साहित्यप्रेमी भगिनी मंडळ (पुणे) या संस्थेतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित स्त्रीसाहित्य संमेलनात ‘स्त्रीसाहित्याचा मागोवा (खंड- ४ :
२००१-२०१०)’  हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचे संपादन डॉ. मंदा खांडगे, डॉ. नीलिमा गुंडी आणि डॉ. ज्योत्स्ना आफळे यांनी केले आहे. या ग्रंथाच्या डॉ. नीलिमा गुंडी लिखित प्रस्तावनेतील संपादित अंश..
सा हित्य हे स्त्रीच्या कलात्मक सर्जनशीलतेचे एक रूप आहे. त्यामुळे हा खंड म्हणजे आपल्याकडील स्त्रीच्या कलात्मक सर्जनशीलतेच्या विकसनशीलतेचा पुरावा मानायला हवा. अर्थात आधुनिक स्त्रीसाहित्याच्या आधीच्या दीडशे वर्षांचा भक्कम आधार या विकासामागे आहे. तसेच १९७५ च्या सुमारास सुरू झालेल्या स्त्री-चळवळींच्या प्रभावाचा हा काही अंशी परिपाकही आहे. समकालीन भौतिक-सांस्कृतिक पर्यावरणातील काही विधायक घटकांचीही त्याला जोड मिळाली आहे. परिणामत: २००१ ते २०१० हा कालखंड स्त्रीसाहित्याच्या लोकशाहीकरणाचा कालखंड मानता येईल. लोकशाही व्यवस्थेत सामान्य व्यक्तीची अस्मिता फुलून येते. व्यक्तीला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे केंद्र आणि त्यातील सुप्त ऊर्जा जाणवू लागते. त्यामुळे व्यक्तीच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. हा अनुभव आपल्या साहित्यक्षेत्रात विविध सामाजिक स्तरांमधील स्त्रीला येण्यासाठी नवे सहस्रक उजाडावे लागले. या खंडाच्या निर्देशसूचीकडे नुसता धावता दृष्टिक्षेप टाकला तरी त्यातील लेखिकांचे वाढते संख्याबळ आणि सर्वच स्तरांतील स्त्रियांचा लेखनाकडे वळण्याचा वाढता ओघ लक्ष वेधून घेतो. ही वस्तुस्थिती म्हणजे एक महत्त्वपूर्ण घटनाच आहे.
‘स्त्रीसाहित्याचा मागोवा : खंड ४’मध्ये कथा, कादंबरी, काव्य, नाटक व एकांकिका, ललितगद्य, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, वैचारिक गद्य, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य, संपादन (पुस्तके व नियतकालिके), संकीर्ण आणि अनुवाद अशा प्रकारांविषयीचे लेख समाविष्ट आहेत. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, डॉ. अरुणा दुभाषी, डॉ. गीता काटे, डॉ. भारती निरगुडकर, डॉ. सुषमा पौडवाल, डॉ. अनघा भट, डॉ. कीर्ती मुळीक, डॉ. वैखरी वैद्य, डॉ. अंजली जोशी, रूपाली शिंदे, विजया चौधरी, शिरीन कुलकर्णी, सुजाता शेणई, डॉ. शोभा पाटील, रूपाली अवचरे व डॉ. प्रतिमा इंगोले यांचे लेख त्यात आहेत.
समकालीन वास्तव आणि स्त्रीची परिदृष्टी
२००१ ते २०१० हा कालखंड १९९० नंतर सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर लक्षात घ्यावा लागतो. खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या आर्थिक व राजकीय क्षेत्रांतील धोरणांमुळे या कालखंडात सामाजिकदृष्टय़ा गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेले दिसतात. हा कालखंड एकीकडे भौतिक सुखाच्या अनेक संधी उपलब्ध करून देणारा कालखंड आहे. तंत्रवैज्ञानिक प्रगतीतून झालेल्या ‘डिजिटल क्रांती’मुळे जग जवळ आल्याचा दिलासा देणारा कालखंड आहे. आणि दुसरीकडे वाढती विषमता, आभासी जगाचे मायाजाल, वाढते अस्मितेचे प्रश्न, सांस्कृतिक सपाटीकरण आदींमुळे अस्वस्थ करणाराही कालखंड आहे. या कालखंडातील व्यक्ती आणि समाज यांच्या नात्यातील वाढती गुंतागुंत, स्त्री-पुरुष नात्यांतील नवनवे पेच, तसेच सामाजिक वास्तवातील अंतर्विरोध (उदा. संप्रेषणाची साधने मुबलक, पण परस्परसंवाद कमी) हे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यातच युद्ध, दहशतवाद, धार्मिक उन्माद यामुळे निर्माण होणारी हिंसा, सार्वत्रिक भयग्रस्तता आणि पर्यावरणविषयक चिंता या प्रश्नांचीही भर पडली आहे. अशा अनेकविध स्वरूपाच्या समस्याप्रधान वास्तवाला कलात्मक ताकदीनिशी भिडणे हे कोणत्याही कलावंतासाठी आव्हानच ठरावे. अशावेळी आपल्याकडील काही लेखिकांनी जागतिकीकरणाच्या वास्तवावरही भाष्य केले आहे, हे महत्त्वाचे आहे. मल्लिका अमरशेख, प्रज्ञा दया पवार, नीरजा, प्रतिमा इंगोले, कविता महाजन, नीलम माणगावे, कल्पना दुधाळ, प्रतिमा जोशी आदींचा येथे उल्लेख उदहारणादाखल करता येईल.
स्त्रीवादाने वैचारिकदृष्टय़ा नांगरलेली भूमी यामागे आहे, हे लक्षात घ्यावे लागते. पुरुषसत्ताक समाजरचनेत लिंगभाव (जेंडर) भेदामुळे स्त्रीला अनेकदा सामाजिक पातळीवर समतेची वागणूक मिळत नाही. या अन्यायाची जाणीव करून देणारे व त्याचा प्रतिकार करणारे तत्त्वज्ञान स्त्रीवादातून मांडले गेले. स्त्रीवाद हा एक प्रकारे विविध ज्ञानशाखांकडून मर्मदृष्टी घेऊन तयार झालेला विचारव्यूह आहे. स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहू जाता भाषेपासून समीक्षेपर्यंतचे साहित्यातील सारेच प्रांत नव्या उजेडात दिसू लागतात. त्यातून वाचकाला संघर्षशील असे भान प्राप्त होते. या कालखंडातील कथा, कादंबरी, काव्य, आदी ललित साहित्यात तसेच वैचारिक साहित्यातही स्त्रीवादाचा प्रभाव आढळतो.
तसे पाहिले तर दहा वर्षे हा कालखंड खूपच लहान आहे. पण त्या कालखंडाचे वजन- काही बाबतींत ओझेही जबरदस्त आहे. बदलत्या सहस्रकाने मानवी जन्मापासून पृथ्वीच्या निर्मितीपर्यंतच्या अनेक रहस्यांना स्वत:च्या देखरेखीखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तीच्या जगण्याचा वेगच नव्हे, तर पोतही बदलत चालला आहे. उदाहरणार्थ, फक्त कुटुंबसंस्थेच्या पातळीवरून विचार केला तरी याचे प्रत्यंतर येईल. एकत्र कुटुंबव्यवस्था, विभक्त कुटुंबपद्धती, घटस्फोटामुळे एकेरी पालक असणारे कुटुंब, लिव्ह-इन् रिलेशनशिप, डिस्टन्स रिलेशनशिप, वृद्धाश्रम अशा विविध अवस्थांतरांचा त्यात समावेश झाला आहे. अशी अवस्थांतरे एकेकाळी दृढमूल कुटुंबसंस्था असणाऱ्या व्यवस्थेत अनुभवणे ही गोष्ट केवळ लेखनविषय पुरवणारी या पातळीवरची राहत नाही. बदलत्या परिस्थितीतही पाडय़ावरच्या स्त्रीचे होणारे लैंगिक शोषण असेल वा कॉपरेरेट क्षेत्रातील स्त्रीला येणारा ‘ग्लाससीलिंग’चा अनुभव असेल; सर्वच स्तरांवर स्त्रीच्या वाटय़ाला असुरक्षितता टिकून राहिली आहे. अशावेळी साहित्य ही समाजाची सर्वात मोठी सांस्कृतिक गरज असते, साहित्याचे समाजाशी काही नाते असते, हे लक्षात घेऊन समकालीन वास्तव स्त्रीच्या परिप्रेक्ष्यातून कसे टिपले गेले, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच हा प्रकल्प हाती घेतला गेला. अर्थातच या कालखंडात लेखिकांच्या कलादृष्टीचा विकास कसकसा झाला, त्यांच्या आशयविश्वाचा परीघ किती व्यापक झाला, याचा वेध घेण्याचा प्रयत्नही या प्रकल्पातून साध्य होणार आहे. गेल्या वीस वर्षांत डॉ. मंदा खांडगे यांच्या नेतृत्वाखाली साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने स्त्रीसाहित्याच्या स्वतंत्र अभ्यासाचा पाया घातला आहे याची नोंद येथे घ्यायला हवी.
ग्रंथाची उपयुक्तता
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये स्त्री-अभ्यास केंद्रे सुरू झाली आहेत. स्त्री-अभ्यास केंद्र हे आंतर-विद्याशाखीय अभ्यासाचे केंद्र असते. या ग्रंथात समाविष्ट असलेला गेल्या दशकातील स्त्रीसाहित्याचा अभ्यास म्हणजे इतर अनेक शास्त्रांसाठी तसेच स्त्री-अभ्यास केंद्रासाठी उपयुक्त अशी सामग्री आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, भाषांतरशास्त्र, तौलनिक साहित्यशास्त्र, मानववंशशास्त्र, शैलीशास्त्र अशा इतर शास्त्रांकडून मिळणारी मर्मदृष्टी घेऊन या अभ्यासाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासातील अभिरुचीविषयक वळणे तपासणे, साहित्यमीमांसा करणे आदी वाङ्मयीन तसेच साहित्याच्या समाजशास्त्राशी निगडित प्रश्नांचा विचार करतानाही या ग्रंथाचा उपयोग होणार आहे.
स्त्रीसाहित्य हा एक महत्त्वाचा प्रवाह आहे. अकादमिक क्षेत्रात विविध वाङ्मयप्रवाहांचा स्वतंत्रपणे विचार करण्याची पद्धत असते. त्या-त्या प्रवाहाचा सखोल अभ्यास व्हावा, ही भूमिका त्यामागे असते. ही भूमिका म्हणजे अलगतावाद नव्हे. आमच्या प्रकल्पामागची भूमिकाही स्त्रीसाहित्य या प्रवाहाला अधिकाधिक न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची अशीच आहे. त्यामागे स्त्रीसाहित्याची वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न नाही. समग्र साहित्यविश्वात स्त्रीसाहित्याचे योगदान लक्षात घेण्यासाठी परिपूर्ण अशा संदर्भग्रंथाची गरज पूर्ण करण्याची विधायक भूमिकाच यामागे आहे. खरे तर स्त्रीसाहित्यासाठी अध्यासन निर्माण करून त्याद्वारे स्त्रीसाहित्याच्या वर्णनात्मक सूचीचे काम दरवर्षी होणे गरजेचे आहे. एकंदरीत या संपूर्ण ग्रंथाचा विचार करता असे लक्षात येते की, स्त्रीसाहित्याच्या सर्वागीण विस्ताराच्या आणि विकसनशीलतेच्या खुणा या गं्रथामध्ये उमटल्या आहेत. तसेच स्त्रीसाहित्याच्या विविधांगी क्षमतेचा मागोवा घेताना अभ्यासकांनी त्याचा चिकित्सकपणे, तटस्थपणे केलेला अभ्यासदेखील यात समाविष्ट झाला आहे; हे अर्थातच विशेष महत्त्वाचे आहे. या अभ्यासातून स्त्रियांच्या वाङ्मयीन योगदानाची दखल घेतानाच त्यांना मार्गदर्शनही केले गेले आहे. तेही उपयुक्त ठरावे असेच आहे. एकंदरीत स्त्रीचे बदलते संदर्भविश्व, त्यातून आकाराला येणारे विचारविश्व आणि त्यामुळे घडत जाणारा तिचा संवेदनस्वभाव याचे प्रातिनिधिक दर्शन यातून ठळकपणे घडते. हे दर्शन अभ्यासकांप्रमाणेच लेखिकांनाही मार्गदर्शक ठरेल आणि सर्वसामान्य वाचकांना (त्यात स्त्री व पुरुष दोहोंचा समावेश गृहीत आहे!) नवी मर्मदृष्टी देणारे ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो. या ग्रंथामुळे स्त्री-साहित्याविषयीचे वाचकांच्या मनातले अपेक्षांचे क्षितीज विस्तारत राहील याविषयी आम्हाला खात्री वाटते. स्त्रीसाहित्यात प्रतिबिंबित झालेले ‘ती’चे अवकाश व्यापक होत चालले असून ‘ती’ समग्र जीवनाचा वेध वृत्तीगांभीर्याने घ्यायला कलात्मक सामर्थ्यांनिशी सिद्ध होत असल्याचे आश्वासक चित्र या ग्रंथाद्वारे समोर येत आहे. स्त्रीसाहित्याचा हा प्रवाह उत्तरोत्तर अधिकाधिक सखोल, गतिमान आणि जीवन समृद्ध करणारा ठरावा, हीच शुभेच्छा!

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी