संत झेव्हियर्स महाविद्यालयाच्या ‘इंडियन म्युझिक ग्रुप’ला ४३ र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गायिका मीता पंडित आणि सरोदवादक पंडित ब्रिज नारायण यांची मैफील आयोजित करण्यात आली होती.

‘शास्त्रीय संगीताचं फ्युजन’ या संकल्पनेमुळे तरुण पिढी मूळ भारतीय शास्त्रीय संगीतापासून लांबच राहते. त्यामुळे शुद्ध स्वरूपातलं शास्त्रीय संगीत ऐकताना त्यातलं सौंदर्य त्यांना जाणवतच नाही. कोणत्याही प्रकारच्या संगीतासाठी पाया पक्का असावा लागतो आणि आपल्यासाठी शास्त्रीय संगीत हीच पायाभरणी आहे. भारतीय संगीताला रागमालांची, आरोह-अवरोहांची आणि सुरावटीची अभिजात देणगी आहे. शास्त्रीय संगीत ही आपली एक समृद्ध परंपरा आहे. ते विशुद्ध स्वरूपात समजावून घेतलं तरच ते तरुणांना समजेल आणि आवडेल. तरुणांनी याकडे वळावं यासाठी शास्त्रीय संगीताच्या मैफिलींसोबतच त्यावरची काही स्पष्टीकरणात्मक आणि ज्ञानपूर्ण व्याख्यानं आणि कार्यशाळाही आयोजित केल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून तरुणांमध्ये या गोष्टीची जाणीव विकसित होईल, असं सरोदवादक पंडित ब्रिज नारायण यांचे शिष्य, पुत्र आणि युवा सरोदवादक ‘हर्ष नारायण’ यांनी ‘संत झेव्हियर्स महाविद्यालया’त आयोजित केलेल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच्या वेळी ‘लोकप्रभा’शी बोलताना सांगितलं. संत झेव्हियर्स महाविद्यालयाच्या ‘इंडियन म्युझिक ग्रुप’ला ४३ वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून गायिका मीता पंडित आणि सरोदवादक पंडित ब्रिज नारायण यांची भारतीय शास्त्रीय संगीताची मैफील आयोजित करण्यात आली होती.

आपल्याकडे असलेल्या अभिजात संगीताची परंपरा आपल्यातल्या तरुणाईपर्यंत पोहोचली पाहिजे या कळकळीने सुमारे ४३ वर्षांपूर्वी संत झेव्हियर्स महाविद्यालयात उस्ताद अल्लारखां खान साहेबांनी ‘इंडियन म्युझिक ग्रुप’ची स्थापना केली. युवा पिढीला भारतीय शास्त्रीय संगीतात रुची निर्माण व्हावी आणि ते शिकण्याकडे तरुणांचा कल वाढवा हा या ग्रुपमागचा मूळ उद्देश होता. आजपर्यंत या ग्रुपच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण आणि होतकरू कलाकारांपर्यंत अनेक दिग्गज पोहोचले आणि त्यांचं मार्गदर्शनही मुलांना लाभलं. संपूर्ण वर्षभरात एकूण पाच शास्त्रीय संगीताच्या मैफिली आयोजित करणारं असं महाविद्यालय विरळाच!

‘आरोह’ या मूळ संकल्पनेतून कोणताही राग आकाराला येतो. आरोह आणि अवरोहांपासून कोणत्याही रागाची सुरुवात होते. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात करताना शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना सुरुवात होते ‘आरोह’ या संत झेव्हियर्स महाविद्यालयाच्या कार्यक्रमाने! यात केवळ विद्यार्थी आपापली कला सादर करतात. जूनमध्ये होणाऱ्या ‘आरोह’नंतर वर्षभर चढत्या दर्जाचे कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विद्यार्थ्यांचाच प्रयत्न असतो.

नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या ‘विरासत’चा उद्देश हा तरुण कलाकारांना प्रोत्साहन देणं हाच असतो. तरुणांमध्ये निर्माण होत असलेली शास्त्रीय संगीताबद्दलची आपुलकी यावेळी युवा प्रेक्षक आणि श्रोत्यांनी भरलेल्या सभागृहातून जाणवली. संत झेव्हियर्स महाविद्यालयाच्याच दोन विद्यार्थिनींनी ओडिसी आणि भरतनाटय़म असे दोन शास्त्रीय नृत्यप्रकार एकत्र सादर करत ‘विरासत’ला सुरुवात केली आणि या मैफिलीत युवा कलाकारांनी उत्तरोत्तर रंग भरले. डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांची शिष्या असलेल्या मनाली फाटकने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर केलं. सारंग कुलकर्णी याने सरोदवादन करून मैफिलीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. स्वत: तयार केलेल्या ‘झिरोद’ या वाद्याने तरुणांमधल्या सर्जनशीलतेचा प्रत्यय दिला. ‘विरासत’ अर्थात ‘वडिलोपार्जित ठेवा’ आणि म्हणूनच परंपरागत अभिजात असलेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला तरुणाईच्या मनामनात पोहोचवण्याचं काम संत झेव्हियर्स महाविद्यालय गेली ४३ र्वष करत आहे.

संपूर्ण वर्षभरात झेवियर्समध्ये होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं सर्वोच्च शिखर म्हणजे दरवर्षीचा ‘जॅनफेस्ट’! दरवर्षी ‘इंडियन म्युझिक ग्रुप’च्या स्थापनेच्या दिवशी होणाऱ्या मैफिलीनंतर ‘जॅनफेस्ट’चं त्या वर्षीचं स्वरूप घोषित केलं जातं. आतापर्यंत पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद झाकीर हुसेन अशा अनेक दिग्गजांनी संस्मरणीय केलेल्या ‘जॅनफेस्ट’मध्ये यावर्षी म्हणजेच २५ आणि २६ जानेवारी २०१७ या दोन दिवसांमध्ये पहिल्या दिवशी पंडित शौनक अभिषेकी, पंडित विश्वमोहन भट्ट आणि बेगम परवीन सुलताना यांच्या शास्त्रीय गायन आणि वादनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. दुसऱ्या दिवशी पंडित हरिप्रसाद चौरसिया, इर्शाद खान, डॉ. अश्विनी भिडे देशपांडे आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्या स्वर्गीय सुरावटीची अनुभूती घेण्याची सुवर्णसंधी रसिकांना मिळणार आहे.

केवळ मैफिली आयोजित करून तरुणाईमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण होणार नाही हे पूर्णपणे जाणून संत झेव्हियर्स महाविद्यालय दरवर्षी शास्त्रीय संगीतविषयक कार्यशाळासुद्धा आयोजित करत असतं. त्यामध्येही महाविद्यालयातील आणि इतर तरुण उत्साहाने आणि आवडीने सहभागी होताना दिसतात. ‘कोल्डप्ले’ला जाण्याऐवजी ‘विरासत’ला आले हा माझा अत्यंत योग्य निर्णय ठरला’ अशी प्रतिक्रिया ‘विरासत’ मैफील ऐकून तृप्त झालेल्या यशश्री उचिल हिने दिली.

‘मैफिली आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातूनच आपला परंपरागत असलेला अमूल्य ठेवा आपण नवीन पिढीपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्यांच्या खांद्यावर धुरा देऊन नििश्चत होऊ  शकतो,’ ८ जानेवारीच्या स्थापनादिन विशेष मैफिलीनंतर प्रख्यात सरोदवादक पंडित ब्रिज नारायण यांनी सांगितलं आणि तरुणांचा प्रतिसाद बघून समाधानही व्यक्त केलं.
वेदवती चिपळूणकर – response.lokprabha@expressindia.com