मराठी विज्ञान परिषदेचे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन गेल्याच आठवडय़ात पार पडले.   या अधिवेशनात विज्ञानविषयक विविध परिसंवाद, व्याख्याने, चर्चासत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

एखादी संस्था सातत्याने कल्पक उपक्रम राबवत लोकभाषेतून विज्ञानासारख्या गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या विषयाचा प्रसार करीत टिकून आहे; इतकेच नव्हे तर ती सतत वर्धिष्णू राहत आली असेल तर ते कोणत्याही समाजाला नक्कीच भूषणावह आहे. अशी एक संस्था महाराष्ट्रात गेली पाच दशके मराठीतून विज्ञानप्रसाराचे कार्य करीत आहे, ती म्हणजे ‘मराठी विज्ञान परिषद’! २४ एप्रिल १९६६ रोजी स्थापन झालेल्या परिषदेने गेल्या पाच दशकांपासून मराठीतून विज्ञान प्रसार करीत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवले आहेत. समाजातल्या तळागाळापर्यंत विज्ञान पोहोचविण्याबरोबरच शालेय व महाविद्यालयीन मुलामुलींमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांना संशोधनाकडे उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही परिषदेने विशेष प्रयत्न केले आहेत. राज्यातल्या निरनिराळ्या स्तरातील व भागांतील लोक परिषदेच्या रचनात्मक कार्यात सहभागी होत असतात. यात जागतिक स्तरावरच्या संशोधकांपासून ते शेतकरी, साहित्यिक, शिक्षक, गृहिणी, विद्यार्थी या सर्वाच्या सहभागातून परिषदेने ग्रामीण भागातही आपले विभाग स्थापन केले आहेत. विज्ञानप्रसारासाठी आपले घर, संसार सांभाळून फावला वेळ देणाऱ्या व निरपेक्ष वृत्तीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर परिषदेने आपल्या कार्याचा विस्तार केला.

यंदा परिषदेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अणुशक्तिनगर येथील सभागृहात १५ ते १७ जानेवारी दरम्यान सुवर्णमहोत्सवी ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन’ भरवण्यात आले होते. राज्यभरातील कार्यकर्त्यांनी, संशोधकांनी व विज्ञानप्रेमींनी हजेरी लावलेल्या या अधिवेशनात तिन्ही दिवस विज्ञानविषयक विविध परिसंवाद, व्याख्याने, चर्चासत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘विज्ञानवेध-२०२५’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेल्या या अधिवेशनाचे यंदाचे अध्यक्ष आय.आय.टी.,पवईचे माजी संचालक प्रा. सुहास सुखात्मे हे होते.

१५ जानेवारीला झालेल्या अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी आपल्या अध्यक्षीय बीजभाषणात प्रा. सुखात्मे यांनी ‘भविष्यात अक्षय ऊर्जास्रोत भारताला पर्याप्त वीज पुरवू शकतील का,’ या विषयाचा ऊहापोह केला. सध्या आपल्या देशात ८० टक्के वीज जीवाश्म इंधनापासून तयार होत असून हे ऊर्जास्रोत येत्या शतकात संपणार असून भविष्यात अपारंपरिक ऊर्जास्रोतच आपल्याला तारणार असल्याचे सांगितले. पुढच्या ५०-६० वर्षांनंतर भारताला प्रतिवर्ष ६८०० अब्ज युनिट इतकी वीज लागणार असून यापैकी ६५०० अब्ज युनिट वीज सौर व वायू अपारंपरिक स्रोतांपासून मिळू शकते. यासाठी आतापासूनच आपण प्रयत्न करायला हवेत, असे ते या वेळी म्हणाले. आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले की कोणत्याही देशाचे दरडोई वीज वापर व मानव विकास निर्देशांक यांचा परस्परांशी संबंध असतो. दरडोई वीज वापर वाढल्यास विकास निर्देशांकही वाढत असून यासाठी सर्वाना सतत वीज पुरवण्याची आवश्यकता आहे. सध्या देशात या दृष्टीने संशोधन होत असून लवकरच वीजपुरवठय़ाचे स्मार्ट जाळे उभारण्याचे आपल्यासमोर आव्हान असून ते प्रत्यक्षात आल्यास विजेचे न्यायपूर्ण व समतायुक्त वितरण करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. प्रा. सुखात्मे यांच्या भाषणाने वीजनिर्मितीमधील विविध पैलू सर्वाच्या समोर आले.

अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ. जे. बी. जोशी, सचिव अ. पां. देशपांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. परिषदेच्या कार्याला शुभेच्छा देतानाच त्यांच्या कार्याचा अजूनही विस्तार व्हायला हवा, असे सांगतानाच देशात सध्या वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आवश्यकता असल्याचेही या वेळी डॉ. काकोडकर आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. या वेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रसायन अभियंता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मनमोहन शर्मा यांना परिषदेचे सन्मानीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. आतापर्यंत डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. माधव गाडगीळ, प्रा. एकनाथ चिटणीस यांना परिषदेने सन्माननीय सदस्यत्व दिले आहे. तसेच विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना परिषदेकडून दर वर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाही प्रा. माधुरी शानभाग, डॉ. लालचंद पाटील व डॉ. रेखा सिंघल यांना त्यांच्या विज्ञान प्रसाराच्या व संशोधनातील कार्याबद्दल गौरविण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सांगीतिक मैफिलीचेही आयोजन करण्यात आले होते.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी प्रा. डॉ. मनमोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतातील विज्ञान तंत्रज्ञान संस्थांचे योगदान व आव्हाने’ या विषयावर झालेल्या परिसंवादात भारतातील महत्त्वाच्या विज्ञान संस्थांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यात भाभा अणुसंशोधन केंद्राचे रसायन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. जगताप, दिल्लीच्या ए,.एफ.सी.आय.सी.ए.आर.चे संचालक डॉ. सी. डी. माई, आय.सी.एम.आर.च्या माजी उपमहासंचालिका डॉ. वसंता मुथ्थुस्वामी, मुंबई येथील आय.सी.टी.चे प्रा. अनिरुद्ध पंडित, पुण्यातील एन.सी.एल. प्रयोगशाळेचे डॉ. विवेक रानडे, आय.आय.टी. मुंबईचे प्रा. मिलिंद सोहोनी यांनी सहभाग घेतला होता. या वेळी प्रा. सोहोनी म्हणाले, ‘‘विज्ञानाकडे सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असून स्थानिक गरजांना संशोधनामध्ये अग्रक्रम मिळायला हवा. परंतु सध्या संशोधनामध्ये प्रादेशिक समस्यांना पुरेसे महत्त्व दिले जात नाही. विज्ञान संस्थांचे केंद्रीकरण झाल्याने या समस्यांशी उद्योगांची सांगड घालणे कठीण झाले आहे.’’ देशात निधी देणारे व तो वापरणारे यांच्यात एक प्रकारची विज्ञानातील नोकरशाहीच निर्माण झाली असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. ‘विज्ञानामध्ये कुतूहल आणि गरज अशा दोन दृष्टिकोनातून संशोधन केले जाते. या दोन्ही दृष्टिकोनांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता असून कुतूहलापेक्षा स्थानिक समस्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,’ अशा शब्दांत प्रा. सोहोनी यांनी समस्या सोडवून लोकांचे जीवन सुकर करणाऱ्या संशोधनाची निकड व्यक्त केली. आय.आय.टी.सारख्या संस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षांच्या अभ्यासक्रम व पद्धतीमध्ये त्रुटी असून त्यामुळे विद्यार्थी घोकंपट्टी करण्याकडेच लक्ष देत असून खासगी क्लासेसचे पेव यामुळे निर्माण झाले असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.

या परिसंवादात इतर मान्यवरांनीही आपापल्या संस्थांच्या वाटचालीची व देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली. देशात असणाऱ्या विज्ञान संस्था शिक्षण व संशोधनातून विकासाला हातभार लावत असून पुढेही त्यांच्या समोर येणाऱ्या आव्हानांना दूर करीत समाजोपयोगी संशोधन सुरू ठेवण्याचा सूर व्यक्त झाला.

lp13यानंतर विज्ञान प्रसार आणि आम्ही या विषयावर अ. पां. देशपांडे यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या परिसंवादात ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, मुंबई आकाशवाणीचे माजी विज्ञान विभागप्रमुख जयंत एरंडे, तसेच ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे सहभागी झाले होते. या वेळी बोलताना डॉ. नारळीकर म्हणाले की, ‘समाज सुशिक्षित झाला तरी त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन असतोच असे नाही, त्यामुळे आजही वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून विज्ञान प्रसार करण्याची आवश्यकता असून पूर्वी जसे रेडिओद्वारे विज्ञानविषयक कार्यक्रम प्रसारित केले जायचे तसे आता दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून होताना दिसत नाही. दूरदर्शनवरून असे कार्यक्रम सादर करण्याची संधी संशोधकांना मिळायला हवी.’ गेल्या पाच दशकांच्या आपल्या अनुभव व आठवणी सांगत डॉ. नारळीकर पुढे म्हणाले की, लोकांना मराठीमधून विज्ञानाच्या संकल्पना सांगितल्या की त्यांना पटकन समजतात. यासाठी सराव करून मराठी भाषा आत्मसात केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

याच परिसंवादात डॉ. कर्वे यांनी भारतीय शेतकऱ्यांवर परंपरेचा मोठा पगडा असून यामुळे ते कोणताही नवा प्रयोग करण्यास सहसा धजावत नसल्याचे नमूद केले. परिणामी संशोधन व प्रयोगांची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवणे कठीण होऊन जाते. आपल्या देशात पेट्रोलियमपासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या तिप्पट ऊर्जा कृषी कचऱ्यापासून मिळवू शकतो. तसेच याचे प्रयोग देशभर होत असल्याचे त्यांनी विविध रंजक प्रयोगांची माहिती देऊन सांगितले.

अधिवेशनाचा दुसरा दिवस राज्यभरातून आलेल्या परिषदेच्या विविध विभागांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणांमुळे अविस्मरणीय ठरला. परिषदेने या विद्यार्थ्यांचे जागतिक प्रकाश वर्षांच्या निमित्ताने प्रकाशविषयक प्रयोगांचे प्रशिक्षण शिबीर सप्टेंबरमध्ये आयोजित केले होते. या शिबिरात दाखविण्यात आलेल्या प्रयोगांचे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी आपापल्या जिल्ह्यतील शाळांमध्ये केले. याद्वारे सुमारे चाळीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रयोग पोहचवण्यात यश आल्याची माहिती या विद्यार्थ्यांनी दिली. कोल्हापूर, निपाणी, नाशिक, जळगाव, पुणे, मुंबई आदी राज्याच्या निरनिराळ्या भागांतून आलेल्या या विद्यार्थ्यांनी चलच्चित्र सादरीकरणातून आपले अनुभव मांडले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात असणाऱ्या अपुऱ्या संधी व साधने यांवर मात करीतही विज्ञानाचा प्रसार शक्य असल्याचा विश्वास या विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणातून व्यक्त झाला.

यानंतर माधव ढेकणे यांचे ‘भारताची अवकाश संशोधनातील गरुडझेप’ या विषयावर व्याख्यान झाले. भारताने १९६२ पासून आजपर्यंत केलेले संशोधन व त्यात मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी माहिती दिली. एस.एल.व्ही. ते जी.एस.एल.व्ही. अशी प्रक्षेपके निर्माण करून भारताने अवकाश मोहिमांमध्ये मिळविलेले यश सांगत असतानाच येत्या काळात चार ते दहा हजार वजनाचा उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्याचे आव्हान आपल्या समोर असून तेही पूर्ण करू असा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

डॉ. अनिल काकोडकर यांचे ‘सिलेज’ या विषयावरील व्याख्यान हे शनिवारी अधिवेशनाचे मुख्य आकर्षण होते. ग्रामीण विकासासाठी पर्यायी व्यवस्था सांगणाऱ्या या संकल्पनेची माहिती डॉ. काकोडकर यांनी या वेळी दिली. समाजामध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात स्थित्यंतरे होत असून पुढेही हे बदल सुरू राहणार आहेत. या बदलांच्या अनुषंगाने ग्रामीण विकास करण्यासाठी आतापासून आपण तयार राहायला हवे. यासाठी ज्ञानाधारित समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे डॉ. काकोडकर म्हणाले. आपल्या देशातील तरुण उत्साही असून त्याला ज्ञानाची जोड मिळाल्यास त्यांची क्षमता दसपटीने वाढेल. तंत्रज्ञानाचा वापर योग्य रीतीने न झाल्यास तळागाळातील लोकांचे त्यातून शोषण होऊ शकते. सिटी व व्हिलेज यांच्या संयोगातून तयार झालेली ‘सिलेज’ ही संकल्पना तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागात ज्ञानकेंद्रे उभारण्याशी निगडित असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात ज्ञानाधारित अर्थार्जनाच्या संधी निर्माण करणे गरजेचे असून देशातील काही भागात असा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले.

यानंतर सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात परिषदेने पन्नासाव्या वर्षांत घेतलेल्या विज्ञान एकांकिका स्पर्धेत विजेती ठरलेली ‘एक्सपरिमेंट’ ही एकांकिका सादर करण्यात आली. डहाणूकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बसवलेल्या या एकांकिकेत लुई पाश्चर यांच्या जीवनावर आधारित कथानकातून रेबिजवरील लसीच्या शोधासाठी त्यांनी केलेल्या प्रयोगांचा चित्तथरारक प्रवास दाखवण्यात आला. कोणातही शोध हा अशा धोकादायक प्रसंगी जिवावर बेतणाऱ्या प्रयोगांमुळेच लागत असतात, असा संदेश या एकांकिकेतून देण्यात आला. या सादरीकरणामुळे ललित कलांमधून विज्ञान प्रसार अधिक प्रभावीपणे करता येऊ शकतो, त्यामुळे परिषद पुढील काळात या माध्यमांचा उपयोग करणार असल्याचे डॉ. जे. बी. जोशी यांनी सांगितले.

रविवारी अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात ‘विज्ञान, अर्थकारण आणि संस्कृती’ या विषयावरील परिसंवादाने झाली. यात परिषदेचे अध्यक्ष डॉ. जे. बी. जोशी, शिवाजी विद्यपीठाचे माजी कुलगुरू प्रा. द. ना. धनागरे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या   प्रा. अमिता भिडे व ग्रामीण वितरणतज्ज्ञ प्रदीप लोखंडे सहभागी झाले होते. विद्यापीठांची जबाबदारी फक्त शिक्षण देण्यापुरतीच नसून त्यांनी संशोधनालाही महत्त्व द्यायला हवे. परंतु सध्या विद्यापीठांमध्ये पीएच.डी.च्या प्रबंधांचा बाजार सुरू असून संशोधनाच्या गाभ्यापेक्षा पदव्या मिळवण्यालाच अवास्तव महत्त्व दिले जात आहे. यातून विज्ञान क्षेत्रात संशोधकांची एक ‘वर्णव्यवस्थाच’ तयार झाल्याचे परखड मत प्रा. धनागरे यांनी व्यक्त केले. विद्यापीठांनी शिक्षण द्यावे व केंद्रीय संस्थांनी संशोधन करावे, अशी संशोधन वाढण्याच्या दृष्टीने धोकादायक विभागणी देशात झाली असून जोपर्यंत समाज व उद्योजकांकडून विद्यापीठीय संशोधनाला सहकार्य मिळत नाही तोवर विद्यापीठांमधील संशोधन वाढणार नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले. शोधनिबंध कोणत्या भाषेतून अथवा नियतकालिकातून प्रसिद्ध होतो, यापेक्षा त्या संशोधनाचा दर्जा काय आहे, याकडे लक्ष देण्याची गरज असून प्रादेशिक भाषांना मिळणारी सापत्न वागणूक बंद होत नाही तोवर मराठीतून विज्ञान प्रसार करावा ही अपेक्षा तरी कशी करावी, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

याच परिसंवादात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विज्ञान, अर्थकारण व संस्कृती यांच्यातील परस्पर संबंधांबाबत आपली मते व्यक्त केली. संस्कृती ही सुबत्तेमुळे टिकते. विकास प्रक्रियेच्या घातक परिणामांवर उपाय शोधता येतील, पण त्यामुळे विकासालाच विरोध करणे चुकीचे आहे. हे उपाय शोधण्यासाठी विज्ञानाची मदत घेता येऊ शकते, असे ते या वेळी म्हणाले. विज्ञान हे व्यवस्थेला प्रश्न विचारत असल्याने कोणत्याही व्यवस्थेला त्याचे वावडेच असते. जोपर्यंत आपल्याकडे असणारी ‘गप्प बसा’ संस्कृती बदलत नाही तोवर विज्ञान प्रसार होणे अशक्य असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

यानंतर झालेल्या डॉ. आल्हाद आपटे यांचे ‘दूरसंचार क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात दूरसंचार क्षेत्रात झालेले आणि सतत होत असणाऱ्या बदलांविषयी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. येत्या काळात सुरक्षा व गोपनीयता यांबद्दलच्या आव्हानांवर काम करत असतानाच सामाजिक समस्यांच्या समाधानासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितली. तसेच ‘चित्रपट व विज्ञान’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात परेश मोकाशी, महेश अणे, अलका कुबल-आठल्ये, संदिप सावंत व उज्ज्वल निरगुडकर यांनी सहभाग घेत चित्रपटांसाठीच्या तंत्रज्ञानात झालेले बदल व त्याचा चित्रपटनिर्मितीवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली. चित्रपट तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता असल्याचा सूरही या चर्चेतून उमटला.

तीन दिवस विविध कार्यक्रमांनी व राज्यभरातल्या विज्ञानप्रेमींच्या उपस्थितांनी फुललेल्या यंदाच्या अधिवेशनाचा सांगता सोहळा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार राहूल शेवाळे, तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. जयंत नारळीकर व परिषदेचे विश्वस्त प्रभाकर देवधर, अचला जोशी, प्रमोद लेले यांच्या उपस्थितीत झाला. मराठी विज्ञान परिषदेचे हे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन ही महाराष्ट्रात विज्ञान प्रसारासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकासाठी दिशादर्शक ठरणारे होते. विज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवतानाच राज्यभरातील लोक एकत्र येत असतात. विज्ञान विषयक चर्चा, संवाद, भविष्यातील आव्हाने व त्याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून मिळत असते. एखाद्या अधिवेशनामुळे चुटकीसरशी शेकडो लोकांच्या मनात विज्ञानाची ज्योत पेटते, अशी अवास्तव अपेक्षा करता येत नाही; परंतु या निमित्ताने लोकांच्या मनात उत्सुकता चाळवते, प्रबोधनाला सुरुवात होते. हेही नसे थोडके!
प्रसाद हावळे –