ऑलिम्पिकमधील भारताच्या आजवरच्या कामगिरीचा इतिहास हा एकूण पदकांच्या अर्धा टक्का राहिला आहे. पण गेल्या काही वर्षांत क्रिकेटचे खूळ डोक्यावर असतानादेखील अनेक आशादायी गोष्टी घडल्या आहेत. हॉकी, नेमबाजी, जिम्नॅस्टीक, रोईंग, ज्युडोसारख्या खेळात नव्या चेहऱ्यांनी पदकांची अपेक्षा उंचावली आहे. त्यातूनच पदकांचा अर्धा टक्का ओलांडला जाईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

क्रांती घडविणारे नेमबाज

नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळविता येते हे पहिल्यांदा भारतीय संघटकांना कळले ते राज्यवर्धनसिंह राठोड याने मिळविलेल्या रौप्यपदकाद्वारेच. २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत त्याने डबल ट्रॅप विभागात हे पदक मिळविले आणि तेव्हांपासूनच भारतीय नेमबाजी क्षेत्रात क्रांती घडली. २००८ मध्ये बीजिंग येथे झालेल्या स्पर्धेत अभिनव बिंद्रा याने दहा मीटर एअर रायफल या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतास वैयक्तिक क्रीडा प्रकारात मिळालेले हे पहिले सुवर्णपदक होते. या पदकामुळे नेमबाजीकडे खेळाडूंबरोबरच प्रायोजकही वळू लागले. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली. अनेक वर्षे ऑलिम्पिक पदकासाठी झगडणाऱ्या गगन नारंग याने दहा मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक मिळविले तर विजयकुमार शर्मा याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये रौप्यपदकजिंकले. या पदक विजेत्यांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना पदकांपर्यंत पोहोचण्यासाठी अपेक्षेइतकी कामगिरी करता आलेली नाही.

अभिनव, गगन यांच्याप्रमाणेच जितू राय, मानवजितसिंग संधू, अपूर्वी चंडेला यांच्याकडूनही यंदा पदकाची अपेक्षा आहे.

ध्यानचंद युग निर्माण करण्याची गरज

मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी संघात असताना १९२८ ते १९५२ या काळात भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णयुग निर्माण केले होते. मात्र १९८४ नंतर भारतीय संघाच्या कामगिरीत अनेक चढउतार पाहावयास मिळाले आहेत. पूर्वी भारतीय संघाचा जागतिक स्तरावर दरारा होता. आता भारतीय संघाला अपेक्षेइतके गांभीर्याने घेतले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत स्थान मिळविणे हेच पहिले ध्येय असणार आहे.

अलीकडे भारताने चॅम्पियन्स स्पर्धेत उपविजेतेपद मिळवीत सनसनाटी कामगिरी केली असली, तरी ऑलिम्पिक स्पर्धा ही खूपच वेगळी असते आणि तेथील अक्षम्य चुकादेखील महागात पडत असतात. हे लक्षात घेत भारतीय हॉकीपटूंसाठी ऑलिम्पिक पदक हे मृगजळासारखेच आहे.

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार मानले जात असे. त्यांनी १९२८ ते १९३६ अशा तीन ऑलिम्पिकमध्ये संघास सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. भारतीय हॉकीचा मजबूत पाया रचण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. १९२८ ते १९५६ या कालावधीत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजविले. दोन महायुद्धांमुळे १९४० व १९४४ च्या ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. अन्यथा भारताच्या खात्यात आणखी दोन सुवर्णपदकांची भर पडली असती. भारतास १९६० च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताला हरविले. १९६४ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने या पराभवाची परतफेड करीत पुन्हा सुवर्णपदकावर मोहोर नोंदविली. १९८० मध्ये मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिकवर ऑस्ट्रेलियासह अनेक बलाढय़ देशांनी बहिष्कार घातला होता. त्याचाच फायदा घेत भारताने विजेतेपद मिळविले. भारतीय हॉकी संघास त्यानंतर एकदाही पदक मिळविता आलेले नाही.

भारतीय हॉकी संघाने २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सनसनाटी विजेतेपद पटकावीत ऑलिम्पिक प्रवेशही निश्चित केला. अलीकडेच चॅम्पियन्स स्पर्धेतील उपविजेतेपद ऑलिम्पिक पदकासाठी प्रेरणादायक ठरणार आहे. साखळी गटात भारतास जर्मनी, नेदरलँड्स, अर्जेन्टिना या तुल्यबळ संघांबरोबर दोन हात करावे लागणार आहेत.

महिलांच्या विभागात भारताने पात्रता निकष पूर्ण केला हीच त्यांच्यासाठी भरीव कामगिरी आहे. यापूर्वी १९८० मध्ये मॉस्को येथे अन्य संघांच्या उपस्थितीत भारतास स्पर्धेत प्रवेश मिळाला होता. साखळी गटात भारतीय संघ किती सामने जिंकणार हीच एकमेव उत्सुकता आहे.

तिरंदाजीत सुधारणा अपेक्षित

भारतीय तिरंदाज १९८८ पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहेत. मात्र त्यांना कधीही पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविता आलेले नाही. भारतीय तिरंदाज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा आदी स्पर्धामध्ये घवघवीत यश मिळवीत असले तरी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सपशेल निराशा केली आहे.

भारताने सेऊल येथे १९८८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला. पुरुषांच्या वैयक्तिक विभागात संजीवसिंग, लिम्बाराम व शामलाल मीणा यांनी सपशेल निराशा केली. तसेच सांघिक विभागातही त्यांचा सपशेल धुव्वा उडाला. पुन्हा १९९२ मध्ये तसेच चित्र पाहावयास मिळाले. मात्र वैयक्तिक व सांघिक या दोन्ही विभागांत त्यांच्या पदरी निराशाच पडली. १९९६ च्या ऑलिम्पिकमध्ये चांगटे व लिम्बाराम यांच्यासमवेत स्कालझांग दोरजे हादेखील उतरला होता. त्यांना वैयक्तिक स्पर्धेबरोबरच सांघिक विभागातही फारसे यश मिळाले नाही.

भारताचा एकही खेळाडू २००० च्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला नव्हता. २००४ मध्ये वैयक्तिक स्पर्धेबरोबरच सांघिक विभागातही निराशाच पदरी पडली. महिलांमधील वैयक्तिक विभागात पहिल्या दहा क्रमांकांमध्येही स्थान मिळविता आले नाही. सांघिक विभागात आठव्या क्रमांकावर भारतास समाधान मानावे लागले. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटात केवळ मंगलसिंग हा एकच खेळाडू पात्र ठरला होता. मात्र त्यालाही खराब कामगिरीस सामोरे जावे लागले. महिलांमध्ये वैयक्तिक विभागात त्यांची कामगिरी खूपच सुमार दर्जाची झाली. सांघिक विभागात त्यांनी सातवे स्थान मिळविले. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पुरुष व महिला विभागात पुन्हा निराशाच केली. रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये महिला गटात भारतीय खेळांडूंकडून काही आश्चर्य घडले तरच उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. अन्यथा भारतीय खेळाडूंकडून फारशी अपेक्षा ठेवणेच चुकीचे होईल.

टेनिसमध्ये पेस एकांडा शिलेदार

भारतीय टेनिसपटू विविध ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये विजेतेपदांची खैरात करीत असले तरी ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेस याने मिळविलेल्या कांस्यपदकाचा अपवाद वगळता भारताला पदकांपर्यंत पोहोचता आलेले नाही. पेस याने १९९६ मध्ये अटलांटा येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये एकेरीत कांस्यपदक जिंकून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. पेस व महेश भूपती यांनी पुरुषांच्या दुहेरीत अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे. मात्र त्यांना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविता आलेले नाही. सानिया मिर्झा ही दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित खेळाडू आहे. तिने मार्टिना िहगिस हिच्या साथीत ग्रँड स्लॅम विजेतेपदांची खैरात केली आहे. तसेच तिने मिश्र दुहेरीतही अजिंक्यपदे मिळविली आहेत, मात्र महिला दुहेरीत ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी आजपर्यंत तुल्यबळ साथीदार लाभलेली नाही. मिश्र दुहेरीतही तिला अपेक्षेइतकी साथ अन्य खेळाडूंची मिळालेली नाही.

रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये पेस हा दुहेरीत रोहन बोपण्णा याच्या साथीत उतरणार आहे. या जोडीने अलीकडेच डेव्हिस चषक लढतीत कोरियन जोडीवर मात करण्यात यश मिळविले आहे. सानिया ही प्रार्थना ठोंबरे या महाराष्ट्राच्या खेळाडूसमवेत उतरणार आहे. त्यांनी दक्षिण आशियाई स्पर्धेत अव्वल कामगिरी केली होती. तेथील अनुभवाचा फायदा त्यांना रिओ येथे कसा मिळतो याचीच उत्सुकता आहे.

कुस्तीमध्ये दोन पदकांची अपेक्षा

कुस्ती हा भारताचा पारंपरिक क्रीडा प्रकार असला तरी भारतास या खेळात मोजकेच यश लाभले आहे. १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी कांस्यपदकजिंकले. त्यानंतर २००८ पर्यंत भारताला सुशीलकुमार याने कांस्यपदक मिळवून दिले. २०१२ मध्ये सुशीलकुमार याने रौप्यपदक मिळवीत लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याची कामगिरी केली. याच स्पर्धेत योगेश्वर दत्त याने कांस्यपदक मिळवीत भारताला आणखी एक पदक मिळवून दिले. कांस्यपदकाच्या या लढतीचे वेळी योगेश्वर हा जखमी असूनही त्याने अतिशय जिद्दीने ही लढत खेळली आणि स्वप्नवत यश मिळविले. या पदकांचा अपवाद वगळता भारतीय मल्लांची कामगिरी निराशाजनकच झाली आहे. यंदा योगेश्वर हा पुन्हा आपले नशीब अजमावत आहे. त्याच्याबरोबर संदीप तोमर, रवींदर खत्री यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. महिला गटात आजपर्यंत भारतीय खेळाडूंची कामगिरी फारशी चमकदार झालेली नाही. काही अघटित घडले तरच साक्षी मलिक व विनेश फोगट यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

बॅडमिंटनमध्ये पुन्हा सायनावर भिस्त

प्रकाश पदुकोण व पुल्लेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत विजेतेपद मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र त्यांच्या यशामुळे अपेक्षेइतके वलय बॅडमिंटनला मिळाले नाही. हे वलय निर्माण करून देण्यात सायना नेहवाल हिचा महत्त्वाचा वाटा आहे. तिने जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची दखल घ्यावी लागण्याइतके यश मिळविले. २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले. २००८ च्या ऑलिम्पिकमध्येही तिने भाग घेतला होता. मात्र त्या वेळी ती खूप नवीन होती. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत तिला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. २०१२ च्या स्पर्धेत पारुपल्ली कश्यप याला पदकाच्या उंबरठय़ावरून पराभव स्वीकारावा लागला होता. सायनाच्या पदकाचा अपवाद वगळता भारतीय खेळाडूंना फारशी चमक दाखविता आलेली नाही.

सायना हिच्याबरोबरच यंदा पी.व्ही.सिंधू हिच्याकडूनही भारतास पदकाची अपेक्षा आहे. ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या दुहेरीत अनेक विजेतेपदे व उपविजेतेपदे मिळविली आहेत, मात्र ऑलिम्पिकमध्ये त्यांनी निराशा केली आहे. ही निराशा त्या कशा दूर करणार हीच उत्कंठा आहे. पुरुषांच्या एकेरीत किदम्बी श्रीकांत याच्यावर भारताची भिस्त आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी केली आहे.

देशाचे लक्ष दीपा कर्माकरकडे

जोखीम पत्करली नाही, तर आयुष्याला अर्थच काय, असे दीपा कर्माकर अभिमानाने म्हणते. १९६४नंतर प्रथमच कलात्मक जिम्नॅस्टिक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व होणार आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली दीपा ही पहिली भारतीय जिम्नॅस्टिक्सपटू आहे. २०१४च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दीपाने कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा जिम्नॅस्टिक्समधील सर्वात कठीण प्रकार मानला जातो. तोच दीपा रिओ ऑलिम्पिकमध्ये सादर करणार आहे. २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत आशीष कुमारने मिळवलेले कांस्यपदक, हे भारताला जिम्नॅस्टिक्समधील मिळालेले पहिलेवहिले पदक. त्यानंतर भारतात खेळाचे वातावरण वेगाने बदलत गेले. त्यावेळी आशीषला रशियन प्रशिक्षक व्लादिमिर चेर्टकोव्हचे मार्गदर्शन लाभले होते. ‘‘ऑगस्ट २००९मध्ये कोणतीही साधनसामुग्री आम्हाला देण्यात आली नव्हती. फेब्रुवारी २०१०मध्ये जी उपलब्ध करून देण्यात आली, ती वीस वष्रे जुनी होती,’’ असा गौप्यस्फोट चेर्टकोव्ह यांनी स्पध्रेनंतर केला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१०मध्ये रॉटरडॅमला झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेला भारतीय संघ पाठवण्यास भारतीय जिम्नॅस्टिक्स महासंघाने नकार दिला होता. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकसाठी कोणताही भारतीय खेळाडू थेट पात्र ठरला नव्हता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत ११ पुरुषांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. १९५२मध्ये दोन, १९५६मध्ये तीन आणि १९६४मध्ये सहा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे तब्बल ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीपा कोणता पराक्रम दाखवते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

यशाबरोबरच चोख वर्तनाची गरज

‘‘ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली होण्याचा मान मिळवण्यापेक्षा आणखी कोणता अत्युच्च क्षण मी आयुष्यात अनुभवू शकेन, याची मी कल्पनाही केली नव्हती!’’.. सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय कन्या कर्नम मल्लेश्वरी हिचे भावनोत्कट उद्गार. या यशानंतर तिच्या आनंदाला सीमा नव्हती. १८९६च्या पहिल्या ऑलिम्पिकपासून पुरुषांसाठी वेटलिफ्टिंग हा खेळ अस्तित्वात आहे. पण सिडनी ऑलिम्पिकमध्ये प्रथमच महिलांसाठी वेटलिफ्टिंगचे पदकांचे द्वार खुले झाले. अन् आंध्र प्रदेशमधील एका छोटय़ाशा गावातील या कन्येने भारतासाठी कांस्यपदक जिंकून आणले. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेने प्राप्त केलेले हे पहिले पदक म्हणून सुवर्णाक्षरांनी अधोरेखित झाले. मग ‘आंध्र प्रदेशची पोलादी कन्या’ आणि ‘भारताची सुवर्णकन्या’ असा तिचा गौरव झाला. या यशानंतर खरे तर वेटलिफ्टिंगकडून मोठय़ा यशाची अपेक्षा करणे स्वाभाविक होते. पण उत्तेजक द्रव्य पदार्थाच्या सेवनामुळे भारतीय वेटलिफ्टिंगची पार वाताहत झाली. गेल्या १६ वर्षांचा भारतीय वेटलिफ्टिंगचा इतिहास नजरेखालून घालताना मल्लेश्वरीच्या अभूतपूर्व यशामुळे एकीकडे देशाला अभिमान वाटतो. परंतु दुसरीकडे अनेक वेटलिफ्टिंगपटूंनी उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणामुळे भारताची मान शरमेने खाली झुकवल्याचे लक्षात येते. गेल्या काही वर्षांतील या लाजिरवाण्या कामगिरीमुळे आजही आपण वेटलिफ्टिंगमधून पदकाची अपेक्षा करताना कमालीचे साशंक आणि संशयी आहोत. पण देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणत्याही खेळाडूने आपण असे कोणतेही वाईट कृत्य करून देशाची इज्जत वेशीवर टांगणार नाही, याची खूणगाठ मनाशी बाळगणे आवश्यक आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सतीश शिवलिंगम आणि साईखोम मीराबाई चानू हे दोघे जण भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

गोल्फमध्ये अनपेक्षित कामगिरीची अपेक्षा

ऑलिम्पिकमध्ये जागतिक स्तरावर अव्वल यश मिळविणाऱ्या अनेक परदेशी खेळाडूंनी गोल्फमधून माघार घेतली आहे. त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना कसा मिळतो हे पाहणे उचित ठरेल. पुरुष गटात शिव चौरासिया व अतनु लाहिरी हे दोन खेळाडू पात्र ठरले आहेत. या खेळाडूंनी परदेशातील काही स्पर्धामध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी अचूकतेवर ते किती भर देतात यावरच त्यांच्या पदकाच्या आशा अवलंबून आहेत. महिलांमध्ये आदिती अशोक या खेळाडूने ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केली आहे. भारतीय महिला गोल्फपटूंसाठी ही खरोखरीच ऐतिहासिक कामगिरी आहे. अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीचा ती कसा फायदा घेते हाच औत्सुक्याचा विषय आहे.

यंदा अ‍ॅथलेटिक्सकडेही लक्ष!

ऑलिम्पिक स्पध्रेतील सर्वाधिक १४१ (४७ सुवर्ण) पदकं अ‍ॅथलेटिक्समध्ये असणार आहेत. त्यासाठी दहा हजारांहून अधिक खेळाडूंमध्ये चुरस रंगणार आहे. त्या हजारांमध्ये भारताचे ३६ खेळाडू आहेत. १२ ते २१ ऑगस्ट या कालावधीत जोआओ हॅव्हलँग आणि सॅम्बोड्रोमो स्टेडियमवर या स्पर्धा रंगणार आहेत. ट्रॅक अ‍ॅण्ड फील्ड, रोड शर्यत आणि चालण्याची शर्यत अशा विभागांत या खेळाची विभागणी करण्यात आली आहे. १९८८ नंतर पहिल्यांदाच अ‍ॅथलेटिक्सच्या शर्यती सकाळच्या सत्रात खेळवण्यात येणार आहेत. हा खेळ अधिकाधिक लोकांना पाहायला मिळावा यासाठी ऑलिम्पिक आयोजन समिती आणि प्रक्षेपण विभागाने तशी विनंती केली होती. धावणे, उडी मारणे आणि फेकणे या पारंपरिक खेळांचा १८९६च्या अथेन्स ऑलिम्पिकपासून समावेश आहे. त्यात अधिक खेळांची भर पडून हा आकडा २८पर्यंत पोहोचला आहे.

सरळ शर्यत

यामध्ये १००, २००, ४००, ८००, १५००, ५००० आणि १०००० मीटर शर्यतींचा, तर ४ बाय १०० आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीचा समावेश असतो.

अडथळ्यांची शर्यत

१०० आणि ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत धावपटूला १.०७ मीटर उंची असलेले १० अडथळे पार करावे लागतात. महिला धावपटूंसाठी ही उंची ०.८४ मीटर असते. ४०० मीटर शर्यतीत पुरुषांना ०.९१४ मीटर, तर महिलांना ०.७६२ मीटर उंचीचा अडथळा ओलांडावा लागतो. याशिवाय स्टीपलचेस प्रकारातही पुरुष व महिलांना अनुक्रमे ०.९१ मीटर आणि ०.७६ मीटर उंचीच्या अडथळ्यांसह पाण्याच्या डबक्यातूनही जावे लागते. त्याची खोली ०.७० मीटर इतकी असते.

रस्ता शर्यती

४२.१९५ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा, २० किमी (पुरुष व महिला) आणि ५० किमी (पुरुष) असे तीन प्रकार आहेत.

हेप्टेथलॉन (महिलांसाठी) व डेकॅथलॉन (पुरुषांसाठी) या दोन प्रकारांत विविध खेळांच्या कसोटीतून खेळाडूला जावे लागते. हेप्टेथलॉनमध्ये १०० मीटर अडथळा, २०० व ८०० मीटर शर्यत, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक व भालाफेक यांचा समावेश असतो. डेकॅथलॉनमध्ये १००, ४००, १५०० मीटर, ११० मीटर अडथळा, लांब उडी, उंच उडी, बांबू उडी, गोळाफेक, थाळी व भालाफेक आदी खेळ असतात.

उडी

उंच उडी – जितकी प्रदीर्घ उंच उडी, तितकीच विजयाची संधी अधिक, हे साधेसोपे समीकरण. खेळाडूला एका विशिष्ट उंचीवरून उडी मारण्याची तीन वेळा संधी मिळते. तिन्ही वेळेला अपयश आल्यास त्याला बाद ठरवण्यात येते.

बांबू उडी – बांबूच्या साहाय्याने खेळाडूला अधिकाधिक उंच उडी मारावी लागते. उंच उडीप्रमाणे खेळाडूला तीन संधी मिळतात.

लांब उडी – प्रत्येक खेळाडूला जास्तीतजास्त लांब उडी मारण्याच्या तीन संधी मिळतात. ४० मीटर अंतरावरून धावत येऊन खेळाडूला लांब उडी मारायची असते.

तिहेरी उडी – येथेही ४० मीटर अंतरावरून धावत यावे लागते, परंतु अंतिम उडी मारण्यापूर्वी खेळाडूला आखलेल्या रेषेपूर्वी दोन वेळा उडी मारावी लागते.

फेकण्याची स्पर्धा

गोळाफेक – पुरुषांना ७.२ किलो वजनाचे, तर महिलांना ४ किलो वजनाचा गोळा तीन प्रयत्नांत जास्तीतजास्त लांब फेकावा लागतो.

थाळीफेक – यातही पुरुष व महिलांसाठी वेगवेगळ्या वजनांच्या थाळी असतात. प्रत्येकी तीन प्रयत्नांत पुरुषांना २ किलो , तर महिलांना १ किलो वजनाची थाळी दूरवर फेकण्याचे आव्हान पेलावे लागते.

भालाफेक –  महिलांना ६०० ग्राम, तर पुरुषांना ८०० ग्राम वजनाचा भाला तीन प्रयत्नांत लांब फेकावा लागतो.

हातोडाफेक – या प्रकारात पुरुष (७.२ किलो) व महिला (४ किलो) खेळाडूंची चांगलीच कसोटी लागते. तीन प्रयत्नांत त्यांना पदकासाठी कडव्या आव्हानांना सामोरे जावे लागते.

टेबल टेनिस: अनुभव महत्त्वाचा ठरेल

भारतीय खेळाडू टेबल टेनिसमध्ये पात्रता पूर्ण करतात हीच मोठी कामगिरी मानली जाते. अचंता शरथ कमाल, नेहा अगरवाल, सौम्यजित घोष, अंकिता दास यांनी केवळ प्रतिनिधित्व करण्याचे काम केले आहे. या खेळात चीन, जपान, स्वीडन, दक्षिण कोरिया आदी देशांच्या खेळाडूंचे प्राबल्य असते. भारतीय खेळाडूंना दुसऱ्या फेरीपलीकडे पोहोचता आलेले नाही. भारतीय खेळाडूंची कामगिरी राष्ट्रकुल, दक्षिण आशियाई स्पर्धापुरतीच मर्यादित राहिली आहे. खरंतर गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंना परदेशात खेळण्याची भरपूर संधी मिळाली आहे. मात्र त्याचा फायदा घेण्यात त्यांना यश मिळालेले नाही.

यंदा भारताचे शरथ कमाल, सौम्यजित घोष, मौमा दास व मनिका बात्रा हे चार खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. दुसऱ्या फेरी पलीकडे त्यांना प्रवेश करता आला तरी त्यांच्यासाठी ती ऐतिहासिक कामगिरी ठरणार आहे.

दत्तूची कामगिरी प्रेरणादायी ठरावी

महाराष्ट्राचा रोइंगपटू दत्तू भोकनळ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. नाशिक जिल्ह्य़ातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या दत्तूने दहावीत वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कर्तेपण स्वीकारले. उत्तम शरीरयष्टीमुळे दत्तूची लष्करात निवड झाली. नोकरीच्या निमित्ताने त्याची नौकानयन या सर्वस्वी नव्या खेळाची ओळख झाली. उंचपुऱ्या आणि काटक शरीराच्या दत्तूने अल्पावधीतच खेळाला आपलंसं केलं. दक्षिण कोरियात झालेल्या आशिया ओश्ॉनिया गटाच्या ऑलिम्पिक पात्रता रेगाटा स्पर्धेत ‘सिंगल स्कल’ अर्थात एकल वल्हे प्रकारात २ किलोमीटरचे अंतर ७ मिनिटे आणि ७.४९ सेकंदात पूर्ण करत दुसरे स्थान पटकावले. अंतिम फेरी गाठणाऱ्या अव्वल सात रोइंगपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकणार होते. अंतिम फेरीत धडक मारत दत्तूने रिओवारी पक्की केली. दुसऱ्या स्थानासह दत्तूने रौप्यपदकही पटकावले. २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने दोन सुवर्णपदकांवर कब्जा केला होता. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या १६व्या आशियाई रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. एका अपघातामुळे दत्तूच्या आईला माणसांना ओळखण्यात अडचण येत आहे. पुण्यात लष्कराच्या रुग्णालयात दत्तूच्या आईवर उपचार सुरू आहेत. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर दत्तू अमेरिकेतील मियामी रोइंग सराव केंद्रात सरावासाठी रवाना झाला. भारतीय रोइंग महासंघ आणि आर्मी नोडल युनिट यांच्यात दत्तूला सरावासाठी पाठवण्यावरून वाद निर्माण झाला. अमेरिकेत दत्तूला आर्थिक चणचण निर्माण झाल्याचे वृत्त पसरले. क्रीडा मंत्रालय आणि रोइंग महासंघाने वेळीच दखल घेऊन प्रश्न सोडवला. लंडन ऑलिम्पिकमध्ये स्वर्ण सिंग सिंगल स्कल प्रकारात तर संदीप कुमार आणि मनजीत सिंग लाइटवेट डबल स्किल्स प्रकारात सहभागी झाले होते. यंदा फक्त दत्तू पात्र ठरला आहे. रोइंग प्रकारात भारताला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळालेले नाही. रिओमध्ये दिग्गजांच्या भाऊगर्दीत दत्तूची एकला चलो रे वारी असणार आहे. आर्थिकदृष्टय़ा जेमतेम कुटुंब वाढलेल्या आणि प्रकाशझोतापासून सदैव दूर असणाऱ्या दत्तूची कहाणी असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.

‘भारताच्या फेल्प्स’कडून मोठय़ा अपेक्षा

हकीमुद्दीन हबीबुल्ला, निशा मिलेट, वीरधवल खाडे, शमशेर खान, रेहान पोंचा, अंकुर पोसरिया, संदीप शेजवळ, शिखा टंडन, गगन उलालमठ, सेबॅस्टियन झेव्हियर या जलतरणपटूंनी आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदा भारतीय जलतरणपटू ऑलिम्पिकसाठी ‘अ’ तसेच ‘ब’ हे निर्धारित निकष पूर्ण करू शकले नाहीत. परंतु  ‘युनिव्हर्सलिटी रुल’ अंतर्गत साजन प्रकाश आणि शिवानी कटारिया यांची निवड झाली आहे. ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरू न शकलेल्या किंवा ऑलिम्पिक क्वालिफिकेशन टाइम गाठू न शकलेल्या मात्र जागतिक जलतरण संघटनेतर्फे ब चाचणीसाठी अर्थात ऑलिम्पिक स्टँडर्ड टाइमसाठी पात्र ठरलेल्या जलतरणपटूंना  युनिव्‍‌र्हसॅलिटी रुलद्वारे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येऊ शकते. रिओ ऑलिम्पिककरता पात्र न ठरलेल्या देशाची जलतरण संघटना एका पुरुष आणि एका महिला जलतरणपटूची निवड करू शकते. यासाठी जलतरणपटू गेल्या वर्षी कझान येथे झालेल्या फिना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेला असावा तसेच फिना अर्थात जागतिक संघटनेतर्फे प्रमाणित असावा. हे जलतरणपटू ऑलिम्पिकमध्ये केवळ एकाच प्रकारात सहभागी होऊ शकतात. त्यानुसार साजन आणि शिवानीची रिओवारी पक्की झाली. केरळचा साजन प्रकाशने गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहा सुवर्ण आणि तीन रौप्यपदकांची कमाई केली. २०० मीटर बटरफ्लाय आणि १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात राष्ट्रीय विक्रमही त्याच्या नावावर आहे. संदीप शेजवळ, वीरधवल खाडे, सुप्रिया मोंडल, सौरभ संगवेकर आणि साजन प्रकाश यांनी ऑलिम्पिक ब निकष पूर्ण केला. मात्र गेल्या दोन वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेऊन २२ वर्षीय साजनची निवड करण्यात आली. साजनला भारताचा फेल्प्स असे म्हटले जाते. जलतरणात भारताला ऑलिम्पिकमध्ये अद्याप एकही पदक पटकावता आलेले नाही.

पहिला वाहिला ज्युदोपटू

भारताकडून पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये ज्युदोपटू खेळणार आहे. २४ वर्षीय अवतार सिंग याने हा इतिहास रचला आहे, परंतु ९० किलो वजनी गटात त्याच्यासमोर अनेक दिग्गज व अनुभवी खेळाडूंचे आव्हान असणार आहे. १९६४च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा ज्युदोचा समावेश करण्यात आला. मात्र, महिला ज्युदोपटूंच्या ऑलिम्पिक प्रवेशासाठी १९९२ साल उजाडावा लागला. रिओत महिला व पुरुष अशा प्रत्येकी सात गटांत स्पर्धा रंगणार असून एकूण ३८६ खेळाडूंनी पात्रता मिळवली आहे. ब्राझील आणि फ्रान्स यांचे प्रत्येकी १४ खेळाडू विविध गटांत पदकासाठी झटणार आहेत. पुरुषांसाठी पाच व महिलांसाठी चार मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यावर ‘गोल्डन स्कोर’मध्ये खेळ रंगतो. याला वेळेची मर्यादा नसली तरी प्रथम गुण पटकावणाऱ्या खेळाडूला विजयी घोषित केले जाते. फ्रान्सच्या अँजेलो पॅरिसी यांच्या नावावर ज्युदोतील सर्वाधिक ४ (१ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य) पदके जमा आहेत.

विजेत्या पंचची अपेक्षा

जॅब्स, क्रॉस, अपरकट आणि पंच.. हे बॉक्सिंगला इतर क्रीडाप्रकारांपेक्षा वरचढ ठरवतात. सेंट लुईस येथे १९०४ साली बॉक्सिंगने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले, परंतु महिला बॉक्सर्ससाठी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकने दार उघडले. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत पुरुषांचे दहा आणि महिलांचे तीन अशा एकूण १३ गटांत बॉक्सिंगच्या स्पर्धा खेळविण्यात येणार आहेत. १३ गटांसाठी एकूण २८६ (२५० पुरुष व ३६ महिला) खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ग्रेट ब्रिटन, कझाकस्तान यांचे प्रत्येकी १२ बॉक्सर्स रिओसाठी पात्र ठरले आहेत, तर शंभर कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतातून शिव थापा, मनोज कुमार आणि विकास कृष्णन हे केवळ तीनच खेळाडू प्रतिनिधित्व करणार आहेत. पुरुष गटात तीन-तीन मिनिटांच्या तीन, तर महिला गटात दोन-दोन मिनिटांच्या चार फेऱ्या खेळविल्या जातात. प्रत्येक सामन्याला पाच पंच असतात. प्रत्येक फेरीनंतर ते खेळाडूला गुण देतात, परंतु सामन्याच्या अखेरीस हे गुण एकत्र करून विजेता घोषित करण्यात येतो. एक फेरी जिंकल्यानंतर खेळाडूला दहा गुण मिळतात, तर पराभूताला सहा ते नऊ गुणांवर समाधान मानावे लागते.
प्रशांत केणी, मिलिंद ढमढेरे, प्रसाद लाड, पराग फाटक, स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com