समोर अथांग समुद्र, आजूबाजूला दाट झाडी, नीरव शांतता अशा परिसरात घर असावं असं कुणाला वाटणार नाही? पण ते प्रत्यक्षात मिळणं एका भाग्यवंताच्या नशिबात होतं. त्याच्याच घराचा फेरफटका-

वीकएण्ड होम म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते एकाच साच्यात, एका ओळीत बांधलेले टिपिकल बंगले. शहरी दगदगीपासून दोन दिवस शांतपणे राहायला मिळावे म्हणून बांधलेले. गेल्या दहा वर्षांत एकूणच राहणीमान उंचावायला सुरुवात झाल्यावर तर महानगरांजवळ अशा वीकएण्ड होमचे पेवच फुटलं. फार्म हाऊस असा गोंडस शब्ददेखील त्याला जोडला गेला. डोंगराच्या पायथ्याशी मोठय़ा शेतजमिनींवर बांधलेली घरं ही नाही म्हटलं तरी त्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा आणतातच. निसर्गाचा सहवास असतो, पण निसर्गाशी एकरूप होणं त्यामध्ये नसतं. पण खरीखुरी एकरूपता अनुभवायची असेल तर टिटू अहलुवालियांच्या घरी जायला हवे. कडय़ावरच्या बंगल्यात.

अहलुवालियांचं घर थेट कडय़ावरच बांधलेले. म्हणजे घराच्या कोणत्या गवाक्षात उभे राहा, खाली दरी, लांबवर पसरलेली नारळी-पोफळीची झाडं आणि त्यापुढे अथांग अरबी समुद्र. पण अगदी जवळून पाहायचं ठरवलं तरी हे घर मात्र सहजी दिसणार नाही. इतकं ते तेथील निसर्गात मिसळून गेलंय. निसर्गाच्या सान्निध्यात या केवळ जाहिरातीतच दिसणाऱ्या शब्दाला शब्दश: जागणारा अहलुवालिया यांचा कडय़ावरचा बंगला आहे. ती जागादेखील निवडली त्यांनी स्वत:च. फार पूर्वी म्हणजे साधारण २९ वर्षांपूर्वी अहलुवालिया यांचा थळ येथे एक बंगला होता. पण वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तेथील बस्तान हलवायचं ठरवलं. वाहतुकीचा, इतर गर्दीचा कसलाही त्रास होणार नाही अशी जागा त्यांना हवी होती. तेव्हा फणसाड अभयारण्याच्या बाहेरील ही जागा त्यांच्या नजरेस पडली. अहलुवालिया सांगतात की, जणू काही देवानेच त्यांच्यासाठी ही जागा राखून ठेवली होती. त्वरित कागदपत्रांची पूर्तता करून कामाला सुरुवातदेखील केली. त्यांच्यामध्ये जात्याच निसर्गप्रेम ठासून भरलेले आहे. आपण जागा विकत घेतली म्हणून आलिशान महाल उभा करायला झाडं तोडून, खडकं फोडून हवं ते करू शकतो हे त्यांना कधीच पटणारं नव्हतं. त्यामुळे तेथील नैसर्गिक रचनेला कसलाही धक्का न लावता घर बांधायचं ठरलं. त्यामुळे न्हाणीघरात टब बसवलाय, पण तेथे असलेले मूळ खडक तसेच ठेवले आहेत. एखाद्या रिसॉर्टमध्ये जाणीवपूर्वक अशी रचना केली जाते पण ती कृत्रिम असते. त्यात आणि या बंगल्यात हाच तर मूलभूत फरक आहे.

02-real-estate-lp

नांदगाववरून मुरुडच्या दिशेने जाताना मुरुडच्या अलीकडे रोह्य़ाकडे जाणारा एक रस्ता आहे. त्याच रस्त्यावर फणसाड अभयारण्याच्या हद्दीच्या अलीकडे एक छोटासा रस्ता आत जातो. पूर्णपणे मातीचा कच्चा रस्ता. गेट ओलांडून जाताना कुत्र्यांपासून जपावे लागतेच. पण एकदा का तुम्ही आत गेलात की बाहेरच्या जगाचा संबंधच संपून जातो. जुन्या चित्रपटात असाव्यात अशा विटांच्या कमानीतून समोरच खुला आसमंत खुणावू लागतो. तर उजवीकडे अशाच कमानीतून बंगल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. पण बंगला काही जाणवत नसतो. जाणवणार तरी कसा. कारण तुम्ही उभे असता ते डोंगराच्या कडय़ावर आणि बंगला त्याच कडय़ावर खाली खाली उतरत गेलेला आहे. पहिल्या कमानीत प्रशस्त असा गोलाकार वऱ्हांडा, त्यामध्ये ठेवलेली काही कलात्मक भांडी, खास लाकडी खुच्र्या आणि चौथऱ्यावर लावलेली खास झाडं. विटांच्या त्या कमानीत जिवाला शांतता लाभते. दोन क्षण तेथे बसल्यानंतर मात्र लक्ष वेधून घेतो तो छोटेखानी तरणतलाव आणि त्या पलीकडे दिसणारी लांबलचक पसरलेली दरी, नारळी-पोफळीच्या बागा आणि क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र. तरण तलावाच्या बाजूला मस्त आरामखुच्र्या टाकलेल्या. एक-दोन ठिकाणी खास शेड तयार केलेली.

अहलुवालियांच्या बंगल्यात शिरण्यापूर्वीच त्यांची एकूणच निसर्गात मिसळून जाण्याची चुणूक पाहायला मिळते. कमानीतल्या पायऱ्या उतरून जाताना आपण नेमके कोठे जातोय हेच कळत नाही. पण एकदा का दरवाजा उघडून आत गेलात आणि बैठकीच्या खोलीत शिरलात की प्रशस्त अशा खिडक्यांमधून समोर जंगलाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. प्रशस्त अशा गच्चीवर तर वारा भणाणत असतो. पण हे सारं केवळ त्या मजल्यापुरतंच मर्यादित नसतं. तर लोखंडी गोलगोल जिन्याने खाली उतरलात की पुन्हा एक दिवाणखाना समोर येतो. निसर्गाची तीच भव्यता नजरेस पडते.

पण हे काहीच बाहेरून जाणवत नाही. कारण अहलुवालियांनी साऱ्या बंगल्यावर विविध वेलींची गुंफण केली आहे. वाघनखं नावाने ओळखली जाणारी वेल संपूर्ण घरावर चढवली आहे. भिंतीला घट्ट पकडून धरणारी तरीही दिसायला अत्यंत नाजूक अशी वेल सरसरत साऱ्या भिंतीवर पसरून जाते. ते कमी म्हणून की काय पण विविधरंगी बोगनवेलदेखील पसरली आहे. एकीकडे कडय़ाखालचे जंगल आणि घराभोवतीची ही वेलबुट्टी. सारा बंगलाच जंगलात बुडून जातो. अगदी तरणतलावापाशी उभं राहिले तरी नेमका विस्तार जाणवत नाही.

अहलुवालिया २९ वर्षांपूर्वी येथे आले. तेव्हा तर रेवदंडय़ाचा पूलदेखील झालेला नव्हता. आजच्यासारखं पर्यटनदेखील विस्तारलेलं नव्हतं. पण त्यांना या जागेने वेड लावलं होतं. त्यातूनच ही अनोखी रचना आकारास आली. शहरी झगमगाटापासून लांबवर घरं बांधताना अनेक जण डोंगराच्या पायथ्याशी जातात, पण थेट डोंगरातच घर बांधायची कल्पना अहलुवालियांनाच सुचू शकते.

03-real-estate-lp

देशातील सर्वात आघाडीच्या अशा ओआरजी मार्ग या सर्वेक्षण कंपनीचे चेअरमनपद त्यांनी भूषवलं. पण जगण्यात कृतार्थता होती. त्यामुळे ५५ वर्षीच म्हणजे २००४ साली त्यांनी त्यातून निवृत्ती स्वीकारली. ही निवृत्ती म्हणजे केवळ आराम करायचा अशी टिपिकल नाही. उलट त्यांच्या या बंगल्यात फेऱ्या वाढल्या. ज्या जागेने, परिसराने त्यांना इतकं काही दिलं त्याबद्दलची कृतज्ञता होतीच, त्यातूनच त्यांनी अंशू फाउंडेशन ही संस्था सुरू केली. कॅन्सरग्रस्त गरीब मुलांच्या उपचारासाठी प्रामुख्याने ही संस्था काम करायची. आता ते नांदगाव, सुपेगाव परिसरातील मुलांच्या विविध कलागुणांना विकसित करायचे कामदेखील करत आहेत. येथील शालेय मुलांसाठी काम करणारे सुदीप आठवलेसारखे कार्यकर्ते त्यांना मिळाले. गेली दहा वर्षे ही संस्था या भागात काम करतेय. तर दुसरीकडे ते स्वत: निसर्गाच्या ओढीने ऑर्गेनिक फार्मिगच्या व्यवसायात उतरले आहेत. तरीदेखील महिन्यातूून पंधरा दिवस येथे आल्याशिवाय त्यांना करमतच नाही. प्रापंचिक अडचणी नसत्या तर पंचवीस दिवस इथेच राहण्यात आनंद वाटला असता.

अहलुवालियांच्या घरात यच्चयावत सुविधा आहेत. पण त्यात भपकेबाजपणा नाही. दिखावा नाही. झगमगाट तर अजिबातच नाही. त्यामुळेच तरणतलावापाशी रात्रीच्या वेळी लागणारे दिवे तेथील एकूणच गूढतेला आगळेवेगळे सौंदर्य देऊन जातात. त्या जागेची एक वेगळीच अनुभूती आहे, ती शब्दात मांडणे अशक्य असते अशी त्यांची भावना. अहलुवालिया सांगतात की, ही जागा देवाने जणू त्यांच्यासाठीच ठेवली होती. त्या घराने त्यांना शांतता दिली, धैर्य दिले. निसर्गाने त्यांना जे भरभरून दिलं त्याबद्दल त्यांच्या मनात अपार कृतज्ञता दाटलेली असते. त्याच जाणिवेतून जेव्हा ते येथे असतात तेव्हा सूर्यास्ताला सागरात बुडणाऱ्या सूर्याची प्रार्थना करतात. छोटासा मंत्रोपचार. पण देवाकडे काहीही न मागता. त्यात असते केवळ कृतज्ञता. निसर्गाने भरभरून पदरात टाकलेल्या त्या अनुभूतीसाठी मनापासून दिलेले धन्यवाद.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2