संपत्तीवृद्धीचा खात्रीशीर मार्ग म्हणून शेअरबाजाराकडे वळण्याचा सल्ला अनेकजण देत असतात. पण तो अंगीकारताना शेअर बाजाराचा अभ्यास करणं अनिवार्य आणि अत्यावश्यक गोष्ट आहे.

शेअर बाजार हे संपत्ती निर्माणाचे सर्वात उमदे ठिकाण असल्याचे आपण ऐकत आलो आहोत. संपत्तीत वाढ तरी किती तर बाजारातील अव्वल १०० समभागांनी गुंतवणूकदारांची मत्ता २८.४ लाख कोटी रुपयांनी तीही केवळ सात वर्षांत वाढविल्याचे आकडे सांगतात. मोतीलाल ओसवाल ही नामांकित दलाली पेढी दरसाल वार्षकि संपत्ती निर्माण पाहणी अहवाल प्रसिद्ध करते. यंदाच्या या अहवालाच्या मते २०११ ते २०१६ या सात वर्षांत आघाडीच्या १०० समभागांनी गुंतवणूकदारांच्या पदरी भरभरून लाभाचे माप टाकले. वार्षकि सरासरी १८ टक्के दराने दराने या काळात गुंतवणूकदारांची संपत्ती साडे २८ लाख कोटी रुपयांनी वाढल्याचे हा अहवाल सांगतो. प्रत्येक गुंतवणूकदाराला सारखाच लाभ झाला असे मानले, तर देशात सध्या सुमारे अडीच कोटी भागधारक (डिमॅट खात्यांच्या संख्येनुरूप) आहेत, तर प्रत्येकाच्या वाटय़ाला किमान सरासरी ११.५ लाख रुपयांचा लाभ त्यांच्या गुंतवणुकीवर या सात वर्षांत यायला हवा. किंबहुना त्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १०० समभागांत सर्वच अडीच कोटी डिमॅट खातेधारकांची गुंतवणूक असणे शक्यच नाही. ही संख्या निश्चितच कमी असेल, म्हणजे एक-चतुर्थाश सुदैवी डिमॅटधारक आपण पकडले तर त्यांच्या लाभाची मात्राही चार पटीने वाढून ४५ लाख रुपयांवर जाते.

पण हा अनुभव सार्वत्रिक म्हणता येईल काय? भारतात तर वर उल्लेखिलेल्या सात वर्षांत लक्षाधीश-कोटय़धीशांची संख्या काही कोटींनी वाढल्याचे आपल्याला खरेच दिसते आहे काय? या इतक्या लाखांचा लाभ मग खरेच किती लोकांच्या पदरी पडला? बहुतांशांचे विचाराल, तर तेजी आली आणि सुखद जाणिवेचा आस्वाद देण्याआधी भुर्रकन लुप्तही झाली, असाच त्यांचा अनुभव असेल. काय कमावले आणि किती कमावले असा हिशेब लावून पाहिला. पण गेल्या वर्ष-दीड वर्षांत बाजाराशी इमान राखलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना नफा गवसला असे विरळाच आढळून येते. हे असे का घडते, त्यामागील घटकांचा आपण मागोवा घेणार आहोत.

नाण्याला दुसरी बाजूही असतेच. त्याप्रमाणे २०११ ते १६ या सात वर्षांत जसे काही गुंतवणूकदारांची मत्ता साडे २८ लाख कोटींनी फुगली तसे त्याच काळात काहींना १५ लाख कोटींनी गरीब करणाऱ्याही काही गुंतवणुका होत्या. धातू, खाणकाम, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता व बांधकाम ही अशी काही उद्योगक्षेत्रे आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांच्या परताव्याच्या अपेक्षा मातीमोल केल्याचे मोतीलाल ओसवालचा संपत्तीदर्शक अहवालच सांगतो. गुंतवणूकदारांचे कपडे उतरविणाऱ्या समभागांमध्ये सार्वजनिक उपक्रमातील नवरत्न कंपनी भेल आणि सार्वजनिक क्षेत्रातील जुनी बँक असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेसारखी आश्चर्यकारक उदाहरणे बोलकी आहेत.

अर्थात शेअर बाजारातील गुंतवणूक ही सरावातून कमावली जाणारी कला आहे. अभ्यास व अनुभवातून ही कला अवगत झाली तरच गुंतवणुकीसाठी योग्य समभागाची निवड केली जाऊ शकेल. समभाग निवडीचे निकष हा खूप विस्ताराने समजावून सांगण्याचा विषय आहे. नवगुंतवणूकदारांना कानमंत्राऐवजी, ज्यांनी बाजारात खस्ता खाल्ल्या आहेत असे सरावलेले गुंतवणूकदार हाच आपला लेखन-विषय आहे. तरी विषयांतर टाळताना, गुंतवणूक करणाऱ्यांना सहज शक्य आहेत अशा दखल घ्यावयाच्या काही गोष्टी संक्षेपाने सांगाव्याशा वाटतात. आजच्या काळात कंपन्यांवरील कर्जभार हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. व्यवसायासाठी कर्ज घेणे वाईट नव्हे. परंतु कर्जफेडीची कंपनीची क्षमता किती आणि या कर्जफेडीचा तिच्या मिळकतीला घास किती हे मात्र कटाक्षाने पाहिले गेले पाहिजे. बरोबरीनेच सध्याची आíथक स्थिती कोणत्या कंपनीला मानवणारी आहे, अर्थव्यस्थेतील उभारीची लाभार्थी कोणती कंपनी ठरेल. हे आजच्या काळातील दोन प्रधान महत्त्वाचे निकष ठरतात. कंपनीची नफाक्षमता, भांडवली पर्याप्तता, खर्चाची बाजू पाहताना तिला लागणारा कच्चा माल- यंत्रसामग्री यांची उपलब्धता, कर्मचारी वेतनाचा भार, करांचा भार अशा सर्व पलूंची माहिती त्या त्या कंपनीच्या वार्षकि अहवालात पारदर्शी स्वरूपात उपलब्ध असते. त्याचा कसून अभ्यास मात्र केला पाहिजे. कंपनीचे उत्सर्जन (प्रति समभाग मिळकत- ईपीएस), किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई रेशो), सद्य भाव/पुस्तकी किंमत गुणोत्तर (पी/बीव्ही रेशो) वगरे निकष हे वरील चाळणीनंतर पुढे येणाऱ्या समभागांना लावले जाऊन गुंतवणुकीसाठी अंतिम निवडसूची तयार करता येऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही गुंतवणुकीत ‘वेळ’ हा तुमचा सर्वात मोठा सोबती असतो. त्यामुळे गुंतवणुकीतून पहिल्याच वर्षांत (अथवा प्रत्येक वर्षी) दामदुप्पट परतावा मिळेल, अशी अपेक्षा अवास्तव ठरेल. आपल्या गुंतवणुकीला विश्वास, संयम, शिस्त यांची साथ देणे अगत्याचेच.

आता परत मूळ मुद्दय़ाकडे वळू. बाजारातील गुंतवणुकीत तोटा आपल्याच पदरी कसा?

आपल्या बाजाराची प्रमुख चालकशक्ती या गुंतवणूकदार संस्था त्यातही विदेशी गुंतवणूकदार संस्था असल्याचे आजवरचा प्रवाह होता. पण तो गत अडीच-तीन वर्षांत लक्षणीय बदलत आला आहे. सामान्य गुंतवणूकदारांनी हा बदल नक्कीच गाठीशी बांधून घ्यायला हवा. जर आपण सरलेल्या वर्षांतील विशेषत: दिवाळीपश्चात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ तिमाहीतील विदेशी संस्थागत गुंतवणूकदार अर्थात एफआयआयकडून झालेल्या व्यवहारांवर नजर फिरवू या. तर या काळात प्रत्येक व्यवहार झालेल्या दिवसांत सरासरी दोन हजार कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री या विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून झाली आहे. केवळ नोव्हेंबर २०१६ मधील त्यांची विक्रीची मात्रा १७,७३६.९५ कोटी रुपयांची राहिली आहे. म्हणजे अमेरिकेत लेहमन ब्रदर्सने दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर झालेल्या पडझडीत ऑक्टोबर २००८ मध्ये झालेल्या निर्गुतवणुकीपेक्षा ती अधिक होती. इतकेच नव्हे सप्टेंबर २०१५ नंतर विदेशी वित्तसंस्थांच्या निर्गुतवणुकीचा सपाटा सुरू असून, त्याचा कळस ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ च्या तिमाहीने गाठला. अमेरिकेतील अर्थ-उभारी, पर्यायाने डॉलरमधील मजबुती आणि देशांतर्गत मोदी सरकारने त्यावेळी लागू केलेली नोटाबंदी, त्यातून निर्माण झालेला चलनकल्लोळ वगरे घटक विदेशी गुंतवणूकदारांच्या पलायनाला कारणीभूत ठरले.

नवीन तोल-संतुलन समीकरण

एफआयआयच्या ऑक्टोबर-डिसेंबर २०१६ मधील निरंतर विक्रीतून बाजार निर्देशांकात (सेन्सेक्समध्ये) जेमतेम सहा टक्क्यांची घसरण झाली. तर ऑक्टोबर २००८ मधील चौदा हजार कोटी रुपयांच्या एफआयआयच्या निर्गुतवणुकीतून त्यावेळी बाजार २० टक्क्यांनी गडगडला होता. या तफावतीचे कारण काय? ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ तिमाहीत विदेशी निर्गुतवणूक सुरू होती तर देशांतर्गत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांकडून त्याच प्रमाणात खरेदीही सुरू होती. तिमाहीतील एकूण विदेशी संस्थांची निर्गुतवणूक ३१,२२१.८४ कोटी रुपयांची, तर देशी संस्थांची गुंतवणूक ही ३२,०८२.६० कोटी रुपयांची होती. वर वर पाहता ही खूपच उत्साहवर्धक बाब वाटेल. बाजारात तोल एका बाजूने ढळू नये यासाठी देशी गुंतवणूकदारांनी संतुलन सांभाळण्याची भूमिका बजावणे स्वागतार्हच! बाजारातून आज दरमहा सुमारे चार हजार कोटी रुपये म्युच्युअल फंडांकडे दरमहा जमा होणाऱ्या ‘एसआयपी’ या हप्ते गुंतवणुकीचे आहेत. ही गुंतवणूक दरमहा बाजारात येणे क्रमप्राप्तच. शिवाय विमा कंपन्या (युलिप योजना), राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), भविष्य निर्वाह निधी (पीएफ) हे बाजारातील गुंतवणूक ओघ वाढविणारे संस्थात्मक स्रोत आहेत.

तथापि प्रश्न हाच की, बाजारातील म्युच्युअल फंडांची खरेदी वाढली पण ती नव्या गुंतवणूकदारांकडून होते काय. याचे उत्तर उत्साहदायी नाही. तर बहुतांश नवीन ओघ हा प्रचलित गुंतवणूकदारांकडून प्रामुख्याने एसआयपीमार्फत दरमहा भर पडणाऱ्या गुंतवणुकीतून आहे. नवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांतील ओघ आजही क्षीणच आहे. भांडवली बाजाराबाबत सर्वदूर कटू अनुभूती आणि अविश्वासाची भावना आजही मोठी आहे.

हा पर्याय दुर्लक्षित का?

प्रत्येक गोष्टीचा एक ठरावीक हंगाम असतो. सणासुदीचे दिवस, बाजारपेठा फुललेल्या असतात. प्रत्येक दुकानदार, विक्रेता या विक्रीच्या हंगामाचा निश्चितच फायदा उचलू पाहत असतो. खरेदीदारांना आकर्षति करण्याच्या या चढाओढीत मग ‘सेल’ अन् ‘ऑफर्स’च्या ठसठशीत पाटय़ा जागोजागी पाहायला मिळतात. अर्थात एक ग्राहक म्हणून आपण केलेली खरेदी हा फायद्यातला सौदा होता की नाही, याचे आपले काही आडाखे निश्चितच असतात. वित्त बाजाराचेही तसेच काही आडाखे आहेत.

भारताच्या भांडवली बाजाराने गेल्या तीन दशकात वार्षकि सरासरी १७ टक्के दराने (सीएजीआर) परतावा दिला आहे. त्याचवेळी म्युच्युअल फंडांच्या समभाग-संलग्न (इक्विटी) योजनांचा गेल्या दोन दशकांतील सरासरी वार्षकि परतावा त्यापेक्षा सरस २० टक्के राहिला आहे. म्हणजे एक गोष्ट स्पष्टच आहे की, कुणाही सामान्य गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा मोठय़ा कालावधीसाठी शिरस्ता कायम राखला असल्यास त्याने सहजी मोठी संपत्ती बनविली असेल. पण हे खरेच शक्य झाले आहे काय? आपल्या आसपास, ओळखीपाळखीत विचारा, पाहा आहे काय कुणी असा भाग्यवान संपत्ती निर्माता?  खरेच कुणी सापडला तर तो असामान्यच! कारण सर्वसामान्यांचे सामान्यपणे असणाऱ्या गुंतवणूक आचरणातून असे घडणे शक्यच नाही.

सुमारे दहा वर्षांपूर्वी बँकेत तीन वष्रे मुदतीसाठी फिक्स डिपॉझिट ठेवले तर १३ टक्के व्याज मिळत होते. आज ते सात टक्क्यांवर आले आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), पोस्टाच्या योजना वगरे सर्व प्रकारांवरील परतावाही गेल्या काही वर्षांत कमालीचा घटला आहे. विमा हे मुळात तुमच्यापश्चात कुटुंबाच्या आíथक संरक्षणाचा उपाय आहे, पण त्याकडे गुंतवणूक म्हणून पाहणारे आणि वर्षांनुवष्रे त्याचे हप्ते भरणारे चिक्कार आहेत. परंतु या इतक्या वर्षांत त्या विमा योजनेने प्रत्यक्षात दिलेला परतावा हा पाच-सहा टक्क्यांपल्याडही जात नाही, हे सांगितले तर अनेकांना धक्का बसतो. दर वर्षांला २४ हजार रुपये पारंपरिक विमा योजनेत गुंतवून १५ वर्षांअखेर फार तर तुम्ही गुंतविलेल्या ३,६०,००० रुपयांचे साडेपंधरा लाख रुपये (तेही बोनस, अतिरिक्त लाभ गृहीत धरून) मिळतील. मात्र हीच गुंतवणूक १५ वर्षांसाठी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेत केली गेली असती, तर ३,६०,००० रुपयांचे आज ५५.४० लाख रुपये (२० टक्के वार्षकि परतावा दराने) मिळविणारे अनेक गुंतवणूकदार आहेत आणि अशा लाभ कामगिरी करून दाखविलेल्या अनेक योजनाही आहेत.

म्युच्युअल फंडच का?

म्युच्युअल फंड – बाजाराच्या नाना तऱ्हा आणि कळांशी आपल्यापेक्षा अधिक अवगत असलेल्या अनुभवी व तज्ज्ञ  व्यवस्थापकांद्वारे सांभाळल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा सर्वात उमदा पर्याय आहे. ठरविलेले ध्येय साधण्यासाठी पसा महत्त्वाचा आहे. पसा कशासाठी हवा याचे प्रत्येकाचे आडाखे वेगवेगळे असतील. कुणाला विदेशात सहल तर कुणाचे मुलांच्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळविण्यापर्यंत स्वप्ने असतील. ही ध्येये एकदा पक्की करून घेतली पाहिजेत. ती साकारायची तर ऐन तारुण्यात आधीपासून गुंतवणुकीचे तत्त्व अनुसरणे खूपच महत्त्वाचे ठरेल. आणि म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीत केलेल्या गुंतवणुकीतून आयुष्यात ठरविलेली सर्व ध्येये मग तुम्हाला निश्चितच साकारता येतील. महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीला निश्चित लक्ष्याची जोड दिली तर आपण गुंतविलेला पसा खरेच आपल्यासाठी मेहनत घेत आहे की नाही याचीही आपण खातरजमा करीत असतो.

असे समजा की, तुम्ही मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक केली आहे आणि तुमचे अंतिम लक्ष्य हे मुलांच्या उच्चशिक्षणासाठी तरतूद करण्याचे आहे. मुदत ठेवींमधून निश्चित स्वरूपाच्या परताव्याची हमी मिळते हे खरेच आहे. परंतु ज्या प्रमाणात वर्षांगणिक शिक्षणावरील खर्चात वाढ होत आहे ते पाहता, पुढील १०-१५ वर्षांच्या दीर्घावधीत एफडीमधून अपेक्षित लाभ मिळविण्याची शक्यता कमीच आहे. या स्थितीत मग तुम्ही म्युच्युअल फंडाच्या इक्विटी अथवा बॅलन्स फंडांच्या पर्यायाकडे पाहायला हवे. ईएलएसएस फंड निवडलात तर गुंतवणुकीबरोबरच कर-वजावटीचेही लाभ मिळतील. दर तीन वर्षांगणिक तुमच्या जमा पुंजीबाबत आढावा घेत राहा. तुमचे मूल ज्यावेळी कॉलेजची पायरी चढण्याच्या वयापर्यंत पोहोचेल, अशा समयी म्हणजे प्रत्यक्ष मोठय़ा खर्चाच्या एक ते दोन वष्रे आधी ही गुंतविलेली जमा पुंजी काढून ती एफडी अथवा शॉर्ट टर्म फंडांसारख्या तुलनेने स्थिर व खात्रीचा परतावा देणाऱ्या पर्यायात गुंतवावी. असे केल्याने ज्यावेळी नेमकी तुम्हाला पशाची गरज असेल, त्यावेळी बाजारातील विपरीत स्थितीच्या दुष्परिणामांपासून त्यांचा बचाव तुम्ही करू शकाल.

म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीची आखणी ही निर्धारित उद्दिष्टांनुरूपच केली जात असते. दरमहा अगदी ५०० रुपयांपासून यात गुंतवणूक सुरू करता येते आणि ठरावीक कालावधीत त्यातून मोठी पुंजी उभारली जाऊ शकते. म्युच्युअल फंडांचा एक फायदा असा की, त्यातून आपला पसा आपोआपच वेगवेगळ्या गुंतवणूकवर्गात विभाजित होत असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पसा हा यातून वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रातील, विविधांगी बाजार-भांडवल असलेल्या आणि वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात व्यवसाय असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये तज्ज्ञ देखरेखीत विभागला जातो. शिवाय म्युच्युअल फंडावर ‘सेबी’सारख्या नियामकाची करडी नजर असते. एरव्ही गुंतवणूक व्यवस्थापनासाठी व्यावसायिकाला द्याव्या लागणाऱ्या शुल्कापेक्षा अल्पखर्चात म्युच्युअल फंड उपलब्ध असतात, त्यांचे तज्ज्ञ व अनुभवी व्यवस्थापन, पारदर्शकता आणि दरमहा मिळणाऱ्या फॅक्टशीटद्वारे सहजसाध्य देखरेख व खातरजमा वगरे त्याचे खास गुण ठरतात. म्युच्युअल फंडातील ‘इंडेक्स फंड्स’, ‘इंडेक्स ईटीएफ’ ही एक किफायतशीर आणि सहजगम्य अशी गुंतवणूक पद्धत आहे.

निवड कशी करावी?

गुंतवणूकविषयक मार्गदर्शन करणारी पुस्तके बाजारात खोऱ्याने उपलब्ध आहेत आणि त्या बहुतांशांचा भर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर असतो. सध्याच्या घडीला भारतात तब्बल २०००च्या घरात म्युच्युअल फंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सर्व फंडांची वैशिष्टय़े वाचून, तपासून गुंतवणूक करायची म्हणजे मेंदूचा भुगाच करण्यासारखे आहे.

गुंतवणुकीचे पक्के लक्ष्य

गुंतवणूक कशासाठी करायची याचे पक्के लक्ष्य निर्धारित केले जायला हवे, जेणेकरून सुयोग्य गुंतवणूक प्रकार निवडला जाऊ शकतो. शिवाय आपल्या गुंतवणुकीची कालमर्यादा काय याची प्रत्येकाला जाणीव असायला हवी. गुंतवणुकीचा कालावधी जितका मोठा तितकी जोखीम सोसण्याची पातळीही तुलनेने वाढते हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठवर आपल्याला पसा गुंतविता येईल हे नेमके माहीत असल्यास गुंतवणुकीचा निर्णय अधिक सोपा बनतो. त्या उपरान्त निवडीचे काही कानमंत्र असे-

१. तुम्ही अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल (उदाहरणार्थ, दोन ते पाच वष्रे) तर अर्थातच तुम्हाला अल्प जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडाला प्राधान्य द्यावे लागेल.

२. मध्यम कालावधीसाठी (जसे सहा ते १० वष्रे) गुंतवणुकीत तुमच्या भागभांडारात उच्च जोखमेच्या आणि अल्प जोखमेच्या अशा दोन्ही म्युच्युअल फंडांचा समावेश उपकारक ठरेल.

३. दीर्घ मुदतीचे गुंतवणूक क्षितिज (११ वर्षांहून अधिक कालावधीचे) आखले असल्यास, उच्च जोखमेच्या म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्राधान्य देणे तुमच्यासाठी परवडणारे ठरेल.

आता तुमच्या नियोजनात न बसणाऱ्या म्युच्युअल फंडांची छाननी करून त्यांना वेगळे केल्यावर, आता तुमच्यापुढे तुलना आणि निवड करण्याजोगे खूपच मर्यादित पर्याय शिल्लक राहतील. तरीही तुम्हाला योग्य त्या फंडांची निवड करणे कठीण जात असेल, तुमचे आडाखे एक तर सर्वसाधारण असतील आणि तुम्हाला अधिक नेमकेपणाने लक्ष्य ठरविणे भाग ठरेल. होय, ना, तर मग दोन पावले मागे जा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा!!

४. तुलना आणि निरूपण : म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे फायदे जोखताना, त्यांनी पूर्वी केलेली कामगिरी हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. तथापि, तो विशिष्ट फंड भविष्यात कशी कामगिरी करेल हे त्याने भूतकाळात केलेल्या कामगिरीच्या आधारे ठरविणे अतिशयोक्तही ठरते. किंबहुना म्युच्युअल फंडांच्या प्रायोजक बँका आणि फंड हाऊसेस आपल्या आवेदन प्रस्तावात ‘भूतकाळातील कामगिरी ही भविष्यातील चांगल्या निष्कर्षांची निदर्शक ठरत नाही’ असे स्पष्टपणे लिहित असतात. जरी सेबीच्या निर्देशानुसार तसे लिहिणे बंधनकारक केले गेले असले तरी गंमत अशी की, त्यांच्या विवेचनाचा सर्व रोख हा गतकाळात केलेल्या चांगल्या कामगिरीकडे निर्देश करणाराच असतो!

तर मग असे समजायचे की, गतकाळातील कामगिरी पूर्णपणे दुर्लक्षित करावी? नाही, गत काळातील कामगिरी हा तो विशिष्ट फंड कसा आहे हे समजून घेण्याचा सर्वोत्तम उपाय निश्चितच आहे. तथापि पूर्वी साध्य केलेल्या कामगिरीसह, काही बिगर-सांख्यिक पलूंनाही तपासून घ्यायला हवे.

१.  फंड व्यवस्थापकाचे गुंतवणुकीचे तत्त्व आणि किती काळापासून फंडाचे व्यवस्थापन तो पाहत आहे. उदाहरणार्थ, एखाद्या अग्रेसर फंड व्यवस्थापकाचे निर्गमन तर अलीकडच्या काळात झाले नाही ना हे पाहायला हवे.

२. विशिष्ट फंडाची ज्या उद्योगधंद्यात अथवा क्षेत्रात गुंतवणूक आहे त्याचे स्वरूप, जसे की गुंतवणूक असलेले उद्योगक्षेत्र वíधष्णू आहे की त्याची गती मंदावली आहे?

३.  प्रत्येक म्युच्युअल फंडाचे ठरावीक गुंतवणूक उद्दिष्ट असते, ते तुमच्या निर्धारित लक्ष्याशी मेळ खाणारे आहे काय? तर मग सारांशात सांगणे हेच की, ‘पूर्वस्थापित कामगिरी हा केवळ एकमेव निकष नसावा!’

५. खर्च आणि शुल्कभार : सुयोग्य म्युच्युअल फंडाच्या निवडीबाबत सर्वसामान्य केला जाणारा निर्देश हाच की, तुम्ही सर्वात किफायतशीर फंडाची निवड करावी. पण हा निकष खरेच इतका सशक्त आहे काय? तसे पाहता सर्व गुंतवणूक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडच बहुदा सामान्य गुंतवणूकदारांना उपलब्ध सर्वाधिक किफायतशीर पर्याय ठरावा. तर मग सर्व निकषांची तुलना ही सारखीच येत असल्यास म्युच्युअल फंडाचा विशेषत: डेट फंडांवर आकारले जाणारे निर्गमन (एक्झिट) शुल्काची तुलना करून पाहा. येत्या वर्षभरात म्युच्युअल फंडाची कामगिरी काय स्वरूपाची असेल याचा अचूक अंदाज बांधणे कोणालाही शक्य नाही, परंतु एक गोष्ट मात्र आपणा सर्वासमक्ष स्पष्ट आहे ती म्हणजे म्युच्युअल फंडाचे वार्षकि व्यवस्थापन शुल्क आणि निर्गमन भार! त्यामुळे स्वाभाविकच अल्पतम भार आणि वार्षकि शुल्क असणारा म्युच्युअल फंड हा तुमचा पसंतीचा एक पहिला निकष बनायला हवा. अर्थातच या खर्च आणि शुल्क भाराची बचत करून तुम्ही तुमच्यासाठी अतिरिक्त परतावा मिळवीत आहात, अशा पद्धतीने विचार करून पाहा!

दमदार ३०-३५ टक्के असा जगातील सर्वाधिक उमदा बचतीचा दर भारतात आहे, हे आजवर अनेकवार उच्चरवाने सांगितले जाते. परंतु तरीही भांडवली बाजारात सर्वात कमी लोकांचा वावर असलेला देश म्हणूनही भारताकडे पाहिले जाते.

आपल्या दृष्टीने फार तर तीन ते कमाल पाच वर्षांत नफा दिसला की बाहेर पडा, अशीच झटपट धाटणीची आपली गुंतवणूक असते. त्या पल्याड तग धरणे, सबुरी राखणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचेच! कुणी जर आधीच्या १, ३, ५ वर्षांत चांगला परतावा पाहिला आणि या पुढच्या काळातही असाच फार तर थोडा कमी-जास्त परतावा राहील म्हणून गुंतवणूक सुरू ठेवण्याचे ठरवितोही. पण परतावा कामगिरी मोठय़ा कालावधीसाठी निरंतर सारखीच राहील, असे क्वचितच घडते. हाच नेमका कसोटीचा क्षण असतो. पण आपण मुळातच वर्तमान व नजीकच्या भूतकाळातील परतावा कामगिरी पाहून गुंतवणुकीस सुरुवात करतो आणि अपेक्षा करतो की, बाजार तेजी पुढेही अशीच सुरू राहील. ही व यासारखा गुंतवणुकीचा दृष्टिकोन निश्चितच योग्य नाही.

गुंतवणुकीची सुयोग्य पद्धत कोणती? 

१. लवकर सुरुवात करा :  कुटुंबाचे ‘बजेट मॅनेजमेंट’ हाच सुखी आयुष्याच्या संतुलनाचा धागा असतो. ज्यात अर्थातच तुमच्या क्रेडिट कार्डाच्या बिलांना आवर, दैनंदिन कौटुंबिक गरजांबाबत नियोजन आणि शहाणपणाची गुंतवणूक यांचा समावेश आहे. गुंतवणुकीला लवकर सुरुवात करावी, असा सल्ला वरचेवर आपल्या कानी पडत असतो. पण त्यातून नेमके काय साधले जाते हे मात्र कुणी फुरसतीने सांगताना दिसत नाही. म्हणूनच आपण वेळीच आणि आधीपासून गुंतवणूक पंथाला लागण्याचे फायद्याचे आहे. आपण दीर्घ कालावधीसाठी नियमित स्वरूपात गुंतवणूक करीत राहणे आणि गुंतलेला पसा किमान पाच वष्रे व त्यापेक्षा अधिक काळासाठी गुंतवणुकीत राहू द्यावा.

२. वित्तीय लक्ष्याचे स्वगत : तुम्हाला किती पसा हवा, केव्हा हवा आणि कोणते लक्ष्य साधण्यासाठी हवा, हे प्रश्न सतत स्वत:लाच विचारत राहा. या प्रश्नांचे नियमित स्वगत सुरू असू द्यावे. त्याचे उत्तर म्हणून सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायाचा ध्यास कायम ठेवा. गुंतवणुकीपूर्वीचे परताव्याचे वास्तववादी लक्ष्य निश्चित करा आणि त्याचा शिस्तीने पाठलाग करा

३. ‘एसआयपी’वर भर असू द्यात : हाती येणाऱ्या प्रत्येक उत्पन्न/ वेतनातून काही ना काही गुंतविण्याची सवय लावून घ्या. दरमहा ठरावीक रक्कम गुंतवीत जाण्याची सोय म्युच्युअल फंडाने ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन- एसआयपी’द्वारे करून दिली आहे. सुरुवातीचा काही काळ या ‘एसआयपी’मुळे तुमच्या खर्चाच्या अन्य सवयींना चिमटा बसलेला दिसेल, पण पुढे ते अंगवळणी पडेल आणि फायद्याचेही ठरल्याचे दिसून येईल. गृहकर्ज-वाहन कर्ज आणि त्याच्या ‘ईएमआय’शी नाते जुळलेल्या जनमानसावर आता या ‘एसआयपी’चे गारूडही अनुभवास येत आहे. कमी भावात खरेदी आणि उच्च दामावर विक्री हे नेहमीच व सर्वथा सगळ्यांनाच शक्य होत नाही. परंतु एसआयपीद्वारे दरमहा होणाऱ्या गुंतवणुकीतून ‘कॉस्ट-अ‍ॅव्हरेजिंग’ आपोआप साधले जाते. तुम्ही कायम कोणत्याही बाजार-चक्राच्या मध्यम मूल्यांकनावर वाटचाल करीत राहाल आणि अंतिमत: मोठय़ा अवधीत गुंतविलेल्या रकमेवर चांगला परतावा पदरी पडत असलेला तुम्हाला दिसून येईल. शिवाय बाजाराच्या वादळी वध-घटींचा ताण अंगावर येणार नाही. किंबहुना तुमच्या धास्तीत भर घालण्याऐवजी बाजाराची ही चंचलता एसआयपी धाटणीच्या गुंतवणुकीमुळे तुमच्या पथ्यावरच पडेल. अल्पतम तणावात तुमच्यासाठी अधिक लाभाची हमी, हाच तर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा अर्थ आहे!

४. गुंतवणुकीला पुरेसा वेळ द्या : तुम्हाला नियमित रूपात (एसआयपी धाटणीने) पसा गुंतविणे शक्य नसल्यास, जसा येईल तसा पसा गुंतवा. पण गुंतलेला पसा १० वर्षांपर्यंत काढला जाणार नाही, याचा अदमास घेऊनच गुंतवणूक करा. ‘इक्विटी इज फॉर लाँग टर्म!’ ज्या कुणाला शेअर बाजारात आपले नशीब आजमावायचे त्यांच्यासाठी हा पहिला कानमंत्र ठरावा. सध्यासारख्या भन्नाट परतावा मिळवून देणाऱ्या बाजारस्थितीत, प्रत्येकाने आपल्या परताव्याबाबतचे लक्ष्य गाठल्यावर, काही नफा वेगळा काढून तो अन्य गुंतवणूक वर्गात ठरावीक कालांतरात वळता करणे हे श्रेयस्कर ठरते. ‘बाजार कोसळलाच तर’ हेच धोरण आपल्या बचावाला या ठिकाणी कामी येते.

५. वैविध्य : जसे सुदृढ जीवनशैलीसाठी संतुलित आणि योग्य त्या प्रमाणात आहाराची गरज असते, तसे गुंतवणूकदारानेही आपल्या भागभांडार- पोर्टफोलियोमध्ये विविधांगी गुंतवणूक प्रकारांचे संतुलन साधणे आवश्यक ठरते. ‘सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका’ असा गुंतवणुकीचा एक मूलमंत्र आहे. आपला पसा वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारात टाकून आपण त्याच्याशी निगडित जोखीमही विभागत असतो. तुमचे गुंतवणूक भागभांडार अर्थात पोर्टफोलियो तुम्हाला किती परतावा मिळवून देईल, हे तुमचा पसा तुम्ही वेगवेगळ्या गुंतवणुकीत कसा विभागला आहे यावर जवळपास ९० टक्के अवलंबून असते, असे अभ्यासाअंती दिसून आले आहे. वाढते भू-राजकीय तणाव, बँकांपुढील बुडीत कर्जाचे अरिष्ट आणि वाढती महागाई (इन्फ्लेशन) वगरेचा गुंतवणुकीवरील परिणाम पाहता, सोने आणि स्थावर मालमत्ता हे गुंतवणुकीला चिरंतन मूल्य प्रदान करणारे पर्यायांमध्ये आपला काही पसा वळविणे उपयुक्त ठरेल. केलेल्या गुंतवणुकीबाबत सजग राहा, पण वारंवार नाहक फेरबदल करू नका. अन्यथा मिळालेला परतावा ब्रोकरेज (दलाली), निर्गमन शुल्क (एक्झिट लोड), भांडवली लाभ कर वगरेत धुपून जाईल.

डोकेदुखीवर शीर्षांसन हा एक रामबाण उपाय आहे. खाली डोके वर पाय असे शीर्षांसन केल्यास डोकेदुखी धूम पळाल्याचे तुमच्या लक्षात येईल. याच प्रकारे आपण आजवर जे करीत आलो त्याच्या नेमके उलटे करा आणि पाहा काय चमत्कार घडतो ते! पण ज्या प्रकारे शीर्षांसन ही प्रत्येकाला जमेल अशी गोष्ट नाही, त्याच प्रकारे बाजार आजच्या सारखा चढता असो, २०१६ सालासारखा अस्थिर अथवा त्यापूर्वीचा २०११-१२ सारखा मंदीचा असो त्यात गुंतवणूक करणे जर स्व-अभ्यासासाठी वेळ आणि निरीक्षण नसेल तर ती प्रत्येकाच्याच आवाक्यातील बाब नाही, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे गुंतवणुकीसाठी जाणकारांचे, तज्ज्ञ सल्लागाराकडून योग्य मार्गदर्शन मिळविणे थोडे खिशाला कात्री लावणारे असेल पण तेच मोलाचे ठरेल.

‘इक्विटी कल्चर’ची वानवा!

जगाच्या बरोबरीनेच भारताच्या उद्योगविश्वातही आज चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या नांदीची भाषा सुरू आहे. एव्हाना स्वयंचलितीकरण आणि नोकर कपातीच्या रूपाने या क्रांतीचे फटकारे सर्वसामान्य नोकरदार वर्गाला बसणे सुरूही झाले आहे. जरी भारताला औद्योगिकीकरणाचा शे-दोनशे वर्षांचा इतिहास असला तरी आपल्या उद्योगक्षेत्राला स्वत:चा असा चेहरा किंवा ओळख आजवर निर्माण करता आलेली नाही, हेच खरे. आपल्या उद्योगविश्वाची काही वैशिष्टय़े व वेगळेपण जरूर सांगता येतील. परंतु सामान्यपणे औद्योगिक प्रगतीसह येणारी मूल्ये, परंपरा आणि संस्थात्मक संस्कृतीचा इथे अभाव असल्याचे नि:संदिग्ध म्हणता येईल. उद्योग व व्यापार जगतात आजही जुन्या सरंजामी व्यवस्थेच्या खुणा पुरत्या पुसल्या गेलेल्या नाहीत. वारसा हक्कांवरून वादंग हा बिर्ला, टाटा, अंबानी या बडय़ा उद्योगघराण्यांमध्ये जसा दिसला तसा त्याला माहिती-तंत्रज्ञानासारख्या आधुनिक उद्योगातील काही परिचित नावेही अपवाद ठरल्याचे आढळलेले नाही. शेअर बाजारात सूचिबद्ध व सार्वजनिक भागभांडवल असलेल्या कंपन्यांत, व्यवस्थापकांची भूमिका ही केवळ विश्वस्ताची असते. तेथे वडिलोपार्जति, वंशपरंपरागत संपत्तीवरून होणाऱ्या भांडणासारखे कज्जे-संघर्ष उफाळून येणे अनुचितच, परंतु हे असे घडते आहे. आपल्या राजकारणात काही बडी मोजकी कुटुंबे सत्ता उपभोगत आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. त्याचप्रमाणे काही बडय़ा उद्योगघराण्यांकडे आपल्या औद्योगिक व आíथक क्षेत्राचा लक्षणीय वाटा आहे, असेही म्हणता येऊ शकेल. या कुटुंबप्रधानतेने राजकारणात (मतपेटी जरी वेगळे सांगत असली तरी) नतिक अधिष्ठान गमावल्याचे आपण म्हणत असतो, परंतु वारसा रूपाने बापाकडून त्यांच्या अपत्याकडे उद्योगसमूहाची सत्ता जात असल्याचे आपल्या सहजी पचनी पडते. दुसऱ्या बाजूला फार थोडके भागधारक प्रवर्तक-व्यवस्थापकांच्या नीतिभ्रष्टतेचा आणि दूषित व्यवहाराबद्दल आपला मताधिकार वापरून जाब विचारताना दिसतात. बहुतांश भागधारकांना आपल्याला असा काही अधिकार आहे आणि तो वापरावा याबद्दल ना जाणीव ना चाड दिसून येते. अशा स्थितीत इन्फोसिसने आपल्या जोखीम टिप्पणीत अनेक घटकांसह ‘सक्रिय भागधारक’ (एक्टिव्हिस्ट शेअरहोल्डर्स) हा बागुलबोवा पुढे आणावा हे आश्चर्यकारकच ठरते. प्रत्यक्षात इन्फोसिससारख्या कंपनीला अशा काही सक्रिय भागधारकांची भीती खरेच वाटत असेल तर ती स्वागतार्हच घटना मानायला हवे. दुर्दैव असे की, आपल्याकडे अद्याप गुंतवणूक संस्कृती पुरती रुजलेली नाही तेथे भागधारकांच्या लोकशाहीची भाषा खूप दूरचीच म्हणायला हवी. यू. के. सिन्हा यांच्याकडे सेबीची धुरा असताना, सर्वप्रथम ‘इक्विटी कल्चर’च्या संवर्धनासंबंधाने गांभीर्याने विचार सुरू झाला. सुदैवाने सेबीवर सर्वाधिक मोठी कारकीर्द ही सिन्हा यांचीच राहिली आहे. म्युच्युअल फंडाचा गुंतवणूक परीघ हा केवळ देशातील बडय़ा १५ शहरांमधील गुंतवणूकदारांपुरता कैक वष्रे सीमित होता. सिन्हा यांनी या पंधरापल्याड (बियॉण्ड १५ किंवा बी-१५) क्षेत्रातून गुंतवणूकदार मिळविणे फंड घराण्यांसाठी सक्तीचे केले आणि त्याचे सुपरिणामही अल्पावधीत दिसून आले. अगदी बीमारू म्हणून म्हटल्या जाणाऱ्या झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश म्हणा किंवा महाराष्ट्रात मुंबई-पुण्यापल्याड, नाशिक, जळगाव, अकोला, लातूर म्हणा या नव्या ठिकाणांहून गुंतवणुकीचे उत्तर पर्व जोमाने फुलल्याचे दिसून आले. या क्षेत्रातून विशेषत: समभागसंलग्न इक्विटी फंडातील ओघ हा बडय़ा शहरांच्या तुलनेत अधिक गतिमान असल्याचे ‘अँम्फी’च्या आकडेवारीवरूनही स्पष्ट होते. तरी सव्वाशे कोटींची लोकसंख्या असलेल्या आणि उदयोन्मुख अर्थसत्ता असलेल्या देशात आजही डिमॅटधारक हे जेमतेम पावणेतीन कोटींच्या घरात असणे आणि सक्रिय गुंतवणूकदार-भागधारकांमधील वाढीचा दर अत्यंत क्षीण राहणे हे शोभनीय नाही.
सचिन रोहेकर – response.lokprabha@expressindia.com