नवरात्रीचे दिवस; म्हणजेच शक्तीची उपासना करण्याचे दिवस. मग ती आंतरिक मानसिक शक्ती असेल, सद्विचारांची असेल. शारीरिक ताकद वाढविण्याची उपासना असेल किंवा काही क्रांतिकारी विचारांवर विजय मिळविण्याची उपासना असेल. उत्तम नैतिक मूल्य टिकायला हवीत हे खरं!

मला वाटतं जगात नैतिक मूल्य ही केवळ चांगली म्हणून टिकत नाहीत तर त्यांचं अस्तित्व टिकविण्यासाठी तसे समर्थ लोक असावे लागतात. ‘कथनी आणि करणी’ एक असणारे लोक असावे लागतात आणि आजही ते भेटतात. असं म्हणण्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षीच्या नवरात्रातलाच एक प्रसंग आज घडल्यासारखा समोर उभा राहतो.

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Navratri fasting diet: Which foods to lose weight and detox with?
Navratri Diet Plan: नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या…
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

माझी मैत्रीण शुभदा नवरात्रात ललिता पंचमीला नऊ सुवासिनींना हळदी-कुंकवासाठी बोलावते. दर वर्षी नवीन नऊ जणी असतात. कारण इतकेच की अनेकींनी आपल्या घरी यावे. शिवाय त्या नऊ जणी नऊ विविध क्षेत्रांतल्या असतात. शिरस्ता असा की, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी नऊ जणींनी आपापले क्षेत्र, त्यातले अनुभव जे काही असेल ते मोकळेपणी सांगायचे. मगच हळदी-कुंकवाचा उपचार. गेल्या वर्षी एक जण भरतकामात निपुण, एक पालयट, एक लेखिका, एक समाजकार्यकर्ती, एक गायिका, एक पत्रकार, एक पौरोहित्य करणारी अशा होत्या. प्रत्येकीचे अनुभव ऐकत होतो. बऱ्या-वाईट माणसांबद्दल समजून घेत होतो. त्या आपापल्या क्षेत्रात कशाकशाला तोंड देत इथपर्यंत पोहोचल्या हे ऐकताना एक जाणवत होतं की, मीच काय ती एकटी ‘शहाणी’ ‘मोठी’ ही भावना गळून पडत होती. अहंभावाला धक्का लागत होता जे चांगलं घडत होतं. थोडक्यात काय तर बादशाहाच्या दरबारातील बिरबलाची आपली रेषा न पुसता कोणी तरी लहान करत होतं. शेजारी मोठी रेषा आखून.. असो.

जवळजवळ साडेबारा वाजून गेले आणि शुभदाच्या आत-बाहेर, आत-बाहेर येरझाऱ्या चालू झाल्या. नऊ जणींपैकी मालू नावाची नववी सवाष्ण जी शवागरातील बेवारशी शवांचा अन्त्यसंस्कार करायची ती आली नव्हती. तिचा फोनही लागत नव्हता. इमर्जन्सी आली असली तर कळायला मार्गही नाही. पण पंचाइत अशी की, आठच सुवासिनी झाल्या. नववी कुणी नव्हती. मालूचे अनुभव आम्हालाही ऐकायचे होते, पण करणार काय? तुम्हा आलेल्यांचा वेळेचा खोळंबा नको म्हणून विधीला सुरुवात झाली. शुभाच्या हाताखाली तिची धाकटी मुलगी होती.

‘‘आई, रात्रीपर्यंत तुझ्याकडे कुणी तरी येईल. तिला सगळं दे म्हणजे तुझी नऊ जणींची पूजा झाली,’’ लेक म्हणाली. तसंच करते म्हणून आम्हा आठ जणींचे पाय दूध-पाणी घालून धुतले. पावलांवर स्वस्तिकं काढली. हळद-कुंकू लावले. केसांना सुवासिक तेलाची बोटं लावून कंगवा फिरवला. डोळ्यात काजळ रेखायला दिलं. हाताला चंदन लावलं. त्यावर नक्षी उमटवली. बांगडय़ा भरल्या. बुक्क्याचा टिळा लावला. गजरे माळले. पाच प्रकारची फळं ओटीत घातली. पेढे, सुका मेवा दिला. ओटीत भरायला नारळ, सुपारी तांदूळ समोर आणले आणि दाराची बेल वाजली.

‘मालू मावशी आली वाटतं,’ म्हणून शुभाच्या लेकीनं दार उघडलं आणि तिच्या कपाळावर आठी आली.

‘‘मालेऽऽऽ तू? आणि भर बाराला? ही काय कचरा गोळा करायची वेळ आहे? घरात इथं आता देवीची पूजा चालीय. आत्ता काय कचरा मागतेस? आणि त्या कडेवरच्या पोराचा शेंबूड पूस आधी. शी!’’असं म्हणून दार पुढं करणार इतक्यात शुभदा पुढं आली.

‘‘अगं, अगं, तिला पुढं जायला सांगू नकोस. लेकुरवाळी लक्ष्मी दारात आलीय. ही मालू नाही तर ती मालू. देवाला माझी बरोब्बर काळजी आहे. माझी नववी सवाष्ण चालत माझ्या दारी आलीय. तिच्या पायावर दूध-पाणी घाल. हळदी-कुंकू लावून तिला आत घे. ही नववी खुर्ची रिकामी आहे त्यावर बसव,’’ शुभा म्हणाली.

कचरा घ्यायला आलेल्या मालूला खूप अवघडल्यासारखं झालं. तिच्या लेखी आम्ही आठ जणी उच्चभ्रू होतो ना! ती परत परत शुभदाला सांगायचा प्रयत्न करत होती. ‘‘ताई खरंच सांगते, मोठय़ा पोराला कालपासनं ताप आहे. रात्रभर झोप नाही. सकाळी धाला निघाले. बिल्डिंगी करत यायला वेळ लागला. शिवाय या धाकटय़ालापण घरी ठेवता येई ना. येऊच नव्हे तर खाडा कापत्यात म्हणून आले.’’ मालूला बघून शुभदाला कल्पनेपलीडकचा आनंद झाला होता. ती तर मालूला सवाष्णीची सारी वाणं देताना चहूबाजूंनी फुलली होती. ती कचरा आणणारी एक चतुर्थश्रेणी कामगार आहे हे तिच्या लेखी नव्हते. ऋ तुजा मला हळू कानात म्हणत होती,

‘‘अगं, हे कसं वाटतंय बघ ना! हे ऐकलं की इतरांना काय वाटेल याची कल्पना आहे का शुभाला?’’ मी म्हटलं, ‘‘या क्षणाला त्या मालूकडे तू फक्त नववी सवाष्ण म्हणून बघ. शुभदाला नवरात्रीची खरी उपासना नुसती कळली नाहीये तर तिनं आचरणात आणली आहे. आपल्याबद्दल इतरांना काय वाटतं यापेक्षा आपण आपल्याला काय समजतो? हे महत्त्वाचं असतं. ज्याची चांगुलपणावर श्रद्धा असते ना त्याला कुणाचच भय नसतं.’’

‘‘काय गं, काय बोलताय इतकं?’’ म्हणत गुळासारखं गोड हसत शुभानं आटवलेलं मसाल्याचं दूध सगळ्यांना दिलं. ते पिऊन आम्ही नऊ सवाष्णी बाहेर पडलो. बाहेर पडताना एकच गोष्ट मला जाणवत होती. ती म्हणजे आदर्श, प्रवाहाविरुद्ध वागायला आवडणं आणि प्रत्यक्ष आचरण करणं यातील तफावत दूर करायला मला या नवरात्रात तरी जमेल का?
माधवी घारपुरे – response.lokprabha@expressindia.com