तब्बल नऊ हजार किलोमीटर्सच्या पंधरा दिवसांच्या ट्रान्स सैबेरियन रेल्वे प्रवासाचे स्वप्नवत अनुभव..

‘ट्रान्स सैबेरियन’ रेल्वे प्रवास हा जगातला सर्वात मोठा म्हणजे तब्बल नऊ हजार किलोमीटर्सचा रेल्वे प्रवास. तो करण्यासाठी २०१५ च्या जुलै महिन्यात १६ तारखेला मुंबई-दिल्ली-मॉस्को असा विमान प्रवास करत सकाळी मॉस्कोला पोहोचलो. आमच्या ग्रुपपैकी आम्ही सहा जणच १६ जुलैला आलो. आधी रशिया सफर करण्यासाठी काही मंडळी दहा जुलैलाच आली होती. जेवण करून स्थलदर्शनासाठी निघालो. ‘लाल’ चौकात आलो. दिल्लीच्या पालिका बझारसारखा इथे जमिनीखाली ‘मॉल’ आहे. जुन्या इमारती, घुमटाकार आकार असलेली रशियन चर्चेस् तसेच अनेक दुकाने होती. पाच वाजेपर्यंत भटकून परत आलो. आमची ‘कझान’ला जाणाऱ्या गाडीची वेळ रात्री दहा ऐवजी संध्याकाळी ७.१० झाली होती. त्यामुळे हॉटेलवरून सामान घेऊन स्टेशनला पोहोचलो.

ट्रान्स सैबेरियन रेल्वेचे हे मॉस्को स्टेशन जुन्या रशियन बांधणीचे आहे. तिथे डब्याच्या बाहेर एका रांगेत सर्वाना उभे करून, प्रत्येकाचे तिकीट, पासपोर्टची तपासणी काटेकोरपणे करून आत सोडले जात होते. हे डबे प्लॅटफॉर्मपासून खूप उंच असतात. आणि डबा आणि प्लॅटफॉर्ममध्ये खूप मोठं अंतर असतं. त्यामुळे सामान चढवणं त्रासदायक होतं, पण वाहक मदत करतात. गाडीत स्थिरस्थावर झालो. सर्व गाडय़ा ‘मॉस्को’ स्थानिक वेळेनुसार धावतात. वेळापत्रक मॉस्को वेळेप्रमाणे असले तरी स्थानिक वेळही दाखवली जाते. गाडीने वेळेवर मॉस्कोहून प्रस्थान ठेवले आणि आमचा ट्रान्स सैबेरियन रेल्वे प्रवास सुरू झाला. आम्हाला निघतानाच मॉस्कोहून ‘पॅक्ड डीनर’ दिलं होतं.  एक सँडविच, फळांचे तुकडे आणि एक फ्रुटीसारखे पेय; शिवाय बरोबर इतर खाद्यपदार्थ भरपूर होतेच. १५ दिवसांचा शिधा! आमच्या चमूचा प्रमुख सुनील उगलमुगळे होता, शिवाय दोन स्थानिक मुली होत्या. एक रशियन, एक टार्टारियन- कझानची. ती चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकत होती. तिने आमच्यासाठी ‘दुभाषी म्हणून काम केले अन् आम्हाला वाहकाशी चांगला संवाद साधता आला. आधुनिक ‘टय़ुबलर’ पद्धतीचे डबे, विद्युत रेल्वे आणि चांगला रेल्वेमार्ग यामुळे प्रवास सुखकर झाला. इकडे उन्हाळा सुरू झाल्याने रात्र लहान दिवस मोठा! तीन-साडेतीनला पहाटेच उजाडते. मध्येच जाग आली आणि बाहेरचा उजेड पाहून सकाळ होऊन बराच वेळ झाला आणि उठायला उशीर झाला असे वाटले, पण बाकी इतर झोपलेले. घडय़ाळात ३.४० झाले होते. नंतर एका स्टेशनवर गाडी थांबल्याचे लक्षात आले. समोर एक गाडी उभी होती. प्लॅटफॉर्मवर लोक येरझरा घालत होते. मात्र स्टेशनवर शांतता होती. फोटो काढण्यासाठी दरवाजाजवळ गेलो तर आमच्या ‘कंडक्टर’ बाबाने नाही म्हणून सांगितलं. गाडी सुटण्याची  वेळ झाली होती, म्हणून कसेबसे दारातूनच स्टेशनबाहेर प्लॅटफॉर्मचे फोटो काढले. बाकी प्रवासी साखर झोपेत असल्याने शांतपणे प्रातर्विधी आटोपून कपडे बदलून तयार होऊन बसलो. बरोबर आठ-दहा मिनिटांनी (८०८ कि.मी.) ‘कझान’ आले. स्वागताला आमची स्थानिक गाईड ‘ल्युबा’ आपल्या दोन-तीन वर्षांच्या मुलीसह हजर होती! हा प्रवास तेरा तासांचा होता ८०८ किमीचा!

‘कझान’ हे रशियामधील लोकसंख्येनुसार (११,४३,५३५) आठवे मोठे शहर. ‘टाटारस्टान’ या विभागाची राजधानी. व्होल्गा आणि कझांका या दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे. लोकसंख्या प्रामुख्याने मुस्लीम आणि ख्रिश्चन आहे. २००९मध्ये ‘स्पोर्ट्स कॅपिटल ऑफ रशिया’ म्हणून त्याची निवड झाली आहे. अनेक स्पर्धा इथे घेतल्या गेल्या आहेत. २०१८ च्या फिफा वर्ल्डकपचे यजमानपद कझान भूषवणार आहे. सोवियत युनियनच्या विसर्जनानंतर कझान ‘टार्टार’ संस्कृतीचे प्रतीक आणि केंद्र बनले. येथील ‘कझान क्रेमलीन’ची (किल्ला) २००५मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये नोंद केली. २००० सालापासून कझानमध्ये खूप बदल झाले. जुन्या ऐतिहासिक वसाहती संपूर्ण पाडून नवीन इमारती बांधल्या. आधुनिक विमानतळ, रस्ते, दळणवळणाच्या ‘मेट्रो’सारख्या सोयी केल्या. कझान रशियातील एक मोठे औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक केंद्र आहे. भारतामध्ील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इथे येतात. मेकॅनिकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री प्रमुख आहेत. पूर्व युरोपमधील एक मोठे ‘सायन्स पार्क’ म्हणून ओळख! हे ट्रान्स सैबेरियन रेल्वेवरील एक प्रमुख स्टेशन आहे. इथे १९ प्लॅटफॉर्मवरून ३६ गाडय़ा निरनिराळ्या ठिकाणी जा-ये करतात. कझानमध्ये विमाननिर्मितीचे कारखाने आहेत. इल्युशीन, सुपरसॉनिक बॉम्बर, ‘ब्लॅकजॅक’ टॅक्टिक बॉम्बरची निर्मिती इथे केली जाते. प्रामुख्याने ‘टार्टर’, ‘रशियन’ भाषा बोलल्या जातात. जानेवारी सर्वात थंड (-७.८), तर जुलै सर्वात गरम (२५.९) मानला जातो.

आज १७ जुलै २०१५. आज ‘रमजान’ची सुट्टी असल्याने, मूळ स्थलदर्शन कार्यक्रमात बदल केला होता. हॉटेलमध्ये ‘कॉन्टिनेंटल’ नाश्ता करुन बाहेर पडलो, तर दूरवर एक मोठं कारंजं दिसत होतं. आमची प्रथम भेट होती ती ३० कि.मी. दूरवर असलेल्या ‘रैफा मोन्यास्ट्री’ला. वाटेत एका ठिकाणी रस्त्याला लागूनच एक ‘सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ’ होतं. एका आर्किटेक्टने त्याच्या कल्पनाशक्तीने एकाच इमारतीत सर्व धर्माचे मंदिर बांधले होते. मूळ बांधणी रशियन पद्धतीची. १६ मिनारावर गोल घुमट आणि टोकावर निरनिराळ्या धर्माचे प्रतीक. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धमूर्ती सर्व एका ठिकाणी. अत्यंत कलात्मक रंगसंगतीने सजावट! प्रवेशद्वाराची कमानही उत्कृष्ट रंगसंगतीने सजवलेली! रस्त्याच्या एका बाजूला व्होल्गा नदीचे विस्तृत पात्र. दुसऱ्या बाजूला हे मंदिर. पलीकडे रेल्वेमार्ग! रैफा मोन्यास्ट्रीकडे जाणारा रस्ता अरुंद आणि खेडय़ांतून गेलेला. कझानपासून ३० कि.मी.वर रैफा मोनास्ट्री आहे. व्होल्गाकामा नॅशनल पार्कमध्ये एका विस्तीर्ण तलावाकाठी रशियामधील सतराव्या शतकाचा स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. सभोवती पाईन वृक्षाचे दाट जंगल आहे. येथील इमारतींची बांधणी रशियन पद्धतीची, पांढऱ्या रंगाच्या मशिदीसारख्या दिसणाऱ्या, वर घुमटाकार सोन्याचे कळस असलेल्या आणि आत मात्र ख्रिश्चन धर्मस्थळे. येशूच्या फोटोला सोन्याच्या महिरपी, बाहेरून पांढऱ्या पण आतमध्ये सोन्याचा चकचकाट असा विरोधाभास! आणि येथील मुख्य पुजाऱ्याला म्हणायचे ‘माँक’! कुटुंबातील प्रिय व्यक्ती, मित्र-मैत्रिणी आप्त यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निरनिराळी श्रद्धास्थाने आणि असंख्य मेणबत्त्या लावलेल्या! गूढ गंभीर वातावरण. प्रचंड शांतता! इथे एक पवित्र पाण्याचा नळ आहे- ‘जॉर्जियन मदर ऑफ गॉड’ – ज्याच्या प्राशनाने आरोग्य लाभते म्हणे! अनेक लोक बाटल्या, कॅन भरभरून नेत होते! मला गंगोत्री आणि मानसरोवरच्या पवित्र पाण्याची आठवण झाली.

सफरचंदाची अनेक झाडे होती त्याला लहान लहान हिरवी तांबडी सफरचंदे लागली होती.  आमचे दुपारचे जेवण भारतीय रेस्टॉरंटमध्ये होते! जेवण करून हॉटेल मुक्कामी आलो. कबान सरोवराच्या काठावर एका जुन्या ऐतिहासिक इमारतीत बदल करून त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये केले होते! जुनी इमारत असल्याने लिफ्ट नव्हती आणि आमची खोली तिसऱ्या मजल्यावर, जिना चढणे उतरणे त्रासदायक होते. नाव होते ‘तामस्काया उसडाबा’! संध्याकाळी प्रथम सेंट पीटर अँड पॉल कॅथड्रलला भेट दिली. १७२२ मध्ये रशियाच्या झार पीटर पहिला याच्या नावे हे जुने आथरेडॉक्स चर्च बांधले. येथे वर चढून जावे लागते. बदामी रंगाच्या भिंतीवर खिडक्यांना निळ्या रंगाची नक्षी केली आहे. येथून कझान शहर आणि कझांकर नदीचा नजारा पाहता येतो. तिथून आम्ही ‘बौ मॉन स्ट्रीट’वर आलो. हा रस्ता क्रेमलीनच्या भिंतीपासून सुरू होऊन शहराच्या मध्यभागी ‘टुके’ चौकात येतो. या रस्त्यावर असंख्य दुकाने, हॉटेल्स आणि बार तसेच करमणुकीची ठिकाणे आहेत. या संपूर्ण रस्त्यावर वाहनांना संपूर्ण बंदी आहे, पायी चालत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मनपसंत ‘विंडो शॉपिंग’ करत जाता येते. १९३० मध्ये निकोलाय बौमान या रशियन क्रांतिकारकाचे नाव या रस्त्याला दिले आहे. १५ व्या शतकापासून हा रस्ता व्यापार केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील दुकाने लहानमोठय़ा भेटवस्तूंनी गच्च भरलेली असून रास्त किंमतीमध्ये खरेदी करता येते. तिथून आम्ही सिटी पार्कमध्ये ‘कबाना’ कारंजाच्या काठावर आलो. अत्यंत विलोभनीय दृश्य होते. ‘बुलक’ कालव्याच्या एका बाजूला जुने कलोनियल इमारती असलेले कझान आणि दुसऱ्या काठावर आधुनिक कझान. या तलावात हे उंच उडणारे कारंजे आहे. तसेच पार्कमध्येपण अनेक कारंजी आहेत. कारंजाच्या पाश्र्वभूमीवर एक फोटो सेशन झाले. आजच्या दिवसाचा कार्यक्रम संपवून हॉटेलवर परत आलो.

आज १८ जुलै २०१५. आज आम्ही ‘जुने टार्टर खेडे’, लहान मुलांकरिता असलेले ‘पपेट थिएटर’ आणि ‘कझान क्रेमलीन’ला भेट देणार होतो. सैबेरियामध्ये सुचीपर्णी वृक्षांचे प्रचंड जंगल (तैगा) होते. आणि ‘टार्टर’ जमातीचे लोक लाकडांच्या ओंडक्यांची घरे बांधत असत आणि खिडक्यांच्या भोवती, कोरीव लाकडांच्या महिरपी हे खास वैशिष्टय़! अशा एका खेडय़ाची प्रतिकृती करून ठेवली आहे. आत सुंदर बाग असून अनेक रंगांची फुले बहरली होती. बागेचे कट्टे फरशीचे तुकडे एकमेकांवर रचून केलेले. तसेच प्रत्येक घरासमोर असेच फरशीच्या तुकडय़ांचे देऊळ तुळशी वृंदावनसारखे! कॅनडामध्ये आदिवासी लोकांनी असे दगडावर दगड ठेवून रस्त्यावर खुणेची ठिकाणे केली आहेत त्याची आठवण झाली. पुढे रस्त्यात थांबून लहान मुलांसाठी असलेल्या भव्य ‘पपेट थिएटर’चे फोटो काढून आम्ही कझान क्रेमलीनकडे निघालो, कझान शहराच्या मध्यभागी हा भव्य किल्ला बांधला आहे. ‘टार्टरस्टान’ची ऐतिहासिक भव्य वास्तू ‘इव्हान द टेरिबल’ याच्या आग्रहास्तव पूर्वीच्या कझान खानच्या कॅसलच्या जागेवर (१०-१६ व्या शतकात) बांधली. २००० साली हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले! या किल्ल्याच्या भव्य परिसरात शासकीय इमारती आणि क्वोल शरीफ मशीद,  सुयुम्बिका टॉवर, सिक्रेट टॉवर, अ‍ॅननसिएशन कॅथ्रेडल अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत.

‘क्वोल शरीफ मशीद’ ही स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. मशीद बाहेरून पांढऱ्या आणि निळ्या रंगाने रंगवली आहे. मला इस्तंबूलमधील ‘ब्लू मॉस्क’ची आठवण झाली. रशिया आणि युरोपमधील भव्य मोठय़ा मशिदीपैकी एक १६ व्या शतकात बांधली. ‘क्वोल शरीफ’ नावाच्या इस्लामिक गुरूवरून नाव दिले.

तो आणि त्याच्या असंख्य शिष्यांची १५५२ मध्ये इव्हान द टेरिबलने हत्या केली. १९९६ साली पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली आणि २४ जुलै २००५ मध्ये उद्घाटन होऊन सर्वासाठी खुली झाली. एका वेळी ६००० व्यक्ती इथे प्रार्थना करू शकतात. एक भव्य घुमट आणि आठ मिनार अशी रचना आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित! या इमारतीचे नकाशे किंवा कुठलेही दस्तऐवज नसताना केवळ अचाट कल्पनाशक्तीच्या बळावर आर्किटेक्टने ही इमारत बांधली. मशिदीमध्ये प्रवेश करताना पादत्राणे काढून पायावर प्लास्टिकच्या मोज्याचे आवरण चढवून आत जाता येते. तळमजल्यावर मशिदीची काचेची प्रतिकृती आहे. त्यात आतून व बाहेरून दिव्यांची सजावट आहे. आलटूनपालटून दिवे लागतात. खूपच रम्य दृश्य आहे. दरवाजांची सजावट रंगीत काचांनी मढवली आहे. पहिल्या मजल्यावर गेल्यावर घुमटाच्या मध्यभागी काचेचे भव्य झुंबर आहे. त्यात निळ्या रंगाच्या अनेक छटांचा वापर करण्यात आला आहे, तसेच आजूबाजूच्या खिडक्यांची तावदानेपण सजवली आहेत. अंतर्भागात प्रचंड शांतता पाळली जाते! ‘अ‍ॅननसिएशन कॅथ्रेडल स्वुयाम्बिका’ टॉवर पाहून पुढे निघालो. या भागातून व्होल्गा नदीचा आणि कझान शहराचा विहंगम नजारा बघता येतो. चालत चालत सिक्रेट टॉवरमधून बाहेर पडलो. या कमानीमध्ये म्हणे एक भुयारी रस्ता आहे. त्या रस्त्याने गुप्त रीतीने बाहेर पडता येते, पण आम्ही गेटमधून बाहेर पडलो. बाहेर हिरवळीवर अनेक नवविवाहितांचे ‘फोटो सेशन’ चालू होते. आम्हाला दुपारचे जेवण करून लगेच स्टेशनवर जाऊन ‘एकतारीनबर्ग’ला जाणारी गाडी पकडायची होती. जेवण करून स्टेशनवर सामान ओढत आलो. तर कळलं की जिना चढून पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जायचे होते. सामान जिन्यावर ओढून न्यायचे या कल्पनेने भरल्यापोटी गोळा आला. पण कळलं की एका टोकाला लिफ्ट आहे, पण लिफ्टपर्यंत सामान ओढणे हेही एक दिव्यच होते! हे दिव्य पार पाडून गाडीपाशी आलो तर भारतीय रेल्वेलाही लाजवेल असा गोंधळ पुढे वाढून ठेवला होता. स्टेशनवर येताना सुनीलने आम्हाला आमचे सीट नंबर दिले होते अणि आम्ही सर्वजण एकाच डब्यात असायला हवे होतो, पण डब्याजवळ आल्यावर प्रत्यक्षात तिसऱ्या, चौथ्या डब्यात विभागले गेलो होतो. तिकिटावर मात्र एकच डबा होता. अन् चार्टवर निराळे! सीट नंबरप्रमाणे तीन नंबरमध्ये गेलो तर ‘कंडक्टर’ बसू देईना! चार नंबरवाली सर्वाना बसू देईना, गाडी सुटेपर्यंत गोंधळ चालू होता. शेवटी कसेबसे गाडीत चढलो. नंतर सुनीलचा एक तास व्यवस्था लावण्यात गेला! आज तिकिटामध्ये जेवण अंतर्भूत होतं. एक सूप, भात सर्वासाठी, शाकाहारींसाठी घोसावळ्याचे तुकडे किंवा स्पॅगेटी, मांसाहारासाठी चिकन किंवा माशाचा तुकडा. सूप छान होतं. भारतातून बरोबर नेलेले मिरचीचे लोणचे किंवा शेझवान चटणी घालून ‘चव’ आणली. गाडी बरोबर ३.४५ ला सुटली आणि सकाळी बरोबर ८.१० ला एकतारीनबर्गला आलो. कझान ते एकतारीनबर्ग हा प्रवास ९४१ कि.मी.चा होता, त्याला सोळा तास लागले. मॉस्को-कझान प्रवास अगदी सुखकर, आरामशीर तर हा अगदी उलट. गाडी भरपूर हलत होती. भरपूर खडखडाट होता. थांबताना- धक्के, सुरू होताना हिसके, गचके, अगदी आपल्या भारतीय रेल्वेपेक्षाही भेसूर, पण तरीही वक्तशीर हे मात्र नक्की!

आज १९ जुलै २०१५. एकतारीनबर्गला सकाळी आलो. स्टेशन पहिल्या मजल्याइतक्या उंचीवर, पायऱ्या उतरून बस उभी होती, तिथपर्यंत सामान ओढून नेणं हे एक दिव्य होतं! सुदैवाने हमाल होते म्हणून सुनीलने ‘हमाल’ केले, फक्त मोठय़ा बॅगेसाठी! १०० रुबल (जवळजवळ रु. १००) एका बॅगसाठी हमाली, पण इलाज नव्हता! हातातल्या लहान बॅगा घेऊन जिना उतरणंही त्रासदायक होतं, पण ते जमवलं आणि बसपर्यंत पोहोचलो.

अशी झाली तयारी…

पुण्याची एक ‘वायुदूत’ नावाची प्रवासी संस्था  १५ जुलै ते १ ऑगस्ट १५ अशी १५ दिवसांची ट्रान्ससैबेरियन रेल्वेची एक सहल आयोजित करणार असल्याची माहिती मिळाली. ती मॉस्कोहून सुरू होऊन, कझान, एकतारीनबर्ग, लिस्ट ग्यांका, इर्कुत्सक, उलानउडे व उलान बटार अशा सैबेरिया आणि मंगोलियातील प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन, आशियामधील सर्वात मोठय़ा ‘गोबीच्या’ वाळवंटामधून जाऊन चीनच्या राजधानीत- बीजिंगमध्ये संपणार होती. संपूर्ण दैनंदिनी मिळताच लक्षात आले की, थोडा प्रवास, मग मध्ये एक-दोन दिवस हॉटेलमध्ये मुक्काम, स्थळदर्शन, मग परत प्रवास असा सहलीचा कार्यक्रम होता.

१८ व्या शतकापर्यंत या भागांत दळणवळणासाठी घोडागाडी, तसेच नदीमधून वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या बोटीमधून होत असे. सहा महिने नद्या पूर्ण गोठत असल्याने जलवाहतूक सहा महिनेच होई. १८५१ मध्ये सेंट पिटर्सबर्ग ते मॉस्को हा रेल्वे मार्ग झाला आणि सैबेरियन गव्हर्नरने सैबेरियन रेल्वेचा प्रस्ताव विचारात घेऊन सर्वेक्षण सुरू केले. पण लालफीत आणि निष्काळजीपणामुळे काहीच प्रगती झाली नाही. मात्र १८९० मध्ये अति पूर्वेकडील ‘व्हॅलिडो व्होस्टॉक’ येथे ‘झार निकोलस दुसरा’ याच्या हस्ते, सैबेरियन रेल्वेच्या कामाचा शुभारंभ झाला. १८९१ मध्ये, रशियातील टोकांकडून सुरुवात झाली आणि मध्यापर्यंत, व्हॅलिडो व्होस्टॉक ते व्होस्क अशी ‘असुरी’ रेल्वे सुरू झाली. १८९० मध्ये ‘उरल’ नदीवर पूल बांधला आणि रेल्वेचा आशियात प्रवेश झाला. १८९८ मध्ये ‘ओब’ नदीवर पूल बांधला आणि ‘इर्कुत्सक’पर्यंत पहिली रेल्वे धावली. रशियन सैनिक व कैद्यांनी हे काम केले!

१९०४ पर्यंत ‘बैकाल’ नावाचे प्रचंड सरोवर एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत (६०० कि.मी.) ओलांडण्यासाठी ‘फेरी बोटींचा’ वापर करीत. या प्रवासाला चार तास लागत. ‘एस. एस. बैकाल’ आणि ‘एस. एस. अंगारा’ अशा दोन वाफेवर चालणाऱ्या बोटींचा वापर केला जाई. इंग्लंडमधून या बोटींचे सुटे भाग आयात करून, ‘लिस्ट व्यांका’ येथील गोदीमध्ये परत बांधल्या. मात्र वाफेची इंजिने आणि इतर साहित्य सेंट पिटर्सबर्गकडून आणले होते. एका फेरीत एक रेल्वे इंजिन व चोवीस डबे वाहून नेले जात. १९१६ पर्यंत या बेटी कार्यरत होत्या. १९०४ मध्ये ‘बैकाल’ सरोवराच्या काठाकाठाने रेल्वे मार्ग, डोंगरातून कडेकपारीतून बांधला. घाटांत दरडी कोसळत तेव्हा आपत्कालीन स्थितीमध्ये या बोटींचा वापर करत. प्रचंड थंडीमुळे सरोवर गोठले जाई तेव्हा प्रवासी आणि सामान ‘स्लेज’ (बर्फावरील सरकती गाडी) वरून नेले जाई. १९१६ मध्ये ‘असुर’ रेल्वे मार्ग बांधून झाला व ‘पेट्रोग्राड’ ते व्हॅला डिन्होस्टॉक’ असा जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग बांधून झाला. १९२९ मध्ये या मार्गाचे विद्युतीकरण सुरू झाले आणि २००० मध्ये पूर्ण झाले. या रेल्वेमुळे प्रवासी, माल वाहतूक वाढून या भागांचा विकास झाला.

मॉस्कोहून निरनिराळ्या वेळेला, निरनिराळ्या शहरांसाठी गाडय़ा सुटतात. एका गाडीला दहा ते बारा डबे असतात. पहिल्या व दुसऱ्या वर्गाची सोय असते. एका डब्यात एका बाजूला आठ ते दहा शयन कक्ष (केबिन्स) असतात. पहिल्या वर्गात दोन प्रवाशांची झोपण्याची सोय असते, तर दुसऱ्या वर्गात चार प्रवाशांची सोय असते. सामान सुरक्षित ठेवण्यासाठी खालच्या झोपण्याच्या जागेखाली एक पेटीसारखी सुरक्षित जागा तसेच मोकळी जागा असते, तसेच दरवाजाच्या वर पोकळीतपण जादा जागा असते. शिवाय एक घडीचे टेबल, टी. व्ही, इ. अनेक सोयी असतात. डब्याच्या दाराजवळ दोन्ही बाजूला एकेक स्वच्छतागृह असते, तसेच वाहकाच्या कक्षासमोर चोवीस तास उकळते पाणी मिळण्याची सोय असते. प्रवासी स्वत:चा चहा, कॉफी, सूप केव्हाही करून घेऊ शकतात. प्रत्येक डब्यात एक पुरुष वाहक किंवा स्त्री वाहक (कंडक्टर) असतो. प्रत्येक प्रवाशाला परिटघडीचे अंथरूण, उशीचा आभ्रा, टॉवेल पुरवला जातो. काही तिकिटांच्या किमतीमध्ये, सकाळचा नाश्ता, जेवण अंतर्भूत असते. प्रवासादरम्यान, मोठय़ा स्टेशनवर गाडी तीस- चाळीस मिनिटे थांबते तेव्हाच दरवाजे उघडले जाऊन प्रवाशांना स्टेशनावर उतरून पाय मोकळे करता येतात. अशा वेळी गाडी थांबण्यापूर्वी पंधरा मिनिटे व सुटल्यावर पंधरा मिनिटे वाहक स्वच्छतागृहे कुलूपबंद करतो. अशा मोठय़ा स्टेशनवर खाद्यपदार्थ, शीतपेये, आइस्क्रीम, इ. मिळण्याची सोय असते. एक रुबल अंदाजे एक रुपया असतो. गाडीमध्ये भोजनकक्ष व बार असतो.

पंधरा दिवसांच्या या प्रवासात सात/ आठ दिवस गाडीत व सात/ आठ दिवस हॉटेलमध्ये जाणार होते. तसेच सर्वसाधारणपणे परदेशात शाकाहारी भोजनाची व्यवस्था यथातथाच असते. मॉस्को ते बीजिंग प्रवासात सर्वसाधारण हवामान समशीतोष्ण असणार होते तरी अचानक पाऊस किंवा रात्री थंडी असण्याची शक्यता होती, त्या दृष्टीने कपडय़ांची निवड करायची होती, आणि खानपान सोयही!

विमान प्रवासात बॅगमध्ये सामान किती वजनाचे नेता येईल याची माहिती घेऊन कपडय़ांची निवड करा. या प्रवासात दोन जीन्स पँट्स, चार-पाच टीशर्ट- चटकन वाळणाऱ्या कापडाचे, एक-दोन फुल शर्ट, सहा-सात सुती अंत:र्वस्त्राचे जोड, तसेच ऊन, पाऊस, थंडी यापासून संरक्षण देणारे ‘विंडचीटर’ जरूर ठेवावे. एक टॉर्च, तसेच वापरून रुळलेले बूट (हं’‘्रल्लॠ २ँी२), सपाता, जरूर असल्यास पोहण्याचे कपडे ठेवावेत. गरम पाण्यात घातल्यावर तयार होणारे (इन्स्टन्ट फूम्ड) पोहे, सांजा, शिरा, उपमा पाकिटे, सूप व चहा कॉफीची पाकिटे, तयार चटण्या, लोणची पूर्ण बंद पाकिटे आणि पाण्यासाठी एक बाटली जरूर ठेवावी. स्वत:ला लागणारी औषधे (थोडी जास्त) डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह ठेवावे. कॅमेरा, जादा बॅटरी, चार्जर तसेच विजेचा युनिव्हर्सल अ‍ॅडाप्टर  इत्यादी जवळ ठेवावे. हातात जवळ ठेवायच्या लहान बॅगेत एक कपडय़ाचा जोड बदलण्यासाठी ठेवावा.

(क्रमश:)
डॉ. रमेश करकरे

response.lokprabha@expressindia.com