दसऱ्याला आपल्याला दारावर पिवळ्याधम्मक झेंडूचं तोरण लावता यावं यासाठी दूर कुठेतरी शेतकरी राबत असतो. खास त्याच्या शेतात जाऊन त्याच्या झेंडूच्या फुलांवर केलेला रिपोर्ताज-

दसरा म्हणजे दारावर झेंडूचे तोरण हे अगदी ठाम समीकरण. पिवळा, भगवा रंग ल्यालेली ही तोरणं दसऱ्याचे मंगलमय वातावरण आणखीनच प्रसन्न करून टाकतात. एरवी साध्या हारापुरता असणारा झेंडू या काळात किलो किलोने विकला जातो. मुंबईच्या बाजारात तर शे-दीडशे गाडय़ा भरून झेंडू येतो. हीच स्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठय़ा बाजारपेठांमध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत होणाऱ्या झेंडूने या बाजारपेठा फुलून जातात. हा सारा झेंडू येतो कुठून याचा मागोवा या निमित्ताने घेतला आहे.

What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Video Virat Kohli Face on Water With Rangoli
विराट कोहलीची आजवरची सर्वात सुंदर व कठीण रांगोळी; पाण्यावर टिपला चेहऱ्याचा प्रत्येक बारकावा, पाहा Video
loksatta, chaturang, begum barve drama
‘ती’च्या भोवती..! बर्वे ते बेगम एक देहांतर

महाराष्ट्रात झेंडू होतो तो प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, पुणे या जिल्ह्य़ांमध्ये. त्यातही मुंबई बाजारात झेंडू येतो तो सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ातून. काही प्रमाणात पुणे जिल्ह्य़ातील सासवड-पुरंदर भागातून. तर जुन्नर परिसरातील झेंडू उतरतो तो कल्याण-ठाण्याच्या बाजारात. झेंडू हे काही मुख्य पीक नाही. पण नगदी पीक आहे. त्यामुळे अगदी ठरवून झेंडू घेणाऱ्यांची संख्या बरीच आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील कोथळी, नांदणी, सांगली जिल्ह्य़ातील तासगाव, भिलवडी ही काही महत्त्वाची ठिकाणं मुंबईकरांच्या झेंडूची गरज पूर्ण करतात. गणपती, नवरात्र, दिवाळी या काळात झेंडूची मोठय़ा प्रमाणात गरज असतेच, पण त्याशिवायदेखील मुंबईची रोजची गरज याच भागातून पूूर्ण होते.

कोल्हापूर जिल्ह्य़ातील कोथळी हे गाव चारही बाजूंनी शेतानेच वेढलेले आहे. जवळूनच वाहणारी कृष्णा नदी आणि सकस अशी माती. त्यामुळे येथे प्रयोगशील शेतकरी हमखास दिसतात. उसाचं पीक तर येथे आहेच, पण त्याचबरोबर फळभाज्यादेखील आहेत, आणि सध्या तर झेंडू पिकवण्यातदेखील हे गाव आघाडीवर आहे. गावाच्या शिवारात एक फेरफटका मारला तरी दोनचार प्लॉॅटच्या मध्ये झेंडू दिसतोच. हे चित्र गेल्या सात-आठ वर्षांतले. त्याआधी येथील शेतकऱ्यांचा भर होता तो टोमॅटोवर. पण २०११ पासून येथे झेंडूची चलती आहे. दिवसाला किमान दोन गाडय़ा भरून झेंडू मुंबईत पाठवणारे हे गाव ऐन मोसमात तर आणखीनच तेजीत असते.

फुलांकडे काही आपण प्राथमिक गरज म्हणून पाहात नाही. त्यामुळे झेंडूकडे पूरक पीक म्हणूनच पाहिले जाते. पण येथील काही शेतकरी बारमाही झेंडूदेखील घेत असतात. पण बहुतांश भर असतो तो गणपती, नवरात्र आणि दिवाळीला झेंडू बाजारात कसा आणता येईल यावरच. काही प्रमाणात लग्नसराईच्या मोसमातदेखील झेंडूची मागणी बरी असते. पण मुख्य गरज ही या तीन सणांमध्येच. त्यामुळे साधारण जुलै-ऑगस्टमध्ये झेंडूची लागवड सुरू होते. झेंडूला फुलं येण्यासाठी ५० ते ६० दिवस लागतात. आणि एकदा फुलं यायला सुरुवात झाली की मग पुढील एक महिना हा फुलोरा सुरू राहतो. तुलनेने कमी काळात येणारे हे पीक. बाजारात तेजी असेल तर चांगला दर मिळणार आणि चार पैसे सुटणार. तर कधी कधी आतबट्टय़ाचा व्यवहार ठरणार. त्यामुळे केवळ झेंडू लावणारा शेतकरी तसा विरळाच. एखाद्-दोन एकरांवर झेंडू आणि उर्वरित इतर पीक (सध्या उसावर भर) अशी येथील साधारण रचना आहे.

कमी वेळात बऱ्यापैकी पैसे म्हणून झेंडूची लागवड होत असली तरी ही शेती खूपच बेभरवशी असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुळात फुलं ही काही माणसाची जीवनावश्यक गरज नाही. त्यातच ही फुलं नाशवंत असतात आणि साठवणूक करून कालांतराने त्याचा पुरवठा केला जाऊ शकत नाही. तोडणी केल्या केल्या लगोलग बाजारात नेणे आणि जो भाव मिळेल त्या भावाला विकणे हाच काय तो पर्याय उरतो. झेंडूच्या पिकासाठी एक एकराचा साधारण खर्च हा सव्वा लाखाच्या घरात जातो असे कोथळीतील शेतकरी सुदर्शन पाटील सांगतात. यामध्ये लागवडीसाठी जमीन तयार करण्यापासून, रोपं, खतं, मशागत, पाणी, तोडणी मजुरी, पॅकिंग आणि झेंडू संपल्यानंतर पुढील पिकासाठी रान मोकळं करण्यापर्यंतचा खर्च पकडला जातो. तर काहींच्या मते ७५ हजार ते लाखभर रुपयांत हे सर्व होऊ शकते. सर्व परिस्थिती उत्तम असेल तर एका एकरातून साधारण ७०० ते ८०० क्रेट (एका क्रेटमध्ये १२ किलो) झेंडू जमा होऊ शकतो. हा झेंडू मुंबईतल्या बाजारात नेण्यासाठी किमान ६५ रुपये प्रति क्रेट खर्च येतो. यासाठी अनेक ठिकाणी या शेतकऱ्यांनी सहकारी संघाची स्थापना केली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा झेंडू एकाच वेळी वाहून नेणे सोपे जाते. वाहतूक आणि मुंबईतील व्यापाऱ्याकडून पैसे जमा करण्याची प्रक्रिया या संघामार्फत पार पाडली जाते. गावातील शेतकऱ्यांबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांचा झेंडू देखील कधी कधी या संघामार्फत मुंबईपर्यंत आणण्याचे काम केले जाते. कोथळीतली ‘श्री शेतकरी फुले व भाजीपाला संघटना’ रोज दोन गाडय़ा तरी झेंडू मुंबईत पाठवत असते.

मुंबईतल्या बाजारात आल्यानतंर येथील परिस्थितीनुसार झेंडूचा दर ठरवला जातो. त्यामध्ये मालाची गुणवत्ता आणि बाजारातील झेंडूची आवक हे घटक महत्त्वाचे ठरतात असे दादर फूल बाजारातील व्यापारी संजय जाधव सांगतात. आलेली फुलं जर कोरडी आणि उत्तम दर्जाची असतील तर त्यांना चांगला भाव मिळतो. तसेच ठरावीक मोसम सोडल्यास इतर वेळी मागणी कमी असते. अशा वेळी पुरवठा वाढला असेल तर मात्र चांगल्या झेंडूलादेखील भाव मिळत नाही असे ते सांगतात. त्यामुळे केवळ चांगली फुलं इतकेच महत्त्वाचे नाही तर ती फुलं बाजारात केव्हा येतात हेदेखील तेवढेच महत्त्वाचे असते. पितृ पक्षात तर झेंडूला मागणीच नसते, त्यामुळे अशा वेळी झेंडू बाजारात आलाच तर अगदीच किरकोळ किमतीत त्याची विक्री करावी लागते. झेंडूची शेती करणे म्हणजे कमी वेळात भरपूर पैसे असे सूत्र अनेकांच्या डोक्यात बसलेले असते. विशेषत: सणासुदीला महागडा झेंडू विकत घेताना तर अनेकांना असेच वाटते. पण सणासुदीच्या दराच्या निम्मादेखील दर एरवी शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकरी सुदर्शन पाटील नमूद करतात. कधी कधी अगदी १० रुपये किलोनेदेखील व्यापारी शेतकऱ्याकडून खरेदी करतात. मात्र अशा वेळीदेखील व्यापारी त्यांच्याकडून नेहमीप्रमाणे १५ टक्के कमिशन घेतात. पिकवलेला सर्व झेंडू सरासरी ३० रुपये किलोने विकला गेला तरी १२ किलोच्या एका क्रेटची विक्री ३६० रुपयांना झाली तरी त्यामागे वाहतूक, हमाली व कमिशन मिळून सुमारे १२० रुपये वजा करून रक्कम हातात येते असे सुदर्शन पाटील सांगतात. या पैशातून मग शेतीसाठी चार महिन्यांत केलेला खर्च वजा जाता फार फार तर ५०  हजार रुपये हाती उरतात. पण जर दर कमी झाला तर मात्र सगळेच गणित बिघडते आणि कधी कधी आजवर केलेला खर्चदेखील वसूल होत नसल्याचे ते नमूद करतात. त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या कमिशनवर अनेक शेतकऱ्यांचा आक्षेप दिसून येतो. भाजीपाल्याला १० टक्के कमिशन असताना फुलांसाठी १५ टक्के इतके कमिशन घेणे अन्यायकारक असल्याचे अनेक शेतकरी नमूद करतात. फुलाच्या दरात स्थैर्याची कसलीही हमी नसताना इतके मोठे कमिशन परवडत नसल्याचे त्यांचे मत आहे. तर दुसरीकडे हे कमिशन इतकेच का यावर कोणतेही सरकारी नियंत्रण नसल्याचे जाणवते.

बाजारपेठी गणिते अशी आहेत, तर अनेक वेळा पावसाच्या बेभरवशीपणामुळेदेखील झेंडूला फटका बसल्याचे अनुभव आहेत. सरत्या पावसाळ्यात फुलं झाडावरच असताना खराब होण्याची भीती असते. तर भिजलेल्या फुलांना बाजारात फारशी किंमत मिळत नाही. अनेक वेळा ही फुले चक्क फेकूनच द्यावी लागतात. वर्षांतून दहा-बारा वेळा तरी हा प्रसंग येतोच असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

थोडक्यात काय तर तुम्ही-आम्ही ७०-८० रुपये किलोने जेव्हा झेंडू खरेदी करतो तेव्हाच कुठे शेतकऱ्याचा चार पैसे नफा होतो. एरवी सगळाच कारभार अधांतरी असल्याचे दिसून येते. यंदा झेंडू बाजारात जाताना याची जाणीव झाली तरी खूप झाले.

पैसे मिळवून देणारी शेवंती

झेंडूच्या बाजारात बरीच चढउतार असते. तशी शेवंतीच्या बाजारातदेखील होत असते. पण शेवंतीला चार पैसे अधिक मिळतात. पण त्याचबरोबर अधिक गुंतवणूक हे सूत्रदेखील आहेच. झेंडू दोन महिन्यांत फूल देतो, तर शेवंती तीन-चार महिने घेते. अर्थातच मशागत, निगराणी वगैरे खर्चदेखील वाढतो. कोथळीतीलच प्रयोगशील शेतकरी पी. आर. पाटील यांनी दोन एकरांवर पिवळ्या आणि पांढऱ्या शेवतींची लागवड केली आहे. ते सांगतात की, शेवंतीला मेहनत अधिक लागते, पण व्यवस्थित त्यात पैसे गुंतवले तर लाख-दीड लाखांपर्यंतदेखील उत्पन्न मिळू शकते.

रोपांसाठी आधार कोलकात्याचा

आपल्या परसबागेत किंवा गच्चीतल्या कुंडय़ांमध्ये झेंडूची सुकलेली फुलं कुस्करून घरापुरती झेंडूची फुलं मिळवण्याचा उद्योग अनेकांनी केला असेल. पण शेतीसाठी लागवड करायची असेल तर झेंडूच्या रोपांचाच वापर सध्या केला जातो. आणि अशी रोपं ही मुख्यत: येतात ती कोलकात्यावरून. सध्या आपल्याकडच्या बाजारात कोलकाता जातीच्या भगव्या आणि पिवळ्या झेंडूला सर्वाधिक मागणी आहे. आटोपशीर आकार आणि अधिक काळ टिकणारी ही जात आहे. कोलकात्याहून ही रोपे स्थानिक रोपवाटिकेत आणली जातात. तेथे काही काळ पाणी देऊन पुरेशा सावलीत त्यांची वाढ होते आणि मग ती विक्रीसाठी तयार होतात. साधारण १.६० पैसे प्रतिरोप हा सध्याचा दर आहे. आपल्याकडेदेखील झेंडूवर अनेक प्रयोग होत असतात. पण रोपे तयार करण्याच्या प्रक्रियेत येथील हवामान पूरक नसल्यामुळे त्या रोपांना फकडी येते (म्हणजे फूल फुटण्याचे प्रमाण अधिक असणे.) त्यामुळे छोटी छोटी रोपे कोलकात्याहून विमानाने येथे मागवणे आणि त्यांचा रोपवाटिकेत सांभाळ करणे हाच पर्याय अवलंबला जातो. कोथळीतले प्रयोगशील शेतकरी सुदर्शन पाटील हे स्वत:च्या रोपवाटिकेत काही ना काही प्रयोग करत असतात. फुलांचे उत्पन्न कसे वाढवता येईल या दृष्टीनेच त्यांनी रोपवाटिका तयार केली आहे. फकडीचे प्रमाण सांभाळून उत्पादन कसे वाढू शकेल यावर त्यांचा भर असतो.
सुहास जोशी
response.lokprabha@expressindia.com