ही सर्व छायाचित्रे पाहताना कनू गांधींचा एक विशेष जाणवतो, तो म्हणजे ते गांधीजींच्या जवळ होते म्हणून ही छायाचित्रे टिपू शकले. असे असले तरीही या छायाचित्रांमधूनच त्यांनी गांधीजींना त्रास होणार नाही इतपत अंतरही राखलेले दिसते.

मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी या नावाला असलेले वलय दिवसागणिक अधिक वाढतेच आहे. अनेकदा माणूस गेला की, त्याच्या जाण्याला अधिकाधिक दिवस होऊ  लागतात तसतसे त्याच्या स्मृती पिढीगणिक कमी होत जातात. मग जाणती पिढी त्याविषयी खंत व्यक्त करू लागते. हा झाला जगरहाटीचा भाग; पण महात्मा गांधी हे याला अपवाद आहेत. आजवर अनेकांनी गांधीजींची छायाचित्रे टिपली. त्यात देशीविदेशी अनेक छायाचित्रकारांचा समावेश होता; पण तरीही जे गांधी एवढय़ा वर्षांमध्ये आजवर कधीच पाहायला मिळाले नाहीत, ते पाहण्याचा वेगळा योग यंदा चालून आला आहे. गांधीजींचे चुलत नातू कनू गांधी हे १९३४ पासून गांधीजींसोबत राहिले ते अखेपर्यंत. त्यांचे वैयक्तिक साहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचे कागदोपत्री व्यवहार पाहणे, हिशेब ठेवणे, त्यांचे सामान उचलण्यापासून ते अगदी सारे काही त्यांनी नित्यनेमाने केले. खरे तर त्यांना व्हायचे होते डॉक्टर, पण वडिलांनी गांधीजींच्या सेवेत या मुलाला रुजू केले आणि अखेपर्यंत त्यांनी गांधीधर्म काटेकोरपणे पाळला. १९१७ साली नरनदास व जमुना गांधी यांच्यापोटी कनूचा जन्म झाला. १९३० साली मिठाच्या सत्याग्रहानंतर जोवर स्वातंत्र्य मिळत नाही, तोवर साबरमतीला न परतण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी देशाचा दौरा केला आणि जमनालाल बजाज यांच्या विनंतीवरून ते वध्र्याजवळच्या सेगाव येथे आले. तिथे गावाबाहेरच त्यांनी आश्रम उभारला, त्याचे नाव सेवाग्राम. गांधीजींच्या येण्यामुळे सेवाग्राम नंतर सतत चर्चेत राहिले. कनूने याच सेवाग्राममधून गांधीजींना सोबत करण्यास सुरुवात केली. नेहमी गांधीजींच्या भेटीस येणारे पत्रकार- छायाचित्रकार यांच्यामुळे कदाचित त्यांच्यातील छायाचित्रकार जागा झाला असावा. त्यांनी गांधीजींकडे तशी विनंतीही केली. विनोबा भावे यांचे भाऊ शिवाजी यांनी मात्र कनूला प्रोत्साहन दिले. कनूच्या इच्छेविषयी गांधीजींकडून कळल्यानंतर घनश्यामदास बिर्ला यांनी कनूला १०० रुपये आशीर्वाद म्हणून दिले, त्यातून त्यांनी रोलिफ्लेक्स कॅमेरा व रोल खरेदी केला. तीन अटींवर गांधीजींनी कनूला छायाचित्रे टिपण्याची परवानगी दिली. तो कधीही फ्लॅश वापरणार नाही, अमुक एक पोज द्या, असे कधीही सांगणार नाही आणि छायाचित्रणासाठी कधीही आश्रमाचा निधी वापरणार नाही. या अटी मान्य केल्यानंतर कनू गांधींच्या छाया-चित्रणाच्या प्रवासाला सुरुवात झाली.

parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
dr sudhir mehta pinnacle industries, pinnacle industries dr sudhir mehta
वर्धापनदिन विशेष : वाहन निर्मितीतील नावीन्याचा ध्यास
217 houses sold in Thane property fair
ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात २१७ घरांची विक्री
religion of lion
नावावरून सिंहांचाही धर्म शोधायचा का?

गांधीजींच्या अखेरच्या क्षणापर्यंत अनेक खूप महत्त्वाचे आणि वैयक्तिक क्षण कनू गांधी यांनी टिपले. मात्र बराच काळ ही छायाचित्रे लोकांसमोर आलीच नाहीत. कनू गांधींनी टिपलेले गांधीजींचे खासगी जीवन १९९५ साली लंडनस्थित कलावंत सलीम आरिफ यांच्या प्रयत्नाने जर्मनीमधील कलादालनात प्रदर्शित झाले. ‘आऊटलुक’ साप्ताहिकाचे छायाचित्र संपादक प्रशांत पंजिआर यांनी त्यानंतर या छायाचित्रांचा खूप शोध घेतला.  आता नजर फाऊंडेशनच्या मदतीने हे प्रदर्शन मुंबईस्थित छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथील जहांगीर निकल्सन कलादालनात सुरू आहे. ही सर्व छायाचित्रे कनू गांधी यांनी १९३८ ते १९४८ या काळात टिपलेली आहेत.

गांधीजींच्या कौटुंबिक आयुष्यातील अनेक क्षण या प्रदर्शनात पाहायला मिळतात. टिपणारी व्यक्ती घरातीलच असल्याने पहाटे चार वाजता उठून वाचन करणारे गांधीजी, रेल्वेच्या डब्यात वाचन करत असताना पहाटे कधी तरी डोळा लागलेले गांधीजी असे अनेक खासगी क्षण या छायाचित्रांमध्ये पाहायला मिळतात. एका छायाचित्रात कस्तुरबा गांधी या गांधीजींचे पाय धूत असताना दिसतात, पलीकडे सरदार पटेलही पाहायला मिळतात. कस्तुरबांचा सेवाभाव गांधीजींच्या देहबोलीत जाणवतो. त्या काळातील पती-पत्नीच्या नातेसंबंधांचा एक अनोखा बंध या छायाचित्रात पाहायला मिळतो. कनू गांधी नसते तर हा क्षण आपल्यासमोर कधीच आला नसता. म्हणून या छायाचित्रांना एक वेगळे महत्त्व तर आहेच; पण त्याचबरोबर छायाचित्रणाचा एक वेगळा प्रयोग म्हणूनही या छायाचित्रांकडे पाहणे आवश्यक ठरते. कनू गांधी हे काही प्रशिक्षित छायाचित्रकार नव्हते; पण त्यांच्या छायाचित्रांमधून दिसणारे गांधीजी हे कधी एखाद्या वृत्तछायाचित्रकाराच्या नजरेतून, तर कधी अतिशय कलात्मकतेने टिपलेले पाहायला मिळतात. प्रत्येक कालखंडामध्ये चांगल्या-वाईट छायाचित्रणाचे काही ठरावीक निकष असतात. त्या वेळचे हे असे अनेक निकष कनू गांधी यांनी अनेक छायाचित्रांमध्ये यशस्वीरीत्या भेदलेले दिसतात. त्यांच्यामध्ये एक चांगला कलावंत दडलेला होता, याचीच ही छायाचित्रे निदर्शक आहेत. नौखालीमध्ये झालेल्या जातीय दंग्यानंतर गांधीजींनी या परिसरास भेट दिली. त्या वेळेस एका काचेवर पडलेल्या प्रतिबिंबासह त्या पलीकडे असलेले गांधीजी पाहायला मिळतात. हे केवळ कलात्मक असे छायाचित्र आहे. पहाटे चार वाजता गांधीजींचे सुरू असलेले वाचन हेदेखील तसेच छायाचित्र आहे. ही सर्व छायाचित्रे पाहताना कनू गांधींचा एक विशेष जाणवतो, तो म्हणजे ते गांधीजींच्या जवळ होते म्हणून ही छायाचित्रे टिपू शकले. असे असले तरीही या छायाचित्रांमधूनच त्यांनी गांधीजींना त्रास होणार नाही इतपत अंतरही राखलेले दिसते. काही छायाचित्रांमधून कलात्मक कनू गांधी अधिक पाहायला मिळतात. गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे छायाचित्र याच पद्धतीत मोडणारे आहे. त्यात खालच्या बाजूस असलेली काच व त्यावरील प्रतिबिंब छायाचित्राला एक वेगळी मिती देण्याचे काम करते. काचेपलीकडे फोनवर असलेल्या गांधीजींचे छायाचित्रही याच बाजाचे आहे. सेवाग्राममध्ये उन्हाचा कडाका टाळण्यासाठी डोक्यावर उशी ठेवून बाहेर पडणारे गांधीजी हे छायाचित्रही असेच कलात्मक आहे. त्यात कुंपणाचे रांगडेपण आणि उशीचा मऊपणा अशी वेगळीच गंमतही आहे. ही सर्व छायाचित्रे सेपिया टोनमधील आहेत.  या संपूर्ण प्रवासात काही वेळा मात्र गांधीजींनी छायाचित्रे टिपण्यापासून कनू यांना रोखले. त्यात पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये, कस्तुरबा अखेरच्या क्षणी गांधींच्या मांडीवर डोके ठेवून असतानाच्या क्षणाचा समावेश होतो. त्यामुळे हे अतिखासगी क्षण यात साहजिकच नाहीत; पण तरीही खूप खासगी आणि कौटुंबिक गांधी जे एरवी कधीच पाहायला मिळणार नाहीत ते या छायाचित्रांतून दिसतात. नजर फाऊंडेशनने यासाठी विशेष पुढाकार घेतला. एरवी पाहायला न मिळणाऱ्या गांधीजींसाठी आणि कनू गांधींसाठीही हे प्रदर्शन पाहायलाच हवे.

हे प्रदर्शन २६ फेब्रुवारीपर्यंत पाहता येईल.
विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com