शेअर बाजाराचा निर्देशांक पुढच्या काळात उच्चाकांची नवनवी शिखरं गाठण्याची शक्यता दाखवणारं चित्र सध्या काही प्रमाणात आहे. पण तेजी आणि मंदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.

निर्देशांक नवीन उच्चांकाची शिखरे पादाक्रांत करीत असताना या उत्साही, आनंदी वातावरणात गुंतवणूकदाराच्या मनातील ‘मानसीचा चित्रकार निर्देशांकांची लाखा-लाखांची चित्रे रेखाटतो’ व भविष्यात निर्देशांक एक लाखाच्या घरात पोहोचणार यासाठी इतिहासातील दाखले देतो.

१) १९९० च्या दशकात अवघ्या हजारावर रेंगाळणारा मुंबई शेअर बाजार निर्देशांक २७ वर्षांत ३०,००० झाला.

२) २००३ साली अवघ्या तीन हजारांवर असलेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक अवघ्या पाच वर्षांत सातपट झाला. ३.००० वरून २१,०००.

तेव्हा मुंबई शेअर बाजार निर्देशांकाचं ५०,०००  ते १,००,००० चं लक्ष्य हे हाकेच्या अंतरावर आहे असा एकूण आविर्भाव, उत्साह आहे. या उत्साहावर, आनंदावर विरजण लावायचा, कुठेही पाणी ओतण्याचा उद्देश नाही तर तटस्थपणे नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करतो, त्याप्रमाणे सद्य:स्थितीतल्या तेजीकडेही ती चालू असताना येणारे घातक उतार त्यानंतर तेजीचे अंतिम लक्ष्य, उद्दिष्ट काय असेल व ते कधी गाठले जाईल हे जाणून घेऊ.

वरील मुद्दे समजून घेण्यासाठी आपण दोन ऐतिहासिक गृहीतकांचा आधार घेऊ.

गृहीतक नं. १ : निर्देशांकाचे ८ वर्षांचे चक्र (सायकल).

गृहीतक नं. २ : लोकसभा निवडणुकांनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो.

गृहीतक नं. १ : दर आठ वर्षांनी निर्देशांक उच्चांक अथवा नीचांक गाठतो..

(अ)    १९९२ मध्ये मुंबई शेअर बाजार निर्देशांकांनी ४,५४६ चा उच्चांक गाठला, ज्याला आपण हर्षद मेहताची तेजी म्हणतो.

(ब)    २००० साली मुंबई शेअर बाजार निर्देशांकांनी ६,१५० चा उच्चांक गाठला, ज्याला आपण केतन पारेखची तेजी म्हणतो.

(क)    २००८ च्या जागतिक महामंदीच्या अगोदर स्थापित केलेला उच्चांक मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर २१,२०६ चा उच्चांक.

(ड)    २०१६ साली मुंबई शेअर बाजार निर्देशांकांनी २२,४९४ चा नीचांक गाठला.

सोबतच्या तक्त्यावरून निर्देशांक दर ८ वर्षांनी ऐतिहासिक उच्चांक अथवा नीचांक गाठतो हे स्पष्ट होईल व सद्य:स्थितीत २०२४ हे ८ वर्षांच्या चक्राचे लक्ष्य येत आहे.

आता आपण दुसऱ्या गृहीतकाकडे वळू या. लोकसभा निवडणुकांनंतर निर्देशांक नेहमी त्याच्या नीचांकापासून दुप्पट होतो. हे गृहीतक स्पष्ट करणारा तक्ता-

04-lp-stock-table

आता या दोन गृहीतकांची सांगड घालता –

१) २०१९ हे लोकसभेच्या निवडणुकांचे वर्ष आहे व लोकसभा निवडणुकांनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो.  तेव्हा सद्य:स्थितीत २०१६ चा नीचांक हा २२,४९४ आहे व २२,४९४ चा दुप्पट ४४,९८८ व निफ्टीवर ६,८२५ चा दुप्पट १३,६५० होण्याची शक्यता २०२० पर्यंत आहे. तेव्हा निर्देशांक नजीकच्या भविष्यात ५०,००० चा पल्ला गाठणार त्यामागची आकडेवारी आज आपण समजून घेतली.

आता आपण तेजीचा आढावा घेतला, जी नाण्याची एक बाजू होती.

आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला वळू या. निसर्गचक्रात जशी दिवसानंतर रात्र येते तसेच तेजीनंतर भीषण मंदी येते व या मंदीत तेजीतला कागदोपत्री नफा (पेपर ऑन प्रॉफिट) भल्या मोठय़ा तोटय़ात रूपांतरित होतो. कारण प्रत्यक्षात समभाग न विकल्यामुळे व तेजी चालू असताना चढय़ा भावात समभाग घेतल्याने नंतर जेव्हा मंदी येते तेव्हा समभागाचे भाव झपाटय़ाने कोसळतात, त्यामुळे नफा राहिला दूर मुद्दलच धोक्यात येते.

त्यामुळे प्रत्येक तेजीत उच्चांक स्थापित झाल्यावर जी भीषण मंदी येते तेव्हा उच्चांकापासून निर्देशांक अक्षरश: अध्र्यावर येतो त्याची ही उदाहरणे.

१)     एप्रिल १९९२ चा उच्चांक ४.५४६ त्यानंतरच्या मंदीत निर्देशांक १९८० (एप्रिल ९३).

२)     २५ फेब्रुवारी २००० चा उच्चांक ६,१५० वरून निर्देशांक २,६०० (२८ सप्टेंबर २००१).

३)     १० जानेवारी २००८ ला उच्चांक २१,२०६ त्यानंतरच्या मंदीत ७,७०० (३१ ऑक्टोबर २००८).

तेव्हा गुंतवणूक केल्यावर लाभाची अपेक्षा ठेवायलाच पाहिजे पण लाभाचे लोभात रूपांतर झाल्यावर फार मोठा फटका बसतो. तेव्हा आपल्या गुंतवणुकीवर वार्षकि परतावा किती असावा याचे कोष्टक :-

१)     बँकेच्या बचत ठेवीवरील

व्याज  ८%

२)     मी भांडवली बाजारात

पसे गुंतवतो त्यांची

जोखीम (प्रचलित

दरपेक्षा दुप्पट म्हणजे

८% + ८ = १६%)      १६%

३)     महागाईचा दर

(घाऊक दर ४% पण

वास्तवता दर्शक १०%)   १०%

—–               ३४%

जेव्हा तुम्ही रु. १०० ला शेअर्स खरेदी करता तेव्हा रु. ३५ ते ४० म्हणजे रु. १०० च्या शेअर्स भाव १३५ ते १४० होणे हा लाभ तुम्हाला मिळालाच पाहिजे. पण तो १४० चा समभाग अल्पावधीत रु. ५०० होणार याचे स्वप्न बघणार तो लोभ झाला.

तेव्हा वरील सर्व विवेचनांवरून तेजी वा मंदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समभाग खरेदी करणे फार सोपे असते पण फायद्यातील समभाग विकून फायदा पदरात पाडून घेणे महाकर्म कठीण! यामुळे आपला घाम गाळून, रक्त आटवून कमावलेला पसा जो शेअर मार्केटमध्ये गुंतवला आहे, तो सुरक्षित राहून त्याच्यावर उत्तम परतावा मिळणेही नितांत गरजेचे आहे. तेव्हा लोभाला थोडा आवर घालून लाभ पदरात पाडून घ्या.

आजच्या घडीला गुंतवणूकदाराच्या मानसीचा चित्रकार निर्देशांकांची लाखा लाखांची चित्रे रंगवत आहे त्याचबरोबर येणाऱ्या तेजीत तो भरभरून पसे कमवून जहांगीर आर्ट गॅलरीतील चित्राच्या प्रदर्शनाला जाऊन लाखा लाखांची चित्रे विकत घेत आहे, असे चित्र निर्माण होण्याची गरज आहे.

(महत्त्वाची सूचना :  येणाऱ्या दिवसांत निर्देशांकांतील संभाव्य वाटचाल कशी असेल याचा आढावा घेण्यात आला आहे. लेखातील अनुमानाच्या आधारे खरेदी व विक्री यापकी कोणताही व्यवहाराचा निर्णय तज्ज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली घेणे उचित ठरेल व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित वाचकाची असेल.)

(लेखक हे शेअरबाजाराचे तांत्रिक विश्लेषक आहेत)

आशीष ठाकूर – response.lokprabha@expressindia.com