महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येने असलेले गडकिल्ले, देशातील बारा ज्योतिìलगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी निवासिनीमुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेला सप्तशृंग गड, नाशिकचे मुक्तिधाम, चांदवडची रेणुकादेवी, शहादा तालुक्यातील प्रकाशा अशी महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळे, इगतपुरी, मुक्ताईनगर, कावनई, नंदुरबारमधील सातपुडय़ाचा परिसर यांसारखी निसर्गरम्य ठिकाणे, नांदुरमध्यमेश्वर, पाल यांसारखी अभयारण्ये..

पर्यटकांना बाराही महिने आकर्षित करणारा असा वैविध्यपूर्ण खजिना उपलब्ध असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याला पावसाळ्यात उधाण येते. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्य़ांमध्ये मुबलक प्रमाणात निसर्गाने उधळण केलेली असल्याने पावसाळ्यात कुठेही गेलात, तरी मनाला प्रसन्न करणारे सौंदर्य दिसते. त्यातच उत्तर महाराष्ट्रातील अनेक धार्मिक ठिकाणे डोंगर आणि निसर्गाच्या कुशीत असल्याने या ठिकाणच्या वर्षां पर्यटनाला नकळत अध्यात्माचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे. अशाच काही परिचित आणि विशेष परिचित नसलेल्या वर्षां पर्यटनासाठी योग्य अशा ठिकाणांची माहिती.

सप्तशृंग गड

नाशिक जिल्ह्यतील नाशिक-नांदुरी रस्त्यावर सप्तशृंगी देवीच्या निवासस्थानामुळे देशभरात प्रसिद्ध असलेला सप्तशृंग गड आहे. विशेषत: धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या सप्तशृंग गडावर खास वर्षां पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत पावसाळ्यात भर पडते. गुजरात-महाराष्ट्र या राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर हा गड असल्याने गुजरातमधूनही मोठय़ा प्रमाणावर पर्यटक गडावर येत असतात. नाशिकपासून गडाचे अंतर ६५ किलोमीटर आहे. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी दहा किलोमीटर अंतर कापावे लागते. गडावर थेटपर्यंत वाहने जाण्यासाठी रस्ता आहे. गडावर निवासासाठी देवस्थानचे निवासगृह आहे. याशिवाय खासगी व्यवस्थाही उपलब्ध होऊ शकते. सप्तशृंग गड परिसरात गुजरातच्या हद्दीत असलेले थंड हवेचे ठिकाण सापुतारा, याच रस्त्यावरील हतगड किल्ला ही ठिकाणेही वर्षां पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात गडावरील निसर्गाला तरतरी येत असल्याने हिरवाईने नटलेला गड आणि गडावरून नजर टाकल्यास इतरत्र पसरलेले निसर्गसौंदर्य मन मोहीत करण्यासाठी पुरेसे ठरते.

कसे जाणार?- नाशिकपासून सप्तशृंग गडापर्यंत बस तसेच खासगी टॅक्सी सेवा उपलब्ध. नाशिक ते नांदुरी रस्तामार्गे खासगी वाहनाने गडापर्यंत जाता येते.

भावली धरण

नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा इगतपुरी तालुका हा निसर्गसौंदर्याची खाण समजला जातो. पावसाळ्यात निसर्ग कसा फुलतो, याचे दर्शन घ्यावयाचे असल्यास इगतपुरी तालुक्यात जावेच. तालुक्यात पर्यटनाच्या दृष्टीने सर्व काही ठासून भरले आहे. कसारा घाट, कावनई, टाकेद कुठेही गेलात तरी निसर्गाचा चिंब आस्वाद तुम्हाला घेता येईल. त्यातही इगतपुरीपासून सुमारे १५ किलोमीटर आणि घोटीपासून २३ किलोमीटरवर असलेले भावली धरण पर्यटकांचे खास वर्षां पर्यटनाचे आकर्षण बनले आहे. तिन्ही बाजूंनी डोंगरांच्या कुशीत असलेल्या या धरणात डोंगरांवरून खळाळत येणाऱ्या जलधारा कोसळत असतात. तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेला परिसर असल्याने एकापेक्षा एक आगळेवेगळे सौंदर्य ल्यालेले धबधबे या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यातही तीन टप्प्यांत कोसळणाऱ्या ‘तीन टप्पी’ प्रपाताचा रुबाब काही औरच. निसर्ग सान्निध्यात स्वत:ला हरवून टाकण्यासाठी या ठिकाणचा परिसर अतिशय योग्य. विशेष अशी गर्दी नसल्याने गोंगाटापासून कानांचीही काही वेळ सुटका होते. बहुतांश धबधब्यांचे स्वरूप कडय़ावरून स्वत:ला दरीत झोकून देणारे असल्याने निसर्गाचे हे रूप काहीसे भीतीदायकही असते. अशा ठिकाणी धबधब्याचे ‘दुरून डोंगर साजरे’ असेच दर्शन घ्यावे लागते. या ठिकाणी मात्र तीन टप्पीसह इतर धबधब्यांचे स्वरूप तसे मनमिळाऊ म्हणता येईल. तीन टप्पी धबधबा तर तीन टप्प्यांत कोसळून थेट तुमच्या पायांवर लोटांगणच घालतो. त्यामुळे बिनधास्तपणे आणि मनसोक्तपणे अत्यंत स्वच्छ पाण्यात चिंब होण्याचा अनुभव येथे घेता येतो. मुंबईहून रेल्वे व रस्त्यामुळे असलेली ‘कनेक्टिव्हिटी’ यामुळे इगतपुरी अलीकडे मुंबईकरांसाठीही एक हॉट पर्यटनस्थळ होऊ लागले आहे. भावली येथे निवासाची व्यवस्था नसल्याने इगतपुरी किंवा घोटी येथे थांबता येते.

कसे जाणार? इगतपुरीपासून मानोरे रस्त्यावर भावली आहे. खासगी वाहनाने जाता येते.

त्र्यंबकेश्वर परिसर

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक.  जगभरात धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेले असल्याने वर्षां पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांना आकर्षित करते. ब्रह्मगिरीच्या कडय़ांवरून कोसळणारे व हवेच्या प्रचंड झोतामुळे पुन्हा वर फेकले जाणारे धबधबे अनुभवयाचे असतील तर त्र्यंबकेश्वरच्या जंगलात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले अंजनेरी, त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेला दुगारवाडी धबधबा, पहिनेजवळील दरी आणि खासगी वाहन असेल तर निसर्ग ठासून डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी त्र्यंबकेश्वर ते खोडाळा असा हळुवार प्रवास करावा. या प्रवासात एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगरांवरून कोसळणारे लहान लहान धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात या परिसराने काही वेळा धुक्याची रजई पांघरलेली राहात असल्याने वाहने हळू चालविण्याशिवाय गत्यंतरही नसते. या रस्त्यावर ठिकठिकाणी स्थानिक आदिवासी मक्याची कणसे भाजून देण्याचे काम करतात. तन आणि मन चिंब झालेले असताना मक्याचे कणीस खाण्यातील आनंद वेगळाच. महत्त्वाचे म्हणजे या भागातील वर्षां पर्यटनामुळे स्थानिक आदिवासींना अशा पद्धतीने थोडाफार पैसा मिळू लागला आहे. त्र्यंबकेश्वरपासून सुमारे १५ किलोमीटरवर जव्हार रस्त्याजवळ असलेला आंबोली तलाव हे ठिकाणही वर्षां पर्यटनासाठी प्रसिद्ध होऊ लागले आहे. नेहमीच्या शहरी वातावरणापासून दूर जात निसर्गाच्या कुशीत काही क्षण घालविण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी त्र्यंबकेश्वर परिसरात सर्व काही आहे.

कसे जाणार? त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी घोटी-त्र्यंबकेश्वर, जव्हार-त्र्यंबकेश्वर, नाशिक-त्र्यंबकेश्वर असा रस्तामार्ग आहे.

तोरणमाळ

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण. नंदुरबार जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या पर्वतरांगांमध्ये तोरणमाळ वसलेले असून समुद्रसपाटीपासूनची उंची १४६१ मीटर आहे. नाशिकपासून ३०५ किलोमीटर, धुळ्यापासून सुमारे १२५, नंदुरबारपासून १०० किलोमीटर, तर शहाद्यापासून ५५ किलोमीटर अंतर. तोरणमाळ गडाच्या पायथ्यापासून वर जाताना सात आडवी वळणे ओलांडावी लागतात. त्यालाच ‘सात पायरी घाट’ म्हणतात. तोरणमाळ म्हणजे फुलांनी बहरलेला कमालीचा शांत परिसर. वर्षां सहलीसाठी तोरणमाळसारखे शांत ठिकाण सापडणे अवघड. या ठिकाणी बीएसएनएल (तेही क्वचित) वगळता इतर कोणतीच रेंज नसल्याने मोबाइलपासून मुक्ती मिळते. तोरणमाळच्या माथ्यावरील नैसर्गिक सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेत आणि त्यातच पाऊस सुरू असला तर तन-मनाने चिंब होत तेथील गवती चहाचा आणि घरगुती जेवणाचा आस्वाद घेण्यात कमालीची मजा आहे. वाहनांची गर्दी नसल्यामुळे कुटुंबासह गेलात तर लहानग्यांना बागडण्यासाठी ‘खुला आसमान’ स्वागत करण्यास तयार. कमलपुष्पांनी भरलेला तलाव, यशवंत तलाव, सीता खाई आणि या खाईत कोसळणारा धबधबा असे बरेच काही पाहण्यासारखे आहे. तोरणमाळच्या पायथ्याशी लेहापाणी येथे औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्रही आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि वन विभागाचे विश्रामगृह आहे. याशिवाय खासगी निवास व्यवस्थाही होऊ शकते.

कसे जाणार? नाशिक-धुळे-शहादा असा रस्तामार्ग. याशिवाय नाशिक-नंदुरबार-शहादा हा दुसरा रस्तामार्ग. शहाद्यापासून परिवहन महामंडळाची मिनी बससेवा थेट तोरणमाळच्या माथ्यापर्यंत जाते.

लळिंग किल्ला

धुळ्यापासून केवळ दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेला लळिंग किल्ला. मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे आणि मालेगाव यादरम्यान असलेल्या लळिंग किल्ल्याचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच उठून दिसते. किल्ल्यावरील कुरणातील रानफुले शहरी जीवनात नजरेस पडणे अशक्यच. पायथ्याशी असलेल्या लळिंग या गावापासून निघणारी पायवाट किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रसपाटीपासून सुमारे ५९३ मीटर उंचीवर असलेल्या या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी हळूहळू गेले तरी एक तासापेक्षा कमी अवधीत सहज पोहोचता येते. किल्ला परिसरात दाट जंगल असल्याने मोर, लांडोर, सांबर, हरीण यांसारखे प्राणी-पक्षी सहजपणे नजरेस पडतात. किल्ल्यावरून कोसळणारा धबधबा पावसाळ्यात डोळ्यांचे पारणे फेडतो. किल्ल्यावर एक लांडोर बंगला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या बंगल्यात काही दिवस वास्तव्य केले होते. या बंगल्याची स्थिती आजही बऱ्यापैकी आहे.

कसे जाणार? नाशिकपासून धुळे महामार्गाने. मालेगावपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर अगदी महामार्गालगत.

पाटणादेवी

वर्षां पर्यटनासाठी डोंगरदऱ्यांचा भाग असला की अधिक आनंद येतो. कारण, डोंगरदऱ्यांमध्ये घोंघावणारे वारे, प्रचंड वेगाने कोसळणारे प्रपात, खळाळणारे ओढे आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी वनराई. सोबत मंदिरांचा वारसा असेल तर वर्षां पर्यटनाला पावित्र्याची जोड. हे सारं अनुभवण्यासाठी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी ठिकाणास हमखास भेट द्यावी. चाळीसगावपासून १८ किलोमीटरवर सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांच्या पायथ्याशी पाटणादेवी हे ठिकाण आहे. येथे चंडिकादेवी मंदिर आहे. डोंगरी नदीच्या किनारी असलेले हे मंदिर त्याच्या प्राचीन कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. गौताळा अभयारण्याच्या मध्यभागी वसलेल्या पाटणादेवी परिसरात सह्य़ाद्रीचे उंच कडे, खळाळून वाहणारे अनेक ओढे, पक्ष्यांचा किलकिलाट हे सर्व काही मन प्रफुल्लित करण्यासाठी पुरेसे ठरते. याशिवाय धवलतीर्थ, केदारकुंड या धबधब्यांची जोड आहेच. या ठिकाणच्या वर्षां पर्यटनाला पाटणादेवी मंदिरामुळे धार्मिक अधिष्ठान आपोआपच प्राप्त होत असल्याने धांगडधिंगा करण्यासाठी निसर्गसान्निध्यात जाणाऱ्यांच्या कृत्यांना येथे आळा बसतो. लीलावती वनोद्यानात विविध औषधी वनस्पती पाहता येतात. पाटणादेवीपासून काही अंतरावर असलेल्या पितळखोरा लेण्यांनाही भेट देता येते.

कसे जाणार? मुंबई, पुण्याचे पर्यटक रेल्वेने थेट चाळीसगावला येऊ शकतात. चाळीसगावहून परिवहन महामंडळाची बस किंवा खासगी वाहनाने पाटणादेवीला जाता येते. औरंगाबादहून कन्नड आणि कन्नडहून पितळखोरा लेणीमार्गे पाटणादेवी असाही एक रस्ता मार्ग आहे.

श्रीमनुदेवी, आडगाव

जळगावच्या यावल तालुक्यातील धार्मिक आणि वर्षां पर्यटनासाठीचे महत्त्वपूर्ण ठिकाण. सातपुडय़ाच्या उत्तर सीमेवर डोंगरांमध्ये दडलेले हे सुंदर ठिकाण. चोपडय़ापासून ३६ किलोमीटरवर असलेल्या श्रीमनुदेवी तीर्थस्थळी तलाव आणि पावसाळ्यात ४०० फुटांवरून कोसळणारा धबधबा पाहता येतो. सर्व बाजूंनी निसर्गाची साथ लाभलेली असल्याने येथे आल्यावर आपोआपच मनाला प्रसन्नतेची अनुभूती येते. या ठिकाणी येण्यासाठी अध्यात्म आणि वर्षां पर्यटन या दोहोंचा आनंद येथे घेता येत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

कसे जाणार? – जळगाव किंवा धुळ्याहून रस्तामार्गे चोपडा. चोपडय़ाहून रस्तामार्गे खासगी वाहनाने किंवा दिवसातून तीन वेळा मनुदेवीसाठी बस सेवा आहे.

याशिवाय नाशिक जिल्ह्य़ातील कोणत्याही किल्ल्याच्या परिसराची आपणास वर्षां भटकंतीसाठी निवड करता येईल. वर्षां पर्यटनासाठी असलेली ठिकाणे शक्यतो डोंगरदऱ्यांच्या परिसरात असल्याने नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची काळजी घेत पर्यटकांना आनंद घ्यावयास हवा. हौशी युवा पर्यटक पावसाळ्यात डोंगर परिसरातील कोणत्याही रस्त्यावर गाडी उभी करून मोठय़ा आवाजात गाणी लावून त्यावर नाच करत असतात. अशा ठिकाणी जाऊन मद्यपान करणे ही अलीकडील एक ‘फॅशन’ झाली आहे. मद्यपानानंतर बाटल्या त्याच ठिकाणी टाकल्या जात असल्याने कालांतराने त्या बाटल्या फुटून त्या ठिकाणी येणाऱ्या इतर पर्यटकांना काचांमुळे इजा होण्याची शक्यता असते. निसर्गात जायचे तर तेथील काही नियम पाळणे आवश्यकच आहे. पावसाळ्यातील हिरव्याकंच पठारांचा, डोंगरांचा, कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी निसर्ग तुम्हाला साद घालत आहे. धकाधकीच्या जीवनात तरतरी आणण्यासाठी वर्षां पर्यटनासारखा ‘छोटा रिचार्ज’ हवाच!
अविनाश पाटील

response.lokprabha@expressindia.com