तसे मी आणि मनोहर, दोघंही नाटकवेडे. ‘संध्याछाया’ हे जयवंत दळवींचं नाटक दादरच्या शिवाजी मंदिरला आम्ही पाहिलं, तेव्हा निखिल माझ्या पोटात होता. एक तर दळवींचं नाटक, त्यांत नाना-नानींच्या भूमिकांत माधव वाटवे अन् विजया मेहता. नाटक पाहिल्यावर आम्ही दोघंही सुन्न झालो होतो. बाहेर पडून रस्त्याला लागेपर्यंत दोघंही गप्पच. नाटकाचा शेवटच तसा होता.. उद्ध्वस्त करणारा. ‘दळवींनी असा शेवट का केला असेल? पटला तुला हा शेवट?’ शेवटी मनोहरनंच विचारलं.

‘नाही पटला तितकासा.. थोडाफार मेलोड्रामाटिक वाटला.’ मला खरंच तेव्हा तो तसा वाटला होता.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Road accident in Dindori
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावरुन परत येताना अपघात; १४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

तसं तर वास्तवदेखील कधी मेलोड्रामापेक्षा भयंकर असतं. पण त्या वेळी, त्या तरुण वयांत तो तसा शेवट पटला नव्हता, एवढं मात्र खरं.

नाना-नानींचा एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला. या देशाविषयी आत्मीयता नसलेला. ‘हा देश माझा वाटत नाही मला. इकडच्या लोकांचं वागणं, भ्रष्टाचार, लुबाडणूक, अस्वच्छता.. मी नाही या देशात राहू शकत’..अशी काहीशी भावना असणारा. तर दुसरा मुलगा याच भ्रष्ट-अस्वच्छ देशासाठी ७१ च्या भारत-पाक युद्धात धारातीर्थी पडलेला! दोन मुलं असून वृद्धपणी एकटे पडलेले, आता एकमेकांसाठीच उरलेले नाना-नानी. ‘नंतर मागं उरलेल्यानं काय करायचं’ हा भेडसावणारा प्रश्न. दोघंही झोपेच्या गोळ्या खाऊन एकाच वेळी आयुष्य संपवितात.. असा नाटकाचा शेवट.

‘‘वेगळा शेवट काय असू शकला असता, माधवी?’’ घरी गेल्यावर मनोहरचाच प्रश्न.

‘‘खरं तर हे प्रत्येकाच्या वृत्ती-स्वभावावर अवलंबून असतं. एकटेपणा हा एरवी आयुष्य ‘कुरतडत संपविणारा रोग असतो. कुणाच्याही वाटय़ाला येऊ  शकतो. वृद्धत्वाबरोबर येणाऱ्या अनेक शारीरिक व्याधींबरोबर मूळ वृत्तीच जर आनंदी नसेल, तर मागं उरलेल्याचं आयुष्य कठीणच. पण म्हणून असं आयुष्य संपविणं..’ चर्चा अशीच चालू राहिली होती.

खुद्द जयवंत दळवी ‘संध्याछाया’च्या रवींद्र नाटय़ मंदिरच्या एका प्रयोगाला एकदा हजर राहिले होते, प्रेक्षकांची प्रतिक्रिया बघण्यासाठी. तिथे जिने चढावे लागत नाहीत, म्हणून वृद्ध प्रेक्षक बहुसंख्य. मध्यंतरात त्या प्रेक्षकांची हळवी अवस्था- हरवलेपण पाहून, ‘आपल्यासारखेच दोघं नाटकाच्या शेवटी मरून पडलेले पाहणार, अन् त्यांचा अमेरिकेला जायला निघालेला मुलगा नाना-नानींच्या खोलीचं दार बाहेरून ठोठावतो ते ऐकणार.. छे, छे, मी नाटकाचा शेवट असा करायला नको होता..’ असं तीव्रतेनं वाटल्याचं दळवींनी कालांतराने आवर्जून लिहून ठेवलं होतं. अर्थात नाटक लिहिताना त्यांना योग्य वाटला तो शेवट त्यांनी केला, हे सत्य उरतंच. आयुष्य संपविणं ही पळवाटही असेल कदाचित. पण अशा पळवाटा आयुष्यात विविध प्रसंगी सारेच शोधात असतात..

निखिलनं तरी वेगळं काय केलं, ‘क्वालिटी-लाइफ’साठी हा भ्रष्ट-अस्वच्छ देश सोडून अमेरिकेत स्थायिक व्हायचा निर्णय घेताना? उच्च शिक्षणासाठी त्यानं अमेरिकेत जावं, ही त्याच्या बाबांची- मनोहरची- रास्त इच्छा. शिक्षणासाठी झालेला प्रचंड खर्च भरून काढण्याच्या सबबीवर त्याचं तिथंच नोकरी करणं.. नंतर इंडियात माझ्या शिक्षणाला- अनुभवाला स्कोप नाही.. इकडची वशिलेबाजी, भ्रष्टाचार..वगैरे, अन् तसंही काय दिलं मला या देशानं? हा त्याच्या दृष्टीनं बिनतोड सवाल. ‘तू काय रे केलंस या देशासाठी?’ हा माझा प्रश्न ओठांवर येऊन थांबायचा. अशा वादांतून काहीच निष्पन्न होत नाही, त्याच्या निर्णयावर तो ठाम असतो, हा माझा आजवरचा अनुभव. मग समजूत काढल्यासारखा तोच पुढं म्हणायचा, ‘आई-बाबा, जग आता इतकं जवळ आलंय, वर्ल्ड हेज बिकम ए व्हिलेज. विदिन फ्यू अवर्स, आपण कुठूनही कुठेही जाऊ  शकतो. टेक्नॉलॉजीमुळे आपण रोज एकमेकांना पाहात गप्पा मारू शकतो. आम्ही तिकडे अमेरिकेत राहिलो म्हणून व्हच्र्युअली काय फरक पडणार आहे? त्यातून आम्ही दोघांनी ठरवलंय, दर सहा महिन्यांनी, जशी रजा मिळेल तसं एकानं तरी इकडे येऊन जायचं.. नेहालादेखील तिच्या आई-वडिलांना भेटता येईल. तुम्हाला वाटलं कधी तर तुम्हीही तिकडे येऊ  शकाल, ईशानला भेटता येईल. मला आजी-आजोबा जसे कायम लाभले.. त्याला निदान आजी- आजोबांची ओळख तरी राहील.. काही प्रॉब्लेमच नाही!’

तीन महिन्यांपूर्वी किरकोळ आजारांतच मनोहर गेला. त्याआधी दोनेक वर्षं निखिल- नेहा- ईशान यांच्याशी भेट नव्हती. निखिलला कळविल्यानंतर रजा- तिकीट वगैरे अडचणी पार करून इकडे पोहोचेपर्यंत तिसरा दिवस उजाडला. तोपर्यंत त्याच्या बाबांचं निर्जीव शरीर हॉस्पिटलच्या शवागारात इंजेक्शन्स देऊन टिकवून ठेवलं होतं. ते अडीच दिवस वाट बघणं, अंत पाहणारं होतं. निखिल आल्यावर सर्व विधी- सोपस्कार पार पडले. नेहाची डय़ुटी, ईशानची शाळा म्हणून दोघंही नंतर दहाव्याला आले.. तेव्हा ईशाननं आजोबांचा फोटो ओळखला! परत जाताना माझ्या खांद्यावर डोकं ठेवून निखिल हमसून रडला. मी त्याला थोपटलं, शांत केलं. बोलले काहीच नाही. न राहवून तोच म्हणाला,

‘आई, तू आता इथं एकटीच कशी राहणार? तिकडेच चल म्हटलं असतं पण..’

‘आलो होतोच ना आम्ही तिकडे.. राहून पाहिलं, पण नाही रे जमलं. इकडची नाळ नाही तुटत.. सगळ्यांना नाही रे जमत ते. अन् असं केव्हा तरी होणार होतंच ना, निखिल? मागं कोण राहणार एवढाच प्रश्न होता.. माझी मला सांभाळीन मी. नका तुम्ही कसली काळजी करू.’

‘आता इथंसुद्धा सगळ्या सोयी उपलब्ध आहेत आई. सीनिअर सिटिझन कण्डोमिनियम्स, सेकंड-इनिंग होम्स.. सगळ्या सोयी असतात तिथं. पास-टाइम क्लब्ज, डायनिंग फॅसिलिटीज, रेग्युलर मेडिकल चेकप्स.. अ‍ॅडव्हान्स अमाऊंट भरली की सगळे कम्फर्ट्स मिळतात. अगदी डॉलर्समध्येसुद्धा. मी पाठवत जाईन तिकडून..’

‘काय हरकत आहे, आई?’ नेहाचा प्रश्न.

मी नुसतीच हसले. नावं वेगळी, सगळे वृद्धाश्रमच.. अन् केवढय़ा तरी सुखसोयी.

‘हरकत कसली असणार गं? पण तिकडे रोज रोज तीच वृद्ध माणसं दिसणार. आजूबाजूला चिल्ली-पिल्ली नाहीत, तरुण मुलं-मुली नाहीत. उत्साह नाही, चिवचिवाट नाही. रोज त्याच संध्याछाया भिववीत राहणार.. त्यापेक्षा मी इथं माझ्या घरीच बरी आहे. शेजारीपाजारी जाग आहे, चाळीस र्वष जुने संबंध आहेत. नका तुम्ही माझी काळजी करू. तुमचं आयुष्य पडलंय पुढे.. मागं वळून पाहताना पुढचा रस्ता हरवायला नको.’

तिघं परत जाताना, ईशानचा हरवलेला चेहरा, त्याचं ‘आज्जी-आज्जी’ पुटपुटणं.. आत कुठं तरी तुटलंच! अन् आता आयुष्यात एकटय़ानंच उभं राहायचं आहे, एवढीच जाणीव उरली. त्याच क्षणी मला मनोहरचा ‘संध्याछाया’ पाहिल्यानंतरचा जुनाच प्रश्न आठवला, ‘वेगळा शेवट काय असू शकला असता, माधवी?’ आता उत्तरं शोधायची.

तशा आम्ही तिघी बहिणीच. थोरली वसुधा, मधली सुमती, नंतर मी. माहेर केव्हाच संपलेलं. दोन वर्षांपूर्वीच सुमती- सुमा- गेली. सुमाचा स्वभाव लहानपणापासून तापट. ‘मधली’ म्हणून आपल्याकडे कायम दुर्लक्ष होतंय, अन्याय होतोय अशी भावना. दोन्ही सुनांशी तिचं कधीच जमलं नाही. मुलं भांडून वेगळी राहू लागली. सुधीररावांच्या जीवघेण्या आजारानंतर सुमा एकटी पडली. एका रात्री झोपेतच गेली. शेजारपाजाऱ्यांना बारा तासांनी कळलं. दोन्ही मुलांना बोलावून घेतलं. तेरा दिवस संपायच्या आतच घराच्या नॉमिनेशनवरून, त्याच्या खरे- खोटेपणावरून दोघा भावांत वाद सुरू झाले ते आजतागायत चालूच आहेत.

थोरली वसुधा पुण्यात दिलेली. हळवी-सोशीक. तिला दोन मुलं, एक मुलगी. पेठेत मालकीचा वाडा. पण दोन्ही मुलं शहराबाहेर वेगवेगळी राहणारी. मुलीचं सासरही पुण्यातच. श्रीधरपंतांच्या पश्चात गेली तीन र्वष वसुधादेखील आता एकटी पडलेली. तिचा एकटेपणा तिच्या मुलांनी त्यांच्या परीनं सोडवला. थोरल्याचं म्हणणं, मीच का एकटय़ानं आईला सांभाळायचं? धाकटा वरचढ. म्हणाला, मी पण सांभाळीन, पण ताईनंही सांभाळलं पाहिजे.. तिला इस्टेटीत तिचा वाटा हवाय ना? मग तिची जबाबदारी नाही का आईला सांभाळायची ? .. थोडक्यात गेली. तीन र्वष वसुधाची त्रिस्थळी यात्रा चालू आहे.. चार महिने प्रत्येकाकडे. त्याच न्यायानं दोन्ही सुनांच्या आयादेखील जावयांकडे येऊन राहतात काही महिने. जशा इस्टेटीच्या वाटण्या तशा जिवंत माणसांच्या देखील वाटण्या.. नात्यागोत्यांच्या सगळ्या चिंधडय़ा!

सख्ख्या- रक्तांच्या नात्यांची अशी परवड झाल्यावर, शेजारपणाचं- सहवासाचं नातं टिकवायचं, एवढंच मग उरतं. माझी ‘वाटणी’ होण्याची भीती नाही. राहत्या घराचे नॉमिनेशनचे सर्व सोपस्कार पूर्ण करूनच गेलाय निखिल. त्यामुळे तो वितंडवाद आता नसेल. भविष्यात पुन्हा भारतात परत यावं लागलं, तर हक्काचं घर हवंच ना! ‘अमेरिकेत गव्हर्नमेंटची, आउट-सोर्सिगची पॉलिसी बदलली, स्थानिकांचा दबाव आला अन् सगळं सोडून यावं लागलं तर..’ मग या मातीची आठवण येणार. एरवी व्हिसा- ग्रीनकार्डसाठी सतत जिवाचा आटापिटा.. त्रिशंकू अवस्था. म्हणायला, क्वालिटी लाइफ अन् कम्फर्ट्स. त्यापुढे हक्काची माती, रक्ताची नाती.. सारंच मातीमोल.

मनोहरनं जाण्यापूर्वी दोघांचेही नेत्रदानाचे फॉम्र्स भरून दिले होते. मृत्यूनंतर इतरांना दृष्टी मिळण्यासाठी नेत्रदान. आकस्मिकपणे मनोहरच दृष्टिआड झाला. त्याही परिस्थितीत भान ठेवून दृष्टिदानाची इच्छा पूर्ण केली. पण औषधं टोचून देह टिकविण्याचे धिंडवडे मात्र चुकले नाहीत.. मग ‘देहदान’देखील केलं तर? या देहाचंदेखील कुणाला बंधन नको, क्रियाकर्मासाठी. कुणी तरी सातासमुद्रापलीकडून देहाग्नी देण्यासाठी येण्याची ‘निर्जीव’पणे वाटदेखील पाहायला नको! एरवीदेखील एकटय़ानं आयुष्य काढायची मनाची तयारी करतेच आहे. गेले तीन महिने.. निदान शरीरावर ताबा, मेंदूचं भान असेपर्यंत तरी. नंतरचं ईश्वर जाणे..! ‘नटसम्राट’ नाटकांत गणपतराव बेलवलकरांचं स्वगत आहे.. ‘शेक्सपिअर हा नुसता नाटककार नाही, सैतान आहे सैतान.. दु:खाची लागवड करणारा. ‘लिअर’चं काम करताना म्हाताऱ्यांचे भकास चेहरे मला दिसायचे. ते रडत नव्हते, रडत ती तरुण मंडळी. पण हे म्हातारे जागच्या जागी नुसते फुटत होते..’ लिअर तर राजा होता.. म्हणून दु:खं, व्यथा कशा चुकणार?

अशा वेळेस हातांतून वाळू निसटत जाताना असहायपणे बघत बसायचं नुसतं, एवढंच हाती उरतं मग.

‘संध्याछाया’चा शेवट निश्चितच वेगळा असू शकला असता.. प्रत्येक घरागणिक.. प्रत्येक व्यक्तीगणिक. एकटेपणाच्या यातना संपविणारा मूळ शेवट नाना-नानींसाठी तरी सुखदच म्हणावयास हवा, पण त्यांच्या मुलासाठी मात्र आयुष्यभर छळणारा.. मनाला कायम टोचणी लावणारा. तसं नं व्हावं.

आयुष्याच्या या नाटकात तर लेखक पडद्यामागे.. तोही अदृश्य! अन् शेवट तर आपल्याही हातांत नाही. जरी ‘संध्याछाया भिवविती हृदया..’ तरी आल्या दिवसाला हसत सामोरं जायचं.. एवढंच आपल्या हाती उरतं.
प्रभाकर बोकील – response.lokprabha@expressindia.com