निसर्गाने इतर सर्व प्राण्यांना काही ना काही तरी शारीरिक सामथ्र्य दिलं आणि माणसाला बुद्धी दिली. माणूस त्याच्या या बुद्धीचा वापर करूनच इथवर आला आहे. तिच्यामुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला आहे. अर्थात सगळ्याच माणसांच्या बुद्धीचा यथायोग्य वापर होतो असं नाही. याचं कारण प्रत्येकाकडे असलेलं बौद्धिक सामथ्र्य ओळखता येतंच असं नाही. बुद्धीच्या वापराच्या बाबतीत आपण नेहमी पाहतो की शाळेत गणितात ढ म्हणून ओळखला जाणारा एखादा मुलगा, त्याच्याकडे असलेली खेळणी मोजताना कधी चुकत नाही. किंवा गणिताची आवड नाही म्हणून त्याला ढ ठरवलं गेलं असलं तरी त्याला संगीतात विलक्षण रुची असते. याचं कारण त्याची बुद्धिमत्ता त्या पातळीवर विकसित झालेली असते. पण ही गोष्ट लक्षातच घेतली जात नाही आणि विशिष्ट चौकटीसाठी त्याच्याकडे बुद्धी नाही, असा उगीचच निष्कर्ष काढला जातो. हे समज दूर करून बुद्धी म्हणजे नेमकं काय, ती कशी काम करते, भाषिक-वाचिक, गणिती, गणिती तार्किक, संगीतविषयक, शरीर स्नायूविषयक, आंतरव्यक्ती, व्यक्तीअंतर्गत, दृश्य अवकाशीय, निसर्गविषयक या वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्या कशा ओळखायच्या या सगळ्याची माहिती या पुस्तकात आहे. याशिवाय यापैकी आपल्याकडे कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे, हे तपासण्यासाठी चाचणीही दिली आहे. ती पुस्तकातच सोडवायची आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींबद्दलही पुस्तकात माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तांना चालना देण्यासाठी काय काय करायला हवं, याबद्दल टिप्स दिलेल्या आहेत. बुद्धिमत्तांना चालना देण्यासाठी कृती कार्यक्रम दिलेले आहेत. भावनिक बुद्धिमत्ता हे प्रकरण भावनिकता या विषयाचं विश्लेषण करतं. बुद्धीबरोबरच भावना हे माणसाचं महत्त्वाचं वैशिष्टय़ं आहे. पण आपल्या भावनांचं नीट विश्लेषण करता न आल्यामुळे आपण खूपदा मुलांच्या भावनांच्याबाबतीत कसे चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतो, त्याचे परिणाम काय होतात, त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद दिला तर काय होऊ शकतं याची माहिती लेखिकेने दिली आहे. त्याचबरोबर भावनांच्या हाताळणीसाठी केल्या गेलेल्या उपक्रमांची रंजक माहिती आहे. या सगळ्यातून बुद्धिमत्ता या घटकाचं चांगल्या पद्धतीने आकलन होत जातं. प्रस्तावनेत हे पुस्तक नववी दहावीच्या पुढच्या कोणासाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे, असं म्हटलं आहे. मुलांपेक्षाही त्यांच्या पालकांना या पुस्तकाची जास्त गरज आहे, हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं.
बहुरंगी बुद्धिमत्ता, डॉ. श्रुती पानसे, मूल्य- १२५ रुपये, पृष्ठे- १०८

आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव देणारा मेंदू हा आपल्या शरीरातला महत्त्वपूर्ण अवयव आहे. पण त्याच्याबद्दल आपल्याला जेवढी माहिती असायला हवी तेवढीसुद्धा माहिती नसते. मेंदू आणि शिक्षण या विषयावर पीएच. डी. केलेल्या डॉ. श्रुती पानसे यांनी डोक्यात डोकवा या आपल्या पुस्तकातून मेंदूबद्दल, त्याच्या रचनेबद्दल, कामांबद्दल, त्याच्या क्षमतांबद्दल, आपण आपला मेंदू कसा समजून घ्यायचा, त्याचा वापर कसा करायचा याबद्दल फार सहजसोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे. नववी-दहावीपासून पुढच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा चांगला उपयोग होऊ शकतो. मेंदूचं महत्त्व ठसवताना लेखिकेने वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. त्यामुळे विषय समजायला, लक्षात राहायला सोपं जातं. मुळात मेंदूची रचना, कार्य समजल्यावर आपल्या वागण्याचे अर्थ आपल्याला लावता येऊ शकतात. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यावर आपण आपल्या मेंदूला सवयी कशा लावायच्या, स्वत:ला त्यानुसार कसं बदलायचं हे समजत जातं. आपलं हेड ऑफिस, स्मृतींची साठवण, डाव्या मेंदूचा वर्ग, अवघड करा सवघड, लॉजिक शोधा अशा स्वरूपाची वेगवेगळ्या प्रकरणांची आकर्षक शीर्षके ते प्रकरण वाचायला भाग पाडतात. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी ‘करके देखो’ अशी त्या विषयाशी संबंधित टीपही दिलेली आहे. मुलांसाठी सोप्या मराठीतलं हे पुस्तक माहितीपूर्ण आहे.
डोक्यात डोकवा, डॉ. श्रुती पानसे, नितीन प्रकाशन, मूल्य- १२५ रुपये, पृष्ठे झ्र् ११०

एका सामान्य माणसाचा, त्याच्या आयुष्याचा प्रवास पुस्तकात साध्यासोप्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यात कोणताही अभिनिवेश नाही, बडेजाव नाही, मी काय पाहिलं-भोगलं असा ऊरबडवेपणा नाही. वाटय़ाला आलेलं आयुष्य जगताना जे जे सामोरं आलं ते स्वीकारत, प्रवाहाबरोबर जात आपली प्रगती करून घेणारा, जगण्याचा स्तर उंचावत जाणारा माणूस या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून दिसतो. कुठलीही नाटय़मयता नसलेलं, पण जगण्याच्या संघर्षांची अपरिहार्यता असलेलं आयुष्य वाचायला मिळतं.
आयुष्य- एक प्रवास ५० वर्षांचा, नल शिर्के, शाश्वत पब्लिकेशन, मूल्य- ५० रुपये, पृष्ठे – ३२

वाढते वजन अपरिहार्य अशा आधुनिक जीवनशैलीचे बायप्रॉडक्ट आहे. रोजची धावपळ, व्यायामाला कमी वेळ, वाढलेल्या जीवनमानामुळे चांगलेचुंगले, चवीढवीचे, भरपूर फॅट्स असलेले खाद्यपदार्थ हवे तेव्हा उपलब्ध असणं, जंक फूडचा मारा, ताणतणाव या सगळ्याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो. हल्ली लहान, शाळकरी वयातच स्थूलता येत असल्याचे संशोधन अलीकडेच पुढे आलो आहे. थोडक्यात, वजन वाढणे आणि ते नियंत्रणात न येणे ही समस्या आता अनेकांना भेडसावत असते.

‘स्थूलतेला करा टाटा’ या पुस्तकात बोरकर डॉक्टरद्वयीने ही समस्या आणि ती सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची चर्चा केली आहे. ‘आपले वजन का वाढते’ या प्रकरणात आपल्याला स्थूलत्व नेमके कशामुळे येते याबद्दलची चर्चा आहे. आपण स्थूल आहोत का, हे कसं ओळखायचं याबाबत आपल्याला दुसऱ्या प्रकरणात दिलेल्या तक्त्यावरून समजतं. आपला आहार संतुलित हवा म्हणजे नेमकं काय याबरोबरच संबंधित सगळ्या घटकांची माहिती देण्यात आली आहे. स्थूलतेच्या परिणामाची तपशीलवार चर्चा अतिरिक्त मेदसंचितीचे दुष्परिणाम या प्रकरणात मांडले आहेत. त्यात स्थूलतेचा आयुर्मानावर, श्वसनसंस्था, पचनसंस्थेवर होणारा परिणाम, स्थूलतेमुळे होणारी सांधेदुखी, येणारा थकवा, कंबरदुखी, टाचदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, मधुमेह, प्रजनन संस्थेवर होणारा परिणाम, स्थूलता आणि अंतस्रावी ग्रंथी, त्वचेवर होणारा परिणाम, हृदयविकाराचा स्थूलतेशी असलेला संबंध, त्यावर उपाय याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.

वयात येताना होणारे मानसिक बदल आणि त्यांचा स्थूलतेशी असणारा संबंध, अशा वेळी पौगंडावस्थेतील मुलांशी कसं वागायला हवं, स्थूलता आणि उपवास यांचा काय संबंध आहे, पाणी पिण्याचे वजनाशी नेमके काय नाते आहे, कॅलरी मोजून आहार घेण्याचे सध्याचे फॅड आणि वस्तुस्थिती नेमकी काय असते या सगळ्या माहितीबरोबरच वजन कमी करण्याचे शास्त्रही हे पुस्तक सांगते. वजन कमी करण्यासाठी आहार काय असावा त्याचा तक्ताही पुस्तकात दिला आहे. आहारासंबंधी दिलेल्या टिप्स वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला उपयोगी पडू शकतात. डॉक्टरांनी मांडलेले रुग्णानुभव हे वाचकांसाठी आरशासारखे ठरू शकतात.

स्थूलता आणि व्यायाम, व्यायामाची त्रिसूत्री ही प्रकरणंही महत्त्वपूर्ण माहिती देतात. पण यात मांडलेली माहिती आणखी तपशीलवार असायला हवी होती, असं वाटत राहतं. पुस्तकाबरोबरच डीव्हीडीही देण्यात आली आहे. त्यात चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे वेगवेगळे, सोपे व्यायामप्रकार दिले आहेत. पुस्तक आणि डीव्हीडी असा हा मराठीतला पहिलाच कॉम्बीपॅक असल्याचा प्रकाशकांचा दावा आहे.
स्थूलतेला करा टाटा, डॉ. आशिष बोरकर, डॉ. गौरी बोरकर,   मेहता पब्लिशिंग हाऊस, मूल्य- ९५ रुपये, पृष्ठे- ८२

संत कबीर हे नाव ऐकल्यावर कुणीही भारतीय माणूस आदराने नतमस्तक होतो. कबीरांच्या रचना आजही ठिकठिकाणी आनंदाने, प्रेमाने, भक्तिभावाने गायल्या जातात. फगवा ही त्यांनी केलेली महत्त्वपूर्ण काव्यरचना. मराठी वाचकाला ती फारशी परिचित नाही. जशा आपल्या अभंग, ओव्या, गवळणी या रचना आहेत, तशाच कबीरांच्या फगवा या वैशिष्टय़पूर्ण रचना आहेत. बिहारमध्ये भोजपुरी भाषेत होळीला फगवा असं म्हटलं जातं. उत्तर भारतात फार पूर्वीपासून होळी हा महत्त्वाचा सण आहे. स्रीपुरुष अतिशय उत्साहाने, आनंदाने, नाचत गात, एकमेकांवर रंग उडवत तो साजरा करतात. कबीर संप्रदायातही होळीचा सण साजरा केला जात असे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे होळी खेळण्यापेक्षा परमात्म्याशी भक्तीची होळी खेळा, तुम्ही तुमच्या आत्मारामाशी होळी खेळा असा संदेश कबीरांनी आपल्या फगव्यांमधून दिला आहे.
कबीरांचा फगवा, संजय बर्वे, प्रकाशक- युवा समूह, मूल्य- १०० रुपये,  पृष्ठे- ४२

संत कमाल हे संत कबीरांचे पुत्र तसंच शिष्य म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचं अभ्यासपूर्ण चरित्र या पुस्तकातून मांडलं आहे. कमाल यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे लेखकाला ही माहिती मिळवण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले आहेत. सहसा मोठय़ा वृक्षाखाली लहान झुडपं किंवा वेलीच वाढतात. दुसरे वृक्ष वाढू शकत नाहीत. त्यामुळे कबीरांच्या प्रभावाखाली असताना स्वत:चा वेगळा अमीट असा ठसा निर्माण करणाऱ्या संत कमाल यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळेपण लक्षात येतं. त्यांच्या नावाने दक्षिणेत काही वेगळे पंथ आहेत, किंवा काही ठिकाणी त्यांना कबीरांचा दत्तक पुत्र मानलं जातं. कबीरपंथी लोक त्यांना कबीरांचा मुलगा मानत नाहीत. कमाल यांनी मात्र कहे कमाल कबीर का बेटा अशा रचना केल्या आहेत. त्यांना संत म्हणून लोकांमध्ये खूप मान होता. कमल यांचं काम, त्यांच्या रचना या सगळ्याबद्दल पुस्तकात माहिती आहे. ती नवीन असल्यामुळे उद्बोधक आहे, पण ती मांडण्याची भाषा काहीशी क्लिष्ट आहे.
कबीरपुत्र कमाल, संजय बर्वे, विजय प्रकाशन, मूल्य- ७५ रुपये, पृष्ठे- ८०
response.lokprabha@expressindia.com