गेल्या शतकातले एक प्रसिद्ध शिक्षक गो. चि. भाटे यांनी प्रवासवर्णने मोठय़ा संख्येने लिहिली. जवळजवळ अख्खा हिंदुस्थान त्यांनी बघितला असे म्हणता येईल. त्या प्रवासवर्णनांखेरीज (एकू ण १०-१२) अर्थशास्त्राची मूलतत्त्वे, समाजशास्त्रावरील व्याख्याने, सज्जनगड व समर्थ रामदास, चरित्र पंचक, नागरिकत्वाची कल्पना, उपरोक्त पुस्तक आणि अर्वाचीन वाङ्मयाचा इतिहास एवढी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.
प्रस्तुतच्या पुस्तकात त्यांनी कार्लाईलचे तत्त्वज्ञान (विचार-कथा या पुस्तकाद्वारे मांडलेले) व हिंदू चालीरीती (किंवा कर्मकांड) यांच्याशी त्याची उपयोगिता मांडली आहे.
प्रथम प्रकरणात त्यांनी कार्लाईलचे चरित्र थोडक्यात दिले आहे. त्यातली माहिती बहुसंख्य वाचकांना उपयोगी पडेल. कार्लाईलने फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास (आठ खंड) क्रॉमवेलची पत्रे व ऐतिहासिक टिपणे; फ्रेडरिक दी ग्रेटचे चरित्र (आठ खंड) भूतकाळ आणि वर्तमान (ढं२३ & ढ१ी२ील्ल३) विभूती व विभूती पूजा अशी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली.
विचार कथा हे पुस्तक त्याने ‘रूपक’ हा घाट स्वीकारून लिहिले. पुढे अत्यंत गाजलेले हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्याला फार कष्ट पडले होते. मानवी आयुष्याच्या इतिकर्तव्यतेबद्दलचे विचार त्याने यात मांडले. ते त्यावेळच्या ब्रिटिश विचारसरणीच्या विरोधात होते, म्हणून सुरुवातीस त्याला ब्रिटनमध्ये यश
मिळाले नाही.
‘विचार कथा’ लिहिताना आपण एका पुस्तकाचा अनुवाद करतो आहोत असा आभास त्याने निर्माण केला. या तथाकथित ‘मूळ’ लेखकांचे चरित्र सांगताना स्वत:च्या आयुष्यातले काही प्रसंगही त्याने घातले असे मानले जाते.
या पुस्तकातली कार्लाईलची विचारसरणी या स्तंभाच्या शब्दमर्यादेत देणे अवघड आहे. त्यामुळे त्या विचारांची रूपरेखा समजू शकेल असा मजकूर देत आहे-
‘‘मनुष्याच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो की तेव्हा मी कोण, कोठून आलो व मला जावयाचे कोठे वगैरेसारखे तात्त्विक प्रश्न त्याच्यापुढे उभे राहतात. असे प्रश्न मनापुढे आले म्हणजे जग व त्या जगातील दिक् व काल ही सर्व आवरणे आहेत. त्यांच्या आत एक आत्मिक तत्त्व आहे व त्या तत्त्वाचाच आपला आत्मा हा एक अंश आहे’’ (पृ. ६४). ‘‘धार्मिक पोशाख म्हणजे मनुष्यांनी आपल्या अंत:करणात असलेल्या धर्मतत्त्वांच्या आविष्कारासाठी वेळोवेळी अस्तित्वात आणलेली दृश्यस्वरूपे हल्लीच्या काळी धार्मिक कपडे अगदी फाटून गेले आहेत.— त्या कपडय़ांचा खरा द्योतक पणा नाहीसा होऊन ते कपडे म्हणजे निर्थक पोकळ आकृती बनल्या आहेत.’’ (पृ. ६८)
‘‘समाज ही संस्था कालाप्रमाणे अविनाशी आहे- ती कधीही मरत नाही; तिच्या रूपात फरक होत जातो व तो नेहमी प्रगतीपरच असतो. म्हणून जुने कपडे, जुन्या संस्था, जुन्या चालीरीती काताप्रमाणे टाकून समाज नवीन नवीन काळाला व प्रगतीला अनुरूप अशा संस्था अस्तित्वात आणत असतो. त्यालाच समाजाचे पुनरुज्जीवन असे म्हणतात’’ (पृ. ७३)
‘‘हल्ली धर्म किंवा प्रार्थनामंदिरे नाहीत व हल्ली धार्मिक उपदेशक नाहीत असे तुम्ही म्हणता. पण मी म्हणतो, प्रत्येक गावात एक उपदेशक येऊन राहतो. तो आपले प्रार्थनामंदिर बांधतो व त्याला तो वर्तमानपत्र हे नाव देतो. मानवी मुक्तीकरिता महत्त्वाच्या महान महान तत्त्वांचा तो उपदेश करतो. तो तुम्ही ऐकता व त्यावर श्रद्धा ठेवता. रूढीने उत्पन्न केलेले आभास व तिच्या हातचलाखीचे खेळ असंख्य आहेत. परंतु या सर्व खेळातील चतुराईचा खेळ म्हणजे खरोखरी चमत्काराची गोष्ट वारंवार पाहून ती चमत्कृतीहीन आहे असे भासविणे. (पृ. ७८)
अद्भुततेला लपविणारे व आभास उत्पन्न करणारे मूलभूत व जगाला आवरण करणारे जर कोणते दोन दृश्य पदार्थ असतील तर ते म्हणजे दिक् / आकाश व काळ. ते आपल्या जीवात्म्याच्या इहलोकातील वस्तीकरता तयार केलेले असतात. ते सर्वव्यापी असून त्यांच्याच योगे या मायामय जगातील लहानसहान आभास उत्पन्न होतात.’’
कार्लाईलच्या विचारकथांची सविस्तर ओळख करून दिल्यावर प्रा. भाटे निष्कर्ष सांगतात: ‘‘कार्लाईलच्या प्रगतिपर तत्त्वाचा इत्यर्थ हा की समाजातील चालीरीती, आचारविचार, विधिसंस्था, यांची दोन अंगे असतात- अंतरंग व बहिरंग. प्रथमत: या गोष्टी समाजात प्रसृत होतात, त्या वेळेस त्यामध्ये संवाद किंवा अनुरूप्य असते. पण कालेवरून त्या गोष्टीचे अंतरंग बदलते. मग अंतरंग व बहिरंग यात विसंवाद किंवा विरोध निर्माण होतो. म्हणजे बहिरंग हे दाणा काढून टाकलेल्या फोलाप्रमाणे होत.. फोलाला चिकटून बसण्याची वृत्ती म्हणजे म्हणजे समाजाची मृतावस्थाच होय.’’
या प्रास्ताविकानंतर ते पुढे म्हणतात की, हे तत्त्व हिंदू समाजातील काही धार्मिक व सामाजिक चालीरीतींना उत्तम तऱ्हेने लागू पडते.
चालीरीतींचे अंतरंग बदलणे म्हणजेच त्या चालीरीतींचे पुनरुज्जीवन करणे. या दृष्टीने उपनयन (मौजी), विवाह व अंत्यसंस्कार या तीन महत्त्वाच्या प्रसंगी केले जाणारे विधी, त्यांच्यामागची मूळ कल्पना, बदलत्या परिस्थितीत त्यातले कुठले उपचार संदर्भहीन झाले आहेत व त्यामुळे या तीन महत्त्वाच्या घटनांच्या वेळी कोणते आचार सुटसुटीतपणे पाळणे इष्ट होईल याचे विवेचन प्रा. भाटे यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी वेदातील सूत्रे, मनुस्मृती इत्यादींचे दाखले दिले आहेत.
उपनयन विधीबाबत ते सांगतात- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिन्ही वर्णात उपनयन करणे एकेकाळी अत्यावश्यक होते. विशिष्ट वयापर्यंत उपनयन न झाल्यास ‘आर्यत्वा’ला मुकण्याचा प्रसंग ओढवत असे. मुलींचेही उपनयन होत असे. मात्र बालविवाहाची प्रथा पडल्यावर ते बंद झाले. आर्य धर्माचे लक्षण म्हणून उपनयन विधी कायम ठेवायचा असल्यास हिंदू समाजाने आर्य समाजपंथी लोकांचे अनुकरण केले पाहिजे.
याच पद्धतीने पुढच्या प्रकरणात विवाह सोहळ्याातील सीमान्तपूजन, कन्यादान, सप्तपदी, लाजाहोम, सूत्रवेष्टन, कंकणबंधन, मंगलसूत्रबंधन इत्यादी विधींचे मूळ कशात आहे, त्यासंबंधी वेगवेगळ्या मंत्रांचे उच्चारण कसे होई याचे तपशील त्यांनी दिले आहेत. (ते असेही सांगतात की, विवाह झाल्यावर वधु-वर स्वतंत्रपणे संसार करू लागण्यापूर्वी तीन रात्री तरी ब्रह्मचर्य दोघांनी पाळावे असे सांगितले गेले आहे.) सीमान्तपूजन हा विधी बराचसा कालबाह्य़ झाल्याचे ते नमूद करतात. पुढे ते सांगतात, आपल्या विवाह विधीत पती-पत्नीचा संबंध मित्रत्वाचा मानलेला आहे. या बाबतीत हा आर्य विधी ख्रिश्चन विधीपेक्षाही उदात्त आहे. त्या (ख्रिस्ती) विधीमध्ये स्त्रीला स्वातंत्र्य दिलेले नाही. तिला ‘‘मी नवऱ्याची आजन्म सेवा करीन व त्याच्या आज्ञेत राहीन अशी शपथ घ्यावी लागते. ही शपथ हीनत्वदर्शक आहे असे युरोपातील स्त्रिया म्हणू लागल्या आहेत’’(१२८)
मृत्युपश्चात करावयाचे विधी, वेगवेगळी श्राद्धे, दाने, प्रायश्चित्ते याबाबत पूर्वापार चालत आलेल्या प्रथा आणि त्याच्या मुळाशी असलेल्या कल्पना यांचा विस्तृत ऊहापोह पुढच्या प्रकरणात येतो. हिंदू समाजात जशी प्रायश्चित्ते व दानांची प्रथा होती, तशीच रोमन कॅथॉलिकात माफीपत्रांची होती. त्यावरही ते टीका करतात. ‘‘अंत्यविधीतली हजारो प्रायश्चिते, हजारो दाने, पाथेयश्राद्ध, वैतरणी धेनुदान वगैरे प्रकार बंदच केला पाहिजे. मनुष्याच्या मरणानंतर त्याच्या सर्व आप्तेष्टांनी एकत्र जमून मृताच्या गुणांचे स्मरण करावे, त्याच्या आत्म्याला सद्गती मिळो अशी प्रार्थना करणे दहनाधी विधी केल्यावर पुन्हा एकदा परमेश्वराची प्रार्थना करणे इतके साधे स्वरूप अंत्यविधी येईल तरच ते समंजस माणसाच्या संस्कृत कल्पनांशी
संवादी होईल.’’
वर्णव्यवस्था/जातिभेद या प्रकरणात पुरुष सूक्तावर ते कडाडून टीका करतात. ‘‘पुष्कळ अर्वाचीन विद्वान चातुवर्ण्य मया सृष्टं गुण कर्म विभागश:’’ याचा अर्थ असा करतात की, समाजातील वर्ण हे गुणावरून (मनुष्याचा स्वभाव) व कर्मावरून (त्याची वागणूक) केलेले आहेत.’’ पण तो त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते, गीतेने जन्मावरूनच वर्ण ठरतो असे मांडले आहे.
प्रस्तुत पुस्तकातील भाटे यांची मते ही १०० वर्षांपूर्वीची आहेत व ती एका ब्राह्मणानेच लिहिलेली आहेत हे लक्षात घेता त्यांचे प्रागतित्व ठसते.
लेखक व प्रकाशक- गोविंद चिमणाजी भाटे- प्राचार्य (तत्कालीन) विलिंग्डन कॉलेज, सांगली. प्रथमावृत्ती- १९२०, मूल्य दीड रुपया.

-मुकुं द वझे
vazemukund@yahoo.com

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)