तो अमेरिकेत जाऊ न आता आठ र्वष झाली. त्याच्या दृष्टीने तो आता चांगलाच स्थिरस्थावर झाला होता. आता त्याचा लग्न करायचा विचार पक्का झाला होता. त्याने त्याचा निर्णय आई-बाबांना सांगितला. त्याने स्वत:हून असं त्यांना सांगणं त्यांच्यासाठी खूप खास होतं. आई-बाबांनी तो येण्याआधी मुली बघण्याची जोरदार मोहीम सुरू केली होती.

तीन आठवडय़ांच्या सुट्टीमध्ये काय काय कसं कसं करायचं याचं प्लानिंग त्याने पक्कं केलं. शक्यतो लग्न करूनच पुन्हा अमेरिकेत जाण्याच्या तो विचारात होता. आई-बाबांनी बघितलेल्या मुलीचे फोटो त्याने ऑनलाइन बघितले होते, पण मुली प्रत्यक्ष बघण्यातच त्याला जास्त इंटरेस्ट होता. याआधी केलेल्या कांदेपोह्यंच्या कार्यक्रमाचा अनुभव त्याच्या गाठीशी होता, त्यामुळे त्याच्या दृष्टीने नो निश्चिंत होता. कारण असे कार्यक्रम पहिल्यांदा करताना काहीसं असणारं दडपण त्याच्या मनावर नसणार होतं.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच

एक मात्र होतं, या वेळेला त्याचा लग्नाचा विचार अगदी पक्का होता. याआधीच्या भारत भेटीमध्ये त्याने असे कार्यक्रम केले ते फक्त आई-बाबांचा मान राखण्यासाठी. ‘इथे आलोच आहे तर मुलगी बघायला काय हरकत आहे?’ म्हणून त्याने त्या कार्यक्रमांना होकार दिला होता. कारण ‘नकार’ देण्याचा पर्याय त्याच्याकडे केव्हाही उपलब्ध होता. काही आई-बाबांनी काही नातेवाईकांसाठी असे कार्यक्रम केले. नाही म्हटलं तरी एक सात-आठ असे कार्यक्रम त्याने केले होते. पण आता तो जरा या सगळ्याकडे गंभीरपणे  बघायला लागला.

तो ज्या दिवशी भारतात आला त्या दिवसापासूनच त्याने मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. मुली आई-बाबांनी आधी बघितल्या होत्याच आणि त्यांच्याबद्दल इत्थंभूूत  माहिती आई-बाबांकडून त्याला मिळाली होती. त्यामुळे या सगळ्यावर ‘एक नजर’ टाकायचं महत्त्वाचं काम त्याला आता करायचं होतं.

दोन दिवसांत चार-पाच मुली बघितल्यावर त्याला त्यातली एक त्याच्या योग्यतेची वाटली. पहिल्या भेटीनंतर पुन्हा भेटावं असं वाटणारी ‘ती’ होती. तो तिला पुन्हा भेटायला खूप उत्सुक होता.

तो आणि ती एका कॉफी शॉपमध्ये भेटले, बोलायला सुरुवात त्यानेच केली. ‘पहिल्या भेटीनंतर असं दुसऱ्यांदा भेटायला येण्याचा हा पहिलाच प्रसंग.’ तो काहीसा खूश होऊन बोलत होता.

‘म्हणजे याआधी बघितलेल्या सगळ्या मुलींना एका भेटीतच नाही सांगितलंस?’ तिने जरा आश्चर्यचकित होऊन विचारलं.

‘हो’ तो हसत बोलला. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणात बदलले.

‘काय झालं ?’ त्याने विचारलं.

‘काही नाही.’ शक्य तितक्या शांतपणे ती म्हणाली.

तो पुन्हा एकदा त्याच्या भविष्याबद्दल तिच्याबरोबर चर्चा करू लागला. जसजसं त्याचं बोलणं वाढत जात होतं तशी ती त्याला त्याच्या योग्यतेची वाटत होती. पण तिच्या मनाचा अंदाज त्याला काही बांधता येत नव्हता. निघता निघता तो तिला म्हणाला, ‘तुझा ‘होकार’ लवकर कळव.’

तिला आता त्याचं असं विचारणं मुळीच ‘वेगळं’ वाटलं नाही. ती अगदी सहज बोलली, ‘आणि मी नाही म्हटलं तर?’

आता मात्र त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला, तो अस्वस्थ होऊन बोलला, ‘माझ्यात काय कमी आहे?’

‘मी कधी म्हणाले, तुझ्यात काही कमी आहे?’ ती म्हणाली.

तो आणखीन अस्वस्थ झाला आणि म्हणाला, ‘मग मला नाही म्हणायचं कारण काय?’

ती हसली आणि म्हणाली, ‘एक प्रश्न विचारू का?’

आता तो गोंधळून गेला आणि म्हणाला, ‘विचार.’

‘तू नाकारलेल्या प्रत्येक मुलीला कारण दिलं होतंस का?’ तिच्या अशा विचारण्याने त्याला राग आला.

तो काही बोलण्याआधीच ती म्हणाली, ‘माझ्या एका नकारामुळे अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? खरं तर अस्वस्थ मला व्हायला हवं. मी तुला नकार देतेय. इथून गेल्यावर मला, मी वेल सेटल मुलाला नकार का दिला, ह्यचं उत्तर मला द्यावं लागेल. घरचे माझं मत मान्य करतीलही, पण आजूबाजूच्या लोकांना चर्चेला एक विषय मिळेल. मी अमेरिकेत वेल सेट असलेल्या मुलाला नकार का दिला हा त्यांना एक मोठा प्रश्न पडेल. त्याची पर्वा करणाऱ्यातली मी नाही, पण आपल्या इथे काय घडतं याची थोडीसुद्धा कल्पना तुला नसेल.

मुलाने दहा मुलींना नकार दिला तरी चालतं, पण मुलीने एकाला नकार दिला तर खूप फरक पडतो. मुलीकडची बाजू, मुलाकडची बाजू असा विचार केला जातो आणि  आजही आपल्या समाजात काही ठिकाणी  मुलीने नकार देणं हे असंस्कृतपणाचं लक्षण समजलं जातं.’

आता ‘नकार’ स्वीकारण्यापलीकडे त्याच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता.
दीप्ती वारंगे – response.lokprabha@expressindia.com