आपल्या बागेत लावण्यासाठी वनस्पतींची निवड काळजीपूर्वक करावी. कारण प्रत्येक झाडाला पुरेशी जागा मिळाली तरच त्यांची वाढ चांगली होणार.

मुंबईसारख्या शहरात जागेची टंचाई हा सर्वसामान्यांचाच नाही तर जरा उच्चभ्रूंनाही तसा जिव्हाळ्याचा विषय. जागेची अडचण सर्वानाच जाणवते. घर घेताना राहाण्याची जागा कशी आहे, सोयी काय आहेत वगैरे गोष्टी आपण पहातो. पण त्याशिवाय आजूबाजूचा परिसर कसा आहे, हिरवाई किती आहे या गोष्टींकडेही पाहण्याची आता लोकांना सवय होऊ लागली आहे. पर्यावरणाविषयीही होत असलेली जागृती खचितच आशादायी आहे. प्रत्यक्ष नव्या घरात राहायला आल्यावर ओकं ओकं वाटणारं घर प्रथम फर्निचरने नटतं तेव्हा कुठे जरा बरं वाटायला लागतं. कारण तोपर्यंत ते नुसतंच हाऊस असतं. आपल्या गरजांप्रमाणे ते फर्निचरने सजलं की जरा ते होम वाटायला लागतं. तरीसुद्धा मनात कुठेतरी अपूर्णता वाटतच राहाते. कारण सुंदर रंगविलेल्या भिंती, त्यावर लटकलेली म्युरल्स्, तसबिरी, जमिनीवरचं फर्निचर, असल्यास गालिचे वगैरे वस्तू मूलत: निर्जीव. या सगळ्यांत प्राण ओतायला काहीतरी जिवंत तिथे असायला हवं ही जाणीव, आत कुठेतरी सलत राहते. घराला एक-दोन व्हरांडेही असले तर हा सल जास्तच जाणवतो. मोकळे व्हरांडे अंगावर आल्यासारखे वाटतात. त्यांचा काहीतरी उपयोग करून घ्यावा असं तीव्रतेने वाटत राहातं. तळमजल्यावर राहाणाऱ्यांना थोडं फार जरी अंगण मिळालं तरी त्याचा सदुपयोग कसा करता येईल याचा विचार मनात नक्की येतोच. चला तर, मग आपल्या हाऊसचं होम कस करता येईल त्याचा विचार करू या.

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
What happens to your body if you only eat foods cooked in olive oil
तुम्ही फक्त ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेले अन्न खाता का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो माहित्येय का?
bengluru crime news
‘नवविवाहित दाम्पत्याचे खिडकी उघडी ठेवून शरीरसंबंध’, शेजारणीची पोलिसांत तक्रार

02-lp-flower

व्हरांडा- बाल्कनीतली बाग 

आपल्या घराला बाल्कनी किंवा व्हरांडा असेल तर आपण त्याचा उपयोग कुंडय़ांतून सुंदर फुलझाडं तसंच दैनंदिन वापरासाठी (स्वयंपाकघरासाठी) लागणारी किंवा औषधी वनस्पती ठेवू शकतो. घर सजविण्यासाठी आपण कुंडय़ातील झाडं ठेवतो. छोटय़ाशा जागेला सुंदर रूप देण्यासाठी अर्थातच झाडांची निवड अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपल्याकडे जागा थोडी आहे. त्यामुळे मोजक्याच वनस्पती आपण ठेवू शकतो. शिवाय व्हरांडय़ाचा मधला भाग सहसा मोकळा ठेवतो. कारण तिथेच उभं राहून आपण बाहेरचं जग बघतो. त्यामुळे व्हरांडय़ाच्या आकारमानानुसार एक किंवा दोन कोपरे कुंडय़ा ठेवण्यासाठी उपयोगात येतात. आपल्याकडे निवडी बाबतीत आता दोन पर्याय आहेत. एक म्हणजे सुंदर पानांची वा फुलांची फुलझाडं व दुसरा पर्याय स्वयंपाकात लागणारी वा औषधी वनस्पतींची लागवड. व्हरांडय़ातल्या फुलझाडांची निवड करताना काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.

  • ही फुलझाडं एक ते दीड मीटर उंचीपर्यंतच वाढणारी असावीत. अवाढव्य पसरणारी नसावीत.
  • एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्हरांडय़ाची दिशा. वेगवेगळ्या वनस्पतींची सूर्यप्रकाशाची गरज ही वेगवेगळी असते. त्याप्रमाणे व्हरांडा दक्षिणाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख असेल तर अशा ठिकाणी सूर्यप्रकाश तीव्र असतो. त्यामुळे अशा जागी पूर्ण प्रकाशात वाढणाऱ्या वनस्पतीच ठेवाव्यात.
  • फुलझाडं वर्षांतून जास्तीत जास्त काळ बहरणारी असतात.
  • फुलझाडं सुगंधी असल्यास सोने पे सुहागा.

आता व्हरांडय़ात ठेवता येतील अशा काही सुंदर फुलांच्या, तर काही सुंदर पानांच्या वनस्पतींची ओळख करून घेऊया.

03-lp-flower

जास्वंद – सर्वाना सुपरिचित असं हे फुलझाड. साधारण दीड ते पावणेदोन मीटर उंचीपर्यंत वाढतं. जास्वंदीचे अनेक प्रकार आहेत. विविध रंगांची उधळण आणि फुलांचे विविध प्रकार तेही जवळजवळ बारमाही ही त्याची वैशिष्टय़े. हवाई जास्वंदीतील रंगवैविध्य खरोखर वाखणण्याजोगे असते. जास्वंदीची लागवड जून फांद्यांनी होते. औषधीदृष्टय़ाही जास्वंद अतिशय उपयोगी आहे, मुख्यत: केशतेलासाठी.

कण्हेर – इंग्रजीत ओलिएंडर नावाने ओळखले जाणारे हे फुलझाड मेडिटेरेनीअन टापू, आशिया, जपान, इथले मूळ रहिवासी आहे. याच्या मूळ रूपातील झाडं दोन मीटर वाढतात. पण नवीन खुज्या जाती एक मीटर वाढतात व फुलंही खूप देतात. याची पांढरी, लाल व गुलाबी अशा खुज्या जाती लोकप्रिय आहेत. मात्र यातून निघणारा पांढरा दुधासारखा चीक विषारी असतो. तो पोटात जाणार नाही याची काळजी घ्यावी.

तगर – जास्वंदीप्रमाणेच सुपरिचित असं हे फुलझाड इमारतींच्या प्रांगणात दोन ते अडीच मीटर उंचीची. चांदणीसारख्या पांढऱ्या फुलांनी डवरलेली तगर कुणाचंही लक्ष वेधून घेते. पण आपल्या छोटय़ाशा व्हरांडय़ात लावण्यासाठी मात्र मध्यम व खुजी जात जास्त उपयोगी. कमीत कमी परिश्रमात, भरपूर फुलं देऊन देवपूजेची गरज भागविणारी अशी ही तगर. यातील खुजी जात तर इतकी लहान असते की खिडकीच्या अरुंद जागेतही ही कुंडी मावेल.

घाणेरी – बागकामशास्त्रात ‘लँटाना’ या नावाने परिचित असलेलं फुलझाड बागेत असल्याशिवाय बागेला पूर्णत्व येणार नाही असं म्हटलं तरी चालेल. पांढरा, लाल, गुलाबी, जांभळा, दुरंगी अशा अनेकविध रंगांच्या खुज्या जाती फुलपाखरांना खुणावीत असतात. अर्धा ते पाऊण मीटर उंची गाठणारं हे फुलझाड आपल्या व्हरांडय़ातच नाही तर परसबागेतही शोभून दिसेल.

अबोली – मूळ भारतीय असलेली अबोली नावाने अबोली असली तरी खूप काही सांगून जाते. अबोलीशिवाय कोकणातलं घर असू शकणार नाही. बीपासून सहजरीत्या पुनरुत्पादन करता येणारं हे फुलझाड जवळजवळ बारमाही फुलं देणारं आहे. हिच्या निळी, पिवळी, शेंदरी अशाही काही जाती आढळतात.

रातराणी – आपल्याला सुपरिचित असलेल्या रातराणीचं मूळ हे वेस्ट इंडिज आहे. एक ते दीड मीटर वाढणारं हे फुलझाड त्याच्या मादक सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. रातराणीची फुलं संध्याकाळनंतर उमलतात आणि त्यानंतर त्यांचा तो मादक गंध आसमंत सुगंधी करतात. दिवसा सुगंध नसला तरी फुलातला मकरंद पिण्यासाठी मधमाशा तिथे हमखास हजेरी लावतात.

दिन का राजा – याचं थोडक्यात वर्णन करायचं तर रातराणीचा भाऊ जो दिवसा सुगंध पसरवतो असं म्हणता येईल.

04-lp-flower

व्हरांडय़ात ठेवायच्या झाडांमध्ये याशिवाय भर घालता येईल ती गुलबक्षी, सदाफुली, बोगनवेल, खुजा, अनंत इत्यादींची. कुणी म्हणेल की या यादीत फुलांचा राजा गुलाबाला का स्थान नाही? तर तो आहे फुलांचा राजा. म्हणजे त्याला राहायला, वाढायला राजवाडाच हवा. आपल्या छोटय़ाशा व्हरांडय़ात इतर अनेक फुलझाडांसमवेत दाटीवाटीने राहायला त्याला कसे आवडेल? जरा मोकळीक मिळाली की गुलाब छान वाढतो. तसंच मोगऱ्याच्या बाबतीतही म्हणता येईल. मोगरा हा बारमाही नाही. त्यामुळे फुलांचा ऋ तू सोडला तर इतर वेळी मोगऱ्याचं झाड म्हणजे फक्त हिरव्या पानांचा गुच्छ दिसतो.

आता सूर्यप्रकाश कमी असेल अशा कोपऱ्याचा विचार करू या. सूर्यप्रकाश कमी म्हणजे जेथे सूर्यकिरण पडत नाहीत पण भरपूर उजेड असतो अशी जागा. अर्थातच अंधारी किंवा काळोखी जागा नव्हे. अशा जागेत छान वाढतील अशा वनस्पतींचा मागोवा घेऊ. व्हरांडय़ाच्या छोटय़ाशा जागेत शोभतील अशी ही झाडं म्हणजे-

  • आकाराने लहान किंवा मध्यम.
  • पानांचा आकारही मर्यादित
  • पानां- फुलांचा आकर्षक रंग

नर्सरीमध्ये सहज आढळणारी अशी काही झाडं म्हणजे –

आगलाओनिमा – सुमारे ४० जाती व त्यांच्या अनेक प्रजाती असलेली ही झाडे मूळची मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इथली आहेत. त्यांचा सौंदर्यवान पर्णसंभार हेच त्यांचं वैशिष्टय़. हरित काष्ठ प्रकारच्या या वनस्पती खोडांचे तुकडे लावून पुनरुत्पादित केल्या जाातात. कुंडीत एक तुकडा लावला तरी त्यातून फूट येऊन कालांतराने कुंडी भरून जाते.

आल्पिनिआ – आल्यासारखी लांब व अरुंद पाने असलेल्या या वनस्पतीला शेंडय़ावर सुरेख फुलांचा गुच्छ येतो. काही जातीत हिरव्या पानांत पिवळ्या रंगाच्या पट्टय़ांनी शोभा अधिकच वाढते. इंग्रजीत  जिंजर प्लांट म्हणून हे ओळखले जाते.

अँथुरिअम – सावलीतही फुलं देणाऱ्या मोजक्या वनस्पतीत याचं नाव अग्रक्रमाने घेता येईल. लांब दांडय़ावर एकच वैशिष्टय़पूर्ण फूल असणारं हे बागकाम शास्त्रात ऑर्किडच्या बरोबरीने श्रीमंत म्हणून ओळखले जाते. याच्या काही जाती सुंदर पानांसाठी प्रसिद्ध आहेत. यांची वाढ विशिष्ट पद्धतीनेच करावी लागते. तसंच फुलांच्या आकारमानात इतकी विविधता असते की ती जातीनुसार ५ ते २५ सें.मी. व्यासाची असू शकतात. त्यामुळे आपल्या व्हरांडय़ाला शोभेल अशाच जातींची निवड करावी.

शतावरी – हिच्या अनेक जाती आहेत. विविध आकाराची पाने हे तिचं वैशिष्टय़. काही जातींची लहान नाजूक फुलंही सुंदर दिसतात. आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हणूनही तिची ओळख आहे. शतावरीचा वेल किंवा झुडुप असल्यामुळे छोटय़ा जागेसाठी शक्यतो कमी वाढणाऱ्या जातीची निवड करावी.

05-lp-flower

बेगोनिआ – मूळची उष्ण प्रदेशातली ही वनस्पती काही जातीच्या सुंदर फुलांसाठी तर काही जातींच्या मनोहर पर्णसंभारासाठी प्रसिद्ध आहे. यांचा आकार लहान असल्यामुळे खिडकीच्या अरुंद जागेसाठीही त्याचा उपयोग होतो.

कॅलेडिअम – अळूच्या पानांची आठवण करून देणारी ही वनस्पती तिच्या सौंदर्यवान पानांसाठी प्रसिद्ध आहे. याचे जमिनीत वाढणारे कंद पुनरुत्पादनासाठी वापरतात. याच्या एका जातीची पानं मितपारदर्शी असतात.

डायफेनबेकिया- डंब केन या इंग्रजी नावाने प्रसिद्ध असलेली ही वनस्पीत सावलीतल्या कुंडय़ांसाठी प्रसिद्ध आहे. मुख्यत: हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या विविध आकारांमुळे हिची मागणी वाढत आहे. यांच्या खोडात व मुळांत जो रस असतो तो विषारी असतो व जिभेला लागल्यास थोडय़ा वेळासाठी जीभ जड होते. म्हणून त्याचं नाव डंब केनं. पण आज इतकी वर्ष वापरात असूनही असं झाल्याचं एकही उदाहरण नाही.

ड्रेसीना – डायफेनबेकिया प्रमाणेच अतिशय सुंदर पानांसाठी ही वनस्पती प्रसिद्ध आहे. यांची वाढ सरळ व उंच असते. त्यामुळे शक्यतो कमी उंचीच्या प्रजाती निवडाव्या.

वरील सर्व वनस्पती या बहुधा खोडाच्या कटिंगने पुनरुत्पादित होतात. याव्यतिरिक्त नेहमीच्या वापरातील काही औषधी वनस्पतीदेखील आपल्या व्हरांडय़ाला शोभा आणि उपयुक्तता आणण्यासाठी वापरता येतील. उदाहरणार्थ-

कर्पुरी तुळस – ही वर्षांयू वनस्पती एक मीटपर्यंत वाढते. पाने डासांना पळविण्यासाठी उपयोगी पडतात. तसेच चहात पाने टाकल्यास मसाल्याच्या चहाची चव येते. हिचं पुनरुत्पादन बीयांपासून होतं.

कोरफड –  सर्वाना परिचित अशा या बहुपयोगी मांसल वनस्पतीची एकतरी कुंडी आपल्या संग्रही जरूर असावी.

पानफुटी – फुलपाखरांना आकर्षित करणारी ही बहुवर्षीय वनस्पती आहे. जखमेतून होणारा रक्तस्राव थांबविण्यासाठी पानं वापरतात.

ब्राह्मी –  गोलाकार पानं असलेली पसरत जाणारी ही वेल कुंडीतही छान वाढते. ब्राह्मी ही बुद्धिवर्धक आहे. केसांच्या आरोग्यासाठी ब्राम्हीचे तेल वापरतात.

व्हिटॅमीन प्लान्ट – आपल्यासाठी ही नावीन्यपूर्ण वनस्पती आहे. एक मीटपर्यंत वाढणाऱ्या या वनस्पतीत अनेक प्रथिने, कबरेदके व खनिजे असतात. याच्या पानांचा देठासकट रोजच्या स्वयंपाकात वापर करता येतो.

गवती चहा – सर्दी पडशावर खासा उपयोग म्हणून गवती चहाचा चांगला उपयोग होतो. कुंडीत ही वनस्पती छान वाढते. मात्र तिला भरपूर ऊन हवे.

ही होती कुंडय़ातली बाग. आणखी एक प्रकारे आपण आपला व्हरांडा अथवा खिडकीच्या बाहेरील (window sin) सुशोभित करू शकतो. ती म्हणजे तरंगती बाग. वेगवेगळ्या प्रकारच्या हँगिग बास्केटमध्ये पसरणाऱ्या वेली लावून आपल्या बागेची उंची वाढवता येईल. त्यासाठी उपयुक्त वनस्पती म्हणजे मोसमी फुलझाडं जशी फ्लॉक्स, पेटुनिया, नास्टरशिअम इ. ब्राह्मीसारख्या पसरणाऱ्या वनस्पतीही तरंगत्या कुंडय़ांत छान वाढतात. तसेच मेझेमब्रांथिअम, पसरणारी घाणेरी, क्लेरोडेंड्रम अशा वेलींचा तरंगत्या बागेसाठी चांगला उपयोग करता येतो. मात्र त्यांची स्थापना त्यांच्या सूर्यप्रकाशाच्या गरजेनुसार करणे आवश्यक आहे.

परसदारी लावण्यासाठी वरील बहुतेक वनस्पतींचा आपण वापर करू शकतो. येथे जागेची उपलब्धता व्हरांडय़ापेक्षा जास्त असल्यामुळे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार जरा मोठय़ा आकाराची झाडेही आपण लावू शकतो. उदा. मोठा इक्झोरा, घाणेरी, कण्हेर. तसेच मोठय़ा औषधी वनस्पती जशा अडुळसा, निर्गुडी. एकंदरीत आपल्या बागेत लावण्यासाठी मग तो व्हरांडा असो की अंगण, वनस्पतींची निवड काळजीपूर्वक करणं हे महत्त्वाचं. मात्र कुंडय़ा असोत वा जमिनीतली लागवड झाडांची दाटी करू नये. प्रत्येक झाडाला पुरेशी जागा मिळाली तरच त्यांची वाढ चांगली होणार.

शहरात राहूनही निसर्गाशी नातं सांगणारं, झाडाझुडपांशी सुसंवाद साधणारं, वाढत्या प्रदूषणाला आळा घालून तुमच्या-आमच्या घरकुलांना घरपण देणाऱ्या या वनस्पतींवर जेवढ प्रेम करू तेवढंच हा निसर्ग आपल्याला देणार आहे जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन.
डॉ. विद्याधर ओगले – response.lokprabha@expressindia.com