आपल्या मुलाला हव्या त्या ब्रॅण्डच्या स्लीपर्स मिळत नाहीयेत हे बघितल्यावर त्यांनी जगभरातल्या बहुतांश ब्रॅण्ड्सना एकत्र आणता येईल असं एक व्यासपीठ तयार केलं. त्यांच्या या स्टार्टअपचं नाव आहे, ‘जिंजरक्रॅश’

‘प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल’ हा  कानमंत्र उराशी बाळगून राजवी मकोल यांनी आपल्या जोडीदाराच्या साथीने यशाकडे पहिले पाऊल टाकले. यातूनच ‘जिंजरक्रश डॉट कॉम’चा जन्म झाला.

‘जिंजरक्रश’ नावावरून एखादा गेम वाटला का? पण राजवी आणि त्यांची बायको सौम्या हे काही गेम डेव्हलपर्स नाही – ते आहेत उद्योजक! अनेकांचा आधार बनलेले, अनेकांच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण करणारे, अनेकांना आनंद देणारे.

या आगळ्यावेगळ्या गोष्टीची सुरुवात होते २०११ मध्ये. अँग्री बर्ड्सची तेव्हा प्रचंड क्रेझ होती. अशातच राजवी आपल्या मुलासाठी अँग्री बर्ड्सच्या स्लीपर शोधायला लागले आणि भारतात कुठेच असं काही मिळत नाहीये हे बघून आश्चर्यचकित झाले. तितक्यात त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी अँग्री बर्ड्सच्या निर्मात्यांना ईमेल करून त्यांच्या वस्तूंच्या वितरणाची जबाबदारी घेण्यास परवानगी विचारली. अर्थात ती नाकारण्यात आली कारण रोविओ, अँग्री बर्ड्सच्या निर्मात्यांना वितरण करणारे नाही तर परवाना देणारे भागीदार हवे होते.

अशा परिस्थितीत वितरणाची कल्पना मागे घेत ते लायसन्सिंग (परवाना) उद्योगाची पायरी चढले आणि २०११ मध्ये ‘स्वदेश एस्फिल’ ही कंपनी स्थापित केली. लायसन्सिंग हा पेशा स्वीकारता त्यांना जगभरातील अनेक ब्रॅण्ड्सच्या डिझाइन आणि चित्र असलेल्या वस्तूंची विक्री भारतात करता येणार होती.

रोविओ, अँग्री बर्ड्सचे निर्माते हे अर्थातच त्यांचे क्लायंट झाले. अँग्री बर्ड्सच्या विविध वस्तूंची विक्री राजवी भारतात करू लागले. ‘भारतात अशा ब्रॅण्डेड वस्तूंची विक्री करणाऱ्या काही मोजक्या उद्योजकांपैकी आम्ही एक होतो,’ असे राजवी अभिमानाने सांगतात. गोष्ट अभिमानाचीच होती कारण ही आगळीवेगळी संकल्पना भारतात आणण्यात त्यांचा मोठा हातभार होता. राजवी म्हणतात, ‘माझ्या मुलाला अँग्री बर्ड्सच्या स्लीपर्स घेऊन देण्यासाठी मी जेव्हा इंटरनेटवर शोधाशोध केली तेव्हा असे कळले की रोविओच्या अशा वस्तू फक्त फिनलंडमध्ये मिळतात आणि त्यांची किंमतही जास्त आहे तेव्हाच मी ठरवलं की आपण या वस्तू भारतात उपलब्ध करून द्यायच्या.’ त्यांचे हे मिशन रोविओ पुरते मर्यादित नाही राहिले. ते पुढे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, हेलो किटी, ड्रीमवर्क्‍स अ‍ॅनिमेशन अशा एकूण १३ कंपन्यांशी आणि संस्थांशी जोडले गेले. आणि कुंगफू पांडा, श्रेक अशा अनेक कार्टून्सची चित्र असलेल्या वस्तू ते भारतात उपलब्ध करून देऊ  लागले.

२०१२ मध्ये त्यांनी फ्लिपकार्ट बरोबर भागीदारी करत ‘बॅक टू स्कूल’ हा उपक्रम यशस्वी केला. ‘पहिल्या दिवशी झालेली दहा हजार रुपयांची विक्री पुढच्या काही दिवसांत चक्क ६० लाखांवर गेली! ईकॉमर्सचा व्यवहार समजून घेण्यासाठी हा उपक्रम माझ्या आणि माझ्या टीमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला,’ यशाकडील वाटचालीचे एक एक टप्पे ओलांडत राजवी गोष्ट पुढे नेतात.

त्यांच्या यशाच्या तुऱ्यात आणखी एक मानाचं चिन्ह रोवलं गेलं २०१४ मध्ये.  राजवी यांची पत्नी सौम्या यांनी पुढाकार घेऊन एक गेम तयार केला. तो गेम ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने ‘बेस्ट एज्युकेशन टॉय ऑफ द ईअर’ म्हणून घोषित केला. यानंतर अनेक कंपन्या ‘स्वदेश एस्फिल’बरोबर काम करण्यासाठी विचारणा करू लागल्या तेव्हा राजवी यांच्या डोक्यात ‘जिंजरक्रश’ ची कल्पना आली. विविध ब्रॅण्ड्स आणि कंपन्यांना ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निश्चय केला आणि ऑगस्ट २०१४ मध्ये जिंजरक्रशचा जन्म झाला.

‘आम्ही एक सॉफ्टवेअर बनवलं ज्याच्यामुळे आम्ही जगातील विविध ब्रॅण्ड्सना एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊ  शकलो. या  सॉफ्टवेअरच्या सहायाने ‘जिंजरक्रश’वर तुम्हाला हव्या त्या ब्रॅण्ड्सचे डिझाइन आणि चित्र असलेल्या वस्तू तुम्ही बनवून घेऊ  शकता,’ असे राजवी सांगतात.

‘जिंजरक्रश’ची निर्मिती झाली तशी राजवी यांनी अनेक ब्रॅण्ड्सशी बोलणी करायला सुरुवात केली. डिस्नी, निक्लोडेऑन  या जगप्रसिद्ध ब्रॅण्ड्सनी जिंजरक्रशला साथ दिली आणि राजवी जवळजवळ १६८ ब्रॅण्ड्सशी जोडले गेले. आज ‘जिंजरक्रश’च्या वेबसाइटद्वारे ते एकूण तीन लाख वस्तूंचा डोलारा सांभाळत आहेत. त्यांची पत्नी सौम्या त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. सौम्या यांच्या मते, ‘नवऱ्याबरोबर एखादे स्टार्टअप चालवताना फक्त बायको म्हणून नाही तर क्षमतेमुळे तुम्ही या कंपनीच्या मुख्य पदी आहात हे सिद्ध करावे लागते.’ राजवी म्हणतात, ‘सौम्या या कंपनीचा कणा आहे. ती जिंजरक्रशचं संपूर्ण बॅकएन्ड सांभाळते.’

पण हे नवरा-बायको फक्त एकमेकांचं कौतुकच करत नाहीत तर वेळ प्रसंगी भांडतातसुद्धा. अशा वेळेस मनशा सूद यांची एन्ट्री होते. मनशा ‘जिंजरक्रश’चा एक अतिशय महत्त्वाचा घटक. मनशा या कंपनीची ‘चीफ मार्केटिंग ऑफिसर’ आहे. तिच्याशिवाय व्यवसायातील कुठलीही चर्चा अपूर्ण आहे असे राजवी यांना वाटते. ‘जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते आम्ही तिघं मिळून घेतो. मी एकटा कुठलेच महत्त्वाचे निर्णय घेत नाही,’ असे राजवी आवर्जून नमूद करतात. एका स्टार्टअपमध्येच हे होऊ  शकता यात काही शंका नाही. आणि हीच बांधीलकी, हीच संघटित भावना टिकवणारे स्टार्टअप्स नक्कीच यशाचा मार्ग धरतात.

‘जिंजरक्रश’ने यशाचा मार्ग धरत नुकतीच एक मोठी बाजी मारली आहे. इन्फोसिसचे माजी अधिकारी आणि मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे चेअरमन, मोहनदास पै यांनी ‘जिंजरक्रश’मध्ये मोठी गुंतवणूक केली. राजवी यांच्या मते, ‘ही ‘जिंजरक्रश’साठी सर्वात मोठी घटना होती. पै यांनी फक्त गुंतवणूक नाही केली तर ते सल्लागार म्हणून आमच्याशी जोडले गेले. त्यांच्यासारखे सल्लागार मिळणं हे आमचं भाग्यच आहे.’

या आणि अशा काही गुंतवणुकीतून मिळालेले पैसे राजवी ‘जिंजरक्रश’ अजून आकर्षक आणि युझर-फ्रेंडली बनवण्याच्या कामात खर्च करणार आहेत. आधीच या वेबसाइटवर ते अनेक नव नवीन प्रयोग होत आहेत. सध्या या वेबसाइटबरोबर ६२ कलाकार जोडले गेलेले आहेत. हे कलाकार तुम्हाला हवं तसा हवा त्या वस्तूवर डिझाइन करून देतात. हे वेबसाईटचे वेगळेपण आहे जे सगळ्यांना भावते आणि त्यांना मिळालेल्या ग्राहकांच्या प्रतिक्रियांवरून ते स्पष्ट होते. कार्तिक राव सांगतो, ‘आधी मला यांच्या गुणवत्तेवर शंका होती, पण जेव्हा वस्तू हातात आली तेव्हा ती इतकी छान होती की माझ्या सगळ्या शंका पुसल्या गेल्या.’ रुची, अशाच एक दुसऱ्या ग्राहकाचा आनंद तर गगनात मावत नव्हता. प्रचंड उत्साहात रुची म्हणाली, ‘माझ्या मुलीच्या दहाव्या वाढदिवसाला मला तिला एक स्पेशल गिफ्ट द्यायचे होते आणि माझी इच्छा ‘जिंजरक्रश’ने पूर्ण केली.’

या प्रतिक्रिया वाचताना ‘जिंजरक्रश’ला ग्राहकांचा भक्कम पाठिंबा आहे याची जाणीव होते. असाच एका ग्राहकाशी निगडित किस्सा राजवी स्वत: आवर्जून सांगतात, ‘अलाहाबादच्या एका ग्राहकाला डिस्नेचे चित्र असलेली एक वस्तू घ्यायची होती. पण त्यांच्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तर नव्हतंच, शिवाय नेट-बँकिंग सुविधाही नव्हती. आम्ही कॅश ऑन डिलेव्हरीची सुविधा देत नसल्यामुळे आमच्या टीमने त्याला बँकमध्ये पैसे भरून त्यांची वस्तू त्यांना मिळेपर्यंत पूर्ण सहाय केले.’ राजवी यांच्या मते त्यांच्या टीमला ग्राहकांच्या समाधानासाठी नवनव्या कल्पना शोधणे अपरिहार्य आहे.

स्टार्टअप सुरू करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि त्यावर मात करत ते इथवर पोचले आहेत. जुने दिवस आठवत राजवी सांगतात, ‘स्टार्टअप म्हटलं की अनेक अडचणी येतात. स्टार्टअप काढणं ही काही सोप्पी गोष्ट नव्हती. मी पहिले पाऊल टाकले तेव्हा सगळीच कामं स्वत: करावी लागत.  दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागे. तेव्हा कुठे स्टार्टअप नावारूपाला येतं.

अडचणींवर मात करण्यासाठी भारत सरकारने नुकताच ‘स्टार्टअप इंडिया- स्टॅण्ड अप इंडिया’ नावाचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन १६ जानेवारीला झाले. तेव्हा राजवी यांना तिथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि बिझनेस समृद्ध करण्याच्या दृष्टीने बरंच काही शिकता आलं, राजवी सांगतात. स्टार्टअप इंडियामध्ये चर्चिलेल्या अनेक विषयांपैकी गुंतवणूक या महत्त्वाच्या विषयावर ते बोलतात, ‘सध्या भारतात इकॉमर्स क्षेत्रात खूप गुंतवणूक होत आहे हे खरंय, पण जर हे असेच सुरू ठेवायचे असेल तर भारतीयांना भावणाऱ्या स्टार्टअप्सच्या विविध संकल्पना सतत शोधत राहणे गरजेचे आहे. सौम्या या विचाराला दुजोरा देत होतकरू उद्योजकांना प्रेमाचा सल्ला देतात, ‘प्रत्येक स्टार्टअपला चांगल्या आणि वाईट दिवसांमधून जावे लागते. त्यातून ते तावूनसुलाखून निघतात. तुम्ही फक्त विश्वास ठेवला पाहिजे की जोपर्यंत चांगले दिवस येत नाहीत तोपर्यंत आपलं काम संपलेलं नाही.’ मुलाखत संपते तसं ‘जस्ट कीप गोइंग, सक्सेस विल फॉलो’ हा त्यांचा कानमंत्र पुन्हा ऐकू येतो, कानात घुमतो आणि राजवी-सौम्याची गोष्ट वाचता वाचता आपण ही आपल्या स्टार्टअपची स्वप्न पाहू लागतो.
तेजल शृंगारपुरे –