मित्रपरिवार म्हणजे दुसरं कुटुंबच! असंच एक कुटुंब तयार झालं होतं मुंबईतील विलेपार्ले येथील ‘परिणीता’ बिल्डिंगमध्ये. सिनेसृष्टीतल्या सहा जणांनी मुंबई गाठल्यावर उमेदीच्या काळात एकमेकांना सांभाळून, समजून घेणारा, प्रेम करणारा मित्रपरिवार एकमेकांशी आजही तितकाच जवळ आहे.

आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसं भेटत असतात. कोणाशी कामाच्या निमित्ताने संपर्कात असतं, कोणी आवडनिवड सारखी असते म्हणून एकमेकांशी जोडले जातात तर काहींची गरज म्हणून एकत्र असतात. या ना त्या कारणाने त्यांच्यात एक नातं तयार होतं. मैत्रीचं! असं नातं ज्यात वय, वजन, रंग, स्वभाव, पगार या आणि अशा असंख्य अटी-नियमांचं ओझं नसतं. खरं तर मैत्रीची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलत जाते. कोणाला मैत्री म्हणजे प्रेम वाटतं, कोणाला मैत्री म्हणजे आयुष्य; कोणाला मैत्री म्हणजे आनंद वाटतो. पण, ‘त्यांच्या’ लेखी मैत्री म्हणजे कुटुंबच आहे! पुण्यातली काही जणांची ओळख. ही ओळख सोबत घेऊन करिअर करण्यासाठी मुंबई गाठल्यानंतर एकत्र राहण्याचा निर्णय होतो. कोणतेही नियम न लावता ते सहा जण गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. ही गोष्ट आहे, मुंबईत राहणाऱ्या सहा तरुणांची. मनोरंजन क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांची संख्या तशी बरीच आहे. या क्षेत्रात काही तरी करून दाखवण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक जण मुंबईकडे वळतात. अशांपैकी हे सहा जण. लेखक क्षितिज पटवर्धन, लेखक आशुतोष परांडकर, अभिनेता सुयश टिळक, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री आरती वडगबाळकर आणि डॉक्युमेंटरीमेकर रोचन गानू या सहा जणांची मैत्री म्हणजे त्या प्रत्येकासाठी एक कुटुंब आहे.

Make Home Made Gudi Padwa special Instant Sevai Kheer Note the Tasty Recipe
गुढीपाडव्या निमित्त बनवा स्पेशल स्वादिष्ट ‘शेवयाची खीर’ ; नोट करा रेसिपी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

या सहा जणांची दिल दोस्ती दुनियादारी सुरू झाली ती चार-साडेचार वर्षांपूर्वी. एकमेकांना भेटून झाल्यानंतर त्यांच्यातलं नातं इतकं घट्ट झालं की, ही दोस्ती तुटायची नाही असंच आता प्रत्येक जण म्हणू लागलाय. यांच्यातल्या यारियाची सुरुवात क्षितिज, आशुतोष आणि रोचन या तिघांपासून झाली. हे तिघे पुण्यापासूनचे मित्र. गेली १७-१८ वर्षांची मैत्री मुंबईत येत होती. मनोरंजन क्षेत्रात करिअर करणं सोपं नक्कीच नाही. त्यातही मुंबईबाहेरून येणाऱ्यांसाठी तर येथे राहण्यापासूनचा संघर्ष मोठा असतो. करिअरची सुरुवात असल्यामुळे तिघांपैकी कोणालाही एका घराचं संपूर्ण भाडं एकटय़ाने भरणं आर्थिकदृष्टय़ा परवडणारं नव्हतं. म्हणून त्यांनी एकत्र राहायचं ठरवलं. या तिघांमध्ये नंतर एंट्री झाली ती सिद्धार्थ आणि सुयशची. दोघेही सध्याचे आघाडीचे कलाकार. पण, तेव्हा त्यांचा उमेदीचा काळ होता. त्यामुळे आता मैत्रीचा पंचकोन तयार झाला होता. सगळ्यांचं सगळं उत्तम सुरू असतानाच यांच्यापैकी आशुतोषचं लग्न झालं. अभिनेत्री आरती वडगबाळकर ही त्याची बायको. तोवर यांच्या मैत्रीतलं नातं इतकं घट्ट होत गेलं की, लग्नानंतर आशुतोष आणि आरती त्यांच्यासोबत एकत्र राहत होती.

पाच मुलं आणि एक मुलगी असे एकत्र राहतात; असं कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचवतात. त्यांच्यात मैत्रीचं नातं आहे, त्यांच्या घरच्यांना माहितीये ते असे राहतात ते; अशी उत्तरं दिली तरी मनातल्या शंका इतक्या सहजासहजी त्यांची जागा सोडत नाहीत. त्याबाबत आरती सांगते, ‘आम्ही असे एकत्र राहत असताना सोसायटीतल्या लोकांची नजर वेगळं काही सांगायची. त्यात ‘हे असे कसे राहतात’ असा सूर असायचा. पण, आमचा स्वभाव, राहणीमान, वागणं-बोलणं बघून कालांतराने सोसायटीतल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. शिवाय माझे आई-बाबा आणि सासू-सासरे खूप समजून घेणारे आहेत. त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.’ साधारणपणे मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईबाहेरून आलेल्या मंडळींना पेइंग गेस्ट, भाडेकरू, रूम शेअरिंग अशा स्वरूपात राहावं लागतं. या क्षेत्राचा समान धागा पकडून काहींची ओळख होते, मैत्री होते. पण, आरतीचं याबाबत वेगळं मत आहे. ती म्हणते, ‘आम्ही या क्षेत्रात आहोत म्हणून आमच्यात मैत्री आहे असं नाही. आमच्यापैकी कोणीच या क्षेत्रात प्रस्थापित नसताना आम्ही एकत्र राहू लागलो. त्यामुळे आमच्यात अहंकार अजिबात आड येत नाही.’ अहंकाराचा मुद्दा पुढे येतोच. एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहत असतील तर चढाओढ होत असते. तिथे स्पर्धा दिसू लागते. पण, आरती हा मुद्दा खोडून काढते. ‘दोन नट एकत्र राहिले की त्यांच्यातली असुरक्षितता वाढते, असा विचार मनात येणं खूप स्वाभाविक आहे. अशा प्रकारचे प्रसंग आपल्या आजूबाजूला दिसतातही. पण, आमच्यात तसं कधीच नव्हतं. पुढेही कधीही नसेल. सिद्धार्थला एखादं काम करणं शक्य नसलं तर तो सुयशला ते सुचवायचा. तसंच लेखकांचंही आहे. क्षितिज आणि आशुतोष दोघंही लेखक आहेत. पण, त्यांच्यातही कधी स्पर्धा नव्हती,’ ती सांगते. सुयशचंही हेच म्हणणं आहे. ‘एकाच क्षेत्रात काम करत असलो तरी एकमेकांबद्दल कधीच असुरक्षितता नव्हती. आम्हा सगळ्यांमध्ये गोष्टी स्वीकारण्याची वम्ृत्ती असल्यामुळे कधीच स्पर्धा झाली नाही’, तो सांगतो.

न सांगताही समोरच्याला मनातलं कळतं, अशा हक्काच्या नात्यांपैकी एक म्हणजे मैत्री. आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, मावशी, आत्या वगैरे नात्यांचं त्या-त्या जागी महत्त्व आहे. ही नाती जन्मत:च प्रत्येकाशी जोडली जातात. ही नाती निवडण्याची संधी मिळत नसते. पण, मैत्रीचं नातं आवड आणि इच्छेनुसार निवडलं जातं. ‘बाय चॉइस रिलेशन’ असं म्हणू या हवं तर. मैत्रीचं नातं कोणाशी, कसं, कुठवर टिकवायचं हे मात्र प्रत्येकाच्या हातात असतं. काही वेळा मैत्रीत ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असं होतंही असतं. पण, यातच मैत्री खऱ्या अर्थाने खुलत जाते. एरवी कुटुंबासोबत राहत असताना मित्रपरिवारासोबत घालवत असलेला काळ तुलनेन कमी होतो. पण, मित्र-मैत्रिणींसोबतच राहात असाल तर ते दुसरं कुटुंब होऊन जातं. कुटुंब म्हटलं की घरातल्या सदस्यांचे स्वभाव, आवडीनिवडी, व्यक्त होण्याची पद्धत हे सगळं माहीत असतं. पण, गोष्टींचा फायदा होत असतो. याच मुद्दय़ावर रोचन व्यक्त होतो, ‘मी, आशुतोष आणि क्षितिज जवळपास १७-१८ वर्ष एकत्र आहोत. आमच्यातली मैत्री इतकी जुनी आहे. जुनी असली तरी त्यातलं प्रेम जुनं झालं नाही. ते १८ वर्षांपूर्वी जसं होतं तसंच आजही आहे. किंबहुना वाढलंय. बाकीच्यांशी मुंबईत एकत्र राहायला सुरुवात केल्यानंतर जास्त ओळख झाली, मैत्री झाली. पण, त्यांच्याशी नंतर मैत्री होऊनही आमच्यातलं बॉण्िंडग खूप चांगलं आहे. चार र्वष आम्ही एकत्र राहिलो आहे. त्यामुळे एकमेकांचे स्वभाव, गुणवैशिष्टय़े, व्यक्त होण्याची पद्धत, सवयी या सगळ्याबाबत आम्ही आता डोळे बंद करूनही सांगू शकतो. कोणाचं काय बिनसलंय हे एखाद्याच्या चेहऱ्यावरूनही कळतं. अशा अडचणींच्या काळात आम्हाला एकमेकांचा खूप आधार वाटतो.’

चार-पाच महिन्यांपूर्वी हे मित्र वेगवेगळे राहायला गेले. क्षितिज आणि रोचन एकत्र राहत असून आरती आणि आशुतोष या जोडप्याने नवं घर घेतलं आहे. तर सिद्धार्थ त्याच्या आईसोबत मुंबईतच राहतो. सुयशनेही नवीन घर घेतल्यामुळे सगळे आपापल्या घरी स्थिरावले आहेत. क्षितिज या वेगळं राहण्याबाबत एक गंमत सांगतो, ‘एकमेकांशी चर्चा करून आम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. अर्थात यामागे चांगलाच हेतू होता. पण, हा निर्णय घेताना एक पक्कं ठरवलं होतं, आणि ते सगळ्यांना मान्य होतं. एकाच भागात घरं शोधायची अशी आम्ही आम्हालाच एक अट घालून घेतली होती. तसंच झालंही. आम्ही सगळेच दोन बिल्डिंग, तीन-चार गल्ल्या सोडून राहतोय. त्यामुळे आमची आता फक्त घरं वेगवेगळी आहेत. बाकी आम्ही पूर्वीसारखंच जगतोय.’ हाच मुद्दा आशुतोष पुढे नेतो. तो म्हणतो, ‘आम्ही आता वेगवेगळ्या घरात राहत असलो तरी आमच्यातलं प्रेम किंचितही कमी झालं नाहीये. ते होणारही नाही. आजही दिवसातून एक तरी फोन एकमेकांना असतोच. आम्ही जाणूनबुजून सगळ्यांनी एकाच भागात घरं घेतल्यामुळे आम्हाला कधीही भेटणं शक्य होतं. अनेकदा मी आणि क्षितिज लिखाणाचं काम करत बसलेलो असतो. साधारण दुपारच्या चहाच्या वेळी आमचा एकमेकांना फोन असतो. कोणाच्या तरी एकाच्याच घरी आम्ही चहा करतो. असंच इतरांच्या बाबतीतही घडत असते. कधी चहासाठी तर कधी जेवणासाठी एकत्र जमतो. भेट झाली नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं.’

प्रत्येक घरात भांडय़ाला भांडं लागतंच असं म्हणतात. कितीही सगळे चांगले असले तरी थोडय़ा का होईना कुरबुरी असतात. मग मैत्रीतही होत असणारच. त्यात हे सहा जण एकाच क्षेत्रातले आहेत. त्यामुळे वाद होण्याची तर शक्यता जास्त आहे. याबाबत रोचन एक मुद्दा स्पष्ट करतो. ‘आम्ही सिनेमा, नाटक बघून घरी आलो की त्यावर चर्चा व्हायची. या चर्चेत आमचे खूप मतभेद व्हायचे. अर्थात हे मतभेद भांडणापर्यंत कधीच गेले नाहीत. तत्त्वत: वाद हा आमचा ठरलेला कार्यक्रम असायचा. पण, सिनेमा-नाटकाविषयी चर्चा संपली की हा कार्यक्रमही तिथेच संपायचा. पण, अशा प्रकारची मतभेदांची चर्चा आमच्या करिअरसाठी नेहमीच पोषक ठरली आहे’, रोचन सांगतो. इतर बरेच ग्रुप्स असले तरी हा सहा जणांचा ग्रुप रोचनसाठी खास असल्याचं तो सांगतो. वेगवेगळ्या घरात राहायला गेल्यानंतर दुरावा वाढलाय पण, प्रेम पूर्वीसारखंच असल्याचं रोचन आवर्जून सांगतो.

रात्रभर गप्पा, वेळी-अवेळी चहा-कॉफी, मध्यरात्री भूक लागल्यावर तयार झालेली गरमागरम मॅगी, गप्पा, कामाविषयी चर्चा हे आणि बरंच काही मैत्री अनलिमिटेडमध्ये हमखास असतं. मैत्रीच्या षटकोनाकडे बघितल्यावर मैत्री अनलिमिटेडचा पुरेपूर अनुभव येतो. कुटुंबानंतर सांभाळून घेणारी हक्काची माणसं ज्या नात्यात भेटतात त्या मैत्रीचं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात खास असतंच. हे सहाही जण आता वेगवेगळे राहत असले तरी आजही एकमेकांना खूप सांभाळून घेतात. मुंबईत कुटुंबाशिवाय राहण्याची तडजोड मुंबईबाहेरून आलेले तरुण जास्त चांगलं समजू शकतात. अशा वेळी कुटुंबाला त्यांची सतत काळजी वाटणं स्वाभाविक आहे. आपला मुलगा किंवा मुलगी चांगल्या संगतीत आहे का, योग्य ठिकाणी काम करतोय का, काम व्यवस्थित आहे ना, अशा शंका घरच्यांच्या मनात असतात. पण, या सहा जणांच्या कुटुंबीयांना ती काळजी नाही. कारणच तसं आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत यांच्या मैत्रीचे दाखले पोहोचले आहेत. प्रत्येकाच्या घरातले प्रत्येकाला ओळखतात. मैत्रीत पारदर्शकता हवीच, असा या सगळ्यांचा आग्रह आहे. सुयश याविषयी सांगतो, ‘आम्ही सगळेच आपापल्या घरापासून लांब आलो होतो. आम्हाला आमच्या घराची आठवण यायची. पण, मुंबईतल्या घराने खूप आधार दिला. इथल्या माणसांनी सांभाळून घेतलं. रात्री शूट संपलं की घरी येण्याची ओढ लागायची. चार वर्षे एकत्र राहण्याच्या काळात आम्हाला माणूस म्हणून खूप काही शिकता आलं. एकमेकांना ओळखू लागलो. कोणाच्या काय गरजा आहेत, कोणाची काय सवय आहे, कोणाला काही अडचण आहे का या सगळ्याबाबत समजत गेलं. आमच्यासोबत एक जोडपंही राहत होतं. त्यामुळे त्याविषयीही जबाबदारीही कळत होती. प्रत्येकाकडूनच काही ना काहीतरी शिकलो. दुसरं कुटुंबच झालं माझं हे. क्षितिजची एक खूप गोड सवय आहे. तो मध्येच ‘तू ठीक आहेस ना, काही टेन्शन’ असं काळजीपोटी विचारत असतो. घरी आईला आपल्या लेकराचं काही तरी बिनसलं हे कळतं आणि ती अशीच मध्ये त्याला विचारते तसं ते असायचं. आमचे विचार, आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत. पण तरी आमच्यात मैत्रीचं कनेक्शन स्पेशल आहे.’

मैत्रीमध्ये पिकनिकला जायचे प्लॅन्स तर शेकडो होत असतात. प्रत्यक्षात उतरताना मात्र नाकीनऊ येतात. पण, हे प्लॅनिंग करणंही मजेशीर असतं. नुसतं कल्पनेच्या जोरावर उडय़ा मारत स्वप्न रंगवायची. पण, या सहा जणांनी ते प्रत्यक्षातही आणले. सिमला, कुलू मनाली, गोवा, महाबळेश्वर अशा अनेक ठिकाणी ते फिरून आले आहेत. इतर दिवसांत कामाचा ताण फारसा नसेल तर सिनेमा बघणं त्यांचा नेहमीचा कार्यक्रम असतो. याबाबत आशुतोष एक गंमत सांगतो, ‘मी मालिकांचं लेखन करतो. त्यामुळे दिवसभर माझं काम सुरू असायचं. सिनेमाला जायला सगळे तयार असायचे. माझ्या कामामुळे मला जाणं शक्य नसायचं. बोर्डवर मालिकेच्या एपिसोड्सचे पॉइंट्स लिहिलेले असायचे. मी सिनेमाला जायला नकार दिला की त्या बोर्डचा एक फोटो काढायचे आणि ‘तू येतोयस की नाही? नाही तरी हा फोटो आम्ही फेसबुकवर टाकतो’ अशी प्रेमळ धमकी द्यायचे. मग, मला त्यांच्यासोबत जावंच लागायचं. पण, मला याचा कधीच राग आला नाही. माझ्यावरच्या प्रेमापोटी ते तसं करायचे. या सहा जणांच्या व्यतिरिक्त याच क्षेत्रातले इतरही काही मंडळी गप्पाटप्पांसाठी यांच्या घरी यायचे. सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, क्षिती जोग, समीर विद्वंस, आदिनाथ कोठारे, आदित्य सरपोतदार, जितेंद्र जोशी अशा अनेक कलाकार मंडळींसाठी त्यांचं घर हक्काचं गप्पा मारण्याचं ठिकाण होतं.

आता ही मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असली तरी प्रत्येकाची रोजची कामं संपली की जमेल तसं एकमेकांना भेटतात. सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणाचा बेत आखतात. सिनेमाला जातात. एकमेकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं सगळ्यांच्याच खूप अंगवळणी पडलं आहे. पाल्र्यातल्या ‘परिणीता’ या सोसायटीतलं त्याचं घर सोडताना सगळेच भावुक झाले होते. पण, सगळ्यांना उत्सुकता होती नव्या सुरुवातीची. चार भिंतीत आता ते एकत्र नसणार याची जाणीव त्यांना होत होती. पण, एकमेकांच्या मनात मात्र ते कायम एकत्र असणार याची खात्री प्रत्येकाला होती. ‘यारो.. दोस्ती, बडीही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है’, हे म्हटलंय ते उगाच नाही..!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, Twitter – @chaijoshi11