क्षितिज पटवर्धन म्हणजे सध्या ‘आवाज वाढव डीजे’ या महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला भुरळ घालणाऱ्या गाण्याचा तरुण गीतकार. त्याशिवाय पटकथाकार आणि संवादलेखक, नाटककार.. अशी चौफेर कामगिरी करणारं हे व्यक्तिमत्त्व. त्याच्याशी गप्पा.

क्षितिजशी गप्पा मारताना सर्वात भावतं ते त्याचं मनमोकळं हसू, निव्र्याज साधेपणा. आणि जाणवत राहतो तो त्याच्यातला संवेदनशील माणूस. गप्पांची सुरुवात अर्थातच झाली, ती ‘आवाज वाढव डीजे’ या सध्या गाजत असलेल्या गाण्यापासून. लग्नाच्या वरातींपासून ते अगदी पार्टीजपर्यंत सगळीकडे या गाण्याने धूम उडवून दिलीय. पण हे गाणं क्षितिजने लिहिलंय, यावर त्याला ओळखणाऱ्या लोकांचाही आधी विश्वासच बसला नव्हता. त्याबद्दल तो म्हणतो, ‘हो. खरं तर आत्तापर्यंत मी जास्त करून प्रेमगीतंच लिहिली होती. त्यामुळे हा अनुभव नवा होता. पण मला स्वतला सरप्राइझ करायला आवडतं. ‘पोष्टर गर्ल’चे दिग्दर्शक समीर पाटील यांनी मला संपूर्ण चित्रपटाची गोष्ट नीट समजावून सांगितली होती. तसंच हे शीर्षक गीत असल्यामुळे अख्खी गोष्ट या गाण्यातून सांगायची होती. माझ्यासमोर मी अनेक लग्नांमध्ये पाहिलेल्या वराती होत्याच. त्यामुळे ते वातावरण परिचयाचं होतं. आणि  ‘आवाज वाढव डीजे’ ही हूकलाइन सुचल्यावर तर आम्ही सगळे खूशच झालो. कारण हूकलाइन जर करेक्ट जमली, तर गाणं लोकांच्या चटकन मनात बसतं. या गाण्यात एक मंगलाष्टकांच्या चालीचं कडवं आहे. त्या कडव्यामध्ये ‘पुनरुक्ती’ वापरून शब्दांची गंमत करून पाहता आली. एकूण माझ्यासाठी हा  वेगळा पण धमाल अनुभव होता. आणि आता तर  काय, लोकांनी ज्या पद्धतीने पसंतीची पावती दिलीये, ते बघून फारच मस्त वाटतंय.’

क्षितिज मूळचा पुण्याचा. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात असताना एकांकिका लेखनापासून त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. साताठ एकांकिका झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की विषय मांडणी ही एक क्राफ्ट आहे. तेव्हाच त्याने ठरवलं होतं, की आपल्याला स्वतहून काही चांगलं सुचलं, तरच लिहायचं. पण असं असलं तरी यशाकडे जाण्याचा रस्ता त्याच्यासाठी अजिबात सहज सोपा नव्हता. उलट तो म्हणतो, ‘सुरुवातीची पाच-सात र्वष तर फारच खचवून टाकणारी होती. मला कधीच वाटलं नव्हतं या क्षेत्रात मी यशस्वी करियर करू शकेन. मी कुणालाही ‘लेखक’ म्हणून विश्वास ठेवण्यायोग्य वाटायचो नाही. त्यामुळे माझं काम कोणाला आवडण्याचा तर प्रश्नच नव्हता. आणि खरं सांगायचं तर माझं स्वतचं अनुभवविश्वसुद्धा फार मर्यादित होतं, तोकडं होतं. मी एकांकिकेचं एक पान लिहायचो. मग काहीतरी चुकतंय असं वाटून तिथेच थांबायचो. मला पुढे काही सुचायचंच नाही. पण हळूहळू माझ्या डोक्यातला हा गोंधळ कमी होत गेला. या सगळ्या काळात मला माझ्या मित्रांनी खूप मदत केली, मला समजून घेतलं. समीर विद्वांस आणि हेमंत ढोमे सतत मी लिहित राहावं म्हणून माझ्या मागे लागायचे. माझ्यातला आत्मविश्वास माझ्या या सगळ्या मित्रांमुळेच टिकून राहिला. समीरबरोबर तर छानच टय़ुिनग जमलंय. आत्ता आगामी ‘वायझेड’ या चित्रपटातही आमची लेखक दिग्दर्शकाची जोडगोळी आहे. हा ‘कम्फर्ट’ तयार होणं मस्त असतं.’’

‘‘२०१० मध्ये मी ‘नवा गडी नवं राज्य’  हे नाटक लिहिलं. तेव्हा मुंबईत स्थिर होत होतो. २०१३ मध्ये इथे स्थिरस्थावर झालो. तोपर्यंत माझा आत्मविश्वास खूपच वाढला होता. या नाटकाने आणि मुंबईने मला खऱ्या अर्थाने एक्स्पोजर मिळवून दिलं. या मुंबईची गंमतच वेगळी आहे. ती जितकी फसवी आहे, अनाकलनीय आहे तितकीच सामावून घेणारी आहे.’’

‘डबलसीट’मधल्या ‘तू दिल के दर्या की रानी’ या लावणीमध्ये क्षितिजच्या मनातल्या मुंबईबद्दलच्या या सगळ्या भावना फार सुंदर व्यक्त होऊन आल्या आहेत.

आत्मविश्वास कमी असला तरी लेखक म्हणून क्षितिजची जडणघडण लहानपणापासूनच होत होती. लहानपणीच त्याला वाचनाची आवड लागली. विजय तेंडुलकर आणि दुर्गाबाई भागवत हे त्याचे आवडते लेखक. तसंच शाळेत ‘वर्गवाणी’ सत्रात बाई नेहमी त्याच्याकडून मोठय़ाने वाचून घेत असत. त्याचा खूपच फायदा झाला. त्याचे उच्चार स्वच्छ, शुद्ध झाले. लेखक म्हणून त्याचं महत्त्व त्याला आता जाणवतं.

41-lp-jitendra-joshiलेखनाच्या प्रक्रियेवर क्षितिज भरभरून बोलतो. ‘लेखन ही कला आहे, हे नक्की. पण अभ्यास करून, प्रयत्नपूर्वक तुम्ही ते शिकूही शकता. हे ‘गिटार’ शिकण्यासारखं आहे. तुम्हाला तंत्र शिकता येतं. पण त्यातलं नपुण्य मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला तुमची साधना करावी लागते. या सगळ्यात ‘माणूस’ म्हणून तुमची समज फार महत्त्वाची असते. तुमच्या आसपासचं वातावरण तुम्ही किती बारकाईने टिपून घेता ते तुमच्या लेखनात उतरत जातं. तुमचे स्वतचे बरे-वाईट अनुभवही त्यात उतरत जातात. त्याचबरोबर तुम्ही ‘ओपन’ असणं हेही गरजेचं आहे, असं मला वाटतं. नव्या घडामोडी, ट्रेंड्स यांचं खुलेपणाने स्वागत करता यायला हवं. त्यासाठी स्वत:च्या मतांचा दुराग्रह, हट्टीपणा टाळता यायला हवा. चांगल्या गोष्टींचा खुल्या दिलाने केलेला स्वीकार तुमच्या लेखनाला ताजं ठेवत राहतो. मला आत्ता आणि आत्ताच सुचलं पाहिजे, असा दबाव मी स्वतवर कधीच टाकत नाही. तुम्ही स्वतला ब्रेक देणंही गरजेचं असतं. तरच नव्या जोमाने पुन्हा कामाला लागता येतं. आणि या सगळ्यानंतर जेव्हा काही सुचतं, तेव्हा मी जगातला सगळ्यात आनंदी माणूस असतो.’

लेखक म्हणून क्षितिजने अनेक माध्यमं हाताळली आहेत. नाटक, चित्रपट, गीतलेखन याच्या जोडीनेच इव्हेन्टसाठी स्क्रिप्ट्स लिहिणं तसंच जाहिरातींसाठी कॉपीरायटिंग हे सगळं त्याने केलंय. त्याने केलेली ‘स्टॉप सेक्स सिलेक्शन’ ही जाहिरात तसंच सारस्वत बँक, कॉसमॉस बँक या जाहिराती खूप गाजल्या. त्याला दोनदा ‘यू. एन. नॅशनल क्रिएटिव्ह एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’सुद्धा मिळालंय. इतकंच नाही तर ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटाच्या मार्केटिंगचीदेखील जबाबदारी त्याने सांभाळली आहे. तो म्हणतो, ‘ही सगळी माध्यमं मी मनापासून एन्जॉय केली. मुळात माझ्या डोक्यात पक्कं होतं, की मला या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. कारण पुढे जाऊन मी समजा नाटक-चित्रपट दिग्दíशत करणार असेन, तर या सगळ्या तांत्रिक गोष्टींमधले बारकावे मला कळले पाहिजेत. या हेतूने मी हे सगळं मनापासून केलं.’

यानंतर अर्थातच गप्पा वळल्या त्या ‘दोन स्पेशल’कडे . २०१५ सालातल्या सर्वोत्कृष्ट नाटकांमध्ये ‘दोन स्पेशल’ गणलं जातंय. ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ म्हणून या वर्षीचा ‘झी नाटय़गौरव’ही त्याला यासाठी मिळाला. ‘झी नाटय़गौरव’सोबत अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांवर या नाटकाने नाव कोरलंय. तसंच ‘लोकसत्ता संपादक शिफारस’चंही ते मानकरी ठरलंय. कौतुकाची गोष्ट म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने क्षितिजने मराठी रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून दमदार पदार्पण केलंय. क्षितिज म्हणतो, ‘ह. मो. मराठेंची कथा मी वाचली २००७ साली. तेव्हाच यावर आपण काहीतरी करायचं हे मी ठरवलं होतं. त्यानंतर ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी मात्र २०१४ साल उजाडलं. कारण हे नाटक लिहायला मी खूप वेळ घेतला. त्यामध्ये कोणतीही  तडजोड करायची नाही, याबद्दल मी ठाम होतो. कोणतीही गोष्ट ही उत्कंठावर्धक पाहिजे. तिच्यामध्ये जगण्यातली, छोटय़ात छोटय़ा गोष्टींमधून येणारी गुंतागुंत पाहिजे. हे जाळं तुम्ही किती कौशल्याने विणता, त्यावर प्रेक्षक तुमच्या कलाकृतीत अडकणार का नाही हे ठरत असतं. सुदैवाने हे समजून घेऊन काम करणारी कलाकारांची टीम मला मिळाली. ज्यांनी मी नवखा असूनही माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला. मी कोणतंही दडपण न घेत माझ्या पद्धतीने नाटक बसवलं. जितेंद्र जोशी, गिरिजा ओक, रोहित हळदीकर या माझ्या तीनही कलाकारांनी आपापल्या भूमिकांचं सोनं केलं आणि त्यापुढचा इतिहास सर्वासमोर आहे.’’

क्षितिजचा जनसंपर्क अफाट आहे. तसंच त्याच्या मोकळ्या स्वभावामुळे अनेक माणसं त्याने प्रेमाने जोडून घेतलीयेत. ‘पटय़ा’ या लाडक्या नावाने हा अजातशत्रू त्याच्या खास मित्रमंडळींमध्ये ओळखला जातो. पण तरीही, इतकं काम करत असताना इंडस्ट्रीबद्दल काय तक्रारी आहेत असं विचारल्यावर तो म्हणतो, ‘खरंतर तक्रारी करत बसायचा माझा स्वभाव नाही. त्यापेक्षा पटत नाही, तिथे मी बाजूला राहणंच पसंत करतो. पण तरीही विचारशील तर आपली मराठी इंडस्ट्री ही आशयघन (कंटेन्ट ड्रिव्हन) आहे, असं म्हटलं जातं. पण ते तितकंसं खरं नाहीये. इथे लेखकाला पुरेसा वेळ दिला जात नाही. या सगळ्याकडे प्रोसेस म्हणून पाहिलं जात नाही. तसंच लेखकाला योग्यतितका मोबदलाही मिळत नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं.’

43-lp-djwaleचित्रपटांसाठी पटकथा संवाद लिहिण्यातही क्षितिजचा हातखंडा आहे. पण तिथल्या कामाच्या पद्धतीबद्दल तो काहीशी खंतही  व्यक्त करतो. तो म्हणतो, ‘खरंतर सिनेमा माध्यमात लेखक हा अतिशय महत्त्वाचा. पण आपल्याकडे सगळ्यात जास्त त्यालाच गृहीत धरलं जातं. अमुकच वेळेत काम संपवायला हवं, असा दबाव तर असतोच; पण बजेट, कलाकारांची उपलब्धता, लोकेशन या हिशेबानं लेखकांना ‘स्क्रीनप्ले’ लिहावा लागतो. तसंच मराठी चित्रपटाचं शूटिंग काही करून ३० दिवसांत संपवायचं आहे, हेही डोक्यात ठेवावं लागतं. खरंतर ही प्रोसेस उलटी असायला हवी. लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य देऊन मग बाकीची जुळवाजुळव व्हायला हवी. तसं न झाल्यामुळे आपण उत्तम सिनेमाच्या अनुभवाला मुकतो असं मला वाटतं. ‘पण तरीही या सगळ्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्याच्याकडे आहे. ‘कमी बजेट आणि मोजका वेळ हे आव्हान सगळ्यांसमोरच असल्यामुळे तुमच्यातली सर्जनशीलता पणाला लागते. आणि तुम्ही तुमच्यातलं सर्वोत्तम देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करता. आपल्याकडच्या चित्रपटांची आज देशभर चर्चा होतेय, यामागे हे एक महत्त्वाचं कारण आहे.’

कलाकृतीच्या समीक्षणाबद्दल तुला काय वाटतं, असं विचारल्यावर क्षितिज म्हणतो, ‘समीक्षणातली टीका आणि कौतुक हे दोन्ही मी सकारात्मकरीत्या घेतो. पण त्यावरून मी कोणतेही आडाखे बांधत नाही. चांगल्या सूचनांचा स्वीकार नक्की करतो, पण एखादं मत मला पटलं नाही, तर ते शांतपणे बाजूलाही ठेवतो. पण विरोधी मत ऐकून घेण्याचा समजूतदारपणा माझ्यात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यावरून काय चालेल आणि काय नाही अशी गणितं कोणीच बांधू शकत नाही. माझ्या पहिल्या दोन चित्रपटांना समीक्षकांनी फार नावाजलं नव्हतं. पण त्या चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवर ते यशस्वी ठरले. थोडक्यात काय, तर हे सगळं बाजूला ठेवून प्रामाणिकपणे आपण आपलं काम करत राहणं हेच महत्त्वाचं!’

२०१४-२०१५ च्या दणदणीत यशानंतर क्षितिजच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी सर्वानाच उत्सुकता आहे. तो म्हणाला, ‘‘माझ्यासाठी हे वर्ष  खूप महत्त्वाचं आहे, कारण मी एक कादंबरी, आणि एक लघुकथा संग्रह लिहितो आहे. या वर्षांत ते येतील असं वाटतंय. आमच्या ‘वायझेड’ चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे.’’ या चित्रपटाचं नाव आणि ‘टीजर पोस्टर’ यांनी सगळ्यांची उत्सुकता आधीच चाळवली आहे. तो म्हणाला, ‘ही फिल्म खरंतर स्वतच्या कोशातून बाहेर पडून स्वतला शोधू पाहणाऱ्या प्रत्येकाची फिल्म आहे. बेगडी बंधांतून बाहेर पडून स्वतचं विश्व उभं करू पाहणाऱ्या सगळ्यांची ही फिल्म आहे. अनेक नवे चेहरे या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतील. सर्व वयोगटांतल्या लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.’

‘चित्रपटाची कथा ही माझं कल्पनाविश्व आणि निरीक्षण यातूनच सुचली. ‘इरॉस’च्या संजय छाब्रियांना ही कथा मी ऐकवली आणि त्यांना ती आवडली. मग समीर विद्वांसच याचं दिग्दर्शन करणार हे निश्चित झालं. ‘टाइम प्लीज’, आणि ‘डबलसीट’पाठोपाठ याही चित्रपटाच्या वेळेस आमचा अनीश जोग हा मित्र निर्माता म्हणून खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा राहिला. तसंच मी आणखी दोन फिल्म्स लिहितोय, एकीकडे गीतलेखन चालूच आहे. त्यामुळे मस्त बिझी वर्ष आहे.’
वरद लघाटे – response.lokprabha@expressindia.com