मराठी सिनेमांतील अभिनेत्रींचं वावरणं, दिसणं आता बदलू लागलंय. त्यांच्या या प्रयोगशील लुक्समागे कमाल असते स्टायलिस्ट्ची. हिंदीत स्थिरावलेला स्टायलिंग हा विभाग आता मराठीतही आलाय.

सिनेसृष्टीत दिसणं खूप महत्त्वाचं असतं. हे ‘दिसणं’ वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे. एक म्हणजे तुम्ही या सिनेसृष्टीत आहात हे दाखवणं म्हणजे विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणं म्हणजे ‘दिसणं.’ तर दुसरं, तुम्ही या क्षेत्रात वावरताना तुमचं असणं, वावरणं, स्वत:ला सादर करणं म्हणजे ‘दिसणं.’ या दोन्ही दिसण्याला तितकंच महत्त्व आहे. पुरस्कार सोहळे, कार्यक्रम अशा ठिकाणी उपस्थित राहून सिनेसृष्टीतील संपर्क वाढवणं आणि टिकून ठेवणं हे असतंच. यात काही चुकीचं नाही. पण आता कलाकार स्वत:च्या दिसण्याकडेही लक्ष देऊ  लागले आहेत. कोणत्याही कार्यक्रमात कलाकार दिसले की ते अप टू डेट दिसायचे. त्यांचे कपडे, मेकअप, अ‍ॅक्सेसरीज, फूटवेअर असं सगळंच आकर्षक वाटायचं. हे लोण हिंदीतलं. पण आता तेच मराठी सिनेवर्तुळातही दिसू लागलंय. मराठी सिनेमा बदलतोय, कात टाकतोय, त्याचे विषय प्रगल्भ होताहेत, त्याचा आशय वेगळी उंची गाठतोय हे सगळं खरं आहे. पण या सगळ्याबरोबरीने या क्षेत्रात वावरणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांच्या दिसण्यातही बदल होताना दिसतोय. ही हवीहवीशी वाटणारी लाट आता मराठी सिनेक्षेत्रात स्थिरावू पाहतेय. मराठीचा आवाका वाढलाय तसंच प्रसारमाध्यमांचा पसाराही वाढतोय. त्यामुळे मराठी कलाकारांना आता बऱ्याच चॅनलवर दिसावं लागतं, वर्तमानपत्रांसाठी फोटो आणि त्यांच्याच वेबसाइटसाठीसुद्धा कॅमेऱ्यासमोर यावंच लागतं. सोशल मीडियाचा वापरही आता वाढलाय. कलाकार एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेला तरी त्याचे तिथे फॅन्ससोबत फोटो काढले जातात आणि ते सोशल मीडियावर पोस्टही केले जातात अशा वेळी त्यांनी नीटनेटकं दिसणं अत्यंत गरजेचं आहे. ही गरज आता प्रत्येक कलाकार जाणतो. कधी, कुठे, कोणत्या कार्यक्रमासाठी जायचंय याचा संपूर्ण विचार करून कलाकार कोणते कपडे घालायचे हे ठरवतो. यासाठी कलाकार त्यातल्या जाणकार मंडळींचे सल्ले घेतात. ही जाणकार मंडळी म्हणजेच स्टायलिस्ट. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार कलाकाराने काय घालावं याबाबत ते अचूक सांगतात. सध्या मराठी सिनेक्षेत्रात स्वत:चा स्टायलिस्ट असणारे कलाकार थोडे असले तरी कार्यक्रमांपुरतं ते अशा स्टायलिस्ट्सची मदत नक्कीच घेतात. यामध्ये सध्या अभिनेत्री प्रामुख्याने दिसून येत आहेत. सई ताम्हणकर या आघाडीच्या अभिनेत्रीचे लुक्स नेहमीच वेगळे ठरत असतात. याचं कारण तिने नेमलेल्या स्टायलिस्ट्स हे आहे. सईनंतर हळूहळू आघाडीच्या अनेक अभिनेत्रींनी हा मार्ग स्वीकारला. अमृता खानविलकर, प्रिया बापट, स्पृहा जोशी, नेहा पेंडसे, पर्ण पेठे, प्रार्थना बेहेरे अशा अनेकींना प्रेक्षक वेगवेगळ्या पेहरावात बघू लागले. या अभिनेत्री सुंदर दिसतातच. त्यांचं कामंही उत्तम असतं. पण सिनेमा, मालिका, नाटकांव्यतिरिक्त इव्हेट्स, प्रमोशनच्या कार्यक्रमांमध्ये त्या वेगळ्या रूपात दिसतात त्या स्टायलिंगमुळेच. त्यांच्या वैविध्यपूर्ण लुक्समागे असणाऱ्या स्टायलिस्ट्सची ही ओळख..

आता कलाकारही दिसण्यावर मेहनत घेतात- सायली मराठे

रमाबाई रानडे ही भूमिका उत्तमरीत्या वठवल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्पृहा जोशीची विशिष्ट प्रतिमा तयार झाली होती. पण मालिका संपल्यानंतर स्पृहा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आली. मालिकेत फक्त साडी आणि पंजाबी ड्रेसमध्ये दिसणाऱ्या स्पृहाची वेगवेगळी रूपं दिसू लागली. सायली मराठे या स्टायलिस्टची ही कमाल. स्पृहा आणि सायली या दोघींचं एकमेकींशी असलेलं टय़ुनिंग छान आहे. त्यामुळे स्पृहाला काय आणि कसं हवं ते सायली जाणून असते. स्पृहासुद्धा प्रयोग करण्यास तयार असते. सायली सांगते, ‘स्पृहा आणि मी एकदा भेटलो. तीन महिने स्टायलिंगचा प्रयोग करून बघू या असं म्हणून आम्ही एकत्र काम करायला लागलो. आणि ते छान जमून आल्यामुळे मी अजूनही तिचं स्टायलिंग करते. माझा इमेज मेकओव्हरवर अजिबात विश्वास नाही. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व, स्वभाव लक्षात घेत तिचा लुक ठरवावा, असं मला नेहमी वाटतं. उगाच काहीतरी प्रयोग करायला गेलो तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व कुठेतरी हरवतं. ती व्यक्ती ओळखताच येऊ  नये इतका तिचा लुक बदलू नये, असं माझं मत आहे. म्हणूनच मी स्पृहाच्या बाबतीत हळूहळू प्रयोग केले. त्या प्रयोगांना स्पृहानेही चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच आता आम्ही आणखी नवनवीन गोष्टी करत असतो.’ आद्या हा सायलीच्या ज्वेलरी कलेक्शनचा ब्रॅण्ड आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. सायली खरं तर कॉम्प्युटर इंजिनीअर आहे. ९ र्वष तिने नोकरीही केली. काही र्वष नोकरीनिमित्त लंडन, दुबई, साऊथ आफ्रिका अशा देशांमध्ये ती राहिली आहे. ‘परदेशात राहात असताना ऑफिसनंतर माझ्याकडे बराच वेळ असायचा. त्या वेळेत मी ज्वेलरी कशी करतात, त्यातले प्रकार काय या उत्सुकतेपोटी काही साध्या प्रकारचे कानातले करून बघितले. जमतंय असं वाटलं. पुढे स्वत:च शिकत गेले. प्रयोग म्हणून फेसबुकवर त्याचं एक पेज सुरू केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि नंतर नोकरी सोडून मी पूर्ण वेळ हे करायला सुरुवात केली’, सायली सांगते. व्यवस्थित अभ्यास करून सायली या क्षेत्रात उतरली आहे. राजस्थानला काही दिवस राहून तिने तिथल्या ज्वेलरीची माहिती मिळवली. तर जयपूरला जाऊन तिथे स्टोन्सना कसं पॉलिश करतात हेही शिकली. ‘मी आजही ज्वेलरीसंदर्भात सतत वाचत असते, अभ्यास करत असते. मी माझ्या ग्राहकाला एखादा दागिना घेण्याबाबत सुचवत असेन तर माझ्याकडे त्याविषयीची संपूर्ण माहिती खरी आणि अभ्यासपूर्ण असायला हवी’, असं सायलीचं मत आहे. कलाकारांचे इव्हेंट्स कधी कधी लागोपाठ असतात. अशा वेळी स्टायलिंग करताना अडचण येऊ  शकते. पण सायली यावरही एक पर्याय सांगते, ‘आम्ही एक बँक करून ठेवतो. स्पृहाला जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा आम्ही भेटतो आणि काही लुक्सच्या बँक्स करून ठेवतो. म्हणजे कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज दोन्ही तयार ठेवतो. कधी दोन दिवसांनी एखादा इव्हेंट असेल आणि स्पृहा बिझी असेल तरी बँक असल्यामुळे गडबड होत नाही.’ सायलीने स्पृहाप्रमाणे पर्ण पेठे या अभिनेत्रीचंही स्टायलिंग केलं आहे. गिरीजा ओक आद्या कलेक्शनच्या ज्वेलरी अनेकदा वापरते. सायली कधी कधी विभावरी देशपांडेचंसुद्धा स्टायलिंग करते. ‘मराठी सिनेसृष्टीत होणारा हा बदल स्वागतार्ह आहे. मराठी कलाकाराचं काम उत्तम असूनही राहण्याबाबत ते काहीसे मागे पडायचे. पण आता कलाकार याची काळजी घेतात. मराठी कलाकारांच्या मनात असलेला दिसण्याबाबतचा न्यूनगंड हळूहळू कमी होतोय. एखाद्या कार्यक्रमाला जाताना काय घालावं, याचा विचार आता केला जातो. कलाकार त्यावर मेहनतही घेतो, ही चांगली बाब आहे’, सायली सांगते.

मराठी चित्रपटसृष्टीत कामाचा आनंद मिळतो- नेहा चौधरी

‘सारेगमप’ हा मराठी रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला आणि चर्चेचा विषय बनला, पल्लवी जोशी या सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेत्रीचा पेहराव. तिच्या पेहरावात साडीचा प्रामुख्याने वापर होता. पण त्या साडय़ांमध्ये असलेलं वैविध्य आकर्षित करणारं होतं. भडक-सौम्य रंग, मिसमॅचचा ट्रेण्ड तेव्हा खूप गाजला. हा प्रयोग करणारी फॅशन डिझायनर होती नेहा चौधरी. सारेगमपच्या पहिल्या एपिसोडमध्ये तिने पल्लवीचं गुलाबी साडी आणि त्यावर काळ्या रंगाचं ब्लाऊज असं स्टायलिंग केलं होतं. सुरुवातीला पल्लवीलाही ती रंगसंगती बघून आश्चर्य वाटलं होतं. पण नंतर तिलाही ते आवडू लागलं. या हट के ट्रेण्डला लोकप्रियताही मिळाली. नेहाची क्रिएटिव्हिटी आजही वेगवेगळ्या कार्यक्रमांत दिसून येते. झी मराठीच्या अनेक इव्हेंट्समध्ये कलाकारांचं स्टायलिंग ती करते. ‘चला हवा येऊ  द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं स्टायलिंगही ती करते. विविध कार्यक्रमांमध्ये जाण्यासाठी नेहा सई ताम्हणकरचं स्टायलिंग करते. सई प्रयोग करण्यात नेहमीच पुढे असते असं नेहाही सांगते. ‘सई सतत नवीन काही करू पाहात असते त्यामुळे मलाही वेगवेगळ्या गोष्टी करून बघायला हुरूप येतो. ती नवनवे ट्रेण्ड्स सुरू करते.’ अमराठी असूनही नेहाने मराठी सिनेसृष्टीसाठी काम करायचं ठरवलं. याबाबत तिचं मत स्पष्ट आहे. ती सांगते, ‘‘फॅशनला कोणत्याही भाषेची गरज नाही. फॅशन डिझायनिंग, स्टायलिंग मला मनापासून आवडतं. ते काम करायला मिळणं आणि केलेल्या कामाचं समाधान असणं ही आनंद देणारी गोष्ट आहे. हा आनंद मला मराठी सिनेसृष्टीत काम करूनही मिळतोय. तसंच मराठी सिनेसृष्टी आता वेगळ्या स्वरूपात, रंगात प्रेक्षकांसमोर येतेय. तिचा आवाका वाढतोय. तिथली निकोप स्पर्धा वाढतेय. मला हे सकारात्मक वाटतं.’’ सध्या नेहा सईसाठी तिच्या सगळ्या कार्यक्रमांचं स्टायलिंग करतेच, शिवाय ‘बेंच’ या नावाने तिनं कपडय़ांचा स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केलाय. नेहाच्या स्टायलिंगच्या विविध कल्पनांमुळे अभिनेत्रींची वेगळी ओळख प्रेक्षकांमध्ये होते.

मराठीतही लूक्सबाबत जागरुकता आलीय- सायली विद्या

फॅशन डिझाइनचं शिक्षण घेतलेली सायली विद्या आधी अनिषा गांधी या फॅशन डिझायनरसोबत काम करत होती. तिथे तिने दिव्या कुमार खोसला, रिचा चड्डा, लॉरेन गॉटलिब, तुलसी कुमार अशा अनेक सेलिब्रिटींसाठी काम केलं. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात मनासारखं समाधान मिळणारं काम करत असल्यामुळे ती खूश होती. पण नंतर तिच्या मनात एक विचार आला. तिला वाटलं मराठीमध्ये कलाकारांचं स्टायलिंग फारसं कोणी करत नाही. म्हणून ती स्टायलिंग या क्षेत्राकडे वळली. ‘‘मराठीमध्येही आता हिंदीप्रमाणेच इव्हेंट्स, प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटी असतात. त्यासाठी मराठीमध्ये कलाकारांसाठी स्टायलिंग करायला हवं असा विचार मनात आला आणि मी काही कलाकारांना त्यांचे पीआर, मॅनेजर यांच्यामार्फत विचारू लागले. कलाकारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर विशिष्ट कार्यक्रमांसाठी विशिष्ट कलाकारांचं स्टायलिंग करायला सुरुवात केली.’’ सायली सांगते. प्रत्येक कार्यक्रमात सई ताम्हणकरचा लुक वेगळा दिसून येतो तो याच स्टायलिंगमुळे. सईचं स्टायलिंग सायली विद्या आणि नेहा चौधरी या दोघी करतात. सईच्या इव्हेंटच्या तारखा आणि त्या दोघींच्या तारखा लक्षात घेऊन सईचं स्टायलिंग केलं जातं. सायलीने अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, सुबोध भावे, अंकुश चौधरी, प्रार्थना बेहेरे, वैभव तत्ववादी अशा अनेक कलाकारांचं विशिष्ट कार्यक्रमांसाठी स्टायलिंग केलं आहे. एका नामांकित मराठी पुरस्कार सोहळ्यासाठी तिने अंकुश चौधरी, अमृता खानविलकर आणि सुबोध भावे यांचं स्टायलिंग केलं होतं. कलर्स मराठीवरील ‘टू मॅड’ या शोच्या प्रोमोमध्ये तीन परीक्षक म्हणजे उमेश जाधव, संजय जाधव, अमृता खानविलकर आणि अँकर अमेय वाघ यांचं स्टायलिंग केलं आहे. इव्हेंट्सव्यतिरिक्त कामासंदर्भातील भेटीगाठी यासाठीही सईचं स्टायलिंग सायली करते. सईचे नेहमीच वेगवेगळे लुक्स दिसतात. त्याबाबत सायली सांगते, ‘‘सईला विविध प्रयोग करायला आवडतात. तिला सतत काही ना काही नवीन प्रयोग करून बघायचं असतं. तिला खूप जास्त अ‍ॅक्सेसरीज आवडत नाहीत. ती सगळ्या प्रकारच्या कपडय़ांमध्ये कम्फर्टेबल असते. पण तिचा आवडता प्रकार इंडो-वेस्टर्न आहे.’’  सायली कलाकारांच्या स्टायलिंगसह इतर क्षेत्रातील काही फोटोशूट्सही करते. त्यामध्ये कॅटलॉग शूट्सचाही समावेश असतो. मराठी सिनेसृष्टीतल्या कलाकारांच्या स्टायलिंगच्या नव्या ट्रेण्डबद्दल सायली सांगते, ‘‘मराठी सिनेमा मोठा होतोय. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचतो. मराठी सिनेमाचं वर्तुळ मोठं होतंय तसं त्यामध्ये असलेल्या कलाकारांनीही त्यानुसार बदलायला हवं. हे कलाकारांना आता समजू लागलंय. म्हणूनच अनेक कलाकार इव्हेंट्स, प्रमोशनचे कार्यक्रम, मीटिंग अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाताना स्वत:च्या दिसण्याकडे लक्ष देतात. ही सकारात्मक गोष्ट मला आवडते. मी आताच्या या ट्रेण्डचा भाग असल्याचा मला आनंद आहे.’’ सायलीची क्रिएटिव्हिटी, नवनवीन कल्पना यातून निर्माण होणारा लुक कलाकारांचं सौंदर्य आणखी खुलवतो.

कलाकारांना प्रेझेंटेबल असण्याचं महत्त्व समजलंय- श्वेता बापट

मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, नरेंद्र कुमार या नावाजलेल्या फॅशन डिझायनर्ससोबत काम केल्यानंतरही श्वेता बापटला मराठी इंडस्ट्रीत यावंसं वाटलं. याचं निमित्त ठरलं प्रिया बापट या अभिनेत्रीसाठी स्टायलिंग करण्याचं. प्रियाने तिला ‘स्टायलिंग करशील का’ असं विचारल्यावर श्वेतालाही ते आव्हान वाटलं. ‘मला फॅशन डिझायनिंगचा अनुभव होता. पण स्टायलिंग मी कधीच केलं नव्हतं. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. माझ्यासाठीसुद्धा हा बदल होता. प्रिया माझी बहीणच असल्यामुळे आमचं टय़ुनिंग चांगलं होतंच. तिच्या आवडीनिवडीही मला माहीत होत्या. आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो. तिलाही ते आवडत असतात.’ या स्टायलिंगच्या ट्रेण्डमध्ये अनेकदा दोन अभिनेत्रींचे सारखे कपडे असणं, दोघींच्या स्टाइल सारख्या असणं अशा बातम्या झटपट पसरत असतात. िहदीमध्ये हा प्रकार सर्वाधिक दिसून येतो. तो मराठीत दिसू नये यासाठी श्वेताचा नेहमी प्रयत्न असतो. ती सांगते, ‘‘प्रियाच्या बाबतीत असं होऊ  नये म्हणून मी सतत विचार करत असते. इन्स्ताग्राम, फेसबुक, ट्विटर अशा वेगवेगळ्या सोशल साइट्सवर अनेक कलाकारांना मी फॉलो करते. त्यांच्या स्टायलिंगवर लक्ष ठेवते. प्रिया स्वत: सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तीसुद्धा अनेक गोष्टींचं निरीक्षण करत असते.’’ कलाकार एका कार्यक्रमात घालून आलेले कपडे दुसऱ्या कार्यक्रमात कधीच घालून येताना दिसत नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या कपडय़ांचं प्रमाण वाढत असेल आणि ते एवढय़ा कपडय़ांचं काय करतात असा विचार सर्वसामान्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. यावर श्वेता सांगते, ‘‘इव्हेंट्समध्ये कलाकार तेच तेच कपडे घालून जात नाहीत हे खरंय. पण त्यामुळे कलाकारांच्या कलेक्शनमध्ये नेहमीच वाढ होते असं नाही. माझं स्वत:चं एक कलेक्शन आहे. मी कधी कधी त्यातले कपडेसुद्धा वापरते.’’ श्वेता प्रियाच्या इव्हेंट्सव्यतिरिक्त मीटिंग्ससाठीही स्टायलिंगही करते. मीटिंग किती महत्त्वाची आहे, कशा संदर्भात आहे याचा विचार करून नंतरच तिचा पेहराव ठरवला जातो. ‘‘कलाकारांनी सिनेमाव्यतिरिक्तही उत्तमरीत्या कॅमेऱ्यासमोर आलं पाहिजे, हे आता कलाकारांना कळू लागलंय. इंडस्ट्रीत एका कलाकाराने अशा प्रकारे राहायला सुरुवात केली की इतरही कलाकारांमध्ये तो ट्रेण्ड पसरतो. ही चांगली गोष्ट आहे. मराठी कलाकारांचं अभिनयाचं नाणं खणखणीतच असतं. त्यामुळे त्यांना कधी स्टायलिंगची गरज भासली नाही. पण आता सिनेसृष्टीत होत असलेल्या बदलांमुळे कलाकारांना प्रेझेंटेबल राहणं महत्त्वाचं वाटू लागलंय,’’ असं श्वेताचं मत आहे. श्वेता सध्या झी युवावरील ‘बन मस्का’ या मालिकेचं स्टायलिंग करते. शिवाय श्वेताचा सवेंची नावाचा टेक्स्टाइलचा ब्रॅण्डही आहे.

चैताली जोशी -@chaijoshi11

response.lokprabha@expressindia.com