‘‘मालती, अगं तुला किती वेळा मी सांगितलं की मिनीला कामाला येताना आणत जाऊ नकोस’’ जरा रागातच बोलली राधा. पण मालतीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. भांडी विसळता विसळता ती म्हणाली, ‘‘अहो, वहिनी काय करू मग? त्या बेवडय़ाच्या ताब्यात ठेवून येऊ का?’’ खूप रागात असली की ती नवऱ्याला ‘बेवडा’ म्हणायची, म्हणजे होताच तो तसा..

‘‘वहिनी, सकाळी तशी मिनी मोकळीच असते, अभ्यास रात्रीच करते. इथून काम आटपून गेले की लगेच मी तिला शाळेत सोडते. मग काय झालं जरा मला मदत केली तर..?’’ मालतीने राधाला समजावले. मालतीचे बोलणे पटल्यामुळे राधा काहीच बोलू शकली नाही.

Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Harsh Chhaya on divorce with shefali shah
घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”
Shukra And Rahu Yuti
७ दिवसांनी ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १८ वर्षांनंतर २ ग्रहांची होतेय ‘महायुती’; लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी

दहा अकरा वर्षांची मिनी पुढे आलेले केस मागे करत केर काढायला आईला मदत करत होती, अगदी मन लावून काम करत होती. तिच्याकडे बघताना राधाच्या मनात आले कितीतरी लेख येतात ‘बालमजूर’ विषयावर, पण तो फक्त चर्चेपुरताच विषय असतो; लहान लहान मुले कष्टाची कामं करतातच. काही आईबापांना मदत म्हणून तर काही आईबाप नाही म्हणून. आपण सुशिक्षित लोक अशा गोष्टींना खतपाणी घालतो, का नाही विरोध करू शकत आपण?

‘‘काकू, पाय वर घ्या ना सोफ्याच्या खालून केर घ्यायचाय’’ निरागसपणे बोललेल्या मिनीच्या वाक्याने राधा भानावर आली. काम आटपून दोघी मायलेकी घरी गेल्या, पण राधाला मात्र त्यांनी विचार करायला भाग पाडलं.

राधा, राजेश व त्यांची एकुलती एक लाडकी लेक ईशा.. छान संसार होता राधाचा. राजेश एका इंटरनॅशनल कंपनीत मॅनेजर होता. राधा आधी नोकरी करायची; पण ईशाचा जन्म झाल्यावर तिने ती सोडली. पूर्ण वेळ तिने घरासाठी द्यायचा ठरवला. हळूहळू ईशा मोठी होऊ लागली तशी राधा तिच्यात व संसारात जास्तच गुरफटत गेली. आठ वर्षांची ईशा दुसरीत होती.

बारा वाजत आले तशी राधा खाली उतरली. थोडय़ाच वेळात ईशाची बस आली. बसमधून उतरल्यापासून घर येईपर्यंत ईशाची अखंड बडबड सुरू होती.. पण काही केल्या केर काढत असलेली मिनी मालतीच्या डोळ्यासमोरून हटत नव्हती. ईशाला झोपवताना तिने मनाशी पक्का निर्धार केला की उद्या मालतीला समजवायचे.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मालती मिनीला घेऊन आली. ठरवल्याप्रमाणे राधा तिला म्हणाली, ‘‘हे बघ मालती, मिनीने हे असे काम केलेले मला अजिबात आवडत नाही, माझ्या घरी तरी तिला कामाला लावू नकोस, किती लहान वय आहे तिचं? कशी काय कामं करवू शकतेस तू तिच्याकडून.’’ तिच्या बोलण्यातली जरब मालतीच्या लक्षात आली. चूप राहण्यातच आपली भलाई आहे हे तिने ताडले. नमते घेत ती बोलली, ‘‘ताई, राहिलं.. तुम्हाला नाही आवडत ना तर मिनी नाही करणार काम, मग तर झालं?’’ निदान एका बालकामगाराला तरी आपण काम करण्यापासून वाचवलं असा विचार राधाच्या मनात आला आणि चेहऱ्यावर हसू उमटलं.. अगदी नकळत. तिने मग ही गोष्ट राजेशला पण सांगितली.

राधाला माहीत होते आपल्याकडे मिनी काम करत नसली तरी दुसऱ्यांच्या घरात ती नक्की काम करते, पण म्हणतात ‘दृष्टी आड सृष्टी’.

त्या दिवशी ईशा शाळेतून आली ती नाचतच, खूप आनंदात दिसत होती. बसमधून उतरताच तिची बडबड सुरू झाली. ‘‘मम्मी, आज शाळेत गेस्ट आले होते, त्यांनी सगळ्यांना चॉकलेट्सपण दिली..’’

‘‘अरे वा.. मस्त.. मग तू चॉकलेट्स खाल्लीस की नाही?’’ राधाने लेकीला प्रश्न केला.

‘‘मम्मी, आज त्यांनी मला एक पेपर दिलाय आणि तो तुला द्यायला सांगितलाय.’’ ईशाने माहिती पुरविली. घरी पोचताच ईशाने बॅगेतून पेपर काढला आणि दिला. त्यावर नाव लिहिले होते महेश दाते आणि मोबाइल नंबर होता. ‘‘मम्मी, त्यांनी तुला फोन करायलापण सांगितला आहे.’’ ईशाने महेश दातेचा निरोप दिला आणि हातपाय धुवायला पळाली.

राधाला मात्र कोडेच पडले. हा कोण माणूस? आणि याने आपल्याला फोन करायला का बरे सांगितले? सगळी कामं आटोपल्यावर तिने ईशाला झोपवले आणि मग सावकाश फोन लावला. ‘‘हॅलो, महेश बोलताय का?’’ तिने प्रश्न केला. ‘‘हो..मी महेश.’’ पलीकडून आवाज आला तशी तिने आपली ओळख दिली. ‘‘मी ईशाची मम्मी राधा बोलतेय.. तुम्ही फोन करायला सांगितला होता…’’ तिचे वाक्य संपायच्या आतच तो म्हणाला, ‘‘हो हो, आलं लक्षात, अहो, काय गोड मुलगी आहे हो तुमची.. एकदम  झकास..’’

‘‘थँक यू, काय काम होतं तुमचं?’’

राधा अजूनही गोंधळलेलीच होती.

‘‘अहो, उद्या चिल्ड्रन्स डे आहे ना म्हणून मी शाळेतल्या मुलांना चॉकलेट्स वाटायला आलो होतो.. दरवर्षी देतो मी. वेगवेगळ्या शाळेत जाऊन. मला तुमची मुलगी खूपच आवडली. मी एका अ‍ॅड एजन्सीमध्ये आहे. तुम्ही तिला स्क्रीनवर आणू इच्छिता का?’’ महेशच्या प्रश्नाने राधा जरा गडबडली. एकदम अशा प्रश्नाची तिने अपेक्षा केली नव्हती, पण लगेच स्वत:ला सावरत ती म्हणाली, ‘‘तसा काही विचार केला नाहीये. आणि मुख्य म्हणजे तिच्या बाबांना पण विचारावं लागेल..’’

‘‘अहो, माझ्याकडे पावडरच्या अ‍ॅडसाठी एका लहान मुलीची गरज आहे. अगदी अर्धा मिनिटाची जाहिरात आहे, ईशा अगदी फीट बसेल त्यात. बघा विचार करून मला फोन करा..’’

‘‘बरं, ठीक आहे, सांगते तसं..’’ असं बोलून राधाने फोन ठेवला. संध्याकाळी राजेश ऑफिसमधून आल्यावर राधाने त्याला सांगितलं. ईशा होतीच तशी गोड, कुरळ्या केसांची, भोकरासारख्या डोळ्यांची, गोरीपान.. अगदी बाहुलीसारखी दिसायची, स्वभावानेही लाघवी होती; पण अशी काही संधी तिच्या आयुष्यात येईल असे दोघांनाही कधी वाटले नव्हते.

दोनचार दिवस विचार केल्यावर राधा व राजेश दोघांनाही वाटले की काय हरकत आहे एखाद्या अ‍ॅडमध्ये काम करायला, संधी आपणहून चालून आलीये.. नाही कशाला म्हणायचे आणि मग त्यांनी होकार दिला. ती अ‍ॅड शूट करायला जवळजवळ महिना लागला. ईशाच्या शाळेचे टाइमटेबल विस्कटलं. अभ्यासाचे तीनतेरा वाजले, पण ईशालाही हे सर्व करायला आवडत होते.. अ‍ॅड पूर्ण झाली, देशभर ती झळकली आणि रातोरात ईशा- प्रसिद्ध झाली. मग मागे वळून बघायचा प्रश्नच येत नव्हता. प्रसिद्धी आणि पैसा यांनी दोघांचे डोळे दिपले. ईशा एक एक पायरी पुढे चालतच राहिली. आता तर शाळा तिच्यासाठी काहीही अ‍ॅडजस्टमेन्ट करायला तयार व्हायची. शाळेतली तिची गैरहजेरी, परीक्षा न देणं सर्व चालायचं…

ईशाबरोबर आता राधाही बिझी झाली. तिच्याबरोबर सगळीकडे जायची. घरातली कामे हळूहळू कमी होऊ लागली. पैशाची आवक वाढली. घर बदलले. गाडी आली. नोकरचाकर आले; पण तरीही राधाने मालतीला काढले नाही. आधीसारखीच मालती मिनीला घेऊन कामाला यायची, आईच्या कामाला हातभार लावायची.

ईशाने अ‍ॅडमध्ये व सीरियलमध्ये काम करायला लागून तीन वर्षे झाली. दिवसेंदिवस तिची धावपळ वाढतच होती. नेहमी प्रसन्न व हसरा असणारा चेहरा कधी कधी हिरमुसल्यासारखा दिसायचा. अभ्यास करणं, खेळणं, सगळं जवळजवळ बंदच झालं होतं. राधाला व राजेशला मात्र तिच्यातले हे वेगळेपण जाणवतं नव्हतं.. त्यांना फक्त पैसा दिसत होता.

त्या दिवशी सकाळी दूध पिताना ईशा म्हणाली, ‘‘मम्मी, मला शाळेत जावंसं वाटतंय गं.. खूप दिवसात गेलेच नाहीये, परीक्षापण जवळ आलीये काय करू.?’’

‘‘अगं कशाला काळजी करतेस? टीचरशी माझे बोलणे झाले आहे, टेन्शन नको घेऊस तू परीक्षेचं. आरामात पास होशील..’’ अगदी सहजपणे, राधाने तिच्या प्रश्नाचा निकाल लावला. केर काढता काढता मालती दोघींचे बोलणे ऐकत होती. एवढेच काय तीन वर्षांत थोडी सुज्ञ झालेली मिनीपण हे ऐकत होती, ती पण यंदा एस.एस.सी.ला होती. मालती व मिनीने एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले आणि त्या परत कामाला लागल्या.

स्वयंपाक करणाऱ्या मावशी आल्यावर राधाने सूचना दिल्या व बेडरूममध्ये तयार व्हायला जायला लागली. आज ईशाचे एक पूर्ण दिवसाचे शूटिंग होते.. सीरियलचे.. ती बेडरूमचे दार लावणार इतक्यात मालती समोर आली. ‘‘वहिनी दोनच मिनिटं बोलायचं होतं, वेळ काढाल का?’’ मालतीची विनंती ती नाकारू शकली नाही. ‘‘बोल लवकर, मला बाहेर जायचंय..’’

‘‘इथे हॉलमध्ये बसा दोन मिनिटे.’’ तिने हाताला धरून राधाला सोफ्यावर बसवले.

‘‘ताई, खूप दिवसांपासून बोलायचा विचार करत होते, पण हिम्मत होत नव्हती. तुमच्याकडे मी दहा वर्षांपासून नोकरी करतीये. मला तुम्ही घरातल्यासारखंच वागवता म्हणूनच बोलते..’’ मालतीला बोलायला जरा जड जात होते.

‘‘आता मुद्दय़ाचं बोलशील का, मला उशीर होतोय.’’ आता मात्र राधा जरा रागानेच बोलली.

‘‘ताई तुम्ही ईशाला येवढं कामाला का लावता? तिला झेपत नाहीये.. सुकलाय पोरीचा चेहरा.. तीनचार वर्षांमागे तुम्ही म्हणाला होतात ना लेकीला काम लावू नकोस. लहान आहे ती.. मग आता. ईशाच्या बाबतीत काय? तुमचं ऐकून मी मिनीचं काम करणं बंद केलं आणि तुम्हीच लेकीकडून काम करवताय? लहान मुलांना कामाला लावू नये हे फक्त गरिबांसाठीच का? आज तुम्हीही तेच करताय.. मला माहितीये हे सगळं ऐकल्यावर तुम्ही मला रागवणार आणि कामावरूनही काढणार.. पण तरीही मला हे तुम्हाला सांगावंसं वाटलं, बघा विचार करून.’’

राधा अवाक्  होऊन तिचे बोलणे ऐकत होती. मालती एवढी विचार करून बोलू शकते हे तिच्यासाठी नवीन होते, किती मोठी गोष्ट बोलून गेली होती मालती.. आपण असे कसे वाहवत गेलो पैशासाठी.. छे.. तिची तिलाच लाज वाटली. ईशाला आपण कामाला लावतोय तेव्हा आपण एक ‘बालमजूर’ निर्माण करतोय हे आपल्या कधी लक्षातच आले नाही..

मालतीचे बोलणे संपले.. तिचे कामही आटपले होते.. जाताना ती राधाला म्हणाली, ‘‘उद्या फोन केलात तर कामाला येईन नाही तर समजीन तुम्ही मला काढून टाकलंत.. तुमच्या बोलण्याचा राग मला चार वर्षांपूर्वी आला नव्हता. मला ते पटलं होतं. बघा तुम्हाला माझं म्हणणं पटतं आहे का?’’ राधाला शॉकमध्ये ठेवूनच मालती व मिनी दार लोटून बाहेर पडल्या.

राधाला अगदी लाजिरवाणे झाले. ज्यामुळे मोलकरणीला आपण बालमजुराचे धडे दिले तिनेच आज आपल्याला ते परत करावेत? जे मालतीच्या लक्षात आले ते पैशाच्या व प्रसिद्धीच्या धुंदीत आपल्याला कळले नाही.. आता ईशाला या सगळ्यापासून दूर ठेवायचे. तिचे बालपण तिला परत द्यायचे..

दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने मालतीला फोन केला, ‘‘मालती, कामाला यायचंय, तुला काय वाटलं मी सोडेन तुला? अगं तुझा सल्ला मोलाचा ठरलाय माझ्यासाठी.. भटकले होते जरा.. पण आता नाही.. ईशाच्या बाबतीत योग्य निर्णय घेतलाय मी.. येणार ना मग?’’

‘‘असं काय विचारता ताई? येणारच ना.. निघते दहा मिनिटांत.’’ मालती फोन कट करणार इतक्यात तिथून आवाज आला, ‘‘आणि बरं का ईशा शाळेत गेली बरं.. आणि आता रोज जाणार.’’ राधाच्या चेहऱ्यावरचा आनंद व समाधान मालतीला तिचा चेहरा न बघताच दिसत होता.
वर्षां जयवंत भावे – response.lokprabha@expressindia.com