आज गुंतवणूक नेमकी कशी करायची, म्हणजे तिचे भविष्यात काय काय फायदे मिळतील, कसे मिळतील याबाबत काही ठोकताळे मांडले गेले आहेत. त्यांचा आढावा-

गुंतवणूक हे एक शास्त्र मानून अभ्यासले तर त्याचे काही खूप रंजक असे आखीव ठोकताळे (थंब रुल्स) असल्याचे आपल्याला दिसून येईल. गंमत म्हणजे हे ठोकताळे स्थळ-काल आणि व्यक्तीसापेक्ष नसून सदासर्वत्र- सर्वानाच सारखेच लागू पडतात. सुयोग्य गुंतवणुकीला या ठोकताळ्यांची जोड दिल्यास व्यक्तिगत आर्थिक स्वप्नांच्या पूर्ततेचा मार्ग निश्चितच सोपा आणि सुकर होतो.

७० चा नियम – अर्थात भविष्यातील क्रयशक्तीचा अदमास.

तुम्ही केलेली गुंतवणूक ही महागाईपश्चात किती परतावा देते अर्थात तुमच्या क्रयशक्तीत वाढ किती करते, हे पाहणे सर्वात महत्त्वाचे असते. म्हणजेच महागाई वाढीचा दर जर सात टक्के आहे आणि बँकेतील ठेवीवर तुम्हाला सात टक्के दराने परतावा मिळणार असेल, तर वर्षभरापूर्वी गुंतलेले १०० रुपये हे १०७ रुपये झाले तर त्यातून तुमच्या क्रयशक्तीतील वाढ शून्यच ठरते. गुंतवणुकीवरील या महागाईचा (इन्फ्लेशन) परिणाम मोजण्याचे ‘७०चा नियम’ हा एक ठोकताळा आहे. विशेषत: निवृत्तीपश्चात नियोजनासाठी हा एक उपयुक्त निकष आहे; तथापि महागाई दर स्थिर नसतो. तो सतत बदलत असतो हेही लक्षात घ्यायला हवे.

कृती – ७० ला प्रचलित महागाई दराने भागायचे येणारी संख्या ही तुमच्याकडील पुंजीची क्रयशक्ती तितक्या वर्षांत निम्म्यावर येईल असे दर्शवेल.

उदाहरणार्थ, प्रचलित महागाई दर सात टक्के गृहीत धरू या. ७० ला सातने भागल्यास येणारे उत्तर १० आहे. त्यामुळे आजच्या १०० रुपयांचे क्रयमूल्य हे १० वर्षांनंतर ५० वर येईल.

७२ चा नियम – अर्थात दुप्पट परताव्याच्या वर्षांचे मापन.

हा नियम तुम्ही गुंतविलेला पसा किती वर्षांत दुप्पट होईल हे निश्चित करतो.

कृती – ७२ या संख्येला तुम्ही किती व्याज दर/परतावा दराने गुंतवणूक केली आहे, तिने भागल्यास येणारे उत्तर हे मुद्दल दुप्पट होण्यास लागणारी वष्रे असतील.

उदाहरणार्थ, बँकेतील ठेव योजनेत तुम्ही दहा हजार रुपये गुंतविले आणि बँकेने त्यासाठी दसादशे नऊ टक्के व्याज दर देऊ केला आहे, तर ७२ भागिले ९ = ८ असे उत्तर आहे.

तर या गुंतवणुकीतून तुमच्या गुंतलेल्या दहा हजार रुपयांचे दुप्पट म्हणजे वीस हजार रुपये व्हायला आठ वष्रे लागतील.

११४ चा नियम – गुंतवणुकीतून तिप्पट लाभाचे मापन

७२ च्या नियमाप्रमाणेच हा नियम तुम्ही गुंतविलेला पसा किती वर्षांत तिप्पट होईल हे निश्चित करण्यासाठी लागू पडतो.

कृती – ११४ या संख्येला तुम्ही किती व्याज दर/परतावा दराने गुंतवणूक केली आहे, तिने भागल्यास येणारे उत्तर हे मुद्दल तिप्पट होण्यास लागणारी वष्रे असतील.

उदाहरणार्थ, बँकेतील ठेव योजनेत तुम्ही दहा हजार रुपये गुंतविले आणि बँकेने त्यासाठी दसादशे नऊ टक्के व्याज दर देऊ केला आहे, तर ११४ भागिले नऊ = १२.६६ असे उत्तर आहे.

तर या गुंतवणुकीतून तुमच्या गुंतलेल्या दहा हजार रुपयांचे तिप्पट म्हणजे तीस हजार रुपये व्हायला साडेबारा वष्रे लागतील.

१४४ चा नियम – गुंतवणुकीतून चौपट लाभाचे मापन.

७२ च्या नियमाप्रमाणे हा नियम तुम्ही गुंतविलेला पसा किती वर्षांत चौपट होईल हे निश्चित करण्यासाठी लागू पडतो.

कृती – १४४ या संख्येला तुम्ही किती व्याज दर/परतावा दराने गुंतवणूक केली आहे, तिने भागल्यास येणारे उत्तर हे मुद्दल चौपट होण्यास लागणारी वष्रे असतील.

उदाहरणार्थ, बँकेतील ठेव योजनेत तुम्ही दहा हजार रुपये गुंतविले आणि बँकेने त्यासाठी दसादशे नऊ टक्के व्याज दर देऊ केला आहे, तर १४४ भागिले ९ = १६ असे उत्तर आहे.

तर या गुंतवणुकीतून तुमच्या गुंतलेल्या १० हजार रुपयांचे चौपट म्हणजे ४० हजार रुपये व्हायला १६ वष्रे लागतील.

१०० वजा वय वर्षांचा नियम

समभागसंलग्न गुंतवणूक ही जरी तुलनेने सर्वाधिक लाभ देणारी असली तरी ती खूप जोखमेचीही असते. त्यामुळे फारशा जबाबदाऱ्या खांद्यावर नसताना कमावत्या तरुणांनी आपल्या कमाईचा मोठा हिस्सा हा समभागसंलग्न गुंतवणुकीत राखायला हवा, असे वित्तीय सल्लागारांचे सांगणे आहे. वयोपरत्वे किती प्रमाणात जोखीमयुक्त समभाग गुंतवणूक कमी करून, ती भविष्यनिर्वाह निधी, एनपीएस, कंपनी ठेवी, बँक ठेवी, रोखे, डेट म्युच्युअल फंडाकडे वळवावी, असा ठोकताळा या नियमाने रचला आहे.

कृती – १०० वजा तुमचे विद्यमान वय = येणारी संख्या जी असेल तितक्या प्रमाणात तुमची खर्च वजा मिळकत ही समभागसंलग्न पर्याय म्हणजे शेअर बाजार अथवा इक्विटी म्युच्युअल फंडात हवी.

उदाहरणार्थ, तुमचे वय सध्या ३० असल्यास, कमाईचा ७० टक्के हिस्सा हा समभागांमध्ये असावा, तुम्ही साठी गाठाल तेव्हा उलट करून कमाईचा ४० टक्के हिस्सा हा स्थिर उत्पन्न पर्यायात असायला हवा.

चार टक्के विथड्रॉवल नियम

अलीकडे माणसाचे आयुर्मान चांगलेच सुधारले आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर सरासरी २७ वर्षांचे आयुष्य माणूस जगेल असा एक अंदाज आहे. दरमहा हाती पडणारे वेतन बंद झाले असताना, या २७ वर्षांसाठी म्हणजे तहहयात पुरेल यासाठी किती रक्कम दरमहा तुम्हाला काढता येईल, याचे गणित या ठोकताळ्यातून केले जाते.

उदाहरणार्थ, निवृत्तिपश्चात जीवनाची तजवीज म्हणून तुम्ही एक कोटी रुपये सर्व स्रोतातून उभे केले आहेत असे मानू या.

जर ही रक्कम दरसाल सात टक्के परतावा देणाऱ्या पर्यायात (ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्टाच्या योजना वगरे) गुंतविली गेली असेल आणि वार्षकि महागाई दरातील वाढही सरासरी सात टक्के असेल असे मानू या. तर एक कोटी रुपयांचे चार टक्के अर्थात ३३ हजार रुपये हे तुम्ही दरमहा या गुंतवणुकीतून स्व-खर्चासाठी काढावेत, असे हा नियम सांगतो.

अर्थात गुंतवणुकीचा परतावा दर व महागाई दरातील चढ-उतार मुभा दिलेल्या वष्रे कमी-जास्त करू शकतील.

तुमची श्रीमंती किती?

तुमचे विद्यमान वय गुणिले करपूर्व एकूण मिळकत भागिले वीस = तुमची नक्त मत्ता अर्थात श्रीमंती दर्शवील.

या नियमामागील तर्क असा की, जितके तुमचे वयोमान वाढत जाईल तितक्या प्रमाणात तुमच्या नक्त मत्तेतही वाढ व्हायला हवी. वाढत्या जबाबदाऱ्यांनुरूप ते गरजेचेही आहे. तसे घडत नसेल तर तुम्ही निवडलेला रोजगार अथवा करिअरचा मार्ग याबाबत तुम्ही फेरविचार करण्याची गरज असल्याचे संकेत देईल.

उदाहरणार्थ, तुमचे वय ३५ वष्रे आहे आणि वार्षकि उत्पन्न हे सहा लाख रुपये असेल तर तुमची नक्त मत्ता ही १० लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत मानले जाल.

(हा मूळ नियम अमेरिकी लक्षाधीशांना नजरेसमोर ठेवून थॉमस जे स्टॅन्ली आणि विल्यम जे, डान्को या विद्वत द्वयींनी पुढे आणला. भारतातील दरडोई उत्पन्नाचे प्रमाण आणि महागाई दर लक्षात घेता, त्यांनी वापरात आणलेल्या दहा विभाजकाऐवजी भारतासाठी आपण १० हा विभाजक गृहीत धरला आहे. किंबहुना नव्याने नोकरीला लागल्यापासून वय वष्रे ३० पर्यंत हा विभाजक २५ असा गृहीत धरायला हवा.)
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com