lp21सातारा जिल्ह्य़ातील औंध संस्थान. तेथील राजगायक पंडित अनंत मनोहर जोशी यांचे आध्यात्मिक गुरू म्हणजेच शिवानंद स्वामी. १९३९ मध्ये त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीस पंडित अनंत जोशी यांनी स्वामींच्या समाधीस्थानी दत्त मंदिराची प्रतिष्ठापना करून औंध संगीत महोत्सवाची सुरुवात केली.

या महोत्सवाच्या आयोजनाची सर्व जबाबदारी पंडित अनंत जोशी आणि त्यानंतर त्यांचे पुत्र पंडित गजाननबुवा जोशी यांनी पार पाडली.   दर्जेदार संगीताचा हा महोत्सव प्रथमपासूनच विनामूल्य ठेवण्यात आला. दरम्यानच्या काळात स्थानिक आमदार केशवराव पाटील यांनी महोत्सवासाठी दत्त मंदिरासमोर एक हॉल बांधून दिला. १९८० पर्यंत ‘औंध संगीत महोत्सव’ हा केवळ जोशी कुटुंबीयांनीच चालवला. मात्र दिवसेंदिवस त्याच्या वाढत्या व्याप्तीमुळे  महोत्सवाचा आर्थिक भार उचलणं जोशी कुटुंबीयांना अवघड जाऊ लागलं. त्यामुळे पंडित गजाननबुवा जोशी यांचे पुत्र मनोहर जोशी यांनी त्यांना एक विश्वस्त संस्था स्थापन करून तिच्याद्वारे हा उपक्रम सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ४ जानेवारी १९८१ साली पंडित गजाननबुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ही संस्था सुरू करण्यात आली. औंध संगीत महोत्सवाव्यतिरिक्त ही संस्था गेली ३४ वर्षे संगीत क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. यात संगीताचा प्रचार व प्रसार करणारी संगीत शिक्षण शिबिरे, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा आदी उपक्रमांचा समावेश आहे.

सध्याच्या औंध संस्थानच्या राणी गायत्रीदेवी यांनी महोत्सवास होणारी गर्दी आणि अपुरा पडणारा हॉल ही अडचण लक्षात घेऊन औंध कला मंदिर नावाचा हॉल बांधून दिला आहे. महोत्सव नि:शुल्क असला तरी त्याचे आयोजन, व्यवस्था, कलाकारांचे मानधन, जाण्या-येण्याची, राहण्याची व्यवस्था,रसिकश्रोत्यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंत आणि महोत्सवासाठीची साऊंड अ‍ॅण्ड रेकॉर्डिग सिस्टीम यासाठीचा निधी ही संस्थेसमोरील मोठी समस्या आहे. संस्थेने २००१ मध्ये http://www.gajananbuwajoshi.com हे संकेतस्थळ सुरू केले. त्यावर रसिकांना पंडित गजाननबुवांच्या गायनाचे आणि व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच शिष्यांना शिकवतानाचे रेकॉर्डिगही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्थात तेही नि:शुल्क आहे. या वेबसाइटच्या मेंटेनन्सवरही मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. संस्थेकडे असलेल्या वाद्यांच्या देखभालीसाठीही संस्थेकडील निधी खर्च होतो. या व्यतिरिक्त कार्यालय व्यवस्था, सदस्यांशी पत्रव्यवहार, संपर्क, कार्यक्रमांची जाहिरात यांचा खर्च वेगळाच (सध्याचे कार्यालय हे जोशी कुटुंबीयांचे राहते घर त्यांनी दीर्घ मुदत कराराने केवळ एक रुपये भाडय़ाने दिले आहे.). संस्था कल्याण-डोंबिवली परिसरात तीन ते चार संगीतविषयक कार्यक्रम आयोजित करते. त्या कार्यक्रमांसाठी जागा पाहण्यापासून ते नियोजनापर्यंतचा खर्च संस्थेतर्फे केला जातो. अर्थात हे सर्व कार्यक्रमही विनामूल्य असतात.

आतापर्यंतच्या देणग्या मुदत ठेव योजनेत ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून निधी उभारला जातो. तसेच संस्थेचे सदस्य नोंदणी वर्गणीतून मिळणाऱ्या निधीतून महोत्सवाचा खर्च केला जातो. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्राने सातत्याने पाठिंबा दिला आहे. संस्थेतर्फे दरवर्षी उत्सवात प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘रियाज’ या स्मरणिकेच्या जाहिरातींच्या माध्यमातूनही निधीची उभारणी होते.

संस्थेकडे पंडित गजाननबुवा जोशी यांच्या व्हायोलिन वादनाच्या आणि गायनाच्या अनेक रेकॉर्डिग्ज उपलब्ध आहेत. तसेच पंडित अनंत जोशी आणि पंडित गजाननबुवा जोशी यांच्या रचनाही संस्थेकडे आहेत. संस्थेला ते सर्व सी.डी., पुस्तक, संकेतस्थळामार्फत उपलब्ध करून द्यायचे आहे.  सध्याचे संकेतस्थळ अधिक प्रगत करायचे आहे. तसेच संस्थेकडील रेकॉर्डिग्ज वेगवेगळ्या ठिकाणच्या रसिक श्रोत्यांना त्यांच्या  वेळेनुसार ऐकायला मिळाव्यात यासाठी त्याची लायब्ररी तयार करून ती ऐकण्यासाठी खास ‘साऊंड प्रूफ’ खोली अथवा स्टुडिओ तयार करण्याची योजना आहे.  संगीतविषयक कार्यक्रमांची व्याप्तीही वाढवायची आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात पंडित गजाननबुवा जोशी संगीत महोत्सव सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
प्रज्ञा तळेगांवकर – response.lokprabha@expressindia.com