लग्न आठ दिवसांवर आले आणि घरांत लगीनघाई सुरू झाली. निशाचे आई-बाबा लग्नाच्या कामामध्ये बिझी झाले. बाहेरगावाहून येणारे पाहुणे चार दिवस आधीच येणार होते. त्यांची राहण्याची सोय, हॉलचे डेकोरेशन, कॅटर्सना द्यायच्या सूचना यामध्ये निशाच्या आई-बाबांना म्हणजेच वंदना व विजयला फुरसतच मिळत नव्हती. निशाचे काही शॉपिंगपण अजून राहिले होते. एकंदर घरातले वातावरण आनंदी होते. पण या सर्वापासून निशा मात्र जरा अलिप्त होती. मनापासून आनंदी वाटतच नव्हती. वंदनाला याचा अंदाज आला होता, पण निशा काही सांगायला तयार नव्हती, तिच्या मनातले ओठापर्यंत येतच नव्हते…

मागच्याच आठवडय़ात निशा २८ वर्षांची झाली. ५ वर्षांपासून वंदना व विजय तिच्यासाठी स्थळ बघत होते. शेलाटय़ा बांध्याची, काळ्याभोर डोळ्यांची, गोरीपान निशा कुणाच्याही नजरेत भरण्यासारखी होती. पण ५ वर्षांच्या सततच्या प्रयत्नांनीसुद्धा लग्न ठरत नव्हते आणि याला मुख्य कारण म्हणजे तिच्या पत्रिकेत ठाण मांडून बसलेला कडक मंगळ.. बघूनसवरून लग्न करायचे म्हणजे मुलाकडची लोकं पत्रिका मागायचीच.. मंगळामुळे ती कुठे जुळायचीच नाही त्यामुळे बघण्याचा कार्यक्रम व्हायचा प्रश्नच येत नव्हता. मोजून ३-४ ठिकाणी निशाला दाखवले होते, पण तिथेही योग जुळून आला नव्हता. आता मात्र निशा या सर्व गोष्टींना कंटाळली होती. एकदा तर रागात ‘‘मला लग्नच करायचे नाही’’ असे बोलली होती, पण ते त्या क्षणापुरतेच होते. तरुण वयात चांगला नवरा, चांगले सासर मिळावे हे कुठल्याही मुलीचे स्वप्न असतेच आणि तसेच स्वप्न निशाचेही होते..

निशाची धाकटी बहीण निमापण आता लग्नाची झाली होती, तिलाही यंदा २२ वे वर्ष  लागले होते. काहीही झाले तरी या वर्षी निशाचे लग्न ठरलेच पाहिजे म्हणून वंदना पदर खोचून कामाला लागली होती. त्या दिवशी सहज पेपर वाचताना वंदनाची नजर त्या जाहिरातीवर गेली ‘‘देशस्थ ब्राह्मण, ३० वय, उत्तम नोकरी, पत्रिका बघायची नाही. संपर्क…’’

वंदनाने ताबडतोब फोन लावला. तो मुलाच्या आईचा मोबाइल नंबर होता. जाहिरातींचा रेफरन्स देऊन वंदनाने निशाची माहिती दिली. मुलाचे नाव अमोल देशमुख असल्याचे कळले व बाकीचीपण थोडी माहिती मिळाली. रविवारी पुन्हा एकमेकांशी बोलू असे ठरवून वंदनाने फोन ठेवला. संध्याकाळी विजय ऑफिसमधून आल्यावर तिने जाहिरातीबद्दल त्याला सर्व सांगितले. निशालापण सगळे सांगण्यात आले. एकदा भेटण्यास काहीच हरकत नाही असे सगळ्यांना वाटले. वंदनाने मग अमोलच्या आईला फोन करून भेटण्यासंबंधी विचारले. प्रथम फोटोची देवाणघेवाण झाली. फोटोची एकमेकांची पसंती कळल्यावर प्रत्यक्षात भेट झाली. आवडीनिवडी, मत विचार हे सर्व काही जुळून येतंय असं वाटलं आणि मग एकमेकांना होकार कळवण्यात आला. दोन महिन्यांनंतरची लग्नाची तारीख ठरली आणि निशाच्या आईबाबांची काळजी मिटली. अजय रुबाबदार तर होताच शिवाय नोकरी उत्तम होती. एकुलता एक असल्यामुळे कसलीही जबाबदारी नव्हती. मुंबईतच आई-बाबांचे स्वत:चे घर होते.. आणखीन काय हवे होते? उशिरा का ठरेना पण आता सर्व छान होईल असा विचार करत दोघंही लग्नाच्या तयारीला लागले. अर्थात निशाला तर आनंद झालाच होता. पण मनात कुठेतरी पाल चुकचुकत होती. आपण अमोलला फसवत तर नाही ना? हा विचार सारखा मनात येत होता.

त्या दिवशी तर तिने आईला सरळ विचारलेच की अमोलच्या आई-बाबांना व स्वत: अमोलला माझ्या मंगळाबद्दल सांगायचे का? पण आईने दिलेले उत्तरही तिला पटले. आई म्हणाली होती ‘‘निशू.. अगं त्यांना पत्रिकाच बघायची नाही, म्हणजे या सर्व गोष्टींवर त्यांचा विश्वास नसेल मग कशाला सांगायचे..सगळं जुळत आलेलं आता तू फिसकटू नकोस.. कळलं? ‘‘समजावत असली तरी आईच्या बोलण्यातली जरब तिला जाणवली आणि ती चूपचाप बसली, पण मनातून विचार काही केल्या जाईना..

वंदना मात्र अगदी उत्साहाने लेकीच्या लग्नाच्या तयारीला लागली होती. लग्न ठरत नव्हते तेव्हाच खोचक प्रश्न विचारणाऱ्या सर्व आजूबाजूच्या मैत्रिणींना तिने पत्रिका देऊन आग्रहाचे आमंत्रण केले. निशा ही ऑफिस सांभाळून तिला जमेल तशी आईबाबांना कामात मदत करत होती. तसे वरवर सगळे चांगलेच होते पण मंगळ नावाचा सल काही निशाच्या मनातून जात नव्हता.

अमोल व निशा दोघंही सॉफ्टवेअर इंजिनीअर होते- आपापल्या कामात अत्यंत हुशार व चोख लग्न ठरल्यानंतर या दीड महिन्यात बहुतेक रोजच एकमेकांना संध्याकाळी भेटायचे. गप्पागोष्टी कधी पिक्चर कधी बीचवर सूर्यास्त बघत भेळपुरी खाणं, वाचलेल्या पुस्तकांबद्दल चर्चा करणं.. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात त्यांची संध्याकाळ फुलून यायची..

अमोल कामात मग्न होता. त्याला आज संध्याकाळी एक प्रेझेंटेशन द्यायचे होते. त्याचीच तयरी चालली होती. येवढय़ात त्याचा मोबाइल वाजला, त्याने पाहिले फोन निशाचा होता. ‘‘हाय निशा बोल काय म्हणतेस?’’ अमोलने प्रश्न केला.

‘‘अमोल संध्याकाळी भेटशील?’’ अधीरतेने निशाने प्रश्न केला.

‘‘आज मला जरा उशीर होणार आहे गं. एक प्रेझेंटेशन आहे. उद्या भेटू या चालेल?’’ फोनवर बोलत असतानाही अमोलचा एक हात कीपॅडवर फिरतच होता.

‘‘आजच भेट ना.. उशीर झाला तरी चालेल, तुझ्याशी जरा महत्त्वाचे बोलायचे आहे. आपल्या लग्नासंबंधी.. ‘‘निशाच्या बोलण्यातले गांभीर्य ओळखूनही हसतच तो बोलला’’ लग्नाला फक्त ८ दिवस उरलेत. आता असे काय सांगणार आहेस की ज्याचा परिणाम लग्नावर होईल..’’

‘‘ते सगळं भेटल्यावर बोलू मी तुझी नेहमीच्या हॉटेलमध्ये वाट बघते. प्लीज येशील ना?’’ निशाला तो नाही म्हणू शकला नाही..

हॉटेल सागरमधे बसुन निशा अमोलची वाट बघत होती. अस्वस्थ मनाने हाताची बोटे एकमेकांत गुंतवून हाताचे कोपर टेबलावर ठेवून ती बसली होती. साधारण दहा मिनिटांनी अमोल आला. तिच्या समोर बसत म्हणाला ‘‘बोला राणी सरकार काय हुकूम आहे?’’

‘‘मस्करी पुरे बरं.. मेनुकार्ड बघून आधी ऑर्डर देऊ.. मग आरामात बोलता येईल. बरोबर ना?’’ त्याच्याकडे पाहात निशा बोलली.

‘‘खरं म्हणजे निशा मलापण तुला काही तरी महत्त्वाचे सांगायचे आहे, पण सांगू की नको असा विचार करत दीड महिना निघून गेला. तुझे बोलणे झाल्यावर मीपण तुझ्याशी बोलणार आहे.. पहिले आपण ऑर्डर करू.’’ अमोलने मेनुकार्ड उघडले व बघू लागला.

निशा काही बोलणार इतक्यात तिला समोरून जोशीकाकू येताना दिसल्या, जोशीकाकू त्यांच्या शेजारी राहात होत्या व अतिशय भोचक स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या बरोराबर त्यांचे मिस्टरपण होते. निशा व अमोल दाराच्या समोरच बसलेले असल्यामुळे जोशीकाकूंचे लक्ष त्यांच्याकडे लगेच गेले. तिच्या टेबलापाशी येत त्या तोंड भरून हसल्या व निशाला म्हणाल्या, ‘‘बघ शेजारी राहून तुझ्याशी कधी भेट होत नाही, पण इथे अशी झाली भेट.. हे अमोलराव आहेत ना?’’ अमोलवर तिरकस नजर टाकत जोशीकाकूंनी प्रश्न विचारला.

‘‘हो..हो.. हे अमोल देशमुख.. माझे होणारे मिस्टर आणि अमोल हे जोशीकाका आणि काकू आमच्या शेजारीच राहतात.’’ निशाने अमोलची त्यांच्याशी ओळख करून दिली. अमोलने त्यांना बसल्याबसल्याच नमस्कार केला. निशाला जरा बजूला करून तिच्या शेजारी बसत जोशीकाकू बोलू लागल्या, ‘‘अहो अमोलराव उशिरा का होईना, पण लग्न ठरले म्हणून वंदनावहिनींना खूप आनंद झाला, अगदी आठ दिवसांवर लग्न आहे ना? पत्रिका दिलीय मला आईनी.’’

‘‘हो काकू. भरपूर कामं राहिलीयेत, थोड बोलायचं होतं म्हणून भेटायचं ठरवलं, लगेच घरी जायचंय.’’ कामाची सबब सांगून त्यांना टाळायचा प्रयत्न निशा करत होती. जोशीकाकू मात्र ठाण मांडून बसल्याच होत्या, जोशीकाका मात्र ताटकळत टेबलापाशी उभे होते.

‘‘एक बरं झालं निशाच्या कडक मंगळाला जुळवून घेणारी तुमची पत्रिका जमली. वंदना वहिनींना हिच्या लग्नाचे खूप टेन्शन आले होते, पण आता सगळी काळजी मिटली. का हो, तुमचाही मंगळ कडकच आहे ना? उगाच नंतर प्रॉब्लेम नको.’’ जागेवरून उठत जोशीकाकू बोलल्या आणि अगदी अनवधनाने अमोल बोलून गेला ‘‘हो हो. माझाही मंगळ कडक आहे.. अगदी ३६ गुण जमलेत आमच्या पत्रिकेचे..’’

बॉम्बस्फोट घडवून आणून आपण मात्र त्या जागेवरून सुरक्षित बाहेर यावं अशा आविर्भावात जोशीकाकू उठून गेल्या. त्यांच्या बोलण्यामुळे निशाचे शब्दच खुंटले. विश्वासात घेऊन सांगायची गोष्ट अमोलला अशी तिसऱ्याच माणसाकडून खुलेआम कळावं याचा निशाला जबरदस्त झटका लागला. तोंडावर रुमाल ठेवत तिने आपले रडणे अडवले असले तरी डोळ्यातून अश्रू मात्र आलेच..

अतिशय चुकीच्या रीतीने अमोलला ही मंगळाची गोष्ट कळण्यापेक्षा दु:खाची गोष्ट काय असणार? तिने हळुच अमोलकडे पाहिले. तिला तो खूप अस्वस्थ वाटला.. पण त्याच्या चेहऱ्यावर राग मात्र नव्हता. एक क्षण थांबून त्याने तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघत बोलला, ‘‘देवाची मर्जी होती की एकमेकांपासून काहीही न लपवता आपले हे लग्न व्हावे. मी तुला महत्त्वाची गोष्ट हीच सांगणार होतो की मलाही कडक मंगळ आहे. बऱ्याच स्थळांकडून नकार आल्यावर आम्ही ठरवलं की जाहिरात द्यायची की पत्रिका बघायची नाही.. म्हणजे काही प्रश्न उद्भवणारच नाही. पण जसे तुझ्या मनात आले तसेच माझ्याही आले की लग्न ही गोष्ट लपवून होऊ नये म्हणून मीही तुला आज सांगणार होतो.’’

अमोलचे बोलणे ऐकताना आपण स्वप्नात तर नाही ना? असे निशाला वाटले. मंगळाचा हा गुंता इतक्या अनपेक्षितपणे आणि सहजतेने सुटेल असे दोघांनाही वाटले नव्हते, पण तसे झाले होते हे मात्र खरे.. मनाजोगे पोटभर जेवून दोघांनी आइस्क्रीमपण खाल्ले. मनातील मळभ आता निवळले होते. एकमेकांवरचा विश्वास त्यांनी गमावला नव्हता. नव्या जोमाने आता लग्नाच्या तयारीला लागायचे होते. बिल दिल्यानंतर दोघंही जोश्यांच्या टेबलाजवळ गेले आणि दोघांनी एकदम म्हंटले ‘‘थँक्यू काकू’’ आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता झपाझप हॉटेलच्या बाहेर पडले. घरी जाऊन त्यांना ही बातमी सगळ्यांना सांगायची होती..

जोशीकाकू मात्र बराच वेळ विचार करत होत्या की या दोघांनी आपल्याला थँक यू का बरं म्हटले..
वर्षा जयवंत भावे – response.lokprabha@expressindia.com