यांच्याकडील चांगल्या गोष्टींचे आपल्यावर नकळत  का होईना संस्करण होत असते. नेपोलिअन बोनापार्टने आपल्या शूर सैनिकांना गौरवण्यासाठी उभारलेले आर्क दि त्रोम्फ हे भव्य स्मारक, उत्तुंग आयफेल टॉवर, लूव्र म्युझिअममधील कलाकृतींचे अगणित कलेक्शन, पॅरिसमधल्या लोकांची रंगीतसंगीत जीवन जगण्याची आवड आणि फॅशन सेन्स, जर्मन प्रिसिजन, नीट नेटकेपणा, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम आपल्याला जगण्याची नवीन दृष्टी देते. जर्मनमधील बसमध्ये एक ‘ऑनेस्टी बॉक्स’ ठेवला होता. बाजूच्या फ्रीजमधून खाण्यासाठी घेतलेल्या पदार्थाचे पैसे स्वत:हून त्यात टाकायचे होते. एवढेच काय तर शेतांमध्ये असलेल्या नर्सरीमध्ये पाहिजे ती फुले किंवा रोपे काढून त्याचे पैसे बाजूला ठेवलेल्या पेटीत प्रामाणिकपणे ठेवल्याचे मी बघितले होते. घरमालकाशी गप्पा मारताना ‘ईकिया’सारख्या बाहेरच्या कंपन्यांमुळे जर्मन इंडस्ट्रीला होणारे नुकसान, शरणार्थिमुळे उद्भवलेली परिस्थिती यावरची चिंता त्यांच्या डोळ्यात दिसत होती. स्वर्झवाल्ड म्युझिअमला जाताना एक महिला आम्ही भारतीय आहोत का हे विचारत आली. तिची नुकतीच ग्रॅजुएट झालेली मुलगी नोकरी सुरू करण्यापूर्वी एक महिना लडाख आणि राजस्थानला जाणार होती. पण तिथे तिला काहीच प्रॉब्लेम येणार नाही असा विश्वास देतानाचा माझा स्वर डळमळीत झालेला तिला कळाला की नाही ते माहीत नाही.
अजय साने – response.lokprabha@expressindia.com