इंटरनेटने आपल्या सगळ्यांच्याच जीवनात कमालीचे वेगवान बदल घडवून आणले आहेत. या बदलांना आपण सरावत असतानाच आता आलंय इंटरनेट ऑफ थिंग्ज.. सकलचराचरसंवादु साधणारं  आयओटी हे तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं उद्याचं वास्तव आहे!

माधवला मीटिंगला जायला उशीर झाला होता. त्याने घाईघाईने घराचं दार ओढून घेतलं. पण अंगचं कुलूप हटून बसलं. शिट्टी वाजवायला लागलं. दार बंद होऊच देईना. त्या शिट्टीला प्रत्युत्तर म्हणून बेडरूममधून शीळ वाजली आणि उलगडा झाला. सडाफटिंग माधवच्या घराची एकमेव किल्ली बेडरूमच्या कपाटात राहून गेली होती! किल्ली-कुलपाने संवाद साधून घोळ टाळला होता!

एकाकी रस्त्यावर मोटरसायकल कलंडून तिच्यावरचा स्वार रस्त्याच्या मध्यावर फेकला गेला होता. त्याला शुद्ध नव्हती. त्याची हालचाल दहा सेकंद बंद राहिल्याचं पाहून त्याच्या हेल्मेटने मोबाइलशी आणि मोटरसायकलशी संवाद साधला. मोबाइलने अ‍ॅम्ब्युलन्सला आणि पोलिसांना कळवलं. मोटरसायकलने  येणाऱ्या मागच्या गाडय़ांना सावधगिरीचा इशारा दिला. त्या गाडय़ा बाजूने पुढे जाऊन मदतीसाठी थांबल्या. अनर्थ टळला. पोलीस आणि अ‍ॅम्ब्युलन्सही तातडीने येऊन पोचले. वेळच्या वेळी मदत मिळाली.

मोना ऑफिसात असताना घरी तिच्या मुलांची मित्रमंडळी जमली. फ्रिजमधलं दूध कॉफीसाठी संपून गेलं. फ्रिजने सुपरमार्केटाच्या फ्रिजला निरोप पाठवला. नंतर मोना सुपरमार्केटात गेलेली असताना फ्रिजने तिच्या मोबाइलवर तर संदेश दिलाच पण तिच्या ट्रॉलीलाही खूण केली. सुपरमार्केटच्या फ्रिजपाशी येताच ट्रॉलीचा लाल दिवा लागला. या खुणा मोनाच्या लक्षात येऊन तिथल्या तिथे आवश्यक दूध खरेदी झाली.

आजवर अशा गोष्टी फक्त अ‍ॅसिमॉव्हच्या विज्ञानरंजक कथांत घडत होत्या. आता त्या वास्तवाच्या दाराशी येऊन ठेपल्या आहेत. यंत्रांना, वस्तूंना किंवा पृथ्वीवरच्या कुठल्याही चर-अचर गोष्टींना एकमेकींशी संगणकी संवाद साधणं शक्य होतं आहे. पुढच्या दशकभरात चराचरांमधल्या संवादांच्या त्या आंतरजालाचं साऱ्या पृथ्वीला अंगभर पांघरूण होईल.

हा संवाद कसा साधला जातो?

कुठल्याही वस्तूमध्ये एक छोटीशी संगणकाची चिप बसवली आणि त्या वस्तूची माहिती गोळा करून ती दुसऱ्या संगणकांना पाठवायची कुवत त्या चिपमध्ये निर्माण केली की त्या वस्तूकडून दुसऱ्या संगणकांना किंवा आंतरजालाला तसे माहितीपर संदेश पाठवणं शक्य होतं. पण संदेश कुणाकडून, कुठून आला ते त्या संगणकांना समजायला हवं. त्यासाठी पत्रावर नाव-पत्ता हवा. त्या वस्तूला आंतरजालाच्या दुनियेत स्वत:चं स्थान किंवा नावगाव हवं. म्हणजेच त्या वस्तूला स्वत:चा इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस असायला हवा. आतापर्यंत तसे पुरेसे आयपी पत्ते उपलब्ध नव्हते. संशोधकांनी आयपीव्हीसिक्स (IPv6) हे नव्या प्रकारचे पत्ते शोधून काढले आणि पृथ्वीवरच्या कणान्कणाला स्वत:चा हक्काचा नाव-पत्ता मिळू शकेल याची नििश्चती झाली. वस्तू, प्राणी-पक्षी, माणसं यांच्यात तशा स्वत:च्या हक्काची ओळख असलेल्या चिमुकल्या संगणक-चिपा बसवल्या आणि त्या चिपांना माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय हवं तेव्हा हव्या त्या माहितीची आंतरजालाशी देवाणघेवाण करता आली की सकलचराचरसंवादू साधतो. तो घडवून आणणाऱ्या चतुरचराचर जालालाच म्हणतात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ऊर्फ ‘आयओटी’.

तशी ‘जालीम’ ओळख कमावलेली चतुर चिप ज्या वस्तूत असते त्या वस्तूला ‘स्मार्ट वस्तू’ म्हणतात. तशा स्मार्ट वस्तू एकमेकींना किंवा मालकाला संदेश पाठवतात. स्मार्ट गाडी बिघडली की तिच्या इंजिनाचा आवाज मोबाइलवरून ऐकून कारखान्यातलं मशीन नादुरुस्तीचं निदान करतं. तशा काही गाडय़ा सध्या भारतातल्या रस्त्यांवरून धावताहेत. अमेरिकेतल्या एका कंपनीतलं तसलं एक निदानकारी मशीन अनेक गाडय़ांच्या कामावर एका वेळी नजर ठेवतं आणि त्यांच्यात नुसती दुरुस्तीच नव्हे तर नवनव्या सुधारणाही करतं.

एकाच वेळी अनेक वस्तूंतल्या संगणक-चिपाही एकमेकींशी तसं संगनमत करू शकतात. तसा संवाद रोजच्या, साध्या कामांतही अनेक ठिकाणी साधता येईल.

माणूस खोलीत शिरला हे स्मार्ट भिंतींना कळतं. त्या ते पंख्याला सांगतात. स्मार्ट पंखा सुरू होतो. खोलीतला तापमापक आणि आद्र्रतामापक पंख्याची त्या वेळची योग्य गती ठरवतात. काही दिवसांनी फझी लॉजिकवाल्या वॉिशग मशीन्स आद्र्रतामापकाच्या सल्ल्याने कपडे कमी-जास्त पिळतील आणि फ्रिजमधून आलेला पदार्थ शिजवण्यापूर्वी मायक्रोवेव्ह ओव्हन फ्रिजचं मत घेईल. स्वयंपाकघरात फोडणीची पळी विस्तवावर धरली की तेलाच्या बाटलीचं बूच आपोआप निघेल आणि िहग-राई-जिऱ्याचे डबे क्रमाने हवी तेव्हा झाकणं उघडून देतील.

शेतात नांगरटीच्या वेळी खत घालणाऱ्या यंत्राशी आणि पेरणीच्या तिफणीशी फाळाने दोस्ती केली की खत बरोबर हवं तितकंच खोलवर, हव्या तेवढय़ाच अंतरावर घातलं जाईल आणि बियाणंही नेमकं त्या खतमिश्रित पोषक मातीतच रोवलं जाईल.

संगणकी संगनमत अनेक स्तरांवर काम करू शकतं. पहिला स्तर निरीक्षणाचा. पेट्रोलियम प्रकल्पांमध्ये रासायनिक प्रक्रियांच्या भट्टीच्या िभती स्मार्ट असतात. त्या भट्टीतला दाब, तापमान, विषारी वायूची पातळी मोजत असतात. ते निरीक्षण आणि नोंद सतत चालू रहाते. त्यापुढच्या स्तरावरच्या चलाख भट्टीला त्या निरीक्षणांनुसार काम करायचे आदेश दिलेले असतात. दाब ठरावीक पातळीपर्यंत वाढला की व्हॉल्व्ह उघडणं, तापमान चढलं की प्रक्रियेची गती कमी करणं, विषारी वायूचा पद्धतशीर बंदोबस्त करणं वगरे कामं भट्टी इमानेइतबारे करते. त्याहून वरच्या स्तरावरची फारच स्मार्ट असलेली भट्टी व्हाल्व्हची उघडझाप, प्रक्रियेची गती, इंधनाचा वापर वगरे साऱ्यांचं कोष्टक सतत संतुलित ठेवून कामकाज आदर्श पद्धतीने चालवते.  काही कारखान्यांचा बराचसा यांत्रिक कारभार तशा स्मार्ट यंत्रांच्या परस्पर-सुसंवादाने इतका सुरळीत आणि फायदेशीर चालतो की त्याला नाममात्र मानवी देखरेख पुरेशी होते.  यंत्रचातुर्याच्या उच्चतम स्तरावर तसा स्वायत्त कारभार चालतो. व्हॅक्युम-क्लीनरमधल्या चिपा त्याला खोलीतल्या सामानसुमानाचा अंदाज देतात. मग कान्याकोपऱ्यातला, कोचाखालचा, कपाटामागचा सगळा कचरा बिनबोभाट निघतो. डोंगरमाथ्यावरच्या पवनचक्क्यांना बसवलेल्या चतुर-चिपा चक्कीच्या प्रत्येक फेऱ्यानंतर प्रत्येक पात्याचा कलता कोन, वाऱ्याची दिशा आणि वेग यांचा अंदाज घेतात. गरजेप्रमाणे पात्याचा कोन बदलतो. त्यामुळे वाऱ्याच्या शक्तीचा सर्वोत्तम वापर केला जातो.

वीजपुरवठा-यंत्रणेचं जाळं राज्यभर पसरलेलं असतं. राज्यातल्या सगळ्याच ठिकाणी विजेची गरज एकसारखी नसते. जाळ्यात जागोजागी बसवलेले स्मार्ट मीटर्स वेगवेगळ्या ठिकाणची विजेची गरज जाणतात. विजेचं वितरण त्याप्रमाणे कमी-अधिक केलं जातं आणि जागोजागी नेमका गरजेपुरता पुरवठा केला जातो.

अशी स्वायत्त, ‘अमानुष’ यंत्रणा सर्वात मोलाची ठरते ती खाणी, भूकंपाने उद्ध्वस्त झालेली गावं, सुरुंगपीडित विभाग वगरे ठिकाणी. तिथे जाण्यात माणसाच्या जिवाला धोका असतो. पण झीनोबॉट्स ही किडय़ा-मुंगीसारखी दिसणारी आणि वावरणारी स्मार्ट यंत्रं कोसळलेल्या दरडीच्या पार, स्फोटक परिस्थितीतल्या खाणीत, दगडविटांच्या ढिगाऱ्यात जाऊन तिथल्या परिस्थितीचं वर्णन, हव्या असलेल्या मदतीची गरज आणि स्वरूप सुरक्षित ठिकाणच्या संगणकाला कळवतात. अपघाताच्या ठिकाणी अडकलेल्या माणसांच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन
झीनोबॉट्स त्यांना संगणकाच्या आज्ञेबरहुकूम आवश्यक औषधपाणी पुरवतात, त्यांना सोडवायच्या युक्त्याही शोधून काढतात.

बहुतेक वेळा माहिती गोळा करणाऱ्या चिमुकल्या, संवेदनशील चिपांना इतर काहीही करता येत नाही, पण त्यांनी पाठवलेल्या माहितीवरून इतर यंत्रांचं काम अधिकाधिक सुयोग्य बनतं. आंतरजालातल्या शक्तिमान संगणकांचं ऊर्फ परमाणुमेघा (cloud)चं पाठबळ मिळालं की ते अधिकच प्रभावी बनतं. चतुरचिपांनी पाठवलेल्या माहितीची परमाणुमेघात छाननी होते आणि तिचं वर्गीकरण केलं जातं. तिचं यंत्रांना समजेल असं ‘भाषांतर’ होतं. यंत्रांनी त्यानुसार काम केलं की माहितीचं पर्यवसान योग्य कार्यात होतं.

आंतरजालाची किमया

तशा माहितीमुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामी, पूर वगरेंच्या धोक्याची ई-घंटा आंतरजालात सर्वत्र, दुर्घटनेच्या बरीच आधीपासून घणघणायला लागते. हवामानाचा अधिक बिनचूक अंदाजही वेळच्या वेळी योग्य जागी कळवता येतो. प्राणहानी, वित्तहानी टळते.

रस्त्यावरच्या अपघातापासून औद्योगिक क्षेत्रातल्या हाहा:कारापर्यंतच्या सगळ्या दुर्घटनांत मुख्य वाटा असतो तो माणसाच्या घोडचुकांचा. आखून दिलेल्या नेहमीच्या कामांत यंत्रं सहसा चुका करत नाहीत. नित्याची ठरलेली कामं यंत्रांवर सोपवता आली तर अनेक अपघात टाळता येतील.

शहरातल्या काँक्रीटच्या पुलाला सूक्ष्म भेगा पडायला लागल्या की आंतरजालाच्या क्लाउडला त्याची बित्तंबातमी पोचते आणि वेळीच डागडुजी होते. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत पुलावर चढणाऱ्या प्रत्येक गाडीच्या इंजिनाला पुलाच्या नाजूक अवस्थेचा इशारा दिला जातो आणि ड्रायव्हरची मर्जी असो-नसो, गाडी पुलावरून सावधपणे धावते.

स्मार्ट गाडय़ा शहरातल्या स्मार्ट रस्त्यांशी बोलायला लागतील तेव्हा चौकातले सिग्नल्स वाहतुकीच्या सोयीप्रमाणे बदलतील. तरीही कुठे वाहतूक-कोंडी झालीच तर दूरवरच्या गाडय़ांना ती माहिती त्या रस्त्यावर पोहोचण्यापूर्वीच कळवली जाईल. त्या गाडय़ा वाट वाकडी करून दुसरा, मोकळा रस्ता शोधून जातील. त्यासाठी दूरच्या रस्त्याने जाताना पेट्रोल संपेल हे आधीच जाणून नव्या वाटेवरचा, चालू असलेला पेट्रोलपंपही गाडीच हुडकून ठेवील.

इंग्लंडच्या मिल्टन-कीन्स भागातल्या पाìकगच्या मोकळ्या जागा आंतरजालाकडून गाडय़ांना कळवल्या जातात आणि कचऱ्याचा डबा भरल्याचा संदेश नगरपालिकेच्या विभागालाही पाठवला जातो.

प्रगत देशांतल्या काही भागांत इमारतीच्या िभतींतल्या, आतल्या सामानात बसवलेल्या चिपा इमारतीच्या आतमधलं तापमान, आद्र्रता, प्रदूषण जोखत असतात. आंतरजालाला इमारतीबाहेरचं तापमान, प्रदूषण इत्यादींची माहिती असते. त्यांची सांगड घातल्यावर खिडक्या उघडणं, पडदे ओढणं, पंखा की एअर कंडिशनर वगरे प्रश्नांची योग्य उत्तरं मिळतात. आगीचा धूर, भुरटा चोर आणि दाराशी आलेला दरोडेखोर या तिघांचीही पूर्वसूचना घरातल्यांना आधीच मिळते. जपानमधल्या गावाकडे एकटय़ा राहणाऱ्या म्हाताऱ्या आईचं घर सुरक्षित असल्याची आणि तिच्या हालचाली व्यवस्थित असल्याची ग्वाही तिच्या घराच्या स्मार्ट िभती तिच्या अमेरिकेतल्या मुलाच्या मोबाइलला देतात.

नव्या फॅशनचं एक मनगटी घडय़ाळ हृदयाचे ठोके मोजतं. बुटातल्या चिपा पादाक्रान्त केलेले मल आणि त्यासाठी खर्चलेल्या कॅलरीज मोजतात. त्या दोघांनी एकत्र घेतलेला निर्णय रोजच्या चालण्याच्या अंतराची-वेगाची मर्यादा ठरवतो.

भविष्यातल्या हॉस्पिटलात कुठेही झालेली विवक्षित जंतूंची लागण चतुरचिपाच हुडकून काढतील. चराचरजालाला भोवतालच्या भागातल्या आजारांची इत्थंभूत माहिती असल्यामुळे हॉस्पिटलातल्या खाटांची आदर्श संख्या, फार्मसीत भरून ठेवायची औषधं, आजार आटोक्यात राहावे म्हणून घ्यायची दक्षता वगरे योग्य निर्णय चतुरजालच घेईल.

ते चतुरजाल पर्यावरणाचीही काळजी वाहील. ब्राझीलमध्ये अमेझॉन जंगलातल्या मोठय़ा वृक्षांच्या बुंध्यात चतुरचिपा बसवल्या होत्या. लाकूडचोरांनी झाडं पाडायला सुरुवात करताच झाडांनी पोलीस-स्टेशनांना निरोप पाठवला. विक्रीला पोहोचलेल्या लाकडांनीही चोरीची चतुरचुगली केली.

२०१४ मध्ये भारत सरकारने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (IoT) विषयीचं पहिलं धोरण मांडलं. त्यानुसार २०२० सालापर्यंत भारतात चतुरचराचरजालामुळे १५०० कोटी रुपयांची उलाढाल झालेली असेल, असा तर्क आहे. खासगी आणि सरकारी क्षेत्रात त्या दृष्टीने पावलं टाकली जाताहेत. एका भारतीय मोटार कंपनीच्या ट्रक्समध्ये चतुरचिपा बसवल्या आहेत. ज्या वाहतूक-कंपन्यांकडे तशा ट्रक्सचा मोठा ताफा असतो त्यांना ट्रक्सच्या नादुरुस्तीची माहिती ते बंद पडण्यापूर्वी तर मिळतेच पण ट्रकचा गरवापर, डीझेलची चोरी वगरेंचीही बित्तंबातमी पोहोचते.

भारतातल्याच एका कंपनीने बनवलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या स्मार्ट तिजोऱ्या घरफोडी होत असल्याचा बोभाटा आंतरजालाच्या चव्हाटय़ावर करतात. त्याच कंपनीची इशारा यंत्रणा घरात कुणी तरी शिरल्याचा सुगावा लागला की तत्काळ मालकाच्या मोबाइलवर खबर पाठवते.

खाणीतून निघणाऱ्या लोखंडाच्या खनिजाची तस्करी रोखायला गोव्याच्या आणि कर्नाटकाच्या राज्य सरकारांनी दुसऱ्या एका भारतीय कंपनीचेच स्मार्ट ट्रक्स घेतले आहेत. ते खनिजाच्या प्रवासाच्या वाटेची आणि त्यातून बेकायदेशीरपणे फुटलेल्या चोरवाटांचीही तपशीलवार माहिती सरकारला पुरवतात.

तोटे कोणते?

माहितीचा पर्वत गोळा करून तो सर्वाना सारखाच उपलब्ध करून देणं हा चतुर चराचरजालाचा सर्वात मोठा गुण हाच त्याचा सर्वात मोठा दोषही आहे.  ‘अगंबाई, अरेच्चा’ चित्रपटातल्या नायकाला समस्त स्त्रीवर्गाची मनोगतं ऐकू यायला लागली आणि मोठा गोंधळ उडाला. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे तर समस्त चराचरजगताच्या मनोगतांचा आंतरजालावर भडिमार होईल. कोलाहल माजेल. रोज नव्याने डोंगरभर भर पडणाऱ्या माहितीचं नियमितपणे विश्लेषण करायला, ती सार्थकी लावायला अत्यंत सामथ्र्यवान संगणकांची गरज असते. तशा संगणकांची सध्या जगात उणीव आहे. ती लवकर भरून काढली नाही तर ती माहिती आणि तिच्यामागचा खर्च आणि कष्ट वाया जातील.

घरोघरी संगणकातच नव्हे तर मिक्सर-मायक्रोवेव्हमध्ये स्थानापन्न झालेल्या चुगलखोर चिपा घरातली सगळी गुपितं आंतरजालाच्या चव्हाटय़ावर उघडी करतील आणि ती पोरांच्या हातातली खेळणी किंवा चोरांच्या हातातली शस्त्रं बनतील. सारी वैयक्तिक माहिती सार्वजनिक मालमत्ता बनेल. कुठल्याही स्त्रीला आपलं वय लपवता येणार नाही.  बारीकसारीक सवयींवर ‘बिग ब्रदर’चं किंवा ‘गुंडा भाई’चं लक्ष राहू शकेल.

मोठे संगणक किंवा मोबाइलमधल्या संगणक चकत्याही माहिती सुरक्षित ठेवणारी चिलखतं सदैव अंगावर बाळगतात. केवळ आंतरजालीय स्थानमाहात्म्याच्या जोरावर माहितीचे कण वेचणाऱ्या इवल्या चिप-मुंग्यांपाशी तशी कवचकुंडलं धारण करायची ताकदच नसते. नेमक्या त्या कमजोर दुव्याचं लक्ष्य करून दुष्ट प्रवृत्तींना कुणाच्याही घराच्या, व्यवसायाच्या किंवा राजकीय मर्मावर हल्ला चढवता येईल.

नुसता खोडसाळपणा म्हणून जरी कुणी वस्तूंना एकमेकींशी खोटं बोलायला शिकवलं तरी गोंधळ होईल. गाडीचा टायर त्याच्यातल्या हवेचा दाब वाढल्याचं सांगणारच नाही. तापलेल्या रस्त्यावर तो टायर फुटेल, अपघात होईल. समाजकंटकांना फितुर झालेली मोटारगाडी तर मुद्दामच दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळेल.

रोजच्या वापरातल्या मिक्सर-फ्रिजसारख्या वस्तूंची दुरुस्ती यंत्रांमार्फतच बिनबोभाट होण्याची सवय झालेली असेल. त्या यंत्रांचीच डोकी कुणी फिरवली तर बिघडलेली कुठलीही वस्तू दुरुस्त होणारच नाही. भंगाराचे ढिगारे जमतील. उच्च सरकारी गोटांतली राजकीय गुपितं शत्रूच्या तावडीत सापडली किंवा सुरक्षा दलाच्या शस्त्रास्त्रांना विकृत शिकवण मिळाली तर हाहाकार माजेल. ते अरिष्ट अटळ नाही.

सकलचराचरजाल हा मानवजातीचा शत्रू नव्हे, पण त्या जाळ्यात सापडल्यावर माणसाच्या रोजच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे हे नक्की. त्या जाळ्यातल्या वादळाला सामोरं जाण्यासाठी त्याच्या आतल्या गाठी नीट समजावून घ्यायला हव्या. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चं तंत्रज्ञान नवं आहे. साऱ्या जगाचं एकसंध आंतरजाल विणलं जायला अजून अवकाश लागेल. सध्या ठिकठिकाणी वेगवेगळी चतुरचराचरजाळी बनलेली आहेत. प्रत्येकाच्या पद्धती, उद्दिष्टं, नियम भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्वव्यापी, एककेंद्री नियंत्रण शक्य होत नाही. सर्वाच्या अनुमतीने आणि सहकार्याने सुरक्षेची, सहकार्याची, सुसंवादाची एकलक्ष्यी घडी बसली की खोडसाळपणा, फंदफितुरी, दहशतवाद वगरे समाजघातकी प्रवृत्तींना शह द्यायला सज्ज राहता येईल.

सध्याच्या आंतरजालावरही समाजकंटकांचे छुपे हल्ले सतत होत असतात. पण त्यांच्याशी एकजुटीने लढा देऊन त्यांना वेळीच परतवूनही लावलं जातं. तशा सुविहित आंतरजालामुळे सर्वसामान्यांचा फायदाच झाला आहे. चराचरांचं आंतरजाल तर सर्वसामान्यांची अनेक प्रकारे काळजी घेऊ शकतं.

सध्या हा सारा कल्पनेचा खेळ वाटतो आहे. पण ‘घरोघरी संगणक असतील’ असं म्हणणाऱ्यालाही पन्नास वर्षांपूर्वीच्या समाजाने वेडय़ात काढलं असतं. ‘मोबाइल ही प्रत्येकाची गरज असेल आणि बहुतेकांच्या मोबाइलमध्ये अंगचा संगणक असेल’ या विधानावर फक्त वीस वर्षांपूर्वीही कुणी विश्वास ठेवला नसता.  नव्या शोधामुळे सर्वत्र हाहाकार माजेल, गुंडाभाई, समाजकंटक साऱ्यांच्या अघोरी कर्तृत्वाने नव्या शोधाचे फक्त दुष्परिणामच होतील, अशी सर्वसामान्यांची खात्रीच असते. आणि मग सगळ्या गरसमजांवर, आम आदमीच्या भयगंडावर मात करून तो शोध रुळतो, त्याचे फायदे समजायला लागतात, तो अंगवळणी पडतो. पाण्याचे नळ, विजेचे दिवे, टेलिफोन या गरिबांच्याही प्राथमिक गरजा झाल्या आहेत. विस्तव, चाक, रहाट हे शोधही कधी काळी नवेच होते.

पर्यावरणावर भयानक परिणाम

कुठल्याही नव्या शोधामागच्या विज्ञानाची सोप्या शब्दांत तोंडओळख करून दिली की लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी वाटते, त्याची गरज समजते आणि जाणवते. मग त्यांच्या मागणीनुसारच जर त्यांना त्या नव्या तंत्राचा पुरवठा केला तर ते आपसूक त्यांच्या गळी उतरतं.

मिल्टन कीन्स, ग्लासगो वगरे गावांत तशाच सहकारी, समंजस पद्धतीने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा जम बसवायचे प्रयत्न चालू आहेत. ब्रिस्टलमध्ये जवळजवळ सगळं शहरच तिथल्या युनिव्हर्सटिीच्या महासंगणकाशी फायबर-ऑप्टिक यंत्रणेने जोडलेलं आहे. कान्रेगी मेलन युनिव्हर्सटिीच्या ऐसपस आवाराला चराचरसुसंवादी आवार बनवायला गुगलने हातभार लावला आहे. तिथल्या बसस्टॉप्सपासून कॉफीच्या कपांपर्यंत सारं काही एकमेकांच्या गरजा जाणून त्याप्रमाणे जुळवून घेतं. त्या साऱ्या गावांत रहिवाशांना विश्वासात घेऊन, त्यांना त्यामागचं तत्त्व समजावून त्यांच्या मदतीनेच साऱ्या सुधारणा केलेल्या आहेत. त्या चराचरसंवादातून मिळणारी माहिती, छोटय़ा उद्योगधंद्यांमधल्या किंवा विद्यापीठातल्या ऊर्जेच्या वापराचं नियंत्रण, त्या यंत्रणेमुळे रस्त्यात धावू शकणाऱ्या विनाचालकाच्या गाडय़ा वगरे साऱ्या सोयी लोकांना हव्याहव्याशा वाटतात. म्हणूनच तिथे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चे प्रयोग यशस्वी होताहेत.

आतापर्यंत जगातल्या सगळ्या संगणकांत आणि आंतरजालावर मिळून जी ५० पेटाबाइट (पेटाबाइट = (१०००)५) माहिती जमली आहे ती माणसांनी मोठय़ा कष्टाने तिथे भरली आहे. पण माणसांच्या कामात वेळ, एकाग्रता आणि बिनचूकपणा यांना मर्यादा पडतात. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी बसवलेल्या आणि सतत सजगपणे निरीक्षणाचा चिमणचारा गोळा करणाऱ्या चतुरचिपा बिनचूक, सर्वागीण माहितीचा मेरुपर्वत गोळा करतील. त्या माहितीचं वर्गीकरण, विश्लेषण आणि संयोजन  समर्थ संगणकांवर सोपवलं तर ती सगळी माहिती न हरवता, फुकट न जाता, कमीत कमी खर्चात उत्तम उपयोगात आणली जाईल. कुठेही काहीही बिघडण्याची शक्यता वेळीच ध्यानात येईल आणि ते संगणकी उपायांनी लगेचच सुधारता येईल.

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चं महत्त्वाचं काम तशा व्यापक स्तरावर चालेल, पण त्यासाठी वैयक्तिक, सामाजिक, राजकीय गोपनीयतेची व्याख्या आणि संकल्पना बदलावी लागेल. आपल्या प्रिय वस्तू दुसऱ्यांपासून दडवणं ही प्राणिमात्रांची प्रवृत्ती आहे. मानव्याच्या व्यापक भावनेने त्या प्रवृत्तीवर मात करता आली, ‘आम्ही आहोत म्हणून मी आहे’ हे उबुंटूचं तत्त्व मनात रुजवता, फुलवता आलं की ‘मी, माझं, माझी गुपितं’ हा आत्मकेन्द्रित विचार दूर होईल. तेवढं साधलं की मात्र जागतिक एकात्मतेची मोठी क्रांती होईल. आतापर्यंत ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चं तंत्रज्ञान एकेकटय़ा सरकारांच्या किंवा कंपन्यांच्या खासगी आंतरजालापुरतं मर्यादित होतं. आता मोठय़ा कंपन्यांनी एकमेकींशी समझोता करून आपल्यापाशी गोळा झालेली माहिती इतरांनाही वापरू देण्यासाठी करार केले आहेत. त्या ‘एकमेकां साहय़ करू, अवघे धरू सुपंथ’ तत्त्वामुळे जगभर पसरलेल्या मोठय़ा व्यवसायांच्या नियंत्रणावर, धोरणांवर आणि त्यांच्यात होणाऱ्या सुधारणांवर क्रांतिकारक परिणाम होतील. विविध देशांतल्या भिन्न व्यवसायांची, तिथल्या वैशिष्टय़पूर्ण तंत्रांची आणि नवनव्या प्रयोगांची माहिती सर्वाच्या अनुमतीने आणि सहकार्यानेच एकमेकांपर्यंत पोचली तर प्रयोगांची व्यर्थ पुनरावृत्ती होणार नाही. उत्तर ध्रुवावर ठेच लागली तर दक्षिण ध्रुवावरच्या कारभारात शहाणपण येईल. संपूर्ण जगाच्या कार्यपद्धतीतच नव्हे तर चलनवलनात आणि अस्तित्वातच एकसंध सुसूत्रता येईल. पावलोपावली एकमेकांची मदत मिळत राहून सर्व जगाच्या दृष्टीने उत्तम अशीच प्रगती होईल. विश्वात्मक चराचरजालामुळे वसुधेच्या एकजीव कुटुंबाला ‘सर्व सुखीं पूर्ण’ होण्याचं पसायदान लाभेल.

डॉ. उज्ज्वला दळवी – response.lokprabha@expressindia.com