ythदर वर्षी २६ जानेवारीला दिल्लीत राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये सहभागी व्हायची संधी मिळणं हे प्रत्येक एनसीसी कॅडेटचं स्वप्नं असतं. लाखो विद्यार्थ्यांमधून मोजक्याच विद्यार्थ्यांचं हे स्वप्नं वास्तवात येतं.

एनसीसी हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर येतात ते ‘झीरो कट’ केलेले कॉलेज विद्यार्थी. त्यांच्या या झिरो कटमुळे ते लगेच लक्षात येतात, कधी कधी चेष्टेचा विषयदेखील होतात. पण लष्करी गणवेशात लेफ्टराइट-लेफ्टच्या तालावर सुरू असणारी त्यांची कवायत पाहिली की त्यांचा रुबाब जाणवतो. पण त्यांचा खरा रुबाब दिसतो २६ जानेवारीला. दिल्लीला राजपथावर साजऱ्या होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात.

देशाच्या लष्कराच्या जोडीने २६ जानेवारीला संचलन करणं हे एनसीसीच्या प्रत्येक कॅटेडचं स्वप्न असतं. किंबहुना त्यासाठी तो कितीही मेहनत घ्यायला तयार असतो. आरडी परेड अर्थात रिपब्लिकन डे परेडमध्ये सामील व्हायचं हे स्वप्न रम्य असलं तर त्यासाठी जवळपास वर्षभर अखंड मेहनत करावी लागते. तेव्हा कुठे देशभरातून १२० कॅडेट्सची  एक तुकडी राजपथावर संचलन करते. विशेष म्हणजे हे खडतर परिश्रम दर वर्षी सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्सचे कॅडेट्स अतिशय मेहनत करतात, म्हणूनच गेल्या वीस वर्षांत दर वर्षी या कॉलेजमधून दोन-तीन कॅडेट्स आरडी परेडमध्ये सहभागी होतात.

आरडी कॅम्पमध्ये सहभागी होण्याचा क्षण आनंदाचा असतो, पण तो काही सहजासहजी वाटय़ाला येत नाही. त्यासाठी मजबूत रगडा खावा लागतो. रगडा खाणे हा टिपिकल आर्मीचा शब्द. दिवसभर घामटा काढणारी कवायत करवून घेण्याला हा खास शब्द लाभला आहे. महाविद्यालयीन स्तरावरील एक कंपनी, त्या जिल्ह्य़ातील महाविद्यालयांतील कंपनी मिळून एक बटालिएन आणि अशा चार-पाच बटालियनचा एक ग्रुप आणि राज्यातील सर्व ग्रुपचे मिळून एक डिरेक्टोरेट तयार होते. या अशाच टप्प्यातून कॅडेट्सना पाच ते सहा कॅम्प वर्षभर करावे लागतात. देशाच्या प्रत्येक राज्यातून निवडक कॅडेट्स दिल्लीमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात एकत्र येतात. त्या सर्वच कॅडेट्सना राजपथावर संधी मिळतेच असे नाही. तेथे केवळ १२००च कॅडेट्स असतात. येथे ड्रिलचा सर्वाधिक सराव घेतला जातो. त्यातूनच उत्तम कॅडेट्स राजपथावरील संचलनात सहभागी होऊ शकतात.

साधारणत: ऑगस्टपासून त्यासाठी कॅम्प सुरू होतात. कॅम्पमध्ये दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजता होते. सर्व तयारी करून रायफलवर सराव सुरु होतो. साधारणपणे साडेतीन-चार किलोमीटर धावून आल्यावर वॉर्म अप केला जातो व त्या नंतर खरा सराव सुरू होतो. (पूर्वी किमान सहा किलोमीटर धावण्याचा निकष असायचा. हल्ली ड्रिलवर तर भर दिला आहेच, शिवाय आयक्यूदेखील तपासला जातो.) कॅम्पमधील संपूर्ण सराव हा लष्करी अधिकाऱ्याच्या तालमीत होतो. प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला सिद्ध करावे लागते. हे ट्रेनिंग अत्यंत खडतर असते. केवळ ड्रिलच नाही तर या संपूर्ण काळात तुम्हाला लष्कराचे नियम अंगी बाणवावे लागतात. येथे अगदी वरिष्ठांशी बोलायची पद्धतदेखील वेगळी असते. दिवसातल्या कोणत्या वेळेला कोणते कपडे (गणवेश) वापरायचे याचे नियम असतात. हे सारं सांभाळत चार पाचशे कॅडेट्समधून काहीच जणांना निवडलं जातं. कॅटसी वन, कॅटसी टू, थ्री असे टप्पे ओलांडत कॅडेट   प्री आरडी कॅम्पला जातो. येथेदेखील त्याला कदाचित बाहेर पडावं लागू शकतं. त्यामुळे प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो.

कॅम्पमध्ये मुलांना राहण्यापुरती व्यवस्था केली जाते, मात्र घरासारख्या आरामदायी सुखसुविधा तिथे नसतात. त्यामुळेच आलेल्या कोणत्याही अडचणींचा सामना हसत हसत करण्याचं व कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचं बळ या कॅडेट्समध्ये येतं. स्वावलंबन आणि सहकार्याचे धडेही इथेच मिळतात. कॅम्पला येणारे लोक बहुतांशी अनोळखी असतात. मात्र नंतर तेच लोक आपले चांगले मित्र बनतात. आसपासच्या जगात कसं वावरावं याची शिकवणही इथेच मिळते. एकदा का सराव संपला, की मग संध्याकाळी बराकीत आल्यावर गप्पांचे फड रंगतात, हास्यविनोद होतो, तसेच अनेक गमतीजमतीही होतात आणि अशा प्रकारे मग दिवसभराचा थकवा दूर केला जातो. कधी कधी कंबळ परेडदेखील होते. म्हणजे एखाद्याच्या अंगावर ब्लँकेट टाकायचे, त्याला सर्वानी झोडपायचं. खडतर सरावाबरोबरच ही सारी धम्माल येथे सुरू असते. त्यात एक वेगळाच आनंद असतो.

घरापासून लांब राहिल्यामुळे घरची आठवण येते आणि मग घरी संपर्क करून त्या दिवशी काय झाले हे सगळं सांगितलंही जाते; मात्र हल्ली मोबाइलच्या अतिवापरामुळे लक्ष विचलित होण्याचा धोकादेखील असतो. त्यामुळे दिल्लीच्या परेडला तर  मोबाइलच काढून घेतले जातात. मात्र या काळात कॅम्पमधील अधिकारी व तेथील सर्व कॅडेट्स हेच एक नवीन कुटुंब बनतं. कॅम्पमध्येच सणही साजरे केले जातात.

आरडीसीमध्ये ड्रिलसोबत गार्ड ऑफ ऑनर, राष्ट्रीय एकात्मकता जागरूकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, सर्वोत्तम कॅडेट (मुलगा व मुलगी), एरो मॉडेलिंग आणि मॉडेलिंग अशा राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा होतात. दिल्लीतल्या कॅम्पसाठी १७ डिरेक्टरेट्सच्या तिन्ही दलांतून कॅॅडेट्स निवडले जातात. विविध राज्यांतील विविध भाषा बोलणारे, विविध संस्कृती, प्रदेश तसेच जातीधर्माचे कॅडेट्स यानिमित्ताने एकत्र येतात. ‘विविधतेतली एकता’ ही संकल्पना एकमेकांच्या संपर्कामुळे प्रत्यक्षात वाढीस लागते. या कॅडेट्सना राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच दिल्लीतील मान्यवरांना भेटण्याची संधी मिळते. काहींना तर युथ एक्स्चेंज प्रोग्रॅमद्वारे परदेशात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळते.

आरडी कॅम्पच्या जोडीनेच आणखीन एक कॅम्प राष्ट्रीय पातळीवरील कॅम्प सुरू असतो. बेसिक लिडरशिप कॅम्प. यामध्ये सारा भर असतो तो नेमबाजी, अडथळ्यांची स्पर्धा आणि नकाशावाचन. हे कॅम्प आरडी कॅम्पच्या जोडीनेच सुरू होतात. त्यातदेखील चाळणी पद्धती तशीच असते. फक्त यांचा अंतिम कॅम्प २६ जानेवारीला न होता एक महिना आधीच संपतो. त्यामध्ये प्रत्येक डिरेक्टोरेटने (साधारणपण प्रत्येक राज्याचा एक) मिळवलेले गुण हे आरडीच्या गुणांमध्ये पकडले जातात आणि त्याआधारे राष्ट्रपतींचा ध्वज सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या डिरेक्टोरेटला दिला जातो. गेली सहा वर्षे हा मान महाराष्ट्राला नियमितपणे मिळाला आहे. या वर्षीदेखील हा मान महाराष्ट्राच पुन्हा मिळवणार अशी खात्री असल्याचं लेफ्टनंट कमांडर सुनील कांबळे यांनी सांगितलं.

एनसीसीच्या प्रत्येक कॅम्पमध्ये खूप काही शिकायला मिळतं; पण आरडीसीमध्ये तुम्ही इतक्या वेगवेगळ्या कॅडेट्सना भेटता की, हा अनुभवच अनोखा असतो. अर्थात त्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही आणि ही सारी मेहनत वाया जात नाही, कारण रोजच्या जीवनातदेखील ही शिस्त कामी येत राहते. कारण एनसीसीचं रसायनच वेगळं असतं.

16-lp-siddharth-kambleसिद्धार्थ कॉलेजचे यश

मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नेव्हल तुकडीतील कॅडेट्स सलग तीन वर्षे राजपथावर संचलनात सहभागी होत असतात. मात्र दिल्ली गाठण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही असे मागील वर्षी आरडी कॅम्पसाठी गेलेल्या अतुल आणि प्रीती या कॅडेट्सशी बोलताना जाणवलं. कठोर परिश्रम तसेच अभ्यासासाठी महाविद्यालयाकडून मिळणारं सहकार्य हेच या यशाचं कारण आहे. या वर्षी नौदलाच्या महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या बारा कॅडेट्समध्ये रोहित सासणे आणि श्याम राणे हे दोन कॅडेट्स याच महाविद्यालयाचे आहेत. प्रत्येक महाविद्यालयातील एक प्राध्यापक हे त्या त्या महाविद्यालयाच्या तुकडीचे नेतृत्व करत असतात. सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सचे लेफ्टनंट कमांडर डॉ. सुनील कांबळे हे या कॉलेजच्या एनसीसीच्या तुकडीचं १९९६ पासून नेतृत्व करत आहेत. या कॉलेजमधील एनसीसीत असणारे १८ कॅडेट्स आज सैन्यदलात नोकरी करत आहेत.
निशांत पाटील – response.lokprabha@expressindia.com