सायकलवरून रपेट मारून साजरी केलेली दिवाळी पहाट असो वा २६/११ च्या दिवशी शहिदांना आदरांजली म्हणून काढलेली सायकल रॅली असो. दक्षिण मुंबईतल्या तरुणाईला या निमित्ताने एकत्र आणून सायकलसारख्या इको फ्रेंडली वाहनाचा प्रचार करण्याचं काम काही तरुण करत आहे. पेडल फॉर जॉय या त्यांच्या उपक्रमाविषयी..

एक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून संघटित झालेला तरुणांचा एक गट सध्या ‘पॅडल फॉर जॉय’ या बिरुदावलीने काही हटके उपक्रम राबवतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर जुनीच तरीही नव्याने स्टार झालेली सायकल वाहतुकीचं साधन म्हणून नव्याने उपयोगात आणली जावी यासाठी या तरुणांचा प्रयत्न सुरू आहे. सायकल चालवण्याचा अनुभव अधिक आनंददायी व्हावा म्हणून गिरगावात राहणारा संकेत सुभेदार आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी हा इनिशिएटिव्ह घेतलाय. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या तरुणाईने त्यांच्या या उपक्रमाला दाद द्यायला सुरुवात केली आहे.
vv19 पेडल फॉर जॉयच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करून सायकलसारख्या पर्यावरणप्रेमी वाहनाचा प्रचार करण्याचं ते काम करतात. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झाली तेव्हा या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूने त्यांनी ‘सायकल रॅली’चं आयोजन केलं होतं.
गिरगावातून सकाळी ६ च्या सुमारास त्यांची ही रॅली निघाली. कामा हॉस्पिटल, सी. एस. टी. स्टेशन, ताज महाल हॉटेल, ट्रायडंट हॉटेल या स्थळांना भेटी देऊन अखेरीस गिरगाव चौपाटीच्या कै. तुकाराम ओंबाळे यांच्या पुतळ्याला वंदन करून त्यांनी रॅलीची सांगता केली. या रॅलीत सहभागी झालेला ऐरोलीचा सायकल चालक रवी पाडोळे  या रॅलीविषयीचं त्याचं मत सांगताना म्हणाला, ‘२६/११च्या हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली वाहण्याचा हा नक्कीच वेगळा मार्ग होता.’

vv20यापूर्वीही संकेत सुभेदार याने ‘इको फ्रेंडली दिवाळी’ साजरी करण्याच्या हेतूने अशाच एका रॅलीचं आयोजन केलं होतं. संकेत आणि त्याचे मित्रमैत्रिणी मेसेजेस आणि फोन करण्याऐवजी दिवाळी पहाटेला एकत्र जमले. गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइन्ट आणि नरिमन पॉइन्टहून परत गिरगाव चौपाटीपर्यंत त्यांनी सायकल चालवली होती. संकेतच्या इको फ्रेंडली सेलिब्रेशनचा हेतू त्याचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना निरोगी आणि आनंददायी वातावरणात एकत्र आणणे असा होता.
सर्जनशीलतेतून सजग होत जाण्याचा हा प्रयत्न दोन्ही गोष्टी नक्कीच स्तुत्य आहेत. ही आनंदयात्रा अशाच नवनव्या योजनांच्या वाटा शोधत राहो, हीच सदिच्छा!
    
संकेत आणि त्याच्या या मित्रमैत्रिणींचं ‘पॅडल फॉर जॉय’ या नावाचं एक ऑफिशियल फेसबुक पेज आहे. तिथे त्याने सायकल सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने काही टिप्सही दिलेल्या आहेत. त्यातल्या काही टिप्स :
* जिथे सायकल पार्क कराल तिथे सायकलच्या कमीत कमी दोन भागांना लागून असलेला एक उभट सपोर्टर असायला हवा.
* कमी दृश्यमान क्षेत्रात सायकल पार्क करताना किमान दोन कुलुपं लावावीत.
* केबल/ कॉम्बिनेशन लॉक वापरून सायकलचं पुढचं चाक सुरक्षित ठेवता येईल.
*  ‘रिअर फ्रेम ट्रँगल’ वापरून सायकलचं मागचं चाक सुरक्षित ठेवता येईल.
=========