नुकतीच मकरसंक्रांत झाली. समोरच्याला तिळगूळ देऊन गोड बोलण्याची आर्जवं करणाऱ्या या सणाचं सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व आपल्याला माहीत असलंच पाहिजे.

भारतीय संस्कृतीत सूर्योपासनेची परंपरा पूर्वापारच आहे. ही परंपरा थेट वैदिक कालापासूनची आहे. ऋ ग्वेदात ‘शक्तीची देवता’ म्हणून सूर्याचा उल्लेख येतो. छांदोग्य उपनिषदात सूर्याचा उल्लेख ‘ब्रह्म’ असा केला गेलेला आहे – ‘आदित्यो’ ब्रrोती.’ ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्याने ती सर्जकतेची  देवता मनली जाते. सूर्य हाही निसर्गातील सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. तो चराचर सृष्टीला प्रकाश देतो;  जीवन प्रदान करतो आणि सृष्टीची गती नियंत्रित करतो. रात्रीचा अंधार हे अज्ञानाचे, तर दिवसाचा सूर्यप्रकाश हा ज्ञानाचे प्रतीक आहे, अशी समजूत सर्वसामान्यांच्या मनात खोलवर रुजली आहे.

अध्यात्मशास्त्रात सूर्य हा नवग्रहांचा सम्राट असल्याचे निर्देश आढळतात. ‘जपाकुसुमं संकाशं काश्यपेयं महाद्युतिम्। तमोऽरि सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्॥’ हा ‘नवग्रहस्तोत्रातील सूर्याचा पौराणिक मंत्र अनेकांच्या नित्यपठणात असतो. याशिवाय ‘ॐ आदित्याय विद्महे, प्रभाकराय धीमहि, तन्नो रवि: प्रचोदयात्।’  आणि ‘ॐ सप्ततुरुंगाय विद्महे, सहस्रकिरणाय धीमहि, तन्नसो रवि: प्रचोदयात्।’ हे सूर्य गायत्रीमंत्रही  आहेत. हिंदू धर्मात पाच उपासनापद्धती सांगितल्या आहेत. शिव, गणेश, विष्णू, सूर्य तसेच शक्तीची उपासना आहे. त्यातूनच  अनुक्रमे शैव, गाणपत्य, वैष्णव, सूर्य व शाक्त असे संप्रदाय निर्माण झाले. प्रभू रामचंद्र हे सूर्य वंशातील म्हणजे ‘सूर्यवंशी’ होते.  त्यांनी सूर्याची उपासना केल्याचे उल्लेख रामायणात आढळतात.  काळाच्या ओघात  हा सूयरेपासनेचा संप्रदाय विरळ होत गेला आणि ही उपासना इतर संप्रदायांतही रूढ झाली. आजमितीला सूयरेपासक संप्रदाय मुख्यत्वे ओरिसा प्रांतात आढळतो.

हिंदू पौराणिक  ग्रंथात सूर्याला विराट कालपुरुषाची उपमा दिलेली आहे. कालमापनातील दिवस आणि रात्र यांना सर्वार्थाने सूर्यच  कारणीभूत आहे. सूर्याचे अस्तित्व हे दिवसाचे, तर नास्तित्व हे रात्रीचे कारण आहे. भारतीयांनी कालगणना करण्यासाठी सूर्याला जसे केंद्रस्थानी गृहीत धरले, तसेच पृथ्वीच्या परिवहन आणि परिचलन या गतीही विचारात घेतल्या. याशिवाय पृथ्वीला आणखीही एक गती असते. तिला ‘परांचन’ गती म्हणतात.   या परांचन गतीमुळे  नैसर्गिक  ऋ तू आणि कालमापन पद्धती यात समन्वय राहत नाही. आधी धर्मशास्त्राची निर्मिती झाली आणि मग कित्येक  शतकांनंतर पृथ्वीच्या परांचन गतीची माहिती आपल्याला झाली. त्यामुळे धर्मशास्त्राला अभिप्रेत असलेला ऋ तू, प्रत्यक्ष निसर्गात अवतरलेला ऋ तू आणि कालमापन पद्धती यात काहीसा विसंवाद निर्माण झाला. हिंदू धर्मशास्त्राचे वैशिष्टय़ म्हणजे, त्यात ऋ तू हेच महत्त्वाचे साधन समजले गेले आहे;  ऋ त्वाधारित जीवनपद्धती स्वीकारली गेली आहे. आपल्याकडील कोणत्याही सणाकडे किंवा सांस्कृतिक उत्सवाकडे पाहिले असता हे स्पष्टपणे आढळते, की प्रत्येक सणाच्या प्रसंगी करावयाची धार्मिक कृत्ये ही त्या त्या ऋ तूशी संबंधितच आहेत.

हिंदू संस्कृतीसातत्याचे अधोरेखन करणारा दिवाळीप्रमाणेच आणखी एक महत्त्वपूर्ण सण म्हणजे मकर संक्रात. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो, त्याला ‘संक्रात’ म्हणतात. एकूण राशी बारा असल्याने  सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीतून  दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. याचाच अर्थ असा, की वर्षभरात एकूण बारा संक्राती येतात.  त्यातील सूर्याच्या कर्क आणि मकर राशींतील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे, ते उत्तरायण आणि दक्षिणायनामुळे. सूर्य २१ जून रोजी सायन कर्क राशीत प्रवेश करतो, त्या वेळी दक्षिणायनाला आरंभ होतो. त्या दिवशी  दिनमान सर्वात मोठे असते. तसेच  सूर्य २१ डिसेंबर रोजी सायन मकर राशीत  प्रवेश करतो, त्या वेळी उत्तरायणाला आरंभ होतो. त्या दिवशी दिनमान अतिशय लहान असते. हळूहळू ते मोठे होऊ लागते आणि म्हणूनच सूर्याच्या  सायन कर्क आणि मकर राशीप्रवेशाला बरेच महत्त्व आहे. आपण कालमापनासाठी जे पंचांग वापरतो, ते ‘निरयन’ आहे. त्यानुसार सूर्य १६ जुलै रोजी निरयन कर्क  राशीमध्ये, तर १४ जानेवारी रोजी निरयन मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी संक्रांती येतात. अर्थात  दरवर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीलाच  येते, हे काही खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंत लागणारा कालावधी हा ३६५ दिवस, सहा तास, नऊ मिनिटे आणि १० सेकंद एवढा आहे. ग्रेगोरियन कालगणनेनुसार  शतकपूर्तीच्या अंकास चारने भाग जात नसेल, तर ते त्या वर्षी ‘लीप इयर’ धरले जात नाही. त्यामुळे  दर ४०० वर्षांनी मकर संक्रांत  तीन दिवसांनी पुढे सरकते. तसेच दर वर्षांचा नऊ मिनिटे आणि १० सेकंद  हा काळ साठत जाऊन  दर १५७ वर्षांनी मकर संक्रांत  आणखी एक दिवस पुढे सरकते. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, १८९९ मध्ये मकर संक्रांत १३ जानेवारीला आली होती.  आता ती १४ किंवा १५ जानेवारीला येत असते. आणि इ. स. २१०० नंतर ती १६ जानेवारी रोजी येईल.

मकर संक्रांतीला सूर्याच्या गतीचे प्रतीक म्हणून शक्तिदेवता मानतात. ही शक्तिदेवता दुष्टांचा नाश करणारी आणि अंधार नाहीसा करून प्रकाश आणणारी आहे. तिला मंदा, मंदाकिनी, ध्र्वाक्षी, घोरा, महोदरी, राक्षसी आणि मिश्चिता अशी सात नावे आहेत.  मकर संक्रांतीपासून उत्तरायणाला प्रारंभ होत असल्याने, संस्कृत साहित्यात तिचा उल्लेख ‘उत्तरायणी’ असाही आढळतो. वैदिक काळात उत्तरायणाला ‘देवयान’, तर दक्षिणायनाला ‘पितृयान’ म्हटले जात असे. या कालावधीत मरण पावणारा माणूस नंतर जन्म – मृत्यूच्या चक्रात न अडकता थेट स्वर्गाला जातो, अशी समजूत आहे. महाभारतात शरपंजरी पडलेल्या भीष्मांनी उत्तरायण सुरू झाल्यावर माघ शुक्ल  अष्टमीलाच प्राणत्याग केले होते आणि त्यांचे श्राद्धही उत्तरायणातच केले गेले. सूर्यवंशी भगीरथ राजाने गंगेला पृथ्वीवर आणले आणि आपल्या पूर्वजांना सद्गती  मिळवून दिली. कपिल मुनींच्या आश्रमात गंगेचे अवतरण झाले, तो दिवस मकर संक्रांतीचाच होता. भगीरथाने गंगाजल, अक्षता आणि तीळ यांच्या साहाय्याने  श्राद्ध तर्पण  केले होते. म्हणून आजही आपल्या पितरांना  प्रसन्न करण्यासाठी तिळाचे अघ्र्य व जलतरण  करण्याची प्रथा आहे. सूर्याच्या उत्तरायणानंतर देवांचा ब्रह्ममुहूर्त उपासनेचा काळ सुरू होतो. परा व अपरा विद्याप्राप्तीचा काळही हाच आहे. साधनेची सिद्धीही याच दिवसांत होते. याच दिवशी दानधर्माचे महत्त्व आहे. ‘देवी पुराणा’त एक श्लोक आहे – ‘संक्रांतौ यानि दत्तानी दव्यकव्यानि मानवै:। तानि नित्यं ददात्यर्क पुनर्जन्मानि जन्मनि॥ याचा अर्थ असा की, मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य – कव्ये करतात, दान केलेल्या त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग आणि हरिद्वारमध्ये माघमेळा अर्थात पूर्णकुंभ व अर्धकुंभ साजरा होतो. सूर्याच्या सात किरणांचा प्रभाव वेगळा पडतो. पहिला सूर्यकिरण  आसुरी संपत्तीमूलक भौतिक प्रतिनिधित्व करणारा आहे, तर सातवा सूर्यकिरण दैवी संपत्तीमूलक आध्यात्मिक उन्नतीचे प्रतिनिधित्व करतो. सातव्या किरणाचा प्रभाव भारतातील गंगा  आणि यमुनेच्या पात्राच्या मध्यभागी दीर्घकाळ राहतो, म्हणूनच हा तेथे पर्वकाळ समजला जातो. संक्रांतीचा आदला दिवस ‘भोगी’, तर नंतरचा दिवस ‘किंक्रांत’ म्हणून साजरा करतात. भोगीच्या दिवशी घराची स्वच्छता केली जाते. किंक्रांतीचा दिवस ‘कर’ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी कोणतीही शुभ कामे होत नाहीत. किंकरासुर या राक्षसाला संक्रांतीदेवीने याच दिवशी ठार मारले, असे समजले जाते.

आपली संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने, संक्रांतीनंतर तिळा तिळाने मोठय़ा होत जाणाऱ्या दिवसामुळे शेतात अधिक काळ काम करायला मिळते, म्हणून हे दिवस आनंदाचे असतात. या दिवसांत शेतात पीक तयार होत आलेले असते. बिहार, पंजाब आणि तामिळनाडूत  मकर संक्रांतीच्या दिवशी धान्य कापण्याचा मुहूर्त धरतात. तसे पाहिले, तर एका अर्थाने हा सण निसर्गाचे ऋ ण मानण्याचा आहे. आपल्याकडे संक्रांतीच्या दिवशी पाच लेकुरवाळे घट (सुगडे) घेतात आणि त्यात हरभरा, वाटाणे, बोरे, गहू, ज्वारी, उसाचे करवे टाकून पूजा करतात व ते वाण सुवासिनींना देतात. या दिवसांत विवाहित स्रियांचे हळदी – कुंकवाचे  समारंभ होतात. तिळगूळ वाटला जातो. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत असताना, पूर्वी कटुतेने  दुरावलेले स्नेहसंबंध पुन्हा एकदा सांधले जातात आणि तिळगुळाचे माधुर्य मानवी संबंधातही खोलवर झिरपत जाते. या दिवशी विवाहित स्त्रीला तिचे आई – वडील आवर्जून  काळे वस्त्र भेट देतात. काळे वस्त्र उष्णता शोषून घेते अािण नेहमी उबदार राहते, हा त्याचा गुणधर्म थंडीत फारच उपयुक्त ठरतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र पतंग उडवण्याचा कार्यक्रम असतो. या दिवसांत पतंग उडवण्यालाही निरभ्र आकाश आणि काहीशी संथ हवा तशी पुरकच असते. पतंग उडवण्याची परंपराही संक्रांतीएवढीच जुनी आहे. ‘श्रीरामचरितमानस’मधील ‘बालकाण्डा’त रामचंद्र आपले भाऊ आणि हनुमान यांच्यासमवेत पतंग उडवत असल्याचा उल्लेख आढळतो. तुलसीदास म्हणतात – ‘राम इक दिन चंग उडाई, इंद्रलोक मे पहुँच गयी।’ (एके दिवशी रामाने पतंग उडवला, तो इंद्रलोकात गेला.) त्यांचा पतंग  इंद्रदेवाच्या सुनेने पकडला. ती विचार करू लागली. – ‘जासु चंग अस सुंदरताई। सो पुरुष जग मे अधिकाई॥’’ (ज्याचा पतंग इतका सुंदर, तो माणूस किती श्रेष्ठ असेल?) ज्याचा पतंग असेल तो त्याल घेण्यासाठी निश्चितच येईल, असा विचार करून तिने तो घरात लपवून ठेवला. आकाशात उंच उडालेला पतंग बराच वेळ झाला, तरी खाली येत नाही म्हणून, रामचंद्रांनी त्याला शोधण्यासाठी हनुमानाला पाठवले. इंद्रदेवाच्या सुनेने  तो पतंग देण्यास नकार दिला आणि पतंग उडवणाऱ्या माणसाने मला दर्शन द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली. प्रभू रामचंद्रांनी तिला चित्रकूटमध्ये दर्शन देण्याचे आश्वासन दिल्यावरच तो पतंग परत मिळाला असं सांगितलं जातं.

तर अशी ही मकर संक्रांत!
भालचंद्र गुजर – response.lokprabha@expressindia.com