लग्न हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभी राहते ती नुसती धांदल. पण सगळ्या नातेवाईकांना एकत्र आणणारी, दोन जिवांचंच नव्हे तर दोन कुटुंबांचं मीलन घडवून आणणारी गोड धांदल. प्रत्येक लग्नात थोडय़ाफार फरकाने ती सारखीच असते, हे तर तिचं खास वैशिष्टय़ असतं..

लग्न… केवळ दोन जिवांना बांधणारा संस्कार नसून कुटुंबांना सर्वार्थाने जोडणारा प्रेमाचा धागा आहे. लग्नसंस्काराने दोन जीव एकमेकांशी कायमचे बांधले जातात हे खरं असलं तरी या प्रक्रियेत वधू-वरांच्या कुटुंबाचा हिरिरीने सहभाग असतो. लग्न दोघांचं असलं तरी या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती धडपडत असते. लग्न होण्याआधी लागणारी लग्नाची पूर्वतयारी, खरेदी, बस्ता यात वधू-वरांपेक्षाही कुटुंबातील अन्य सदस्यांचा सहभाग जास्त असतो. पारंपरिक पद्धतीने विधी करून वधू-वर बंधनात कटिबद्ध होतात. मात्र आप्तेष्टांचा पाहुणचार, हळदीचा समारंभ, मुख्य लग्न, पाचपरतावन या सर्व सोपस्कारांमुळे लग्नाचा सोहळा होतो. या लग्नसोहळ्याच्या आठवणी ताज्या राहाव्यात यासाठी कॅमेऱ्यात हे सर्व विधी टिपले जातात आणि लग्नसोहळ्यातील नातेवाईकांच्या आठवणी छायाचित्राच्या माध्यमातून कायमच्या मनावर कोरल्या जातात. काही घरांत लग्नविधींना महत्त्व देऊन पारंपरिक लग्न पद्धतीचा आनंद घेतला जातो तर काही घरांत लग्नविधीला विशेष महत्त्व न देता जवळच्या आप्तेष्टांना आमंत्रित करून त्यांच्या आशीर्वादाने वधू-वर नव्या आयुष्याची सुरुवात करतात.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

अलीकडे समाजभान राखत सर्व धर्माच्या लग्नविधींचे महत्त्व जाणून घेऊन त्यानुसार लग्न करण्याचा नवा ट्रेण्ड या लग्नसोहळ्यात पाहायला मिळतो. या सोहळ्याचे स्वरूप कोणतेही असले तरी या संस्काराशी जोडली जाणारी प्रत्येक व्यक्ती उत्साहाने प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असते. या लग्नात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संबंधित विधीनुसार मान असतो. लग्नाचा ठराव होत असताना कुटुंबाच्या भावकीला विशेष महत्त्व दिले जाते आणि मानाचा पहिला नारळ देण्याचा प्रारंभ या बैठकीपासून होतो. वधू-वरांच्या कुटुंबातील पुरुष मंडळींची बैठक देण्याघेण्याच्या व्यवहारासाठी बसते. या सगळ्यात वधू-वरांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी दोघांचे नातेवाईक या सोहळ्यावेळी एकत्रित आल्याचा आनंद ते अनुभवत असतात. आजची तरुण मंडळी लग्नाच्या बाबतीत जुनं विरुद्ध नवं असं भांडण न करता पारंपरिक लग्नपद्धतीचा पुरेपूर आनंद घेताना दिसतात. पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिकतेची कास धरत आजची तरुणाई लग्नात नावीन्याचा प्रयोग करतात.

केळवणाची धम्माल

लग्नाआधी वधू-वरांसाठी कुटुंबात केले जाणारे केळवण हे तर सगळ्यांनी एकत्र भेटण्याचे निमित्त असते. वधू-वरांच्या आवडीचे पदार्थ करून जेवणासाठी पाहुण्यांकडे आमंत्रित केले जाते. एखादी भेटवस्तू देऊन लग्नाबाबत शुभेच्छा दिल्या जातात. हे केळवण अलीकडे अनेकदा हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पार पडते. मैत्रिणी, बहिणी, आत्या, काकू यांचे त्या निमित्ताने लग्नाआधी गेट टुगेदर होते आणि लग्नाच्या तयारीची खरी तर सुरुवात या केळवणापासून सुरू होते. बदलत्या काळानुसार केळवण हॉटेलात करण्याचा ट्रेण्ड सुरू झाला असला तरी भावना मात्र कायम त्याच आहेत.

लग्नसराई जवळ येताच धावपळ सुरू होते ती खरेदीची. ही खरेदी नेहमीप्रमाणे नसल्याने लग्नाची खास खरेदी बहुतांश वेळा महिला एकत्र येऊन करतात. वधूच्या बहिणी, मावश्या, आत्या, काकू यांची खरेदीसाठी असलेली एकच धांदल पाहिल्यावर लग्नघरात चैतन्य पसरतं. खरेदीपेक्षाही घरातील बायकांच्या या खरेदीविषयीच्या गप्पांना लग्नसराईत अधिक उधाण येते. खरेदीतही वधू-वरांची खरेदी वेगळी असून आप्तेष्टांना मानपानात द्याव्या लागणाऱ्या भेटवस्तूंची खरेदी हा कुटुंबातील गृहिणींचा महत्त्वाच्या खरेदीचा कार्यक्रम मानला जातो. पत्रिका छापण्यापासून पत्रिकांवर नावे कोणाची छापायची, लग्नस्थळ कुठे असावे, वधू-वर या दोघांच्या कुटुंबीयांना लग्नस्थळ सोयीचे पडेल का? या अशा विविध मुद्दय़ांवर लग्नघरात चर्चा ऐकायला मिळते. अलीकडे सोशल मीडियाच्या सोईस्कर उपयोगामुळे घरोघरी जाऊन पत्रिका देण्यापेक्षा लग्नाची तारीख जवळ येऊ लागताच व्हॉट्सअ‍ॅपचे डीपी पत्रिकांचे पहायला मिळतात. फेसबुकच्या माध्यमातून लग्नपत्रिका शेअर करून आमंत्रण देण्याचा ट्रेण्ड सध्या रुळत आहे.

रुखवत असावे शोभेचे

नवऱ्यामुलीची कला पारखण्यासाठी विविध कलाकुसरीच्या वस्तू लग्नाच्या दिवशी रुखवतात मांडण्याची परंपरा आहे. अलीकडे मात्र या रुखवताची जबाबदारी वधूच्या मैत्रिणी आणि बहिणीच घेताना दिसतात. लग्नसंस्काराचे महत्त्व सांगणारे एखादे पत्रक या रुखवतात हमखास असते. सध्या प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची सवय तरुण-तरुणींना असल्याने वधूचे बालपणीचे आणि महाविद्यालयीन वयातील फोटोंचे कोलाज रुखवतीच्या प्रदर्शनात पाहायला मिळतात. यात रुखवत नवऱ्यामुलाकडे जाणार असल्याने तयार केलेल्या रुखवताचे बक्षीस वराकडून उकळण्यासाठी वधूच्या बहिणींची लग्नसमारंभात दादागिरी असते. अपेक्षित रक्कम मिळेपर्यंत वराला मनवण्यासाठी वधूच्या बहिणींच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या पाहण्याचा वेगळाच आनंद नातेवाईक घेत असतात.

साचेबद्धपणातून मोकळीक

आजच्या तरुण पिढीला सतत काहीतरी नवीन करण्याची हौस असल्याने साचेबद्धतेपासून लग्नसमारंभातदेखील मोकळीक हवी असते. अलीकडे लग्नसमारंभात विधी, आप्तेष्टांची भेट आटोपल्यावर केक कापून लग्न साजरा करण्याचा ट्रेण्ड रुळावत आहे.

मानापमानाच्या भेटवस्तू

लग्नसमारंभात आवर्जून आलेल्या आप्तेष्टांना भेटवस्तू देण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. लग्नसमारंभात वधू-वरांची आई, आत्या, मामी तर आलेल्या बायकांना हळदीकुंकू लावून भेटवस्तू देण्यातच व्यग्र असतात. हे सगळं आवडीने करत असलेली ही मंडळी लग्न पार पडल्यावर मात्र लग्न एन्जॉयच करता आले नाही, असेही आवर्जून सांगतात. लहान ताट, समई, दिवा या भेटवस्तू पारंपरिकरीत्या आप्तेष्टांना दिल्या जातात. अलीकडे साडी कव्हर, बांगडय़ा ठेवण्याचे कव्हर, मेकअपचे साहित्य देण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे.

चिमुकल्यांची धांदल

लग्नसमारंभात तरुण आणि इतर मंडळींनी साज केला असला तरी चिमुकल्यांची धांदल काही औरच असते. लग्नात नऊवारी  साडी, नथ घालून आलेली चिमुकली मग लग्नसोहळ्यात सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. पारंपरिक साज केलेल्या चिमुकलीचे  मुरडणे कौतुकास्पद असते. अर्थात शेरवानी घालून चिमुकले मुलगेही मिरवत असतात.

संगीत समारंभाची धमाल

अलीकडे मराठी लग्नामध्येदेखील संगीत-नृत्याची धमाल असते. लग्नाच्या दोन दिवस आधीच पाहुणे मंडळी वधू-वरांच्या  घरी एकत्र येऊन संगीत-नृत्याची धमाल करतात. कदाचित या लग्नाच्या सोहळ्यात भविष्यातील होऊ पाहणाऱ्या जोडप्याचेदेखील बंध बांधले जातात. ज्येष्ठ मंडळींना जुन्या दिवसांची आठवण होते आणि तरुण आपल्या लग्नाच्या स्वप्नात गुंग होतात.

सौंदर्यासाठी पार्लरकडे धाव

वधूने लग्नात सुंदर दिसावे यासाठी पार्लरची मंडळी लग्नसोहळ्यात हजर असतात. मात्र लग्नासाठी खास पेहराव केल्यावर  साजेसा मेकअप करण्यासाठी इतर बायका, मुलींचीदेखील तितकीच लगबग असते. लग्नापूर्वी आणि लग्नाच्या वेळी साजेसा पेहराव करून या बायका, मुली सेल्फीसाठी सज्ज होतात.

सेल्फी तो बनता है

गेल्या काही वर्षांत सेल्फी ट्रेण्ड सुरू झाल्यापासून लग्नात सेल्फी नसेल तर काय मजा. लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत  सेल्फीमध्ये बांधले जातात आणि हे लग्नातील सेल्फी लगेचच सोशल मीडियावर व्हायरल होतात. हे फोटो पाहणाऱ्या आप्तेष्टांनाही तितकाच आनंद असतो आणि सेल्फीत बंद झालेल्या नातेवाईकांना या कायमच्या आठवणी बनतात.

पाठवणीचा क्षण

सर्व विधी आटोपून, नातेवाईकांची भेट घेऊन झाल्यावर मुलीच्या पाठवणीची वेळ आल्यावर मात्र दिवसभर हसऱ्या चेहऱ्याने  नातेवाईकांचे स्वागत करणाऱ्या बाबांचे डोळे पाणवतात. आई एका कोपऱ्यात मुलीला कौतुकाने न्याहाळत असते आणि  नेहमी भांडणारा भाऊ ओक्साबोक्शी मित्रांजवळ रडत असतो. पाठवणीची वेळ आल्यावर बाबाचे हात मुलीच्या सासू- सासऱ्यांपुढे आपोआप जोडले जातात. मुलीला सुखी ठेवा हे शब्द ओठांवर येतात. भावनांनी दाटलेल्या लग्नसोहळ्यात वधू  जड अंत:करणाने सगळ्यांचा निरोप घेऊन भावी आयुष्याची सुरुवात करते.
किन्नरी जाधव – response.lokprabha@expressindia.com