निपुण धर्माधिकारी म्हणजे ‘फोर्ब्स इंडिया’च्या ‘थर्टी अंडर थर्टी’ या यादीत ज्याचं नाव समाविष्ट झालं आहे, असा तरुण नाटककार. त्याच्याशी बातचीत.

‘फोर्ब्स इंडिया’ या मासिकामध्ये ‘थर्टी अंडर थर्टी’ (30 under 30) च्या यादीत संपूर्ण भारतातूनच नव्हे तर या वर्षी संपूर्ण आशिया खंडातून निपुण धर्माधिकारी या तरुण नाटककाराचं नाव अंतर्भूत करण्यात आलं आहे. ‘फोर्ब्स इंडिया’ ही फोर्ब्स या मूळ अमेरिकन साप्ताहिकाची भारतीय शाखा. एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यावसायिक मासिक म्हणून या मासिकाची ओळख आहे. हे मासिक त्यांच्या विविध याद्या आणि रेटिंगसाठी प्रसिद्ध आहे. तशीच एक यादी ‘थर्टी अंडर थर्टी’ (30 under 30) या नावाने दरवर्षी प्रसिद्ध होते. ज्यात कला आणि संस्कृती, वित्त, माध्यमं, क्रीडा, कायदा आणि धोरणं अशा क्षेत्रात अवघ्या तिशीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांची नावं अंतर्भूत होतात. त्यात कला आणि संस्कृती या यादीत नाटय़ क्षेत्रातल्या  कामगिरीसाठी निपुणचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
Mallikarjun Kharge interview Congress loksabha elections 2024 PM Narendra Modi BJP
इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड

वास्तविक फोर्ब्समध्ये नाव येण्यासाठी तीन पद्धती आहेत. एक म्हणजे आपण स्वत:हून अर्ज भरायचा, दुसरं म्हणजे काही लोकांनी नामनिर्देशन करायचं आणि तिसरं म्हणजे ते स्वत: लोकांना शोधणार.  निपुणने अर्ज न देता, कोणीही त्याचं नामनिर्देशन न करता त्याचं काम बघून त्यांचा आपणहून निपुणला तो या यादीत येण्यायोग्य आहे अशा अर्थाचा मेल आला. नंतर कला आणि संस्कृतीच्या पॅनलमधील लोकांनी येऊन त्याची मुलाखत घेतली आणि त्याचं नाव ‘थर्टी अंडर थर्टी’च्या यादीत अंतर्भूत करण्यात आलं.

निपुणचं शिक्षण कॉन्व्हेन्ट शाळेमध्ये झालं. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्याने  शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. तो म्हणतो ‘तसा मी बरा गायचो. पण मी त्याची मजा नाही घेऊ शकायचो. घरातले जेव्हा मला सांगायचे की बाबा रे म्हणून दाखव तेव्हा मी फार कंटाळा करायचो. मग मला आई बाबा नाटकांना घेऊन जायला लागले. ती नाटकं बघताना मला थोडं थोडं जाणवायला लागलं की हे मला आवडतंय. नंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं आणि मी वेगवेगळ्या आंतर महाविद्यालयीन स्पध्रेत भाग घ्यायला सुरुवात झाली. माझ्याच नकळत मी दिग्दर्शनाकडे वळलो आणि माझी नाटकाबद्दलची ओढ इथून वृिद्धगत होत गेली.

महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर नाटक सोडायचं नाही असं ठरवलं; पण त्यासाठी कुठल्या तरी बॅनरची गरज होती. तिथेच ‘नाटक कंपनी’ची स्थापना झाली. इथून निपुणचा खरा प्रवास सुरू झाला.  त्याने प्रायोगिक रंगभूमीवर बरेच प्रयोग केले जे वाखाणण्याजोगे आहेत. हे सगळे प्रयोग करताना लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता या सगळ्या भूमिका तो समर्थपणे पेलत होता. पण तरीही प्रायोगिक रंगभूमीबद्दल तो म्हणतो की, मी रंगभूमीमध्ये फरक करू इच्छित नाही. मी नाटकाकडे एक नाटक म्हणून पाहतो आणि म्हणूनच ‘नाटक कंपनी’ची स्थापना आम्ही केली.

नाटक कंपनी चालवणं म्हणजे आर्थिक गणितं आली. त्याबद्दल तो म्हणतो, एका प्रयोगाला मिळालेला पसा आम्ही दुसऱ्या प्रयोगासाठी वापरतो. तो नाटक कंपनीमध्येच फिरता राहतो आणि आम्ही लोकशाही मार्गाने काम करत असल्यामुळे गणितं पटापट सुटत जातात.

या व्यतिरिक्त निपुण बऱ्याच सिनेमांसाठी लेखनही करतो. त्याचा एक गाजलेला िहदी सिनेमा म्हणजे ‘नौटंकी साला’; ज्याचं त्याने संहिता लेखनही केलेलं आहे आणि त्यात अभिनयही केलेला आहे. याबद्दल तो म्हणतो की बॉलिवूडमध्येही काम करताना खूप मजा आली आणि तशी व्यावसायिकता  आपण मराठीतही हळूहळू साधतो आहोत याचा त्याला आनंद आहे.

46-lp-dalanनिपुण ‘थर्टी अंडर थर्टी’ च्या यादीत येण्यासाठीच्या अनेक कारणांपकी एक म्हणजे संगीत नाटकात त्याने केलेली उल्लेखनीय कामगिरी. संगीत नाटकच त्याला का निवडावंसं वाटलं यावर त्याचं म्हणणं असं की, त्याला संगीत नाटकसुद्धा एक प्रायोगिक नाटकच वाटतं. त्याला नाटकांच्या दौऱ्यानिमित्त परदेशी जाण्याचा योग यायचा तेव्हा तिथे तो पाहायचा की त्यांच्या नाटकामधून ते त्यांची संस्कृती जपतात. मग आपण का आपली परंपरा, संस्कृती जपू नये या विचाराने तो प्रेरित झाला. त्यामुळे संगीत नाटक सजग ठेवावं या भावनेने त्याने संगीत नाटकावर काम करायला सुरुवात केली. त्याच्या मतानुसार जसा काळ बदलत जातो तसे गरजेनुसार आपणही आपल्यात बदल केले पाहिजेत. तरच ते लोकांना रुचतं आणि पचतं. निपुणनेही संगीत नाटकात असे काही बदल केले. पाच अंकी नाटक दोन अंकी केलं. नाटकाची संहिता आजच्या काळाला चपखल बसेल अशी त्याने लिहिली. नाटकात काही ध्वनिमुद्रित ट्रॅक्सचा वापर करायला सुरुवात केली. कलाकारांच्या संवादातही बदल केले गेले आणि हे बदल प्रेक्षकांनी उचलूनही धरले. गेल्या दीड वर्षांत ‘नाटक कंपनीने’ तीन संगीत नाटकं केली. मराठी नाटय़सृष्टीच नव्हे तर अमेरिकेत आणि एनएसडीच्या भारत रंग महोत्सव यांसारख्या प्रख्यात महोत्सवातही त्यातली काही सादर झाली.

निपुणचा अतिशय जवळचा मित्र अमेय वाघ म्हणतो की, निपुण त्याच्या कामामध्ये कितीही व्यावसायिक  (professional’) असला तरीही तो कलाकाराला एक कलाकार म्हणून खूप किंमत देतो. निपुणकडे माणसं जपण्याची खूप छान कला आहे. त्यामुळेच ‘नाटक कंपनी’ इतकी वर्ष सातत्याने काम करते आहे. जोखीम घेण्याचं धाडस त्याच्याकडे आहे.   वेगवेगळे प्रयोग सतत त्याला करायला आवडतात आणि त्याची जबाबदारीही तो घेतो. निपुण सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे करतो आणि म्हणून सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित हाताळू शकतो.

पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट  असताना तू नाटय़ क्षेत्राकडे कसा वळलास, असं विचारल्यावर तो म्हणतो की, मी माझ्या सीए मित्रांना बघायचो ते अकाऊंटिंग, टॅक्सेशन, ऑडिट आणि एकंदर सगळंच मन लावून करायचे आणि त्यातले काही असे असायचे की त्यांना यात काही फार रस नसायचा. त्यांच्यातला मी होईन असं मला वाटायला लागलं आणि मग मी शोध घ्यायला सुरुवात केली की मला काय आवडतंय तर मनात नाटक हे एकमेव उत्तरं आलं. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय यातलं जास्त काय करायला आवडतं याचं उत्तरं क्षणाचाही विलंब न करता त्याने दिग्दर्शन असं दिलं.

45-lp-marathi-dramaअभिनेत्री स्पृहा जोशी निपुणच्या दिग्दर्शनाबद्दल सांगताना म्हणते, ‘नेव्हर माइंड’ नाटकाच्या निमित्ताने आमची ओळख झाली आणि मला त्याच्यामधला एक वेगळाच दिग्दर्शक भेटला. इतका शांत दिग्दर्शक मी आजवर अनुभवलेला नव्हता. म्हणजे दोन तासांवरही प्रयोग असेल तर आमच्यात सगळ्यात शांत तो असायचा. एकदाही कलाकारावर तो ओरडला नाही किंवा त्यांच्यावर आवाज चढवला नाही. माझा वाचिक अभिनयाकडे कल होता, पण कायिक अभिनय मला सहज जमावा यासाठी आमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे तो गेम्स खेळवून घ्यायचा. उत्तम कायिक अभिनय मी त्याच्याकडून शिकले. दिग्दर्शक म्हणून तो मला एक वेगळाच अनुभव देऊन गेला आणि निपुणसारखा मित्र मला असणं याचा मला सार्थ अभिमान वाटतो.’’

फोर्ब्सने निपुणची ओळख ‘एक असा माणूस ज्याच्यासाठी संपूर्ण जग म्हणजे जणू एक रंगमंच आहे.’ अशी करून दिली आहे. ही उक्ती सार्थ ठरणारी आहे. त्याची कुठलीही नाटय़कृती असो ती जगभर पोहोचतेच. तोही म्हणतो की काम करताना मी कधीच मला हे मिळावं म्हणून काम केलं नाही; पण तरीही जेव्हा त्याची दाखल घेतली जाते तेव्हा खूप बरं वाटतं आणि आणखीन काम करण्याचा उत्साह येतो. त्याचं फोर्ब्सच्या यादीत आलेलं नाव म्हणजे त्याची वाढलेली जबाबदारी आहे असं त्याला वाटतं. प्रत्येक गोष्टीत निपुणता हे त्याचं वैशिष्टय़ आहे. असे निपुण कलाकार नाटय़सृष्टीला लाभले तर तिचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे यात काही शंकाच नाही.
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com