lp23गिरणी कामगारांच्या संपामध्ये वडिलांची नोकरी सुटली आणि तो कुटुंबासह सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या आपल्या मूळ गावी परतला. तिथेच शिकून पोटा-पाण्यासाठी त्याने मुंबईची वाट धरली. त्या महानगरीत  रस्त्यावरच्या निराधार मुलांमध्ये तो रमायला लागला. त्यांचे प्रश्न, त्यांची सुख-दु:खं समजावून घेतानाच त्याला समाजात निराधार वृद्धांची अवस्था अतिशय बिकट असल्याचं प्रत्यक्ष अनुभवातून ध्यानात आलं. मग त्याने त्यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. अपंग, अनाथ वृद्धांना आधार देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अणाव इथे बबन परब या काकांसह त्याने वृद्धाश्रम सुरू केला. पहिल्या दोन-तीन वषार्ंतच या निराधार वृद्धांप्रमाणेच समाजातल्या अपंग, मतिमंद, मनोरुग्ण इत्यादी घटकांच्या प्रश्नांनाही थेट भिडण्याचा पर्याय त्याने स्वीकारला. त्यासाठी त्याने संस्था स्थापन केली  ‘जीवन आनंद’! आणि त्याचं नाव संदीप परब.

अणावच्या वृद्धाश्रमापाठोपाठ मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर पणदूर या गावी २ ऑक्टोबर २०१३ रोजी संस्थेतर्फे ‘संविता आश्रम’ हे केंद्र सुरू करण्यात आलं. त्यानंतर दोन वर्षांच्या काळात या ठिकाणी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर इथूनही  ५२ निराधार वृद्ध, भिन्न वयोगटाचे स्त्री-पुरुष आणि बालकं दाखल झाली आहेत. त्यात १६ वृद्ध, २५ मनोरुग्ण, ५ बालकं आणि ३ अपंगही  शिवाय कोणताही कौटुंबिक आधार नसलेल्या तिघाजणांना शालेय-महाविद्यालयीन शिक्षणासाठी संस्थेने आधार दिला आहे. संदीपसह १५-२० कार्यकर्ते त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत.

संविता आश्रमामध्ये आलेले वृद्ध शब्दश: निराधार असतात. त्यापैकी काही संदीप किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना रस्त्याच्या कडेला असाहाय्य अवस्थेत सापडलेले, तर काहीजणांना गावातल्या कोणीतरी व्यक्तीने किंवा प्रसंगी पोलिसांनी आणून सोडलेलं. त्यांचा सर्व आर्थिक भार संस्थाच उचलते. गरजेनुसार औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेचा खर्च केला जातो आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करून त्यांना सद्गती देण्याचीही जबाबदारी हे कार्यकर्तेच पार पाडतात. इथल्या मनोरुग्णांची अवस्था कोणत्याही मनोरुग्णालयात भेटणाऱ्या रुग्णांसारखीच असते. कोणी गुडघ्यात मान घालून बसलेलं, तर कोणी जमिनीवर लोळत असलेलं, तर कोणी मोठमोठय़ाने स्वत:शीच बडबडणारं. पण तरीही हे रुग्णालय नाही तर एकाच छपराखाली राहत असलेलं मोठं एकत्र कुटुंब वाटतं. कारण इथले आशीष कांबळी, कल्पना ठुमरे, नीता गावडे, राजू यादव यांच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याने बोलत-वागत असतात. या अथक प्रयत्नांमुळेच काहीजणांचं भरकटलेलं आयुष्य थाऱ्यावर येतं. मानसिक आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या पाच रुग्णांचं समाजात पुनर्वसन करण्यातही संस्थेने यश मिळवलं आहे.

जन्मत:च व्यंग असलेल्या किंवा बालपणी दुर्धर आजाराने पछाडलेल्या मुलांचं हरपलेलं बाल्य पुन्हा मिळवून देण्यासाठीही संविता आश्रम कार्यरत आहे. संस्थेच्या कामाचं स्वरूपच असं आहे की, इथे विविध प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं सतत सहकार्य लागतं. त्या दृष्टीने डॉ. कौस्तुभ लेले (सावंतवाडी), मुंबईच्या मानसशास्त्रज्ञ स्मिता आकळे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व डॉक्टरमंडळी सेवाभावी वृत्तीने सहकार्य करत असतात. परिचारिका, पूर्णवेळ कार्यकर्ते, इतर कर्मचारी मिळून सोळाजण या संस्थेत काम करत आहेत. त्यांच्या वेतनासह संस्थेत राहणाऱ्या सर्व प्रकारच्या निराधारांचा मिळून एकूण खर्चापोटी दरमहा सुमारे तीन लाख रुपयांची गरज असते. संस्थेच्या हितचिंतकांकडून वेळोवेळी वस्तू किंवा रोख देणग्यांच्या स्वरूपात मदत केली जाते. त्यातून हा सार्वजनिक प्रपंच चालतो. पणदूरचे निवृत्त वनाधिकारी संजय सावंत यांनी भाडेतत्त्वावर दिलेल्या बंगल्यात आणि गावात संस्थेने स्वत: घेतलेल्या जागेत उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सध्या सर्वाच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. पण तिथल्या गैरसोयी लक्षात घेता संस्थेची स्वतंत्र वास्तू उभी करण्याचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या सरकारी अनुदानासाठी करावा लागणारा खटाटोप आणि कागद रंगवण्याची किचकट प्रक्रिया शक्य नसल्यामुळे जनताजनार्दनाच्या साहाय्याच्या आधारेच हे कार्य चालवण्याचा संदीप व त्याच्या सहकाऱ्यांचा निर्धार आहे.
सतीश कामत – response.lokprabha@expressindia.com