घनदाट वृक्षराजीने नटलेलं गिरिस्थान पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरान सकृतदर्शनी स्वच्छ सुंदर दिसत असलं तरी तिथं कडे-कपाऱ्यात, झाडीझाडोऱ्यात प्लास्टिकने थैमान मांडले आहे.

मुंबईकरांच्या सर्वात आवडीच्या पर्यटन स्थळांमध्ये माथेरान हे कायमच अग्रस्थानी राहिले आहे. मुंबईपासून तासाभराच्या प्रवासात गाडीने किंवा उपनगरी रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून अगदी सहजपणे पोहोचता येणारे हे ठिकाण. कोणत्याही वाहनाला प्रवेश नसल्यामुळे अत्यंत शांत आणि खरोखरच शहरी गोंगाटापासून दूर असल्यामुळे अनेकांची माथेरानला पसंती असते. पावसाळ्यात तर माथेरानवर ही गर्दी असते. त्याचबरोबर उन्हाळी सुट्टय़ांमध्येदेखील अनेकांची पहिली पसंती माथेरानच आहे. माथेरानच्या डोंगरात घाटरस्त्याने गेल्यानंतर माथेरानच्या अलीकडेच दोन अडीच किमीवर सर्व वाहनं थांबवली जातात. त्यापुढे कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. तिथून पुढे एकतर पायी जायचं किंवा घोडय़ावरून अथवा माणसांनी ओढल्या जाणाऱ्या रिक्षातून. या पलीकडे चौथा पर्याय नाही. वनखाते आणि गिरिस्थान नगरपालिकेच्या या संयुक्त निर्णयामुळे माथेरानचं वेगळंपण आजही टिकून आहे. या दोन्ही व्यवस्थांनी प्लास्टिकच्या वापरावर आणि एकूणच स्वच्छतेवर दिलेला भर माथेरानच्या नैसर्गिक सौंदर्यावर चार चाँद लावतो. पण हे झालं माथेरानचं थेट दिसणारं रूप. कधीकधी थेट समोर दिसणाऱ्या सुंदरतेला लागलेलं ग्रहण सहजासहजी दिसत नाही. माथेरानच्या बाबतीत असंच होतंय का हे ‘लोकप्रभा कॅम्पेन’च्या माध्यमातून आम्ही मांडत आहोत.

इतर लोकप्रिय स्थळांच्या तुलनेत माथेरान येथे कमालीची स्वच्छता आहे. कोणालाही चॉकलेट खाऊन वेष्टन टाकावंसं वाटलं तरी दोन वेळा विचार करावा लागेल. पण हे झालं नागरी नियम पाळणाऱ्यांसाठी.  येणारे सर्वच पर्यटक नागरी नियम पाळणारेच असतील अशा भ्रमात  राहता येत नाही. दस्तुरीला गाडी सोडून लोहमार्ग पकडण्यापूर्वीच एक टिपिकल सरकारी चौकी दिसते. त्यावर माथेरानचे वनक्षेत्र म्हणून असलेले स्थान, प्लास्टिकवर बंदी, कचरा करणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाई असं बरंच काही लिहिलेलं आहे. पण ते माहिती केंद्र इतक्या दिनवाण्या अवस्थेत आहे की तिथंच  सारं काही आलबेल नसल्याची पहिली जाणीव होते. दस्तुरीवरून नॅरोगेज रेल्वेच्या मार्गावरून जाताना ही जाणीव अधिकच बळकट करणाऱ्या गोष्टी जाणवतात. पण त्या जरा आडबाजूला डोकावल्यावरच. डोंगराचा काही भाग फोडून काढलेल्या आणि दोन्ही बाजूने झाडांनी आच्छादलेल्या मार्गावरून जाताना सारं काही आलबेल असतं. त्या शांततेनं चालण्याचे श्रम जाणवत नाहीत. ही वाट संपली की एका बाजूला दरी दिसू लागते आणि जरा काठावर जाऊन दरीत डोकावलं की प्लास्टिकच्या बाटल्यादेखील दिसू लागतात. गर्द झाडीने आच्छादलेलं समोरचं माथेरानचे टोक पाहताना पायाखालच्या कपारीतलं प्लास्टिक डाचू लागतं. इतका वेळ दिसणाऱ्या स्वच्छतेवरचा हा डाग सलू लागतो. २५-३० मिनिटांच्या तंगडतोडीत वाटेत एक दोन सरबतवालेदेखील आहेत आणि अर्थातच सोबतीला प्लास्टिकच्या बाटल्या. नियमांचे पालन करण्याची वृत्ती जशी आहे तशीच न पाळण्याचीदेखील. त्यामुळे या सरबताच्या गाडय़ांच्या बाजूला प्लास्टिकच्या काही बाटल्या आढळल्या तर नवल वाटायला नको. अर्थात एवढं सोडलं तर उर्वरित पायपीटित चुकार एक-दोन बाटल्या वाटेवर आढळतातच. माथेरान स्टेशन सध्या मिनी ट्रेन बंदच असल्यामुळे अत्यंत भकास आणि केविलवाण्या अवस्थेत उभं आहे. बाजारपेठ मात्र खरंच खूप स्वच्छ आहे. माथेरानच्या हवेपेक्षा तेथील शांतता आणि स्वच्छताच तुम्हाला खूप प्रसन्न करणारी आहे याची जाणीव होते. अशा वेळी एक-दोन ठिकाणी पडलेला प्लास्टिकचा कचरा थोडासा नजरेआड होतो हे मात्र नक्की.

बाजारपेठ ओलांडून पुढे जंगलात जाणाऱ्या वाटेला लागलं की माथेरानच्या वेगळेपणाची जाणीव ठळक होते. मुंबईपासून तासा-दोन तासांच्या अंतरावरचं नीरव असं हे ठिकाण इंग्रजांना त्यावेळी इतकं का प्रिय वाटलं असावं त्याचं उत्तर या जंगलात आहे. उंचच उंच वाढलेली आणि रस्त्यावर कमान धरणारी वृक्षराजी, प्रशस्त अशा मातीच्या रस्त्यावर मधूनमधून डोकावणारे उन्हाचे कवडसे असे मोहक वातावरण तीन-चार किलोमीटरवरील पॉइण्टला चालत जाण्यास आपसूकच प्रवृत्त करतात. संपूर्ण जंगलात पानांचा सडा पडलेला असतो. जंगलात पाय टाकला तरी पाचोळा चुरगळतो. पण त्यातच मध्येच एखादी प्लास्टिकची बाटली नाही तर चॉकलेटचे अथवा बिस्किटाच्या पुडय़ाचे रॅपरदेखील दडलेले असते. सुरुवातीलाच इको पॉइण्ट लागतो. तुलनेने अगदीच अरुंद असा हा पॉइण्ट पर्यटक आवर्जून पाहतात. तुलनेने जवळ आणि तेथे ओरडून प्रतिध्वनी ऐकायची उत्सुकता त्यामुळे येथे सतत वर्दळ सुरूच असते. त्याचबरोबर अर्थातच कडय़ावर लोंबकळत पडलेल्या बाटल्यांची, वेफर्सच्या पाकिटांची गर्दीदेखील वाढते. थेट सरळसोट खाली दरीत उतरत गेलेली कातळभिंत असल्यामुळे पॉइण्टवरून टाकलेला कचरा पार खाली दरीत जाऊनच कोसळतो. हीच गत पुढे हनीमून पॉइण्ट, लुईझा पॉइण्ट आणि मंकी पॉइण्टवर झालेली असते.

हनीमून पॉइण्ट हा अगदीच अरुंद म्हणजे दोन-तीन माणसंच उभी राहू शकतील असा. कसलेही रेलिंग नसलेला. येथे खाली उतरतानाच आजूबाजूच्या ओढय़ात बाटल्यां पडलेल्या दिसतात. येथे थेट सरळसोट कडा नाही. त्यामुळे उतारावरील झाडीझाडोऱ्यातच प्लास्टिकच्या बाटल्या अडकलेल्या दिसतात. पुढे लुईझा पॉइण्टला मात्र तुलनेने जरा दिलासा मिळतो. हा पॉइण्ट बराच मोठा. अगदी शे-दोनशे लोक सहज मावतील एवढा.  सुरुवातीस बरीच झुडपं असलेल्या लुइझावर खूपच कमी कचरा आहे. म्हणजे झुडपांमध्ये बराच दिसतो. पण काठावरून दरीत पडणारा कचरा नाममात्र.

माथेरानला येणारे पर्यटक हमखास भेट देण्याचं आणखी एक ठिकाण म्हणजे शारलोट लेक. ग्रामदैवत असणाऱ्या स्वयंभू अशा पिसरनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे येथे बरीच गर्दी असते. अर्थातच विक्रेत्यांची, हॉटेल्सची गर्दीदेखील भरपूर आहे. लेक फार मोठा नसला तरी उतारावर तयार झालेल्या सपाटीवरील हा तलाव आकर्षक आहे. मात्र त्याच्या तीरावर प्लास्टिकच्या बाटल्यांचे थर दिसून येतात. काही बाहेर काढलेल्या तर काही तरंगत आलेल्या. मंदिराच्या आसपासच्या हॉटेल्सच्या जवळच असणाऱ्या झुडपांमध्ये तर सध्या थर्माकोलच्या प्लेट्सदेखील मुबलक आहेत. दोन मिनिटांवर असलेल्या लॉर्ड पॉइन्टवर कडा नसल्यामुळे झुडपात अडकलेले प्लास्टिक दिसतेच.

गावातून जाणाऱ्या वाटांवर अथवा वाटांच्या बाजूला तुलनेने समाधानकारक स्थिती आहे. पण सर्वात धक्कादायक बाब आहे ती येथील जंगलात असणाऱ्या बंगल्यांची. बाजारपेठेतून मंकी पॉइण्टला जाताना वाटेत अनेक जुने बंगले आहेत. पूर्वीच्या काळी पारशी, गुजराती, बोहरी समाजातील लोकांनी घेतलेले हे बंगले अतिशय प्रशस्त आणि मनोहारी असे आहेत. मात्र काही बंगल्यांच्या बाहेर चक्क कचराकुंडी असावी अशीच परिस्थिती आहे. यातच एका बंगल्याबाहेरील उघडय़ावर असणारी कचराकुंडी खिन्न करणारी आहे. या बंगल्याच्या बाहेर माथेरानच्या मिनी ट्रेनच्या जनकाच्या म्हणजेच अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय यांच्या नावाचा फलक आहे. मस्त विटकरी रंगातील म्हातारीच्या बुटाची आठवण करून देणारी अशी एक मजली इमारत येथे आहे. पण या सुंदरतेला बाहेरील उघडय़ावर टाकलेल्या कचऱ्याने गालबोट लावले आहे. त्या बंगल्यात कोण राहते, त्यांचा आणि पीरभॉय यांचा काही संबंध आहे का हे कळू शकले नाही, पण अशा व्यक्तीच्या घराबाहेरच माथेरानचे नियम धाब्यावर बसवले जात असतील तर अवघड आहे.

हे झाले रहिवासी आणि पर्यटकांचे उद्योग. पण या सर्वावर कडी करणारा प्रकार नगरपालिकेने केला आहे. मंकी हिलच्या वाटेवर एके ठिकाणी थोडं खाली उतारावरील एका वाटेवर माथेरानचे डंपिंग ग्राऊंड आहे. याची जाणीव या वाटेवर मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने होते. हे डंपिंग ग्राऊण्ड म्हणजे गर्द झाडीवर लागलेल्या गालबोटासारखं आहे. गाव, वस्ती, गर्दी तेथे डंपिंग ग्राऊण्डची गरज भासणारच. पण त्याला काही तरी व्यवस्थित व्यवस्था असायला हवी. त्या व्यवस्थेची येथे पूर्णपणे वानवा आहे. परिणामी हजारो दारूच्या बाटल्यांच्या काचांचा खचाचे दोन मोठे ढीग येथे दिसतात. तर प्लास्टिकच्या बाटल्या तर चक्क जंगलातच फेकून दिल्या आहेत. उर्वरित कचरा विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेवर मोकाटपणे पसरला आहे. त्यात कुत्री, गायी, म्हशी सुखेनैव चरत असतात. माथेरानमध्ये प्लास्टिकचा कचरा फेकायला बंदी आहे, पण वापरायला नाही. मग असा ट्रक भरेल इतका कचरा निर्माण होणारच. पण त्याची विल्हेवाट लावण्याची कसलीच व्यवस्था नाही. अनेक वेळा तो जाळून टाकला जात असल्याचे सांगितले जाते. पण हे आणखीच भीषण म्हणावे लागेल. माथेरानची उंची, तेथील पावसाचे प्रमाण पाहता पावसाळ्यात हा कचरा कितपत त्याच ठिकाणी राहत असेल याबाबत नक्कीच शंका आहे. अशा वेळी गोळा केलेला हा टनावारी कचरा जंगलात वाहून जाणार नाही कशावरून. येथील सफाई कर्मचारी खासगीत सांगतात की येथून हा कचरा खाली नेणं शक्य नाही. प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करणारे काही प्रमाणात येथे असल्याचे त्यांच्याकडून समजते. पण येथेपर्यंत पोहोचण्यासाठी वाहन सुविधा नसल्याने बरेच परिश्रम करावे लागतात. मग अशा वेळी खरेतर हे प्लास्टिक नगरपालिकेनेच वाहन सुविधा असणाऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. पर्यटन कर म्हणून माणशी ५० रुपये घेतले जात असताना नगरपालिकेने कचऱ्याची ही जबाबदारी झटकून चालणार नाही.

हे सर्व वाचल्यानंतर स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य अशा माथेरानची ही अवस्था का झाली असावी, असा प्रश्न साहजिकच पडल्यावाचून राहत नाही. बहुतांश ठिकाणी कमालीची स्वच्छता असते तेव्हा तर असे डाग अगदी ठळकपणे खुपतात. आणि म्हणूनच या सर्वाची दखल घ्यावी लागते. नगरपालिकेकडून दर दोन दिवसाआड गावातील कचरा गोळा करण्याची व्यवस्था आहे. गावकरीदेखील ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवतात. ओल्या कचऱ्यापासून बॉयोगॅस तयार करणारा प्रकल्पदेखील आहे. दर आठ दिवसांनी पॉइण्टजवळच्या हॉटेलातील आणि वाटेवरील कचरा गोळा केला जातो. तरीदेखील कडय़ांवर, सांदीकोपऱ्यात, जंगलात पानांखाली असा कचरा का दडलेला दिसतो त्याचे कारण फक्त आणि फक्त भारतीय मानसिकतेत आहे. माथेरानमध्ये कचरा टाकल्यास दंड किंवा हे वनक्षेत्र असल्यामुळे काही बंधन आहेत, ही जागा प्लास्टिकमुक्त आहे असे सांगणारे एकूण एक फलक हे मराठीत आहेत. क्वचित काही ठिकाणी इंग्रजी अथवा हिंदीत आहेत. या पाश्र्वभूमीवर येथील विक्रेत्यांचा अनुभव काही वेगळाच आहे. पॉइण्टवरील जवळपास प्रत्येक विक्रेता सांगतो की परदेशी पर्यटक कुठेही कचरा टाकत नाहीत. किंबहुना ते वाटेत पडलेला कचरा गोळा करून आमच्याकडे कचराकुंडीची विचारणा करतात. ही प्रतिक्रिया जवळपास सर्वच विक्रेत्यांकडून येते. म्हणजे मग कोण कचरा करतं तर उरलेले आपणच भारतीय लोक. अगदी अगोचरपणा करून दरीत बाटली किंवा रॅपर फेकून ते वर येते का हे पाहण्याचा उद्योगदेखील काही थोर पर्यटक करत असल्याचे विक्रेते सांगतात. हे गंभीर आहे.

त्याचबरोबर दुसरी एक त्रुटी आवर्जून नमूद करावी लागेल ती म्हणजे कचराकुंडय़ांची सध्याची अवस्था. माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने जागोजागी कचऱ्यासाठी पेटय़ा बसवल्या आहेत. पण आजमितीला एकाही पेटीची अवस्था चांगली नाही. एकतर त्या गंजून गेल्या आहेत किंवा तुटक्या फुटक्या अवस्थेत आहेत. बाजारपेठ सोडल्यास पॉइण्टला जाणाऱ्या वाटेवर आणि प्रत्यक्ष पॉइण्टवर कचरा पेटय़ांचे प्रमाण अगदीच तुरळक आहे. त्यातही शिल्लक कचरा पेटय़ा गंजून तुटून निकामी झाल्या आहेत. त्यात कचरा टाकल्यास पेटीतून खालीच पडायला पाहिजे. सफाई कामगारांची मेहनत आहेच. पण तेदेखील रस्त्यावरील किंवा अगदी बाजूच्या पाणी वाहून जाण्याच्या मार्गात असलेल्याच बाटल्या व इतर कचरा उचलतात. पण जंगलात, कडय़ावर तसेच सांद्री कोपऱ्यातला कचरा तसाच राहून जातो. रस्त्यापासून १५ मीटपर्यंत नगरपालिकेची जबाबदारी आहे. तर कडय़ावरील आणि सांद्री कोपऱ्यातील कचरा गोळा करणे अशक्य असेच आहे. त्यासाठी दोर वगैरे लावून गिर्यारोहणाचं थोडंसं कसब वापरावे लागेल. परिणामी जेथून कचरा पुढे सरकू शकत नाही अशा ठिकाणी तो तेथेच साचून राहतो आणि वाहून जाणारा कचरा थेट दरीत जाऊन कोसळतो. म्हणजे एकीकडे माथेरान सुंदर, स्वच्छ आणि दुसरीकडे दऱ्यांमध्ये मात्र प्लास्टिकच्या बाटल्या अशी काहीशी येथील परिस्थिती होत आहे. त्यामुळेच आहे मनोहर तरीही.. अशी सध्या या गिरिस्थानाची अवस्था झाली आहे. आज हे प्लास्टिकच्या वापराचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी वाटत असले तरी याकडे वेळीच लक्ष देण्याच आत्यंतिक गरजेचे आहे. कारण हे असे साचलेपण वाढतच जाणारे आहे. पण खरी गरज आहे ती मुळातच मानसिकताच बदलण्याची. ती कशी बदलणार हाच खरा प्रश्न आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2