हरीश सखाराम राजवाडे कसं वाटतं हे नाव? एखादी पंचाहत्तर वर्षांची व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते किनई?

दातांची कवळी- डोक्याला टक्कल-

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
Make Home Made Gudi Padwa special Instant Sevai Kheer Note the Tasty Recipe
गुढीपाडव्या निमित्त बनवा स्पेशल स्वादिष्ट ‘शेवयाची खीर’ ; नोट करा रेसिपी
Personality Traits
Personality Traits : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व

पण मी म्हणतेय ते हे महाशय म्हणजे चाळिशीच्या आत-बाहेरचे बरं का! आणि मुख्य म्हणजे प्रकाशझोतात राहण्याची विलक्षण आवड असलेले! येनकेनप्रकारेण प्रसिद्धी प्राप्त करून घ्यावी असं वाटायचं त्यांना.

उत्तम नोकरी, उत्तम व्यक्तिमत्त्व, अंगात एखादी छान कला असणं किंवा निदान बायको तरी सुंदर असणे. एखाद्या नटीशी मिळताजुळता तिचा चेहरा असणं ही सगळी कारणं माणसाला प्रसिद्धीच्या वलयात ठेवतात. पण याबाबतीत हरीश राजवाडे दुर्दैवीच होते. यापैकी त्यांच्याकडे काहीही नव्हते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी मग राजवाडय़ांनी दुसरे काही मार्ग शोधले. म्हणजे त्यांनी चित्रं काढायचा सपाटा लावला. तेव्हा त्यांची बायको चेष्टेने म्हणाली,

‘‘तुम्ही काढलीयत भरमसाट चित्रं, पण त्यांच्याकडे बघणार नाही कुत्रं!’’

‘‘प्रिये, तू तर कविताच करायला लागलीस!’’ असं राजवाडे म्हणाले आणि नंतर त्यांना वाटलं आपली बायको जर कविता करू शकते तर आपल्याला का करता येणार नाहीत?

हे मनात आलं आणि त्यांनी कविता करायला सुरुवात केली. पण नवकविता म्हणूनही त्यांच्या कविता कुणी प्रसिद्ध करेना. त्यामुळे त्यांचा चेहरा अगदीच पडला.

नवऱ्याचा पडलेला चेहरा बघून बायको म्हणाली, ‘‘अहो, असे हताश होऊ नका! तुम्ही कथालेखन का करत नाही? विनोदी कथालेखकांना खूप भाव मिळतो!’’

बायकोनं आपल्याला किती छान सल्ला दिला असं हरीश राजवाडय़ांच्या मनात आलं आणि त्यांना एकदम त्यांच्या मित्राची- बंडू गुप्तेची आठवण झाली. दिवाळीच्या आदी काही महिने तो अचानक गुप्तच होतो. त्याच्या प्रकटदिनाबद्दल त्याच्या घरच्यांनाही काही माहिती नसते. आणि तो जसा गुप्त होतो तसाच एकेदिवशी एकदम प्रकटही होतो. बरोबर खूपशा कथा घेऊन बऱ्याच दिवाळी अंकात त्याचं नाव झळकते. हे महाराज मग एकदम हवेत.

हे सगळं आठवलं आणि हरीश राजवाडय़ांनी ठरवून टाकलं आपण कथालेखक व्हायचं; प्रयत्न करायचा आणि विनोदी कथाच पाडायच्या.

त्यांनी मग जवळच्या स्टेशनरी दुकानातून खूपसे आखीव ताव आणले. एक पारकर पेनही खरेदी केले.

पेन हातात धरून आढय़ाकडे बघत बसल्यावर त्या अमुकतमुक लेखकाला लेखनाची स्फूर्ती येते असं त्यांनी कुठल्यातरी मोठय़ा लेखकाविषयी वाचलं होतं. मोठा लेखक व्हायचं तर तसं करणं भाग आहे, असं त्यांच्या आतल्या मनाला वाटलं आणि जरा वेळ ते त्याच अवस्थेत बसले. आणि मग काय आश्चर्य! आधी कळस मग पायासारखं झाले. त्यांना एका कथेचं नावच आधी सुचलं. ‘समीक्षकांच्या तावडीत सापडलेला लेखक (बिचारा!)’

त्यांनी मग स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. आणि एक कागद पुढे ओढून त्याच्यावर वरच्या बाजूला कथेचं नाव लिहून टाकलं. लेखकाचं नाव लिहिण्याची वेळ आली तेव्हा त्यांना वाटलं आपलं नाव काही बरोबर नाही. हल्ली किती छान छान नावं असतात. पण आपलं कसलं जुनाट नाव. लेखकाचं नावसुद्धा आकर्षक हवं. तरच वाचकांना कथा वाचावीशी वाटेल.

ते विचार करायला लागले. कुठलंतरी टोपण नाव घ्यावे. एकदम झकास. त्यांच्या मनात आलं. तेवढय़ात त्यांची बायको तिथे टपकली. ते म्हणाले ‘‘तुला काय काय सुचत असतं ना? मग मला एक सुचव की!’’

‘‘अहो, पण सुचवायचं काय? ते तर कळू दे!’’

‘‘एखादं छानपैकी टोपण नाव सुचव. माझ्या नावात काही तथ्य नाही आणि ते नाव लकीही नाही. म्हणून म्हणतो.’’

बायकोनं थोडा विचार केला आणि चुटकी वाजवून म्हणाली ‘‘हसरा- हे टोपण नाव कसं वाटतंय?’’

‘‘हसरा? अगं पण मी तर कधी हसत नाही. मग एकदम?’’

‘‘अहो, माणसाच्या व्यक्तिमत्त्वाशी त्याच्या नावाचा  काहीही संबंध नसतो. ‘नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा’ ही म्हण लक्षात घ्या. बरं ते जाऊ दे, ‘हसरा’ नाव मला का सुचलं  असेल ओळखा पाहू!’’

‘‘मला कसं ओळखता येणार?’’

‘‘अगदी सोप्पं आहे! हरीश मधला ‘ह’, सखाराममधला ‘स’ आणि राजवाडेमधला ‘रा’- हसरा!’’

‘‘कित्ती हुशार गं तू!’’ राजवाडे बायकोला म्हणाले. ‘हसरा’ हे टोपणनाव त्यांना एकदम पसंत पडले. बायकोकडे कौतुकानं बघत त्यांनी ‘समीक्षकांच्या तावडीत सापडलेला लेखक’ कथेच्या या नावापुढे लेखकाचं नाव लिहून टाकलं- ‘हसरा’

त्यांनी मग पुन्हा आढय़ाकडे नजर लावली. आणि काही वाक्यं मनाच्या तळातून त्यांच्याकडे उडय़ा मारत पळत यायला लागली.

त्यांना वाटलं एका लेखकाची आपण गोष्ट लिहावी. तो लेखक अगदी आपल्यासारखा. त्यानं रंगवलेलं एक दाम्पत्य म्हणजे त्याच्या कथेतले नायक-नायिका.

हरीश राजवाडे मग भराभरा लिहीत सुटले. मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस सुखात्मे. दोघेही निष्णात डॉक्टर. नाव सुखात्मे होतं पण त्यांच्या संसारात एक दु:ख होतं.

अशी सुरुवात करून राजवाडय़ांनी सुखात्म्यांच्या सुखी संसाराचं वर्णनच सुरू केलं.

दोघंही डॉक्टर होते. पण हॉस्पिटलमधून घरी आल्यावर हॉस्पिटलमधला विषय ते कधीही काढायचे नाहीत. दोघांचाही कायम रोमँटिक मूड.

त्यांच्या सुखी संसाराच्या वर्णनानं तीन पानं भरून गेली. मग राजवाडय़ांनी एक छोटासा ब्रेक घेतला आणि ते बाल्कनीत जाऊन उभे राहिले.

तेवढय़ात बायकोनं त्यांचं रफ लेखन वाचलं आणि खो खो हसत म्हणाली ‘‘अहो, हे तुम्ही काय लिहिलंयत? त्यांच्या संसारात एक दु:ख होतं असं म्हणून पुढे ते दु:ख सांगितलंच नाहीत. वाचक कंटाळतील ते सुखी संसाराचं वर्णन वाचून! त्यापेक्षा निम्मं वर्णन काटून टाका!’’

बायकोनं पुन्हा एकदा त्यांना मौलिक सूचना केली. मग ते म्हणाले, ‘‘अगं, दु:ख म्हणजे त्यांना मूल नव्हतं.. चांगल्या डॉक्टरना दाखवून चांगली ट्रीटमेंट घेऊनही मूल झालं नाही. म्हणून..’’

‘‘म्हणून काय?’’

‘‘म्हणून हॉस्पिटलमध्ये अबॉर्शन करून घ्यायला आलेल्या दाम्पत्याला ते सांगतात की तुमचं  मूल आम्ही दत्तक घेऊ. तुम्ही अबॉर्शन करू नका!’’

‘‘मग ते घेतात का ते मूल!’’

‘‘नाही ना! बाळंतपणात ती बाईच जाते. आणि तिची आठवण म्हणून तिचा नवरा ते मूल स्वत:कडेच ठेवतो’’

‘‘अशी आहे होय ही कथा? पण या कथेचा कथेच्या शीर्षकाशी काहीच संबंध नाही! ‘समीक्षकांच्या तावडीत सापडलेला बिचारा लेखक’. काय संबंध आहे कथेचा आणि शीर्षकाचा?’’

‘‘आहे तर! नाही कसा? मी असं दाखवणार आहे की ही कथा प्रसिद्ध झाल्यावर एका समीक्षकानं ती वाचली. आणि त्यानं त्या कथेवर टीकेची झोड उठवली.

मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस सुखात्मेंना मूल न होण्याचं कारण लेखकानं दिलेलं नाही. कुठल्या डॉक्टरांची त्यांनी ट्रीटमेंट घेतली? त्या ट्रीटमेंटचं नाव काय, याचाही कथेत उल्लेख नाही. त्यामुळे ही कथा अपूर्ण वाटते. वगैरे वगैरे..

स्वत:च्या कथेवर झालेली अशी टीका वाचून हे लेखक महाशय भडकले आणि त्यांनी त्या समीक्षकाला फोन केला. म्हणाले, ‘‘तुम्ही केलेली टीका योग्य नाही. कारण ही कथा काही मेडिकल ग्राऊंडस्वर आधारलेली नाही.

लेखक महाशय अजूनही काही बोलणार होते. पण पलीकडून फोन बंद झाला!’’

‘‘हंऽ हे जर असं काही लिहिलं तर जरा बरं होईल!’’

‘‘अगं, पण कथेचा शेवट मी अजून जरा धक्कादायक करणार आहे!’’

‘‘आता अजून कुठला धक्का?’’

‘‘समीक्षकांनी त्या कथेवर अशी टीकेची झोड उठवल्यामुळे वाचकांना त्या कथेबद्दल खूपच उत्सुकता वाटायला लागली. बऱ्याच वाचकांनी ती मुद्दाम मिळवून वाचली. अशा तऱ्हेनं लेखक महाशय प्रसिद्धीच्या झोतात आले!’’

‘‘अरे वा! हा शेवट पण चांगला आहे. लगेच ही कथा लिहून टाका. आणि पोस्टात टाका. एखाद्या संपादकांचे नाव लिफाफ्यावर लिहायला विसरू नका!’’

बायकोच्या एकामागून एक मौलिक सूचना! हसऱ्यांनी तिच्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं. कथा रवाना झाली. थोडय़ाच अवधीत ती प्रसिद्धही झाली.

कथेत दाखवल्याप्रमाणे खरंच हसऱ्यांनी ती कथा निरनिराळ्या समीक्षकांकडे पाठवून दिली.

आता मजा! कथेवर टीका होणार आणि आपण प्रसिद्धीच्या झोतात येणार! असं त्यांना वाटत होते. पण दैव आड आलं! त्यांच्या कथेची दखलच घेतली नाही समीक्षकांनी!

हसरा शेवटी रडायला लागले. पण त्यांनी हार मानली नाही. ‘समीक्षकांच्या तावडीतून सुटलेला बिचारा लेखक’ या शीर्षकाची नवी कथा लिहिण्याची तयारी त्यांनी सुरू केली!
शुभदा साने – response.lokprabha@expressindia.com