nitmनुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टमध्ये देश-विदेशातील अडीच हजार पर्यटन व्यावसायिकांनी हजेरी लावली होती. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या मार्टमध्ये एमटीडीसीचा वावर अत्यंत व्यावसायिक होता.

साधारण आठ-दहा वर्षांपूर्वीची घटना असेल. मुंबईतल्या नॅशनल एक्झिबिशन सेंटरमध्ये पर्यटनावरचे एक भव्य प्रदर्शन सुरू होते. देशभरातूनच नाहीतर जगभरातील टूर ऑपरेटर्सचा, अनेक देशांच्या पर्यटन विकास महामंडळांचा त्यामध्ये सहभाग होता. आपला देश किती नयनरम्य आहे, पर्यटनाच्या किती विविध संधी आमच्याकडे उपलब्ध आहेत, हे सांगायचा प्रत्येकाचा अक्षरश: आटापिटा सुरू होता. अत्यंत कलात्मक पद्धतीने सजवलेल्या स्टॉल्सवर अत्यंत नम्र भाषेत आपल्या देशाचं कौतुक सांगणाऱ्या प्रतिनिधीची लगबग सुरू होती. इतकेच नाही तर देशातल्याच केरळ, गुजरात, राजस्थान या राज्यांची उपस्थितीदेखील अशीच नजरेत भरणारी. कलात्मकतेच्या जोडीला एक व्यावसायिक आक्रमकतादेखील होती. जम्मू-काश्मीर पर्यटन विकास महामंडळाने तर त्यांच्या राज्यातील यच्चयावत टूर ऑपरेटर्सना एकत्र आणून प्रत्येकाला जागा दिली होती. आणि या सर्व नयनरम्य सोहळ्यात कलात्मकतेचे आणि व्यावसायिकतेचेदेखील दारिद्रय़ दाखवणारा स्टॉल होता तो महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचा.

एक दहा बाय पाच फुटांचा छोटा स्टॉल. तीन बाजूंना रंग उडालेले बॅनर. टेबलावर पाच-पन्नास माहितीपत्रकांचा ढीग आणि येथे बसायचे म्हणजे शिक्षाच असल्याप्रमाणे कंटाळवाण्या चेहऱ्याचे दोन तद्दन सरकारी कर्मचारी. पर्यटकांशी कसलेही देणेघेणे नसणारे. आपल्या राज्यात स्वर्गीय अशा निसर्गरम्य पर्यटनस्थळांची कशी खाण आहे, कोकणचा कॅलिफोर्निया कसा होऊ शकतो, बौद्ध लेणींचा प्राचीन वारसा कसा आहे, सह्य़ाद्रीच्या अतिप्राचीन डोंगररांगेत अनगड जागी वसलेले आपले किल्ले कसे राष्ट्रीय वारसा आहे ही व अशी सारी वर्णने म्हणजे टाळ्या मिळवण्यासाठीच असतात आणि पर्यटन व्यवसायाबाबत आपले धोरण हे असे कर्मदरिद्री असते हे ठळकपणे अधोरेखित करणारी ही घटना.

पण गेल्या आठवडय़ातल्या एका घटनेने मात्र महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने चक्क १८० अंशात वळण घेतल्याचे दिसून येत आहे. ती घटना म्हणजे नुकताच झालेला ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’. बी टू बी अर्थात बिझनेस टू बिझनेस, म्हणजेच एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकासाठी स्वत:च्या उत्पादनाचे केलेले प्रदर्शन. आमच्याकडे अमुकअमुक आहे, ते किती चांगले आहे, तुमच्यासाठीच तयार केलेले आहे आणि तुम्ही हे खरेदी करा, अशी थेट व्यावसायिक साद यामध्ये घातली जाते. मराठी माणसाला असे काही करणे जरा जडच असते म्हणा. पण व्यवसायात उतरल्यावर हे करावे लागते. त्यामुळे आजवर केवळ  सरकारी सोपस्कार करून काहीतरी थातूरमातूर महोत्सव भरविणाऱ्या महामंडळाने प्रथमच अशा प्रकारे थेट व्यावसायिक पातळीवर काहीतरी हालचाली केल्या असे म्हणावे लागेल.

संपूर्ण व्यावसायिक पद्धतीने आयोजित केलेल्या या ट्रॅव्हल मार्टमध्ये देश-विदेशातील अडीच हजार पर्यटन व्यावसायिकांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील अनेक टूर ऑपरेटर्स, हॉटेल्स, अ‍ॅग्रो टूरिझम साइट ओनर्स यांच्याशी या पाहुण्या व्यावसायिकांच्या व्यावसायिक चर्चाचा आकडा तब्बल नऊ हजार इतका आहे. सुमारे २५० हून अधिक ट्रॅव्हल एजंट्सनी व्यावसायिक भागीदारीबद्दल सकारात्मक पावले उचलली आहेत. गणपतीपुळे, ताडोबा, तारकर्ली या ठिकाणांना अनेक पर्यटक व्यावसायिकांची पसंती होती. तर मालवण किनारच्या स्कुबा डायव्हिंगसाठी ६० पर्यटक व्यावसायिकांनी आपल्या टूर्सची नोंददेखील केली आहे. त्यापैकी २० ऑपरेटर्स हे परदेशातील आहेत हे विशेष.

अर्थात, हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे आकडेवारीपेक्षा एक प्रयत्न म्हणून हा उपक्रम महत्त्वाचा वाटतो. ट्रॅव्हल मार्टच्या निमित्ताने आलेल्या देश-विदेशातल्या पर्यटनव्यावसायिकांशी बोलताना हे हमखास जाणवते. अशा प्रकारचे ट्रॅव्हल मार्ट हे काही या व्यावसायिकांसाठी नवीन नाहीत. पण यापूर्वी कधीच महाराष्ट्राबाबत असे घडले नसल्याचे अनेकांनी नमूद केले. पोलंडच्या लक्झरी ट्रॅव्हल्सचे अन्ड्रय़ू सांगतात की, माझे पर्यटक मुंबईत यायचे आणि गोव्याला जायचे. पण त्यापलीकडे महाराष्ट्रातदेखील अन्य पर्यटनस्थळे आहेत हे मात्र आजच कळले.

ट्रॅव्हल मार्टमधील व्यवसायाबरोबरच एकूणच आयोजनाबाबतीतल्या आतिथ्यशीलतेने ‘नो न्यूज नो शूज’ या इंग्लंडस्थित पर्यटन कंपनीचे संचालक फिलिप अ‍ॅल्ड्रीज हे खूपच भारावून गेले होते. इतर ट्रॅव्हल मार्टपेक्षा याठिकाणी नावीन्य दिसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे माजी अध्यक्ष विजय ठाकूर यांनी ट्रॅव्हल मार्टबद्दल टिप्पणी करताना सांगितले की, एमटीडीसीने उचलेले पाऊल नक्कीच चांगले आहे, पण बदल एका दिवसात होणार नाही. असा प्रयत्नांमध्ये नियमितपणा अपेक्षित आहे. तेव्हा कोठे व्यापक परिणाम दिसतील. महाराष्ट्रातील अ‍ॅग्रो टुरिझमला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल महाराष्ट्रातील अग्रगण्य शेती पर्यटन व्यावसायिक पांडुरंग तावरे यांनी सांगीतले की, आपल्या ग्रामीण कलाकृतींनी अनेक व्यावसायिकांना आकर्षित केले होते. असाच अनुभव वाशिम जिल्ह्य़ातील आमखेडय़ाचे अविनाश जोगदंड यांनीदेखील सांगीतला आहे.

अर्थातच, हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे यात काही त्रुटी नक्कीच राहिल्या आहेत. पर्यटनस्थळांची आणखीन विस्तृत माहिती अनेक व्यावसायिकांना अपेक्षित होती. त्याऐवजी मार्टमध्ये हॉटेल्सवर भर दिला गेला असे त्यांचे म्हणणे आहे. तर महाराष्ट्राने हे करायला खूपच उशीर केला, असेदेखील अनेकांना वाटते. तसेच हा उपक्रम आणखीन व्यापक स्तरावर पर्यटन व्यावसायिकांपर्यत पोहचला नाही असे सांगणारेदेखील अनेक आहेत. अर्थात, हे सारे कमीजास्ती होतच राहणार आहे, पण मुद्दा आहे तो दृष्टिकोनाचा. हा एक व्यवसाय आहे. तो थेट मार्केटमध्ये उतरून धडाडीने करायचा असतो. ही जाणीव होणे गरजेचे होते. एमटीडीसीचे संचालक पराग जैन नैनौटिया यांच्याशी बोलताना त्याचे थेट प्रत्यंतर येते. व्यवसाय करण्यासाठी लागणारा जो एक अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन असावा लागतो तो त्यांच्याकडे अगदी ठासून भरला आहे. पर्यटन खात्याच्या प्रधान सचिव वलसा नायर यांनी ज्या कल्पकतेने हे सारे जुळवून आणले त्याला नक्कीच दाद दिली पाहिजे. अर्थात, हे सारे राजकीय इच्छाशक्तीवरदेखील अवलंबून असते, आणि ती इच्छाशक्ती मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. फक्त हे सारे करताना पुढील वर्षभरात पर्यटनस्थळांवरील मूलभूत सोयीसुविधांबाबतदेखील जरा अधिक व्यावसायिकता येईल याची काळजी घेतली तर २०१७ सालापर्यंत हे सारे प्रयत्न फलद्रूप होतील.

थोडक्यात काय, तर उशिरा का होईना आपल्या राज्याच्या पर्यटनाला जरा बरे रुपडे येईल अशी अपेक्षा आता तरी बाळगता येईल. असे म्हणतात की, बोलणाऱ्याची मातीदेखील विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे सोनेदेखील पडून राहते. महाराष्ट्राच्या पर्यटनाची आजवरची अवस्था ही सोन्याची खाण असूनदेखील चकार शब्द न बोलणाऱ्या व्यापाऱ्यासारखी होती. या ट्रॅव्हल मार्टच्या माध्यमातून हे मौन सुटले हेही नसे थोडके..

वेबसाइटही चकाचक

ट्रॅव्हल मार्टच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी काही सकारात्मक पावले उचलली आहेत. २०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पर्यटन व्यवसायात गरजेच्या अशा ७१ परवान्यांची जंत्री कमी करून ती २५ पर्यंत आणली आहे. (हे २५ परवाने एकूण सहा प्रकारच्या परवान्यांमध्ये एकत्रित केले जातील.) नूतनीकरण केलेली एमटीडीसीची वेबसाइट ही आणखीन सकारात्मक घटना म्हणावी लागेल. वेबसाइटवरच्या माहितीचा विस्तार करण्यास वाव असला तरी एकंदरीतच हा लुक पर्यटकाला लुभावणारा आहे. पूर्वीपेक्षा तर कैकपटीने चांगला. ‘महा-एक्सप्लोरर’ हे मोबाइल अ‍ॅप म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर स्वीकारणार चांगले लक्षण म्हणावे लागेल.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com @joshisuhas2