काश्मीरमधील अस्थिरता, तुलनेने कमी खर्चातील परदेशवारी अशा परिस्थितीतदेखील उन्हाळी सुट्टय़ांमध्ये हिमालयाचे आकर्षण कमी झालेले नाही. उलट नवनवीन ठिकाणांच्या माध्यमातून ते वाढतेच आहे.

उन्हाळी सुट्टय़ा म्हणजे पर्यटनाचा सुगीचा काळ असतो. त्यातही हिमालय हा सर्वाधिक प्राधान्य असणारा भाग. किंबहुना या काळात सर्वाधिक गर्दी होणारे भारतातील पर्यटन स्थळ म्हणजे हिमालय हेच असते. जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेश या भारताला लाभलेल्या प्रचंड अशा पर्वतरांगेत कौटुंबिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, साहसी पर्यटन असे पर्यटनाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहे. या सर्व पर्यायांचा आजच्या पर्यटकांकडून पुरेपूर वापर केला जात असल्याचे दिसून येते. इतकेच नाही तरुणांकडून अनेक नवनवीन पर्याय हातळण्याचे प्रयोग होताना दिसत आहेत. पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखले जाणारे काश्मीर हे यच्चयावत भारतीयांच्या यादीत कायमचे स्थान असलेला भाग. गेल्या दोन दशकात काश्मीरमधील अस्थिरता पाहता पर्यटनाला प्रचंड फटका बसला होता. पण ही परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आणि काश्मीरमध्ये देखील पर्यटनाला चालना मिळाली होती. पण पुन्हा मागील वर्षी तेथील परिस्थितीत झालेल्या बदलामुळे काश्मीरच्या पर्यटनाला पुन्हा एकदा फटका बसला आहे. या वर्षीच्या उन्हाळी सुट्टीत एकंदरीत पर्यटकांची पसंती ही हिमालयातील पर्यटन स्थळांनाच आहे, मात्र त्यात काश्मीरचा वाटा तुलनेने घसरला असल्याचे दिसून येते.

गुरुनाथ ट्रॅव्हलस्चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश पांढरे सांगतात की, यंदा काश्मीरचे आकर्षण किमान ३० टक्क्यांनी घसरले आहे. तुलनेने हिमाचल प्रदेशमध्ये सर्व सोयीसुविधा अगदी व्यवस्थित असल्यामुळे पर्यटक मनाली, लेह, लडाखला अधिक प्राधान्य देत आहेत. कौटुंबिक सहलींमध्ये तुलनेने काश्मीरला सध्या फारशी उत्सुकता दिसत नाही. मँगो ट्रॅव्हल्सचे दुष्यंत देसाई याबाबत सांगतात की एकंदरीतच आपल्याकडे बर्फानुभव घ्यायचे प्रमाण अधिक आहे. पण त्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य हे हिमाचलला दिले जात आहे. अर्थातच हे प्रमाण लहान मुलांच्याबाबतीत अधिक असते. त्यामुळे हिमाचल हे सध्या हॉट डेस्टिनेशन म्हणून पुढे येताना दिसते. हनीमूनर्समध्येदेखील मनालीला अधिक प्राधान्य दिले जाते.

हिमालयाचं वैशिष्टय़ म्हणजे सर्वच वयोगटांतील पर्यटकांना त्याचे आकर्षण आहे. त्यातच सध्या हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये साहसी पर्यटनाला चालना मिळताना दिसत आहे. त्यामुळे अनेक तरुणांना सध्या हिमालय भुरळ पाडत आहे. या तरुणांमध्ये मात्र स्वत:च स्वत: नियोजन करून पर्यटनाला जाण्याचे प्रमाण दिसून येते, असे क्वेस्ट टुर्सचे केदार साठे यांनी नमूद केले. ते सांगतात की हे प्रमाण किमान २०-२५ टक्के इतके आहे. काश्मीर म्हटल्यावर खरे तर सर्वाचेच जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तरांचल या राज्यांना प्राधान्य असायचे. पण सध्या पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम ही राज्येदेखील पर्यटनाच्या नकाशावर झळकताना दिसतात. सिक्कीममधून दिसणारी कांचनजंगा पर्वतरांग ही पर्यटकांना आकर्षित करते. अरुणाचल हे तसे पर्यटनाच्या सुविधा कमी असणारे राज्य, पण येथेदेखील सध्या पर्यटन व्यावसायिकांना बऱ्यापैकी पर्यटक मिळत आहेत.

उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी हिमालयालाच प्राधान्य मिळत असले तरी आणखीन एका घटकाकडे एसटीए हॉलिडेज्चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सांगले लक्ष वेधतात. ते सांगतात की, एकंदरीतच गेल्या काही वर्षांत दक्षिणपूर्व अशियातील पर्यटन खूपच सुकर झाले असून थायलंड, मलेशिया, बाली या ठिकाणी जाण्याचा खर्च आणि देशांतर्गत एखाद्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याचा खर्च यात तुलना केली तर फार फरक दिसत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक हे देशांतर्गत भटकण्यापेक्षा देशाबाहेर जाण्यास अधिक प्राधान्य देताना दिसतात, असे अजित सांगले नमूद करतात. अर्थात असे जरी असले तरी हिमालयाची एकंदरीतच भारतीयांची ओढ काही कमी झालेली नाही असे ते सांगतात. सध्याच्या सुट्टीत पर्यटकांनी केलेल्या एकंदरीत नियोजनावरून हे ठळकपणे दिसून येते. अगदी धार्मिक पर्यटनातदेखील सर्वच स्तरांतील लोकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. अर्थातच उन्हाळी पर्यटन आजही हिमालयालाच प्राधान्य देताना दिसत आहे.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com