‘दंगल’ सिनेमाच्या शेवटी गीता सुवर्णपदक जिंकते तेव्हा राष्ट्रगीत वाजवलं जातं आणि त्याक्षणी संपूर्ण चित्रपटगृह उठून उभं राहिलं असं चित्र बहुतेक चित्रपटगृहांमध्ये दिसत होतं. त्यापलीकडे आपण देशाबद्दल काय विचार करतो?

२६ जानेवारी १९५०, आपला देश हा एक ‘प्रजासत्ताक राष्ट्र’ म्हणून उदयाला आला. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं हित पाहणारं लोकशाही राष्ट्र! आपलं संविधान आपण जनतेला अर्पण केलं. त्या दिवसापासून आपण स्वत:ला अनेक मूलभूत हक्क बहाल केले आणि त्याचबरोबर काही मूलभूत कर्तव्यही आपल्याकडून पाळली जावीत याची अपेक्षा केली गेली. हक्क आपल्या लगेच अंगवळणी पडले आणि कर्तव्य मात्र सोयीस्करपणे नजरेआड केली. ‘भारत माझा देश आहे’ या ओळीने सुरू होणारी प्रतिज्ञा फक्त शाळेपुरती मर्यादित राहिली. तेव्हा अर्थ समजतच नव्हता म्हणून आणि अर्थ समजायला लागल्यावर तो आपल्या पचनी पडणारा नाही म्हणून आपण पाठांतर केलेली प्रतिज्ञा विसरूनही गेलो. ६६व्या वर्षांत पदार्पण करणारा भारत देश आता वयानुसार प्रगल्भ प्रजासत्ताक व्हायला हवा आणि जे आपल्यासारख्या तरुणांच्याच हातात आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करतोय का? ही आपली जबाबदारी आहे हे आपल्याला जाणवतंय का?

प्रत्येक जण व्यक्तिस्वातंत्र्याच्या मोठमोठय़ा गप्पा मारतो. मात्र हे व्यक्तिस्वातंत्र्य कोणी दिलं आपल्याला? आपल्या राज्यघटनेने! ‘भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते’ याचं उत्तर शाळेतल्या ‘एका वाक्यात उत्तरे लिहा’ या प्रश्नाच्या पलीकडे कधी पोहोचलंच नाही. आपल्याला दिलेल्या सगळ्या हक्कांचे जनक जे होते त्यांना आपण ‘ओळखत’ नाही, त्यांना आपण कधी ‘वाचलं’ नाही की ‘समजून’ घेतलं नाही. सगळ्या देशांची संविधानं एकत्र करून भारताचं संविधान बनवलं, यात त्यांनी महान काय केलं, असा उलट प्रश्न आपण विचारतो. मग सगळ्या देशांची संविधानं वाचून, अभ्यासून आणि त्यांचं पृथक्करण करून आपण प्रयोग म्हणूनही कधी एक शोधनिबंधही लिहायचा प्रयत्न केला नाही. शाळेच्या पुस्तकात दिलेली, कधीकाळी वाचून पाठ करवून घेतलेली म्हणून संविधानाची प्रस्तावना तरी आपल्यातल्या काही टक्के तरुणांनी वाचली असेल. मात्र ‘कोण ते एवढं वाचणार’ म्हणून आपण राज्यघटनेबद्दल साधं ‘गुगल सर्च’ही कधी केलं नाही. ज्या घटनेत मुळात काय काय लिहिलंय हेच आपल्याला माहीत नाही त्या मूल्यांचा अंगीकार आपण कसा करणार?

मात्र जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय येतो तेव्हा आपल्याला लगेच ‘घटनेने आम्हांला बोलण्याचा अधिकार दिलाय’ हे आठवतं. त्या वेळी आपल्याला राज्यघटनेतला ‘र’सुद्धा माहिती नाही हे आपण सहजपणे विसरून जातो. मुळात राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिला आहे की हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून आपल्यातल्या गरसमजांना सुरुवात होते. आपल्या संविधानाने दिलेल्या हक्कांना आपण अगदी सहजपणे गृहीत धरतो. ‘मी बोलले तर काय झालं, मला बोलायचा अधिकार नाही का?’ असे प्रश्न आपण अगदी सहजपणे विचारतो. मात्र त्याच वेळी हा जो अधिकार आहे तो आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिला आहे हे विसरून जाऊन ‘मी एक व्यक्ती आहे, म्हणजे मला बोलायचा आणि व्यक्त  व्हायचा अधिकार आहेच’ हे गृहीत धरून चालतो. पण आपण ज्या देशात जन्माला आलो आहोत त्या देशाने आपल्याला हा बोलण्याचा अधिकार दिला आहे. जर आपल्याला घटनेने हे व्यक्तिस्वातंत्र्य दिलंच नसतं तर यातला एकही शब्द आपण उच्चारू शकलो नसतो. आपल्या सरकारविषयी काही टीका करायची असेल तरीही आपल्याला बोलण्याची परवानगी आहे ती केवळ आपल्या राज्यघटनेमुळे! कुठेही वास्तव्य करण्याचं, कोणताही धर्म पाळण्याचं, कोणतेही कपडे घालण्याचं स्वातंत्र्य मिळणं ही एक बहुमोल गोष्ट आहे जी सर्व देशांतल्या सर्व लोकांना मिळत नाही. आपल्या देशात सर्व कर्तव्य ही जरी सज्ञान नागरिक झाल्यानंतर म्हणजेच १८ वर्षे वयाचे झाल्यानंतर लागू होत असली तरीही हक्क मात्र ‘मूलभूत’ म्हणून आपल्याला जन्मापासून मिळत आलेले असतात आणि ते आपण मनसोक्त गाजवतही असतो. हक्कांचा उपभोग न कळत्या वयापासून आपण घेत आलेलो असतो, मात्र १८ वर्षांचे नाही म्हणून आपण कर्तव्य तेवढी बेमालूमपणे टाळून मोकळे होतो.

आपल्या राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रध्वजाचा मान राखावा इतक्या साध्या कर्तव्यापासून आपली नाकं मुरडायला सुरुवात होते. चित्रपटगृहात चित्रपट सुरू  होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवलं जावं हा नियम करावा लागला, त्याविरुद्धही चर्चा आणि वादविवाद झाले आणि आपण तरुणांनी त्यात काही भूमिकाच घेतली नाही. हे सगळं राजकीय आहे म्हणून आपण त्याकडे सरळ दुर्लक्ष केलं. चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावायची सक्ती करावी लागणं हीच मुळात नामुष्कीची गोष्ट आहे. ज्या वेळी ही सक्ती नव्हती आणि हा एक उपक्रम म्हणून सुरू केला गेला होता त्या वेळी सगळ्यांनी प्रथमत: त्याचं स्वागत केलं, कौतुक केलं. मात्र हे प्रत्येक सिनेमाच्या वेळी लावलं जायला लागलं तेव्हा प्रत्येक वेळी ५२ सेकंद उभं राहण्याचा आपल्याला त्रास व्हायला लागला. म्हणून हळूहळू चित्रपटगृहांनी राष्ट्रगीत लावणं बंद केलं आणि मग मात्र शासनाला त्याची सक्ती करावी लागली. ‘दंगल’ सिनेमाच्या शेवटी गीता मेडल जिंकल्यानंतर वाजवल्या जाणाऱ्या राष्ट्रगीताला संपूर्ण चित्रपटगृह उठून उभं राहिलं ही जितकी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे तितकीच विचार करण्याची पण घटना आहे. देशाने आपल्याला अभिमानास्पद काही दिल्यानंतरच आपण देशाला सन्मान देणार आहोत का? आंतरिक ऊर्मीने आपण स्वत:हून उठून उभे राहावं अशा वेळा देशातल्या कोणी तरी काही तरी उंची करून दाखवल्यावरच का याव्यात?

आपला नेहमीचा आवडता आणि व्यवहार्य म्हणवला जाणारा प्रश्न म्हणजे ‘देशाने मला काय दिलं तर मी देशासाठी काही करावं?’ मग देशाने मला काय दिलं याचं उत्तर म्हणून सगळ्या समस्या स्वत:लाच सांगून आपण ‘देशाने माझ्यासाठी काहीच केलं नाही’ हा निष्कर्ष आपण स्वत:च काढून मोकळे होतो. मुळात देशाने मला काय दिलं याआधी मी देशाला काय दिलं, हा प्रश्न आपल्यातल्या प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. देश ही कोणी व्यक्ती नाही जी आपल्याला काही देईल आणि तिला आपण तिच्या देण्याची परतफेड म्हणून काही देऊ. देश हे एक सर्वसमावेशक व्यक्तित्व आहे ज्यात सर्व यंत्रणा, सरकार आणि जनता अंतर्भूत आहेत. देश आपल्याला तेव्हाच काही देईल जेव्हा आपण त्याच्यासाठी मनापासून काही करू. देशाच्या प्रगतीसाठी आणि सुधारणेसाठी जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हाच देश आपल्याला सुधारणा देऊ शकेल. एका एका पेशीने मिळून संपूर्ण शरीर बनतं तसाच एका एका व्यक्तीने मिळून देश बनतो. जर शरीरातल्या प्रत्येक पेशीने विचार केला की हे शरीर मला काय देतंय म्हणून मी त्याला काही देऊ, तर आपल्या शरीरातली एक एक पेशी हळूहळू काम करणं बंद करेल आणि परिणामत: आपलं संपूर्ण शरीर निकामी होईल. जसं शरीराचं तसंच देशाचं! आपण प्रत्येकाने जर ‘मला देशाने काय दिलं’ हा प्रश्न विचारत काम करणं थांबवलं तर हळूहळू देश नक्कीच पिछाडीवर जाईल आणि ज्याचा दोष पुन्हा आपण सरकार आणि यंत्रणेला देऊन ‘जनता’ म्हणून सहज जबाबदारी टाळून मोकळे होऊ.

आपल्या आत्ताच्या वयात देश, राष्ट्र, प्रजासत्ताक, लोकशाही वगरे वगरे विचार करायचा आपल्याला एका क्षणी कंटाळा येतो. मग आपण ‘काही कोणाला स्वातंत्र्य देऊन उपयोग नाही, यांना चाबूकच पाहिजे तरच यंत्रणा सुधारेल’ असं म्हणून हुकूमशाहीचे स्वाभाविक पुरस्कत्रे बनतो. काही काळानंतर ‘हिटलर’ आणि भारतातली ‘आणीबाणी’ वाचून आणि समजून झाली की मग आपल्याला आपल्या प्रजासत्ताक लोकशाहीचं महत्त्व कळायला लागतं. भारत हा जगातील सर्वात मोठं प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र आहे ही गोष्ट आपल्याला अचानक जाणवते. देशाचा विस्तारित भूभाग, प्राचीन काळापासून चालत आलेली सांस्कृतिक विविधता आणि संपन्नता या सगळ्या गोष्टी आपल्याला जर जपायच्या असतील तर ‘माझे फॉरेनला सेटल व्हायचे प्लॅन्स आहेत’ हे गर्वाने न सांगता ‘भारत माझा देश आहे’ आणि ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ ही प्रतिज्ञेतली विस्मरणात गेलेली वाक्यं पुन्हा शाळेसारख्याच जोमाने उच्चारायची गरज आहे. भारताला ‘देशा’पासून ‘राष्ट्रा’कडे न्यायचं असेल तर त्या प्रवासाची जबाबदारी आपल्यासारख्या तरुणांच्या खांद्यावर आहे हे विसरून चालणार नाही.

भारताकडे सारं जग भविष्यातील महासत्ता म्हणून बघत असताना आपल्या देशाला त्या स्थानी नेऊन ठेवायचं काम आपलं आहे आणि ते आपलं मूलभूत कर्तव्य आहे, मूलभूत हक्कांसारखंच!
वेदवती चिपळूणकर – response.lokprabha@expressindia.com