उत्क्रांतीच्या ओघात भावना व्यक्त करण्याच्या कलांमध्ये अनेक बदल झाले. बदलाच्या रेटय़ात अनेक कला लुप्त झाल्या. पण गोंड समाजात शैलाश्रयातील चित्ररेखाटनं आजदेखील जोपासली जात आहेत. शैलाश्रयातील या ‘गोधनी’चा एक मागोवा..

चित्रकला ही नेहमीच आपल्यासाठी भावनांना वाट करून देणारं एक हुकमी माध्यम राहिलं आहे. लहानपणीसुद्धा पेन किंवा पेन्सिलने भिंतीवर काढलेल्या रेघोटय़ांमध्ये काहीतरी निर्मितीचा आनंद असतो. पेपर, पेन, कागद, भिंत, पाटी, खडमू साधन-सामग्री काहीही असेल, किंवा असं म्हणूयात जे काही असेल त्यातून मानवाने नेहमी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. शैलचित्र हा त्यातलाच एक प्रकार आहे. भारताला लाभलेल्या अनेकविध प्राचीन ठेव्यांपकी एक म्हणजे आदिम काळातली शैलाश्रय कला. जेव्हा भाषा किंवा लिपीचा वापर हा तितका प्रचलित नव्हता तेव्हा आदिमानव खडकांवर चित्र रेखाटून आपल्या मनातील भावना व्यक्त करत असत असा निष्कर्ष बांधला जातो. त्यातूनच आपल्याला आज त्यांच्या दैनंदिन जीवनाचा किंवा त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करता येतो.

Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
Numerology Number 6 Personality Prediction in Marathi
Numerology Prediction: या जन्मतारखेचे लोक लहान वयातच होतात श्रीमंत, शुक्राच्या कृपेने त्यांना मिळते अपार धन अन् प्रसिद्धी
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

आपल्या देशात आजही काही आदिवासी जमाती त्यांच्या काही पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांशी नातं जोडून आहेत. अश्मयुगीन काळातील शैलाश्रयकला हीदेखील अशाच काही जमातींच्या परंपरेतून जोपासली गेली आहे. त्याच्या खुणा बहुतांश वेळा डोंगरकपाऱ्यांमध्ये दडलेल्या असतात. असाच एक प्रागतिहासिक अमूल्य ठेवा गोंड लोकांचं वास्तव्य असलेल्या धारुल नावाच्या मध्य प्रदेशातल्या गावी आढळतो. शैलाश्रयातील गोधनी चित्रे ही धारुलच्या गोंड लोकांची परंपरा. खडकाळ प्रदेश, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या गुंफा, एकेकाळी मानवी वास्तव्याचं ठिकाण असाव्यात. आज तिथे माणूस नाही, पण धारुलच्या गावाकऱ्यांचा देव वसतो. आणि या लोकांची खडकावर चित्रं काढण्याची, पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली परंपरा इथे सापडते. धारुल गाव महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेलगत, बेतुल या जिल्ह्यत येते. हे गाव सातपुडा डोंगर रांगांच्या पायथ्याशी असून गोंड व कोरकू या दोन जमातींची येथे वसाहत आहे. गोंडांमध्ये असलेल्या अनेकविध उपजातींपकी, धारुलचे गोंड हे स्वत: राजगोंड असल्याचे सांगतात.
lp14

गोधनी म्हणजे नेमकं काय?

गोंड जमातीच्या लोकांनी भौमितिक आकृत्यांनी साकारलेला एक चित्र प्रकार जो मुख्यत: दोन ठिकाणी आढळतो, एक म्हणजे शैलगृहांमध्ये आणि दुसरा गोंडी घराच्या बाहेरील िभतीवर. गोधनी या शब्दाची व्युत्पत्ती ‘गो’ म्हणजे ‘गाय’ आणि ‘धन’ म्हणजेच ‘संपत्ती’ या दोन शब्दांपासून होते. गोंड घरांच्या भिंतींवर अथवा शैलगृहांमध्ये दिसणारी गोधनी चित्रे ही सारखी आहेत. भौमितिक आकृत्यांचा वापर करून काढलेल्या या चित्रांमध्ये मूळ आकार हा आयत, चौकोन किंवा अधिकचं चिन्ह असतं, आणि त्याला टिंब, रेषांच्या सजावटीने पूर्ण करतात. गोंडी घरांच्या भिंतींवर चितारलेली गोधनी ही जोडय़ामध्ये काढतात. अधिक नटवलेलं चित्र हे स्त्रीचं, तर कमी नटवलेलं पुरुषाचं प्रतीक असतात. ही चित्रजोडी, लग्न होणाऱ्या जोडप्यासारखे, उजवीकडे स्त्रीचं तर डाव्या बाजूला पुरुषाचं अशी काढतात. चित्र काढण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री ही वर्षांनुवषेर्ं तीच आहे. त्यात बदल नाही; मग जागा कुठलीही असो शैलगृह किंवा गोंडी घर. पण शैलगृहामध्ये दिसणारी गोधनी ज्या सोहळ्यातून जन्म घेते तो रंजक आहे. सातपुडा डोंगररांगांमध्ये प्रामुख्याने, कुक्कडशहा, मुंगसादेव, अंबादेवी व गायमुख हे चार महत्त्वाचे शैलगृह चमू आहेत. गोंडांची गोधनी पूजा व गोधनी चित्रे मात्र मुख्यत्वे मुंगसादेव शैलगृहाशी निगडित आहेत. काही तुरळक गोधनी चिन्हे गायमुख आणि अंबादेवी शैलगृहांमध्येसुद्धा दिसून येतात. पण मुंगसादेव शैलगृहाच्या बाह्यंगावर ते प्रामुख्याने आणि मोठय़ा संख्येने आढळतात.

lp12  गोधनी चित्रं ही गोधनी पूजेचा एक अविभाज्य घटक आहेत. दिवाळी सणाच्या चार ते पाच दिवस आधी होणारी ही पूजा म्हणजे, तीन ते चार तासांचा विधी असतो. हा काळ निवडण्यामागचं कारण, शेतकामाशी निगडित असावं, कारण पूजेचा मूळ उद्देश हा गुरा-ढोरांचे संरक्षण, शेतीतून चांगले उत्पन्न आणि सगळ्यांना सुखी समृद्ध आयुष्य मिळावे हे आर्जव असते. दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनासोबतच आपल्या या देवरूपी जनावरांचे पूजन करतात व त्या निमित्ताने देवाचे आभारही मानतात. गुरांचा सांभाळ करणे हे काम पूर्वापार जे करत आले तेच आज गुराखी म्हणून सर्वत्र ओळखले जातात आणि त्यांच्या कामावरूनच जातीलासुद्धा वर्गीकरण दिले गेले. आणि म्हणूनच त्यांच्यापकीच कुणी एका गुराख्याने पूजा आयोजित करणे व पुजाऱ्याने ती त्याच्या वतीने विधिवत पार पाडणे अशी प्रथा आहे.

याचे मुख्य पूजास्थळ मुंगसादेव गुंफा असल्यामुळे गुराखी, पुजारी आणि इतर गावकरी गावातून वाजतगाजत वरात काढतात, धोतर नेसलेला व अंगरखा घातलेला गुराखी सुरेल बासरी वाजवतो, समूहातल्या स्त्रिया गाणी गात असतात; तर कुणी ढोलकं बडवत असतं. वरात गावाच्या वेशीजवळच्या गोठणातल्या मूढवा देवाच्या पाया पडून पुढे मुंगसादेव शैलगृहांच्या दिशेने निघते. तिथे पोहोचताच मुंगसी बाबा देवासमोर दिवा उजळून आणि अगरबत्ती लावून या पूजेची सुरुवात केली जाते. प्रारंभी पुजारी एका टोपल्यामध्ये आधी गेरू-चुन्याने व नंतर शेणाने गोधनी काढतो. या काढलेल्या गोधनीवरती झेंडूच्या फुलांनी सजावट करून ते पूजेसाठी तयार केलं जातं. अशाच प्रकारे एका सुपामध्येसुद्धा गोधनी काढून आणि गोलाकार आकारात मिनज्वा (काळा सुतळीसारखा दोरखंड) ठेवून तयार केलं जातं. दरम्यान गुराखी बासरी वाजवत असतो, गावातील स्त्रिया गोंडी भाषेमध्ये या गोधनी पूजेसंबंधातील गाणी म्हणत असतात, कुणी लहान मुली रांगोळी काढतात आणि असा सुंदर माहोल तयार होतो. या गाण्यांच्या मार्फत भक्त देवाकडे आपल्या शेतीसाठी, गुरांच्या सरंक्षणासाठी व चांगल्या भरभराटीसाठी साकडं घालतात. मुंगसी बाबा देवासमोर, गोधनीने रेखाटलेला सूप व टोपलं अर्पण करून त्यावर हळद-कुंकू वाहतो. शिऱ्याचा नवेद्य दाखवून व आरती करून पूजेची सांगता होते.

lp13पण अजून एक मुख्य भाग याच्यापुढे असतो, तो म्हणजे खडकावर गोधनी काढणे. पूजेच्या सरतेशेवटी शैलगृहाच्या दर्शनी भागावर काडीच्या टोकाला कापूस लावून, गेरू व चुना या नसíगक रंगांचा वापर करून गोधनी चित्रे काढली जातात. ही चित्रे केवळ स्त्रियांनीच काढायची अशी प्रथा आहे. मुख्य म्हणजे ही चित्रे दरवेळी खडकावरील नवीन ठिकाणी काढली जातात. त्यात अध्यारोहण झालेले दिसत नाही. जुनी पुसट झालेली चित्रेदेखील कळून येतात. गोधनी सोबतच पक्षी-प्राण्यांची चित्रंसुद्धा काढतात. जशी आपल्याला अश्मयुगातील चित्रांमध्ये पक्षी-प्राण्यांची चित्रे दिसतात तशीच साधारण फक्त आकृत्यांच्या धाटणीने आधुनिक, कदाचित जुन्या चित्रांचे अजाणतेपणी अनुकरणच ते करत असावेत.

चित्रांचे रेखाटन झाल्यावर सगळी मंडळी पुन्हा गावात, गुराख्याच्या घरी परततात. शैलगृहांमध्ये पुजलेला सूप व टोपलं पुढचे पाच दिवस त्याच गुराख्याच्या घरी ठेवतात. या पाच दिवसांच्या काळात, गायकी समाजातील स्त्रिया, गावातल्या सगळ्या घरांच्या बाहेरच्या भिंतींवर गोधनी चित्रे काढतात. गोंड लोक ही चित्रं शुभ मानत असल्याने ती घराबाहेर काढण्याची प्रथा आहे. तसंच ही चित्रं त्यांच्या घराचं सुशोभीकरण करण्याचंही काम करतात.

पाच दिवसांनंतर, दिवाळीत होणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी, गोधनी पूजेचा उत्तरार्ध ज्याला आपण म्हणू शकतो अशी गोठण पूजा घातली जाते. गोठण पूजा हे आणखी एक विधिवत कार्य जे गावच्या वेशीजवळील रानावर पार पाडले जाते. या रानावरील असलेल्या त्यांच्या मूढ्वा देवाच्या शेजारी, गोधनी पूजेमध्ये वापरलेली सर्व सामग्री पुरली जाते व त्यावर गेरू-चुन्याने गोधनी काढलेला एक दगड ठेवला जातो. गुराख्याला, चेहरा झाकून देवाच्या पायाशी झोपवतात आणि मूढ्वा देवाची साधी पूजा केली जाते. या गुराख्याला नंतर त्यांच्याच जातीचा कुणी उचलून, पुढे होणाऱ्या गायखेलाच्या ठिकाणी घेऊन जातात. देवाच्या आशीर्वादाने गुराख्याला सर्व रक्षणाची ताकद प्राप्त होते, अशी मान्यता आहे. तसाच गुराखी या सगळ्या सोहळ्यादरम्यान वाजवत असलेल्या बासरीमध्येसुद्धा रोगनिवारणशक्ती येते असं गोंड समाज मानतो. म्हणूनच गोठण पूजेच्या अखेरीस, पुजारी ही बासरी चुन्यात बुडवून तीन वेळा लोकांच्या पोटाला स्पर्श करतो. ‘इडा पिडा टळो’ असा सश्रद्ध विश्वास यामागे असतो. यानंतर येतो तो गायखेला. गुराखी व त्याच्या गाईमध्ये होणारी ही एक स्पर्धाच असते. गोधनी आणि गोठण पूजेतून गाईने नक्की किती बळ एकवटले आहे याची चाचणी यातून केली जाते. मुख्यत: गुरा-ढोरांच्या रक्षणासाठी घातलेली पूजा ही गायखेला झाल्याशिवाय पार पडत नाही अशी समजूत आहे.

गेल्या काही वर्षांपासून, शैलागृहांमध्ये जाऊन पूजा करण्याची व चित्र साकारण्याची प्रथा खंडित झाली आहे. शहरीकरणामुळे बदलते व्यवसाय, शेतीकामाला मिळणारे कमी प्राधान्य आणि स्थित लोकांमध्ये असणाऱ्या पशाच्या अडचणी, अशा विविध कारणांमुळे वर्षांनुवष्रे चालत आलेली ही परंपरा लोप पावत चालली आहे. अजूनही दिवाळी उत्सवादरम्यान घरांच्या बाह्यंगावर गोधनी काढण्याची प्रथा मात्र गोंड अविरत पाळत आहेत. पण तेदेखील किती काळ सुरू राहील आणि अजून किती काळ आपल्याला ही कला मूळ स्वरूपात दिसत राहील, हे सांगणे जरा कठीणच. पण निदान अशा आदिम कला जर नेटाने नोंदवल्या गेल्या तर त्या प्रकाशझोतात येण्याची व त्यानिमित्ताने जोपासल्या जाण्याची शक्यता वाढते. खडकांवर दिसणाऱ्या गोधनीमागचा हा पारंपरिक डोलारा खरंच संस्मरणीय आहे. या त्यांच्या रूढीपरंपरांचा सखोल अभ्यास, आपल्याला आदिमानवाच्या सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोनाचे दर्शन घडवते. कारण गोधनीशी मिळतेजुळते चित्र प्रकाराचे प्रागतिहासिक नमुनेसुद्धा मुंगसादेव आणि कुक्कडशाह शैलगृहांमध्ये सापडले आहेत. जर चित्रप्रकारांमध्ये एक प्रकारचे सातत्य कायम आहे तर नक्कीच मानवाची वर्तणूक, त्याच्या संकल्पना, जगण्याची पद्धती यातही काही संबंध जोडता येऊ शकतात का?, असा प्रश्न निर्माण होतो. आणि गोधनी चित्रांसारखे अवशेष या प्रकारच्या संशोधनाला चालना देण्यास पूरक ठरतात. ही परंपरा जरी गोंडांच्या जमातीत प्रचलित असली तरी हा मानवाच्या उत्क्रांतीचा मागोवा देणारा एक अमूल्य सांस्कृतिक व सामाजिक ठेवा आहे. असा हा संवेदनशील कलावारसा आपल्याला आपल्याच पाशातून बाहेर येऊन भारतामध्ये दडलेल्या भिन्नता अधिक खोलाने जाणून घेण्यास प्रवृत्त करतो.
स्वप्ना जोशी – response.lokprabha@expressindia.com