काही नाटकं मनोरंजन करतात, काही डोळ्यातून पाणी काढतात; तर काही उपाहासात्मक भाष्य करतात. पण, काही नाटकं विचार करायला प्रवृत्त करतात. ‘लौट आओ गौरी’ हे त्यापैकीच एक नाटक. हे नाटक जिथे संपतं तिथून प्रेक्षकांच्या डोक्यातलं विचारचक्र सुरू होतं. या विचारांमध्ये ते नाटक प्रेक्षकांना गुंतवून ठेवतं.

शनिवारची स्वस्थ दुपार. अशा स्वस्थ दुपारी एखादं नाटक बघायला मिळावं म्हणजे दुग्धशर्करा योग. प्रबोधनच्या मिनी थिएटरमध्ये नाटक. कलाकारांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी स्पष्ट दिसणार या कल्पनेने उत्साह आणखी द्विगुणीत. घडय़ाळ तसं त्याच्याच वेळेत चालत होतं; पण मला उगीच उशीर झाल्यासारखं वाटत होतं. बाहेर पाऊस अक्षरश: कोसळत होता. इतका की आमच्या खिडकीवरचा, पाऊस आत येऊ नये म्हणून मुद्दाम लावून घेतलेला पत्रा आता कोलमडून पडणार अशी भीती वाटत होती. त्यामुळे मग माझी अधिकच लगबग सुरू झाली. पावसात एसीमध्ये आणखी थंडी वाजते, कुडकुडायला होतं म्हणून मी बॅगमध्ये चांगलं जाडजूड जॅकेट कोंबलं. छत्री घेतली. पाणी गरम करून घेतलं. हे सगळं केवळ थंडी वाजू नये आणि त्यामुळे नाटकावरचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून चाललं होतं.

पावसाने आणखी जोर धरला. त्या काळ्या ढगांसारखी भीती दाटून आली की प्रयोग होईल की नाही? पण म्हटलं जाऊ. वाटलं तर परत येऊ. गेलो नाही आणि मग कळलं की ‘प्रयोग तर झाला’ तर? या अशा पश्चात्तापापेक्षा जाऊन परत आलेलं बरं, नाही का? घरातून अवघा पाऊण तास लवकर निघाले. रिक्षेत बसले. पावसाचे शिंतोडे अंगावर उडत होते. मस्त वाटत होतं. आठवडय़ाभराचा शीण निघून गेल्यासारखं. नाटकाच्या अर्धा तास आधीच पोहोचले. नाटकाला लवकर पोहोचण्यात आणखीच मजा असते. तो नाटकाच्या सेटचा टेम्पो आला ना की ती त्यांची लगबग बघायला गंमत वाटते; मला टेम्पो बघायला मिळाला नाही; चिक्कार माणसं धावताना दिसली. दम खात ‘सगळं आलं? मोडे? लेवल्स? फ्रेम्स? टूल किट? सगळं?’ असे आवाज ऐकू आले. अहाहा! शब्द ऐकूनच कसलं वाटलं वाह! तर तिकीट दाखवून आत जाणे वगैरे सोपस्कार झाले. पावसाचा जोर काही कमी झाला नव्हता; पण तरीही नाटय़गृह मात्र भरलेलं होतं. आत शिरल्या शिरल्या माणसांची ऊब जाणवली. इतका पाऊस असूनसुद्धा नाटय़गृह इतकं भरलेलं असणं हे नाटकाचं श्रेय होतं. माणसांची गर्दी वाढत होती. आत आल्यावर माणसांचे जागा शोधण्यासाठीचे भिरभिरणारे डोळे बघून नाटकाच्या ताकदीचा अंदाज येत होता. उत्कंठा शिगेला पोहोचली होती. नाटक सुरू  होण्यापूर्वी मी जॅकेट वगैरे घालून तयारीनिशी बसले. तिसरी घंटा. प्रेक्षागृहात बसूनही तिसरी घंटा झाली की धडधड का वाढते कळत नाही. तिसऱ्या बेलनंतर एक मुलगी पडद्याआडून बाहेर आली. तिचं हिंदी भाषेवरचं प्रभुत्व ऐकून कान तृप्त झाले. अस्खलित हिंदीमधून तिने फोन सायलेंटवर ठेवण्याचं आणि इतर सूचनांचं प्रेक्षकांना आवाहन केलं. तेवढय़ात कुणाचा तरी फोन वाजला आणि दोन टपोरी माणसं येऊन त्या माणसाला बेदम मारायला लागले. (अर्थात तो नाटकाचा भाग होता.) माझ्या बाजूला बसलेल्या काकू भेदरल्या आणि ‘अरे ऐसे मत मारो. समझाओ ना अच्छेसे. ऐसे जल्बाजीमें हात क्यों उठाते हो?’ असं मोठमोठय़ाने म्हणू लागल्या. त्यांना मी सांगितलं की हा नाटकाचा भाग आहे तर त्यांना ते फारसं पटलं नाही. ‘ऐसा नाटक मुझे नहीं देखना’ असं म्हणून त्या घरी जायला निघाल्या; पण तेवढय़ात पडदा उघडला आणि रंगमंच उजळलेला पाहून त्यांनी आपला काढता पाय तूर्तास थांबवला. नाटक वास्तवदर्शी आहे याची या प्रसंगातून खात्री पटली.

म.ल. डहाणूकरचे थिएटर मॅजिक निर्मित आणि व्हाइट एलिफंट प्रस्तुत ‘लौट आओ गौरी’ अशी नाटकाच्या नावाची परंपरेनुसार काही वेळाने घोषणा झाली आणि नाटक सुरू झालं. नाटकाच्या नावावरून हरवलेली गौरी परत मिळावी यासाठी काहीतरी खटाटोप असणार याचा अंदाज आला; पण हे नाटक म्हणजे फक्त एवढंच नाही याचा अंदाज कथानक पुढे जायला लागल्यावर आला. उत्तर प्रदेशमधलं एक छोटंसं गाव. त्या गावात घडलेली एक हृदयस्पर्शी घटना. एक अशी घटना जी आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी घडतच असते अथवा घडलेली तरी असते. ती म्हणजे ‘लौट आओ गौरी’ हे विचार करायला लावणारं एक नाटक.

गावातलं श्रीवास्तव हे अति सामान्य कुटुंब, नवखे दरोडेखोर आणि गावातले पोलीस आणि गावाचा नावापुरता पालनकर्ता पक्का राजकारणी ‘विधायक’ यांच्यातील एक मनाला चटका लावणारा खेळ म्हणजे हे नाटक. श्रीवास्तव कुटुंब शेतकऱ्याचं कुटुंब. आपल्या तुटपुंज्या कमाईवर घर चालवणारं आणि दुसऱ्या बाजूला मिळालेल्या पैशाचं काय करावं हे कळत नसल्यामुळे नाच, गाण्यात पैसे उडवणारं ‘विधायकाचं’ कुटुंब. दोन्ही कुटुंबात एक गौरी. दोन्ही कुटुंबांची लाडकी आणि कुटुंबाचा प्राणसुद्धा. एक दिवस दोघांचीही ‘गौरी’ बेपत्ता होते. पोलीस अर्थातच विधायकाच्या गौरीचा शोध घेतात. सामान्य माणसाची गौरी मिळाली काय किंवा नाही मिळाली काय, ना पोलिसांना त्याची फिकीर ना गावाचा पालनकर्ता असूनसुद्धा त्या विधायकाला. पोलिसांचं सहकार्य मिळत नाही म्हणून श्रीवास्तव कुटुंब स्वत: आपल्या गौरीला शोधायला घराबाहेर पडतं. अर्थात अपयशी होतं. शेवटी गौरीचे वडील (जियालाल श्रीवास्तव) विधायकाच्या गौरीला शोधायचा निर्णय घेतात. त्यांना ती सापडतेही. विधायक खूश होऊन धनलक्ष्मीच्या स्वरूपात बक्षीसही देतो; पण त्यांची गौरी काही त्यांना शेवटपर्यंत परत मिळत नाही.

नाटकातलं महत्त्वाचं वळण म्हणजे जिथे प्रेक्षकांना कळतं की विधायकाची गौरी म्हणजे एक म्हैस आहे आणि श्रीवास्तव कुटुंबाची गौरी म्हणजे त्यांची मुलगी आहे. एक जिवंत, पोटचा मांसाचा गोळा. तरीही पोलीस विधायकाच्या गौरीला शोधण्यासाठी दिवस-रात्र एक करतात आणि श्रीवास्तव कुटुंब हातापाया पडूनसुद्धा ‘तुझी गौरी मिळून देशाला काहीच फायदा नाही; पण विधायकाची गौरी मिळाली तर देशाचं कल्याण होणार आहे. जरी ती म्हैस असली तरीही.’ असं म्हणून हुसकावून लावतात.

नाटकातील अनेक प्रसंग अंगावर येतात, डोळ्यात पाणी आणतात; पण त्याच वेळेला नाटकातील पांडे आणि मुरारी ही पोलिसांची जोडी हसून हसून वेडं करते. नवखे दरोडेखोर, विधायकाची पत्नी आणि विधायक यांच्यातील संवाद, नाटकातील एक नृत्य या सगळ्याची योग्य ठिकाणीची पेरणी नाटक हलकफुलकं करते. हे नाटकाच्या दिग्दर्शकाचं कौशल्य. नाटक तसं सगळ्याच कौशल्यांनी ओतप्रोत भरलेलं आहे. पोलीस निरीक्षक पांडे (विभव राजाध्यक्ष) याने आपल्या अभिनयाने सगळ्याच प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं. त्याचं विनोदाचं टायमिंग लाजवाब! नाटक बघताना हसून डोळ्यांतून पाणी येतंय की रडून याचाही विचार करावा लागतो. नाटकातील शेतकऱ्याचं कुटुंब, पत्नी लाजोवंती श्रीवास्तव (वेदांगी कुळकर्णी) आणि पती जियालाल श्रीवास्तव (प्रथमेश परब) यांचाही अभिनय मनाला चटका लावून जातो. नाटकातील एक छोटासा नृत्याविष्कार (सादरकर्ती- आकांक्षा वाघमारे)सुद्धा प्रेक्षकांना थिरकायला लावतो. नाटकातील वेशभूषा आणि रंगभूषा पात्रांना जिवंत करते. त्याला उत्तम साथ आहे ती नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची. आपण खरोखर उत्तर प्रदेशातील एका ठिकाणी आहोत आणि आपल्यावरच ‘गौरी’ हरवण्याचा प्रसंग ओढावला आहे असं क्षणभर वाटतं. पात्रांच्या तोंडी लेखक पराग ओझा याने लिहिलेली भाषा हे नाटकाचं आणखी एक कौतुकाचं स्थान. भाषा अगदी सहज समजत असली तरी ती अभ्यासपूर्वक लिहिलेली आहे आणि पात्रांनीही मेहनतीने मुखोद्गत केलेली आहे हे ऐकताना जाणवतं आणि इतकी रसाळ भाषा ऐकून कान तृप्त होतात.

नाटकातील एक गौरी म्हणजे म्हैस हे कळतं; पण सामान्य माणसाची ‘गौरी’ मात्र दिसत नाही. ती गौरी दिग्दर्शकाला बहुधा हरवलेलीच दाखवायची असावी; कारण बहुधा त्याला त्या हरवलेल्या गौरीचा संबंध माणसाच्या हरवलेल्या ‘विवेकबुद्धीशी’ जोडायचा असावा. तीच आपल्यातून हरवलेली आहे. आज कित्येक माणसं तिला शोधायचा प्रयत्न करताहेत. परिस्थितीअभावी ‘ती’ आपल्याला मिळेल म्हणून लोकांची वाट्टेल ती कामे करताहेत; पण तरीही श्रीमंत आणि गरीब या समाजाच्या पडलेल्या दरीच्या अंधारात आपला हरवलेला विवेक शोधताहेत असा संदेश नाटकातून द्यायचा असावा.

रंगमंचावर श्रीवास्तवच्या कुटुंबासारखी अनेक कुटुंबं कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात आपल्या हरवलेल्या गौरीच्या काळजीने विव्हळताना दिसतात आणि पडदा पडतो. प्रेक्षागृह प्रकाशमान. सगळं क्षणभर स्तब्ध आणि त्याच शांततेत प्रेक्षागृह हळूहळू रिकामं होतं.

माणसाचा विवेक परत मिळेल की नाही माहीत नाही; पण ‘लौट आओ गौरी’ हे नाटक एका वेगळ्याच विचारात माणसाला घेऊन जाईल आणि एक अनोखा अनुभव आपण प्रेक्षागृहातून बाहेर घेऊन येऊ हे मात्र नक्की!
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com