चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावरील ‘चिन्ह’च्या ‘गायतोंडे’ या ग्रंथाचे येत्या ३० जानेवारी रोजी दक्षिण मुंबईत प्रकाशन होत आहे. गायतोंडे यांचं चित्रकार म्हणून असलेलं मोठेपण सहज आणि तितक्याच दमदारपणे अधोरेखित करणारी पुस्तकाची प्रस्तावना-

गायतोंडे यांची आठवण झाली की मनात संवेदनशील मौन जागं होतं. त्यांच्याविषयी मी पहिल्यांदा ऐकलं ते गुरुवर्य प्रा. शंकर पळशीकर यांच्याकडून. ते स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना गायतोंडे, पै आणि पळशीकर असं मैत्रीचं त्रिकूट होतं. तिघंही मूलत: गंभीर प्रकृतीचे, त्यापैकी डिप्लोमानंतर लक्ष्मण पै लंडनला गेले आणि गायतोंडे-पळशीकर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. गायतोंडय़ांना लवकरच कळून चुकलं की ते काही शिक्षक नव्हेत आणि त्यांनी त्याक्षणीच जे.जे.ला रामराम ठोकला. पळशीकर मात्र कला शिक्षणात रुजले, वाढले आणि एक निष्णात शिक्षक, सडेतोड उपदेशक आणि द्रष्टे मार्गदर्शक म्हणून नावारूपाला आले. गायतोंडेसारख्या सहाध्यायापासून नंतरच्या अनेक पिढय़ा त्यांना गुरुस्थानी मानत आल्या ते त्यामुळेच.

आज जगाला माहीत असलेले गायतोंडे गंभीर स्वभावाचे आहेत, परंतु विद्यार्थी दशेत किंवा त्यानंतरच्या उमेदवारीच्या काळात ते असे नव्हते. चारचौघांसारखे हसतखेळत वावरणारे, आवडीने विनोद करणारे आणि इतरांनी केलेल्या विनोदात आनंद शोधणारे होते. माझी त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा ते मौनाच्या प्रवासात खूप दूरवर पोहोचले होते. तत्पूर्वीच्या काळात चित्रकलेच्या व्यासंगातील गांभीर्याने, त्यातील कूट प्रश्नांनी आणि सभोवतालच्या कलाजगतातील विभ्रमाने उत्तरोत्तर चिंतनशील होत गेले. चिंतनाचं मौनाशी असलेलं पिढीजात नातं त्यांनी ओळखलं आणि तिथून पुढे ते आजच्या गायतोंडय़ांपर्यंत आले. त्यांच्या गांभीर्यावर उदासीपणाची सावली नव्हती, तरी त्यात आत्मज्ञानाची समतानता होती. त्यांनी डिप्लोमा घेऊन कलाप्रांतात प्रवेश केला तेव्हा चित्रकलेचं स्वरूप विकासाच्या वाटा शोधत होतं.

प्रोग्रेसिव्ह चित्रकारांनी (सूज्ञा, रझा, आरा, गाडे, बाकरे आणि हुसेन) पूर्ण विचारांती केलेल्या सांस्कृतिक बंडामुळे कासव गतीने सुरू असलेल्या विकासाला पंख फुटून कला स्थित्यंतराचा वेग वाढला. लेडन, श्लेशिंजर आणि चित्रकार लँग हॅमर ह्य भारतात वास्तव्य करणाऱ्या त्यावेळच्या पाश्चात्त्य, जाणत्या रसिकांनी प्रोग्रेसिव्हांना डोक्यावर घेतलं. ह्या उठावामुळे बेंद्रे-हेब्बा-चावडा यांच्यासारखे मातब्बरही सावध झाले. पळशीकर-गायतोंडे-सामंत-डिझी इत्यादी प्रोग्रेसिव्हांचे समकालीन सतर्क झाले. कदाचित गायतोंडय़ांच्या गांभीर्याची सुरुवात ह्यच कालखंडात झाली असण्याची शक्यता आहे. चित्रकलेतील पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखालील प्रोग्रेसिव्हांच्या चळवळीने ठळकपणे अधोरेखित केलेला – भारतीय परंपरा व पाश्चात्त्य प्रभाव ह्यामधील लक्षणीय फरक-तत्कालीन विचारवंत, चित्रकारांना एकूणच चित्रकलेविषयी सखोल विचार करायला प्रवृत्त करणारा ठरला. ते नक्कीच चिंतित झाले असतील. परंतु चिंतेला त्यांनी शास्त्रशुद्ध मनन प्रक्रियेतून पाहिल्यामुळे ते चिंतनशील झाले. चित्रकला त्यांच्यासाठी केवळ छंद राहिली नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न झाला. तारेवरच्या कसरतीऐवजी तो नैतिक तथा कलात्मक जबाबदारीचा प्रवास ठरला.

त्याच दरम्यान मुंबईतल्या भुलाभाई इन्स्टिटय़ूटमध्येही विविध कलाक्षेत्रातले कलावंत नव्या जाणिवांच्या आणि अनुबंधांच्या शोधात; प्रयोग करण्यात दंग होते. त्यांच्या प्रयोगाच्या मुळाशी भारतीयत्वाची प्रेरणा होती. त्या कलावंतांत हुसेन, सातवळेकर, दवियरवाला, अब्राहम अल्काझी, रवीशंकर-उदयशंकर, विजया मेहता, पोचखानवाला, प्रफुल्ला, गायतोंडे यांच्यासारखे चित्र-संसाराला समर्पित झालेले कलावंत काम करीत होते. परंतु तिथेही गायतोंडे त्यांच्यात असूनही नसल्यासारखेच.

माझी पिढी जे.जे.मधील शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली तेव्हा भुलाभाई स्टुडियो जवळजवळ बंद झाला होता. जहांगीर आर्ट गॅलरी बऱ्यापैकी रसिकांत आली होती (आता ती निरस झाली आहे असं खेदाने म्हणावंसं वाटतं.) केमोल्ड, पंडोल आणि ताज या गॅलऱ्या नव्या उत्साहाने कार्य करीत होत्या. या गॅलऱ्यांमधून समकालीनांची चित्र-प्रदर्शनं गाजत होती. त्यांची दखल घेतली जात होती. या खाजगी गॅलऱ्यांमधून चित्रकलेची नवी ओळख, नवे विचार, नव्या शैली आणि नवी जाण मुळे धरू लागली होती. गायतोंडे या बदलत्या हवेत श्वास घेत होते आणि तरीही अलिप्त होते, किंबहुना ते स्वत:ला सोडून कुठे गेले नाहीत. एखादा पट्टीचा पोहणारा, अंगाला तेल लावून समुद्र तरून जातो तसं. समुद्रासमोरच्या अनेक दृढ बैठकींतून त्यानंतर त्यांची कुठेही, कधीही समाधी लागू लागली असावी. ते अमेरिकेला, जपानला जाऊन आले आणि आधी होते त्याहून अधिक एकटे झाले, ‘झेन’ मास्टरसारखे; स्वत:शीच स्पर्धा करणारे. चित्रकला हाच ध्यास, तेच लक्ष आणि तोच मोक्ष असंच त्यांना पोटतिडकीने जाणवलं असावं. त्यांच्या त्या एकटेपणावरच्या श्रद्धेला पुढे कधीही तडा गेल्याचं ऐकिवात नाही. त्यांना लाभलेल्या एकटेपणाचं वरदान दुर्लभ जातीचं असावं. मृत्यूनंतर कुणालाही लाभणाऱ्या एकटेपणासारखं. ते त्यांनी जिवंतपणीच भोगलं, मात्र त्यातल्या अमर्त्य सजीवत्वाशी मैत्र साधून; जे मृत्यूनंतर साधणं अशक्य.

आम्ही विद्यार्थी त्यांच्या नुसत्या दर्शनानेही प्रभावित होत असू. त्यांना पाहणं म्हणजे एक सोहळा असायचा. काशीतल्या विश्वेश्वराला मुंबईतून नमस्कार करावा तसा. आजही त्यांच्या आठवणीने मन पन्नास र्वष मागे जातं. त्यांच्या दशर्नाने मिळालेली प्रेरणा आजही अस्तित्व ढवळून काढते. त्यांना पाहिल्यामुळे आपणही चित्रकला क्षेत्रात असल्याचा अभिमान वाटतो. वाटतं चित्रकार व्हावं तर असं, इतकं त्यांचं व्यक्तिमत्त्व भुरळ घालणारं होतं. परंतु त्यांचं दशर्न दुर्लभ असे. जेव्हा दिसत तेव्हा त्यांच्याभोवती जमीन दास, लक्ष्मण श्रेष्ठा, मनोहर म्हात्रे यांच्यासारखे नव्या पिढीचे उमदे कलावंत हमखास असत. पळशीकरसरांच्या सहवासात गायतोंडय़ांचा विषय असायचाच. त्या दोघांनाही एकमेकांबद्दल नितांत आदर होता. प्रेमाचं अंतिम टोक म्हणजे आदरच असावा, इतका आदर.

एकदा मी सरांना म्हटलं, ‘‘सर, गायतोंडय़ांची चित्र समजत नाहीत.’’ त्यावर ते पटकन म्हणाले, ‘‘अरे, पण दिसतात ना? ती पाहायचा प्रयत्न कर, डोळ्यांनी, दृष्टीने, बुद्धीने, मनाने पाहायचा प्रयत्न कर, सगळ्या ज्ञानेंद्रियांनिशी अनुभवण्याचा प्रयत्न कर. समजतील.’’ त्यावेळी दृश्यानुभवाचा इतका प्रदीर्घ प्राणायाम एका दमात त्यांनी सांगितला की तो कळण्यात आणि पचनी पडण्यात आजवरचं आयुष्य खर्ची पडलं. पळशीकर सरांचंही हे असचं होतं. गुंजभर मोती मिळविण्यासाठी जवाहिऱ्यांच्या दुकानात नव्हे तर थेट सागराच्या तळाशी जाण्यासारखं. त्यांचे अशासारखे सल्ले आम्हा तरुणांना सतत दृश्य-विचारांत गुंतवून ठेवायचे. कधी कधी मी कल्पना करायचो, सर आणि गायतोंडे या दोघांतला संवाद कशा स्वरूपाचा असेल? वाटायचं ते एकमेकांकडे डोळ्यांच्या डोळ्यांनी पाहात आणि कानांच्या कानांनी ऐकत बसत असावेत.

त्यांच्या पिढीला चित्त आणि चित्र यांमधील पुरातन नातं उमजलं असावं. त्यांचा चित्रावर शब्दांहून अधिक विश्वास होता. किंबहुना म्हणूनच त्यांच्या पिढीचं बहुतांश कलावंत मौन वृत्तीचे झाले असावेत. ‘वीतभर कला आणि हातभर कलकलाट’ यावर नखभरही विश्वास न ठेवणारी ही पिढी माझ्या पिढीला घडवून गेली याचा मला अभिमान वाटतो. या पिढीने आम्हाला पाहायला शिकवलं, रंगांचे इंद्रधनुष्य आमच्या डोळ्यात उभं केलं, चित्राच्या किमतीकडे नव्हे तर दर्जाकडे आमचं लक्ष वेधलं. त्यांनी आम्हाला अंतर्बाह्य़ रंगवलं, इतकं की देह गेला तरी रंग जाणार नाही. त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्याचा विचार करणंदेखील नतद्रष्टपणाचं ठरेल. पळशीकरांना विचारलेला प्रश्न, एकदा प्रत्यक्ष गायतोंडय़ांना विचारण्याची संधी मला मिळाली. मी म्हटलं, ‘‘सर, तुमची चित्र लोकांना कळत नाहीत यावर तुम्हाला काय वाटतं?’’ त्यावर तेही पटकन म्हणाले, ‘‘मला काय वाटायचं? मला जे वाटतं ते लोकांना वाटत नाही आणि त्यांना कळत नाही ही त्यांची समस्या आहे.’’ वर असंही म्हणाले, ‘‘मला तरी सगळंच कुठं कळतंय जगातलं?’’ बस्स. एवढंच होतं त्यांचं उत्तर. खरं आहे त्यांचं म्हणणं; लोकांना चित्राविषयीचे प्रश्न, विचार, तत्त्वज्ञान कळलं तर चित्रही समजेल आणि चित्रकारसुद्धा समजेल. त्यांची ही अशी त्रोटक, मुद्देसूद उत्तरं त्यांच्या प्रदीर्घ मौनातूनच आली असावीत.

त्यांना झालेल्या भीषण अपघातात त्यांचं शरीर मोडलं पण मौनाचा कणा अधिक कणखर झाला. त्यानंतर मौन हेच बोलणं झालं. ज्यांना त्यांची मौनाची भाषा कळली त्यांनी त्यांना प्रश्न केले नाहीत. ज्यांनी प्रश्न केले त्यांना गायतोंडय़ांनी आपल्या चित्रातून उत्तरं दिली. स्वत:ला पृथ्वीवरचा रहिवासी समजणाऱ्या गायतोंडय़ांचा जन्म कुठे झाला, बालपण कुठे गेलं, तारुण्यात त्यांनी काय केलं, म्हातारपणात काय भोगलं, ते दिल्लीला का स्थलांतरित झाले, पुन्हा मुंबईला का आले नाहीत? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरितच राहणार आहेत किंवा त्यांची अनेक वेगवेगळी उत्तरं अस्तित्वात येतील. दंतकथा, आख्यायिका तयार होतील. चित्राव्यतिरिक्त इतर अनेक रूपकातून गायतोंडे शिल्लक राहतील. संपूर्ण गायतोंडे कधीच कुणाला सापडणार नाहीत. पूर्णत्वाची हीच किमया असते. पूर्ण असलं तरी अपूर्णच वाटत राहणारं.

अगदी अलीकडची बातमी अशी आहे की, गायतोंडेचं प्रदर्शन ग्युगेनहाइमला होणार आहे. चांगल्या, दर्जेदार कामाचं असंच असतं. अशा कामांना प्रायोजक लागत नाही, त्यांचा अस्खलितपणा त्या कामाचं प्रयोजन करतो. पािठबा, गटबाजीची गरज पडत नाही. कट-कारस्थानं करावी लागत नाहीत. कामातील दर्जा वारसाहक्कात कुणाला मिळत नाही आणि देताही येत नाही. तो मिळवावा लागतो. गायतोंडय़ांनी स्वत:च्या चित्राद्वारे तो मिळवला. दर्जेदार काम काही काळ टाळता येईल, पण झाकून ठेवता येणार नाही; कारण ते आरवणारं असतं. गायतोंडेंचा काळ सांस्कृतिकदृष्टय़ा परिपक्व परंतु परिवर्तनशील होता. कलाक्षेत्राचं बाजारीकरण झालेलं नव्हतं. कलेतील अक्षय आनंद आणि अपार्थिव आशय शोधण्याला कलावंत आपलं धर्मकार्य समजत असत. चित्रकार भरपूर वाचन करीत असत. आपापसात वाद घालत, परंतु एकदुसऱ्याच्या मनावर ओरखडाही उमटणार नाही याची काळजी घेण्याइतपत त्यांची संवेदनशीलता जागी असे. त्यांच्या लेखी जीवनातील महानुभव अधिक महत्त्वाचा होता.

गायतोंडे मुंबई सोडून दिल्लीत जाण्यापूर्वी त्यांच्या चित्रांची जी काही थोडीफार प्रदर्शने झाली; त्यापैकी दोन प्रदर्शनांचा मी इथे मुद्दाम उल्लेख करू इच्छितो. माझ्या मते, पहिलं त्यांच्यातला प्रयोगशील कलावंत दाखवणारं होतं तर दुसरं त्यांच्यातील द्रष्टय़ा चित्रकाराचं दशर्न देणारं होतं. या दोन्ही प्रदर्शनांच्या दरम्यानचा कालावधी फार थोडा होता. पहिल्यात दुसऱ्याचं बीजारोपण होतं, तर दुसऱ्यात त्या बीजाचं महाबोधी वृक्षात रूपांतरण झाल्याचं तीव्रतेने जाणवत होतं. पहिलं प्रदर्शन रॅम्पार्ट रो मार्गावरील एका पुस्तकाच्या दुकानात तर दुसरं प्रतिष्ठित ताजमहल हॉटेलातल्या सुबक-सुंदर गॅलरीत. पहिल्यात स्वत: गायतोंडे कधीच उपस्थित राहिल्याचं आढळलं नाही, परंतु दुसऱ्यात ते सात दिवस संपूर्ण वेळ उपस्थित होते. पहिलं प्रदर्शन जे प्रायोगिक वाटत होतं, त्यातल्या चित्रातून एक साचेबंद साम्य असलेले आकार वेगवेगळ्या पाश्र्वभूमीतून वर काढल्यासारखे वाटत होते. साडय़ांवरच्या नक्षीकामासारखे. केवळ आकारांची हेतूपूर्वक केलेली पखरण. त्यात ओळखीचे गायतोंडे नव्हते. ही चित्रं गायतोंडय़ांची नसावीत असंच वाटलं म्हणून अत्यंत हुशारीने एका कॅनव्हासच्या मागे पाहिलं, तिथे गायतोंडय़ांची सही होती. धक्काच बसला. मनात प्रश्न उभा राहिला ‘‘काय झालं माझ्या आदर्श नायकाला?’’

वर्ष-सहा महिने उलटले असतील आणि त्यांचं दुसरं प्रदर्शन ताजमध्ये भरलं. न भुतो, न भविष्यती असंच. अविस्मरणीय, अतिसुंदर इ.इ. विशेषणं मागे टाकणारं. हा दुसरा धक्का, परंतु सुखद, त्यांच्या चित्रांवरून जीव ओवाळून टाकायला लावणारा. त्या चित्रांमधून रंगांचा रसरशीत ताजेपणा वेड लावणारा होता. गायतोंडे रंग लावत नसत तर स्वत:च्या अस्तित्वाचा तुकडा कापून लावावा तसा तो अलगदपणे कॅनव्हासवर ठेवत, इतक्या हळुवारपणे की तो ठेवल्याची जाणीवही आंधळ्या कॅनव्हासला होऊ  नये. त्यांनी कॅनव्हासला डोळे दिले, परंतु अशा खुबीने की कॅनव्हासला वाटावं त्याने ते स्वत:च उघडले. दिल्याने घटत नाही उलट वाढतंच यावर गायतोंडय़ांचा जबर विश्वास असावा. हा विश्वासच गॅलरीभर पसरला होता. या चित्रांतून त्यांनी स्वत:चं तंत्रकौशल्य दाखवलं होतं. त्यांचं रोलर वापरण्यातलं परिपक्व धाडस वाखाण्यासारखंच होतं. मंत्रमुग्ध करणाऱ्या एखाद्या सराईत जादुगाराने स्वत:च्या जादुई-तंत्राने आपल्याला अचंबित करावं तसं.

रंगांचं परस्परातील नातं विलोभनीय होतं. रंग-आकार होऊन पुढे येत तर तेच कधी पाश्र्वभूमी होऊन मागे राहात. आणि असं दोलायमान होताना मधूनच कधी आकारांच्या तर कधी अवकाशच्या देहावर पोताचा नम्र स्पर्श सोडत. एका चित्रात पांढरा आणि पुसट करडा असा योजिला होता की तो रजत-वर्ख होऊन उमटावा. दुसऱ्या एका चित्रातला सोनकशी पिवळा, जणू हळदीत किंचितसा पहाटेचा कोवळा प्रकाश मिसळून तयार केल्यासारखा. संध्याकाळचं आकाशच मावळतीवर कोमेजणं आपल्या हळवेपणाला अधिकच संवेदनशील करतं. त्या निळ्या, गहिऱ्या आकाशाचा तुकडाच चक्क एका कॅनव्हासवर पांघरलाय असंच वाटत रहावं असं आणखीन एक चित्र. असं जोपर्यंत वाटत होतं तेव्हा मला अवती-भवतीच्या सवयीच्या जगाचं भान होतं.

कालांतराने त्या चित्रांनीच पूर्णविरामानंतरची पोकळी माझ्या मनात निर्माण केली. त्या पोकळीत उभं होतं केवळ त्यांचं चित्र, कुठल्याही उत्प्रेक्षा-उपमेशिवायचं फक्त चित्र, मला दिग्मूढ करणारं. त्यावेळी, प्रत्येक अनुभवाचा अर्थ लावणारी माझी साक्षर बुद्धिमत्ता चक्क मला सोडून गेली. माझ्या शरीरातली एकूण-एक इंद्रियं, हाडामांसासकट मला न सांगता पसार झाली आणि मी मग एक संवेदनशील हवेने तट्ट फुगलेला फुगा होऊन उरलो. हवेतून येणाऱ्या-जाणाऱ्या एखाद्या सूक्ष्म कणानेही मी फुटून नष्ट झालो असतो. पण गायतोंडय़ांच्या चित्रांनी तसं होऊ  दिलं नाही. कारण त्यांनीच माझा देह रिकामा केला होता. जे-जे काढून नेलं ते-ते सर्व पुन्हा आणून जाग्यावर ठेवलं; अर्थात नव्या संस्कारांनी शुद्ध करून, त्या क्षणी साक्षात्कार व्हावा तसं मला एकच कळलं की चित्र फक्त पाहायची असतात, पाहून अनुभवयाची असतात.-जे दिठिही न पविजे ते दिठिविण देखिजे जरि अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ – अशा असीम धारणेने.

मला वाटतं, गायतोंडय़ांची चित्रं अवीट आहेत. ती एकदा पाहून मन तप्त होणार नाही, सारखंसारखं पहात राहावीत अशी आहेत. मग मी सातही दिवस ती पहात राहिलो, वारकऱ्याने विठ्ठल पहावा तसा. निरखून पहात राहिलो. वाटलं निसर्गाने स्वत:कडचे बारीकसारीक सृजन-कौशल्य गायतोंडय़ांकडे सुपूर्द केले आहे. त्यांनी ते सारे इतक्या उत्स्फूर्तपणे आणि सहजतेने हाताळले की निसर्गही क्षणभर भारावून गेला असावा. गायतोंडय़ांनी आपल्या चित्रांतून निसर्गाला मन:पुत ओवाळले होते. तो कसा दिसतो हे नव्हे तर तो कसा त्यांच्या अंतरात ठाण मांडून बसलाय हेच चित्राद्वारे अनुभवलं आणि दाखवलं होतं. गायतोंडय़ांनी निसर्गाचा मागोवा घेतला होता की निसर्गाने गायतोंडय़ांचा असा संभ्रम निर्माण करणारी ती चित्र होती, स्वायत्त आणि मुक्त.

गायतोंडेही तिथे चित्रासारखे बसून होते; ते त्यांच्या चित्रात, चारही दिशांना सर्वत्र भरून उरले होते. त्यांनी त्यांच्या चित्रासकट माझ्या आत प्रवेश केला. काहीतरी अगम्य मनात रुजल्याचं जाणवलं. त्याने मी प्रफूल्लित झालो. मला वाटलं, आंतर्बाह्य़ बदलवून टाकणारी ही घटना, मी आणि गायतोंडेसकट मला गोठवता आली असती तर किती बरं झालं असतं. पण तसं झालं नाही. परंतु त्या प्रदशर्नाने माझ्या चित्राबद्दलच्या कल्पनांना नवे धुमारे फुटले. अमूर्तासोबत एकूण चित्र-माध्यमाच्या स्वभावाविषयी, मूलतत्त्वाविषयी, मानवी जाणिवांच्या अमर्याद क्षमतेविषयी आणि त्याच वेळी स्वत:च्या कुवतीविषयी गांभीर्याने विचार करायला मला प्रवृत्त केले आणि बळही दिले.

सतत सातही दिवस चित्रे पाहता पाहता चित्रच झाल्याचा भास त्यानंतर मनात अश्मासारखा कायम झाला. मी नि:शब्द झालो होतो. गायतोंडे तर झालेच होते कारण तेही तितक्याच आश्चर्याने स्वत:चीच चित्रे पहात होते. काळाला मोजण्याची गरज भासली नाही आणि तो अनंत आहे याचीच प्रकर्षांने खात्री पटली. गायतोंडय़ाशी त्यांच्या चित्रांच्या साक्षीने झालेली माझी, ती मुंबईतली शेवटची भेट होती. ते दिल्लीला स्थायिक झाल्याचे कळले आणि वाटले त्यांनी मुंबई सोडायला नको होती. वाटायचे रझा, सूझा, बाकरे, गाडे, अंबादास, सामंत यांनीही मुंबई हेच ‘मुक्काम-पोष्ट’ करायला हवे होते; कायमचे. हे सगळे प्रतिभावंत चारी दिशांना पांगले आणि मुंबईचे कला-जगत पोरके झाले.

गायतोंडय़ावरील या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिताना साठ-सत्तरच्या दशकातल्या अनेक कला-घटनांचा चित्रपट मन:चक्षूंसमोरून सरकला. पुन:पुन्हा तो सरकत राहावा, असाच तो काळ होता आणि गायतोंडय़ासारखा अवलिया हा त्या काळाचा केंद्रबिंदू होता. मात्र आता तो विस्तारत जाणारा परिघ झाला आहे. त्याचा केंद्राकडून परिघापर्यंतचा प्रवास आणि दरारा काय होता व अजूनही आहे हे सांगणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेखकाने आपापल्या स्थानांवरून आपल्या स्वतंत्र कुवतीच्या बळावर टाकलेला दृष्टिक्षेप म्हणजे त्या प्रत्येकाचा स्वानुभवच. संबंधित लेखक-वृंदांपैकी जवळजवळ सर्वच चित्रकार आहेत. त्यात गायतोंडेच सहाध्यायी, समवयस्क मित्र आहेत तसेच त्यांना जवळून अनुभवलेले त्यांचे विद्यार्थीही आहेत. त्यामुळे या ग्रंथात सापडतात ते अविस्मरणीय गायतोंडे. म्हणजे काहींनी ‘गाय’चा प्रत्यक्ष अनुभव घेतला तर काहींनी गायतोंडे सरांचा.

एक प्रतिभावंत दिसतो कसा, राहतो कसा, बोलतो कसा, सुनावतो कसा आणि वागतो कसा, याविषयीचे विविध पैलू वाचकाला या पुस्तकात सापडतील. गायतोंडे यांचे विचार, त्यांचे व्यक्तिगत भावविश्व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची श्रद्धास्थाने, त्यांची चित्राविषयीची तळमळ, त्यांचे प्रेम, त्यांची विफलता, त्यांचा आनंद आणि निराश, त्यांचे सुख-दु:ख, त्यांचे श्रांत-विश्रांत संगीत-प्रेम, त्यांचे अचंबित करणारे मौन इ.इ. सगळ्याच गोष्टी पुस्तकातल्या लेखांतून उलगडल्या गेल्या आहेत. आणि तरीदेखील गायतोंडे अजूनही उरलेच असावेत अशी भावना मनात घर करतेच. एकंदरीत प्रत्येक लेखकाने गायतोंडे कसे दिसले आणि त्यांनी त्यांना कसे पाहिले हे सहजगत्या, कुठलाही अभिनिवेश न आणता सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पाळंदे, बाळ छाबडा, दाभोळकर, विश्वास यंदे, प्रफूल्ला डहाणूकर यांच्यासारख्या त्यांच्या मातब्बर मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी, आपल्या मनात विद्यार्थी दशेतल्या आणि तरुणपणातल्या गायतोंडय़ाची मूर्ती उभी करतात. तर लक्ष्मण श्रेष्ठ, मनोहर म्हात्रे यांच्यासारखे गायतोंडय़ांमधला विद्यार्थी, सहृदय मित्र आणि विलक्षण प्रतिभेचा ‘मसिहा’ आपल्याला दाखवून देतात.

दादोबा पंडित, नरेंद्र डेंगळे आणि प्रीतिश नंदी हे आपापल्या क्षेत्रातले दिग्गज. त्यांनी गायतोंडय़ांकडे, त्यांच्यातल्या लोकोत्तर चित्रकाराकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. त्यामुळे ते आपल्याला माहीत नसलेल्या ‘गाय’बद्दल बरेच काही सांगून जातात. विशेष म्हणजे संबंधित सर्व लेखकांना गायतोंडय़ांबद्दल नितांत आदर आणि अतीव प्रेम आहे. त्यांचे त्यांच्याशी नात्यापलीकडचे नाते आहे. त्या नात्याला स्मरूनच त्या सर्वानी ‘गाय’च्या व्यक्तिमत्त्वाभोवती प्रदक्षिणा घातल्या आहेत. या पुस्तकात प्रदर्शित केलेल्या गायतोंडय़ांच्या चित्राविषयी लिहायला शब्द नेहमी अपुरे पडतील; कारण जिथे शब्द निरुपयोगी ठरतात तिथून पुढे त्यांचे चित्र सुरू होते आणि सुरूच राहते. पुस्तकासाठी निवडलेली चित्रे डोळ्यात भरून घ्यावीत अशीच आहेत. डोळे बंद ठेवून निवडलेली चित्रेही अशीच निघाली असती असाच दर्जा गायतोंडय़ांनी आपल्या चित्रातून अबाधित ठेवला होता. आपण त्यांची चित्रे पाहतो तेव्हा तीही आपल्याला पाहत असतात, असा अनुभव फार दुर्मीळ आणि तोच गायतोंडय़ांनी कॅनव्हासवर घडवला आहे.

चित्रांना दृष्टी आहे अशी जाणीव जेव्हा पाहणाऱ्याच्या मनात जागी होते तेव्हा त्याने बेलाशक समजावे की ती गायतोंडय़ांची चित्रे आहेत. असाच अवर्णनीय प्रत्यय देणाऱ्या चित्र-प्रतिमांच्या सहवासात हे पुस्तक वाचताना, शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचलेले, शब्दा-शब्दांमधल्या रिकाम्या जागेत हरवून जाते आणि मग ते पुन्हा वाचण्याचा मोह अनावर होतो; असाही अनुभव कदाचित वाचकांना येण्याची शक्यता आहे. तेव्हा वाचणे आणि पाहणे असे आलटून-पालटून होत गेले तर आश्चर्यमिश्रित आनंद झाल्यािशवाय रहाणार नाही; असेच हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या निर्मितीविषयक सौंदर्याची काळजी डोळ्यात चित्र घालूनच घेण्यात आली असल्याच्या कित्येक खुणा पाना पानांवर दिसतील. हे पुस्तक प्रकािशत करून ‘चिन्ह’ या संस्थेने कला-साहित्यात मोलाची, उद्बोधक भर घातली आहे.
प्रभाकर कोलते – response.lokprabha@expressindia.com